चुरशीच्या स्पर्धेत यशस्वी होऊन जितेंद्र ठीक साडे बाराला उगवला. सत्काराला माननीय नाटककार उपलब्ध नसल्याने आयोजकांनी नगाला नग म्हणून चक्क थिएटर मालकाचा सत्कार उरकून घेतला. ‘हा हन्त हन्त! ना खेद ना खंत!!’
एका मंत्र्याने लघुपट स्पर्धेची घोषणा करताना प्रथम पारितोषिक एक लाख आणि द्वितीय पारितोषिक रुपये पन्नास लाख फक्त, असे जाहीर करताच प्रेक्षकांनी हसून हसून थिएटर डोक्यावर घेतले. मंत्र्यांना स्थूळ, सूक्ष्म भेद कळत नसल्याने त्यांना प्रतिसादु अवघा एकू गोविंदू रे झाले. जाणकार रसिकांनी हा फिल्मोत्सव नसून हा डीव्हीड्योत्सव असल्याचे लक्षात येताच तेथून काढता पाय घेतला. आम्ही जाणिवेच्या पातळीवर चाचपडत असल्याने तब्बल तीन सिनेमे पाहून वेळ, श्रम व पेट्रोलचे पैसे वाया घालवले. गाइड सिनेमात देवानंदचा चेहेरा दिसेना म्हणून एक पत्रकार प्रोजेक्शन रूम मध्ये डोकावला तर त्याला डीव्हीडीचे ४९ रुपये मात्रचे कव्हर वाकुल्या दाखवत होते.
प्रोजेक्शनचा दर्जा पहाता आधुनिक तंत्रज्ञानाचा कडेलोट होऊन पार रसातळाला गेल्याचे आढळले. प्रत्येक फिल्मचे सबटायटल पडद्याखालच्या ओट्यावरून लांब झटकून वाळत टाकले होते. त्यातली अक्षरे अर्थासकट ओघळून चालली होती. ते वाचून दाखविणा-याला अमिताभ बच्चन प्रमाणे पंचकोटी महामनी जाहीर करायला हरकत नव्हती.
हे अजाण स्त्रिये! जाशील का पुन्हा शासकीय फिल्मोत्सवाला आं??
कल्पना जोशी
१०१, नीलकमल अपार्टमेंट,
११, हिंदुस्तान कॉलनी,
अमरावती रोड,
नागपूर – ४४००३३
मोबाइल – ९४२३६८०७२६
इमेल – kalpanasmiling@gmail.com