बोधी नाट्य परिषदेचा महोत्सव -२०१०

0
51


बोधी नाट्यमहोत्सव मुंबईमध्ये अलिकडेच साजरा झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी नाटककार शफाअत खान यांनी उद्बोधक भाषण केले. त्याचे शब्दांकन, आदिनाथ हरवंदे यांचा वृत्तांत आणि या महोत्सवाचे कर्ते प्रेमानंद गज्वी यांची राजीव जोशींनी घेतलेली मुलाखत असा तिपेडी मजकूर येथे सादर करत आहोत.

बोधी नाट्य परिषदेचा महोत्सव -२०१०

आता तुम्ही पाहिलेत ते नाटक होते!

– आदिनाथ हरवंदे

बोधी नाट्य परिषद २२ नोव्हेंबर 2003 रोजी स्थापन झाली. परिषदेने सात वर्षांत दोन नाट्यमहोत्सव आयोजित केले. त्या दोन नाट्यमहोत्सवांत निवडक दहा नाटकांचे प्रयोग झाले. २००७ मध्ये पहिला नाट्यमहोत्सव पार पाडल्यानंतर २००८ मध्ये खंड पडला. २००९ आणि या वर्षीचा (२०१०) तिसरा असे महोत्सव सलग घडून येत आहेत.

शफाअत खान यांनी यावर्षीच्या बोधी नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन केले. ते म्हणाले, “केवळ करमणूक असा दृष्टिकोन बाळगणा-या प्रेक्षकांनी विनोदी नाटकांना आसरा दिला. परिणामस्वरूप विनोदी नाटकांची मांदियाळी झाली. त्या दरम्यान विनोदाची पातळी घसरली. आता केवळ विनोदासाठी विनोद निर्माण होतो.”

नाटक हा प्रकार गर्दीसाठी असतो हे विषद करताना शफाअत खान ह्यांनी युरोपातील प्राचीन उदाहरण दिले.
अथेन्सच्या बाजारात एक नाट्यप्रयोग झाला होता. ऐन गर्दीच्या वेळी नाटकातील पात्रे विखुरली गेली होती. प्रयोग सुरू झाला. एकेक पात्र पुढे येऊन आपापली भूमिका निभावू लागले. प्रयोग संपल्यानंतर दिग्दर्शकाने बाजारात जमलेल्या मंडळींना सांगितले, की “आता तुम्ही पाहिलेत ते नाटक होते!”

भांबावलेले प्रेक्षक भानावर आले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला!

बोधी ह्या शब्दातच ज्ञान आहे. पण ते साधेसुधे नव्हे तर ‘सम्यक ज्ञान’! ह्या अर्थाला अनुसरून बोधीचे कार्य सुरू आहे. कुठेही अडकून न पडता ‘बोधी’ आपल्या गतीने मार्गक्रमणा करत आहे. त्यामुळे नाट्यमहोत्सवाबरोबर ‘कथासंगिती’चे आयोजन करण्यात आले होते. बोधी नाट्य लेखन कार्यशाळेत नाटक वाचले जाते. ते वाचन नाटककारानेच करावे, असा कटाक्ष असतो. त्यानंतर नाट्यतज्ज्ञांशी चर्चा होते. तसेच स्वरूप ‘कथासंगिती’चे होते. त्यामध्ये या वर्षी डॉ. अमिताभ, प्रतिमा जोशी, धर्मराज निमसरकर, वामन होवाळ, प्रेमानंद गज्वी, डॉ. अनिल सकपाळ, नीरजा आणि राजन खान असे कथाकार एकत्र आले.

प्रत्येक कथावाचनानंतर त्या कथेवर विस्तृत चर्चा झाली. त्या चर्चेत अवधुत परळकर, नीलकंठ कदम, वामन तावडे, भारती निगुडकर, वि.शं.चौघुले इत्यादींनी सहभाग घेतला.

नाटक आणि कथा ह्या दोन्ही साहित्यप्रकारांनी माणसाला ज्ञान दिले पाहिजे. माणसाला डोळस केले पाहिजे अशी बोधी नाट्य परिषदेची भूमिका आहे. त्या ध्येयाने त्यांची वाटचाल सुरू आहे.

त्या दृ्ष्टीने कार्यरत असलेल्या बोधी नाट्य परिषदेने नवे आणि जुने असा समन्वय साधून, २०१० च्या महोत्सवासाठी ‘डॅम इट, अनु गोरे’, ‘गजरा’, ‘माऊली’, ‘आला रे राजा’ आणि ‘चौकट’ ह्या विविध विषयांवरील नाटकांची प्रयोगांसाठी निवड केली होती.

‘बोधी’च्या कार्यक्रमांना साहित्य आणि नाटक-सिनेमातील अनेकांची उपस्थिती असते. सात वर्षांतील ही कमाई अभिमानास्पद म्हणता येईल.

– आदिनाथ हरवंदे
adharwande@gmail.com
भ्रमणध्वनी : 9757104560आपण ज्ञान देतो म्हणजे काय देतो तर त्याला धीर देतो, जगण्याचं बळ देतो. त्यानं उभं राहवं असा प्रयत्न करतो. एक ना एक दिवस मी त्याला ‘साक्षात्काराचा क्षण’ दिल्यानंतर तो बदलेल, माझ्या मागे, माझ्या सोबत चालत येईल. ज्ञानाच्या रंगभूमीचं एवढंच काम आहे.

जगणं सेलिब्रेट केल्यासारखं का मांडू नये? : शफाअत खान

बोधी नाट्य परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी शफाअत खान यांनी केलेलं भाषण- सविस्तर स्वरूपात शब्दांकन –


बोधी नाट्य परिषदेच्या कार्यशाळांमध्ये नवीन नाटककारांच्या नाट्यवाचनाचे कार्यक्रम होणं, त्यावर नाटकाच्या सर्व अंगांची चर्चा होणं हे महत्त्वाचं, मोलाचं आणि अत्यंत कठीण काम आहे. यांपैकी काही कार्यशाळांमध्ये मी सहभागीही झालो आहे. नवीन लेखकाकडून, नाटककाराकडून नाटक लिहून घेणं, तेही अर्थपूर्ण नाटक लिहून घेणं, हे काम किती कठीण आहे हे रंगभूमीवर वावरणा-या रंगकर्मींच्या लक्षात येईल. नाटककारांचं आकलन वाढावं, त्यांची दृष्टी बदलावी, समाजातला सगळा गुंता त्याच्या लक्षात यावा आणि हे सगळे बदल त्याला नाटकात पकडता यावेत या अंगाने कार्यशाळांमध्ये चर्चा होत होती. आज समाजाची अशी अवस्था आहे, की कोणालाही काही अर्थपूर्ण नको आहे. हवी आहे ती एक सस्ती गंमत, सवंग मनोरंजन. किंबहुना हे करणं एवढंच नाटकाचं किंवा रंगभूमीचं काम आहे, अशी अनेकांची समजूत झालेली आहे. अशा वेळी अशक्य अशी गोष्ट बोधी नाट्य परिषद करत आहे. ती म्हणजे नाटकाचा गंभीर विचार!

तुम्ही एक नाटक चार लोकांसमोर वाचलं किंवा केलं तर, “तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे त्या नायकाला झालेलं दु:ख फार मोठं आहे, समस्याही फार मोठी आहे. त्याचं भोगणं खरं आहे. पण हे नाटक आम्हाला धरून ठेवत नाही” अशी प्रतिक्रिया मिळते. अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागणार आहे, हे आजच्या नाटककारांसमोरचं आव्हान आहे. त्यांना येत्या काही दिवसांमध्ये यातून काहीतरी मार्ग शोधावा लागणार आहे.

आपण आता पोस्ट मॉडर्न युगामध्ये जगत आहोत. आपण सगळ्या फिलॉसॉफीज, सगळे इझम या युगामध्ये नाकारत चाललो आहोत. मला सेलिब्रेट करायचं आहे ( याला शेमलेस सेलिब्रेशन असं म्हटलं जातं), ज्याला मी सुख समजत आहे ते सुख नाही, ते दु:ख आहे. ज्याला मी विकास समजत आहे तो विध्वंस आहे, हे आज कुणालाही समजावून घेण्याची गरज वाटत नाही. आर्थो नावाच्या नाटककाराने असं म्हटलं, “माझी खात्री आहे, की एक दिवस आकाश तुमच्या डोक्यावर कोसळणार आहे. मी तुम्हाला फक्त सावध करण्यासाठी नाटक लिहीत आहे” त्याच्या या वक्तव्यानंतर त्याला वेडा ठरवून डांबून ठेवण्यात आलं. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. परिस्थितीमध्ये बदल झाला आहे.

आपल्याला आज प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन हवं आहे. आता आईवर नुसतं प्रेम असून चालत नाही, तर त्यासाठी ‘मदर्स डे’ सेलिब्रेट करावा लागतो. ग्रीटिंग कार्ड द्यावं लागतं. फोटो काढून पेज थ्रीवर छापावे लागतात. वर्तमानपत्रांत मुलाखती द्याव्या लागतात, तेव्हा कुठं आईवर प्रेम आहे हे सिद्ध होतं. सेलिब्रेशनच्या या पद्धतीप्रमाणे जगभरच्या नाटकांची भाषाही बदलली आहे. आपण जेव्हा ‘ज्ञानाची रंगभूमी’ असा शब्दप्रयोग करतो तेव्हा इथं नाटक म्हणजे कंटाळवाणी, प्रचारकी, डोस पाजणारी अशी रंगभूमी आहे असं समजून अशा प्रकारच्या नाटकांना येणं लोकांना आवडत नाही. पण असं समजण्याचं कारण नाही. ‘स्पून फिडिंग’ करणं नव्हे; तर आजुबाजूचं पर्यावरण भारावून टाकणं, ज्ञान झिरपत ठेवणं, ज्ञानाची लालसा निर्माण करणं किंवा ज्ञानाचा शोध घ्यावा अशी स्थिती निर्माण करणं, हे ज्ञानाच्या रंगभूमीचं काम आहे. नाटक झाल्यावर त्यावर अत्यंत खुलेपणानं लोकांनी बोलावं, चर्चा करावी अशी सामाजिक स्थिती निर्माण करणं हे ज्ञानाच्या रंगभूमीचं काम असावं, अशी माझी धारणा आहे.


नाट्यलेखनाची प्रक्रिया दोन प्रकारची असते. एक म्हणजे थेट वास्तव मांडण्यासाठी म्हणून आपण लिहितो किंवा वास्तव वा जगणं दडवण्यासाठी. मराठीत मोठ्या प्रमाणावर जे साहित्य आहे ते दडवण्यासाठी लिहिलं गेलेलं साहित्य आहे. जे उघडपणे वास्तवाला भिडतं ते श्रेष्ठ साहित्य, ज्ञानाची रंगभूमी काहीही दडवत नाही, हातचं राखून ठेवत नाही. ती वास्तवाला भिडते. वास्तव आपल्याला उलगडून दाखवते. किंबहुना कुठल्याही चांगल्या नाटकाचं ते कर्तव्यच आहे.


कोणतंही नाटक होताना ‘मोमेण्ट ऑफ ट्रुथ’ किंवा साक्षात्काराचा क्षण असं ज्याला आपण म्हणू तो खूप महत्त्वाचा असतो. एकाच वाक्याची झेन गोष्ट मला आठवते, “साक्षात्कारापूर्वी मी लाकड तोडत होतो आणि साक्षात्कारानंतरही मी लाकडं तोडत होतो.” साहित्य, कविता, नाटकांमुळे असे कुठले मोठे बदल समाजात होतात असं कोणी विचारत असेल तर त्याचं उत्तर, ‘ते या गोष्टीएवढंच’ असं आहे. म्हणजे, साक्षात्कारानंतर त्यानं फर्निचरचं दुकान काढलं नाही. पण आता लाकूड तोडणं त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं करता येऊ लागलं! तोडण्याची कला त्याच्या लक्षात आली. लाकूड तोडताना तो दमत नाही, त्याला आनंद वाटतो, तो लाकूड तोडणं एन्जॉय करतो. लाकडाच्या तुकड्यात त्याला काही आकार दिसला तर तो आवडीनं झोपडीत नेऊन मांडतो. या साक्षात्कारानं त्याचं जगणं समृद्ध केलं.


आपण ज्ञान देतो म्हणजे काय देतो तर त्याला धीर देतो, जगण्याचं बळ देतो. त्यानं उभं राहवं असा प्रयत्न करतो. एक ना एक दिवस मी त्याला ‘साक्षात्काराचा क्षण’ दिल्यानंतर तो बदलेल, माझ्या मागे, माझ्या सोबत चालत येईल. ज्ञानाच्या रंगभूमीचं एवढंच काम आहे. आपण नाटक लिहिताना किंवा करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नाटकातलं दु:ख खरं आहे; पण नाटकात दु:ख घडत नाही, असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मला स्टाईल हवी आहे, मला स्पेक्टॅक्युलर काही हवं आहे, अशी अपेक्षा असते. दु:ख आणि दारिद्रय सेलिब्रेट केल्यासारखं मांडलं गेलं तरच ते सेलेबल होतं हे लक्षात ठेवून ज्या पद्धतीची भाषा लोकांना हवी आहे, ज्या पद्धतीची भाषा त्यांना कळते – त्यांना धरून ठेवते असा त्यांचा समज आहे, त्या भाषेत आपण बोलायला हवं. दु:ख मांडलंच पाहिजे; पण तितक्याच स्मार्टली. सर्वांना खेळकर काही हवं आहे, गंमत हवी आहे, मग ते जगणं दु:खद असो की दारिद्रयातलं; आपण ते सेलिब्रेट केल्यासारखं का मांडू नये? मला वाटतं, नाटककारांनी याचा जरूर विचार केला पाहिजे. (‘सकाळ’ वरून)


बोधी नाट्यमहोत्सव आणि विविध कार्यशाळांच्या निमित्ताने –
नाटककार प्रेमानंद गज्वींची मुलाखत..
.

– राजीव जोशी

मराठी रंगभूमी ही सतत प्रयोगशील राहिलेली आहे. रंगायनची असो वा आविष्कार – छबिलदासची चळवळ असो.. इथे व्यावसायिक नाटकांना ‘समांतर’ असे प्रयोग चालू असतात. रंगभूमीला मरगळ आली, टीव्ही चॅनेल्समुळे प्रेक्षक रोडावला!! अशी स्थित्यंतरे घडत असताना नवीन काही करण्याची उर्मी उत्पन्न होणे, हेच या प्रयोगशाळेचे वैशिष्ट्य आहे.

वामन केंद्रेनाटककार प्रेमानंद गज्वी ह्यांनी ‘ज्ञानासाठी कला’ या उद्देशाने बोधी नाट्य परिषदेची स्थापना केली. त्याअंतर्गत नाट्यवाचनाच्या कार्यशाळा व नाट्यमहोत्सव आयोजित केले जातात. या वेगळ्या उपक्रमाबद्दल त्यांची ‘थिंक महाराष्ट्र’साठी घेतलेली ही मुलाखत –

प्रश्न : मुळात ही ‘संकल्पना’ कशी सुचली? आणि बोधी नाट्य परिषद ही नेमकी कशासाठी आहे ?
प्रेमानंद :  आम्ही गौतम बुद्धाकडे ‘धर्मपुरूष’ म्हणून बघत नाही; एक विचारवंत म्हणून पाहतो. त्याला बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाले. ह्याचा अध्यात्माशी काही संबंध नाही, बुद्धाने माणसाचा मेंदू वापरला गेला पाहिजे ह्याचे भान प्रथम दिले. दोन-अडीच हजार वर्षांपासूनची ही संकल्पना मला पुनरुज्जीवित करावीशी वाटली, कारण कलेतून ज्ञान मिळाले पाहिजे. आपल्याकडे पूर्वी साहित्यामध्ये वाद होता – कलेसाठी कला की जीवनासाठी कला? तर ही ज्ञानासाठी कला!

आजवर आपल्याकडे साहित्य, कला ह्यांचे दोन प्रमुख गट मानले जातात – १. व्यावसायिक – सर्वसाधारणपणे वाचक किंवा प्रेक्षकशरण म्हणता येईल असा गट. २. प्रयोगशील – प्रचलीत वा प्रस्थापित यांची मोडतोड करून नवीन काही सांगू पाहणारी ( मी ‘समांतर’ म्हणत नाही. कारण नेमकी कशाशी समांतर? ते स्पष्ट नाही!) आणि तिसरा गट म्हणजे बोधी – जो ज्ञानशरण आहे. ज्ञानाच्या अनुषंगाने कलेकडे पाहणे. छोट्या छोट्या गोष्टी शिकणे. मी नेहमी साध्या खिळ्याचे उदाहरण देतो. खिळ्याच्या निर्मितीसाठी फॅक्टरी ते विक्री हे अनेक टप्पे येतात. साहित्याच्या कक्षेतील असे सर्व टप्पे जाणणे म्हणजे ‘बोधी’. आपल्याकडे कला म्हटले की स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला, संगीत व नृत्य ह्यांचा विचार होतो. माझ्या दृष्टीने त्यात साहित्य (लिखित) व कलेचा इतिहास – हवे तर तत्त्वचिकित्सा म्हणुया – या दोघांचाही समावेश करायला हवा. कारण प्रत्येक कलेला ‘स्वतंत्र’ असा इतिहास आहे, एक शास्त्र म्हणून अभ्यास आहे. हे सगळे एकत्रित करून ‘कॅनव्हास’ वाढवला पाहिजे. सगळ्या घटकांचे मिळून जे एक बनती किंवा जी फळनिष्पत्ती होते ती म्हणजे संस्कृती.
ज्ञानासाठी कला हा उद्देशाने मी नवीन नाटकांच्या वाचनाच्या कार्यशाळा सुरू केल्या. नवे विचार, नवे विषय ह्याबद्दल नवीन संहिता लिहिल्या जाव्यात, त्यावर चर्चा व्हावी, जमल्यास ‘प्रयोग’ व्हावे आणि लोकांना प्रयोगशरण (व्यावसायिक नसलेल्या) नाटकांचे ‘प्रयोग’ बघायला मिळावेत – हा उद्देश.

प्रश्न : पहिल्या कार्यशाळेपासून आजतागायत नेमके काय झाले? त्यातून अपेक्षित परिणाम साधला जात आहे? असे जाणवते का ?
प्रेमानंद : पहिल्या कार्यशाळेचा शुभारंभ – पु.ल.देशपांडे अकादमीत ज्येष्ठ दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या हस्ते झाला. अकादमीची सुरुवात आमच्या या कार्यशाळेने झाली. प्रत्येक वर्षी आम्ही चार नव्या-जुन्या नाटककारांच्या नवीन नाट्यसंहिता वाचतो. वीस-बावीस मंडळी ते वाचन ऐकतात, मग मोकळेपणाने चर्चा होते; अक्षरश: चिरफाड होते! नाटककार नाराजही होतात पण ह्यामागे चांगली संहिता मिळावी हा हेतू असतो. लांबलेली संहिता, चुकीचे शीर्षक… अशा अनेक मुद्यांवर चर्चा होते. त्याचा नाटककाराला उपयोग होतो. पुढे त्या संहितेचे सादरीकरण होते.

आजवर अठरा कार्यशाळा घेतल्या गेल्या व एकूण एक्याण्णव संहितांचे वाचन झाले. मुंबई-पुण्याव्यतिरिक्त नांदेड, नाशिक, नागपूर, सांगली, कल्याण, कणकवली, येवला, महाड, रत्नागिरी अशा, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ‘बोधी कार्यशाळा’ घेतल्या गेल्या. आमचा हेतू केवळ नाटक सादर करणे हा नाही; उद्दिष्टात साहित्यही समाविष्ट असल्याने कथा, कविता ह्यांवरही कार्याशाळा घेतल्या गेल्या, यापुढे कादंबरी संदर्भातही तशी चर्चा घडवण्याचा विचार आहे.

‘नाट्यवाचन’ घेण्यामागे हेतू हा की नवे लेखक दोन अंकी नाटक किंवा दीर्घांक लिहितात, पण ते थेटपणे सादर होतेच असे नाही आणि एखादे नाटक रंगमंचावरुन सादर न होणे हे लेखकाचे दु:ख आहे. कार्यशाळेची निष्पत्ती सांगायची झाली, तर गेल्या तीन वर्षांत तिशीच्या आतले तरुण येथे लिहीत आहेत. नागपूरचे महेंद्र सुखे, सांगलीचे अरुण मिरजकर, मुंबईचे सांख्य, अशोक हंडोरे आणि कै. सिद्धार्थ तांबे
( नाटक-जाता नाही जात!)

देशाचा नाही, पण महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर पुढच्या वीस-पंचवीस वर्षांत असे सशक्त नाटककार – किमान आठ-दहा तरी मिळतील. विषयांचे बंधन नाही, नवे-जुने असा अडसर नाही. दत्ता भगत, जयंत पवार, वामन तावडे अशा प्रथितयश नाटककारांनी आणि मीसुद्धा माझ्या नवीन संहिता येथे वाचल्या आहेत.

प्रश्न : यंदाच्या बोधी महोत्सवाचे वैशिष्ट्य काय ?
प्रेमानंद : वामन तावडेंनी महाडला जे नाटक वाचले होते, त्याचे दिग्दर्शक, विजय केंकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अभिवाचन’ सादर केले. स्त्रीविषयक एक तरल व वैचारिक नाटक लिहिले आहे. जे सादर करण्यास अवघड आहे, पण तरीही ते रंगमंचावर येत आहे. बोधीच्या कल्याण शाखेने स्वप्नील गांगुर्डेचे ‘गजरा’ सादर केले. दिग्दर्शन – प्रदीप सरवदे, मितीचार (कल्याण) यांनी दिलीप जगतापांचे ‘ आला रे राजा’ (दिग्दर्शक – मकरंद धर्मार्दिकारी), सृजन (मुंबई) यांनी ‘चौकट’ ( लेखक – सांध्य, दिग्दर्शक – मिलिंद इनामदार) आणि माझे ‘डॅम इट अनू गोरे’ (दिग्दर्शक – अजित भुरे) अशी अन्य नाटके सादर झाली. नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन – नाटककार शफाअत खान ह्यांनी केले होते.

प्रश्न :
कार्यशाळा व नाट्यमहोत्सवासाठी निधी कसा उभा राहतो ?
प्रेमानंद : निधी, प्रायोजक असे कोणीही नाही. या सगळ्या लष्करच्या भाक-या, आपली खाज म्हणून करायचे. मी व माझे तीन मित्र डॉ. सुरेश मेश्राम, राज बाडरकर, अशोक हंडोरे, आम्ही पैसे काढतो, जमा करतो. नाही म्हणायला गेल्या वर्षी मारवाडी फाऊंडेशनने ५०,००० रु व डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी १०,००० रु दिले. तशी आपली मित्रमंडळी हजार-पाचशे देऊन मदत करतात. शिवाजी मंदिर व इतर नाट्यनिर्माते तारखा देऊन सहकार्य करतात.

खुद्द जी मंडळी आपली नाटके वाचतात तीही स्वत:च्या पैशाने (नांदेड असो की सांगली, तिथून) येतात. कोणालाही प्रवासखर्च, भत्ता वगैरे दिला जात नाही. ही अप्रत्यक्ष स्वरूपातली देणगीच होय!.

– राजीव जोशी

About Post Author

Previous articleनाव कळलं तर झाडच गेलं !
Next articleमहाराष्ट्रघातकी फाजलअली समिती!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.