पैठणीवीर शांतिलाल भांडगे

carasole

शांतिलाल विठ्ठलसा भांडगे यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या येवले शहरात एका पारंपरिक विणकर कुटुंबात १९४४ मध्ये झाला. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नववीपर्यंत येवला येथेच पूर्ण केले. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी घरात परंपरेनुसार मागावरील धोट्या हाती घेतला.

दरम्यान, वस्त्रोद्योग मंत्रालयाने (भारत सरकार) विणकरांच्या जागा भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली. शांतिलाल यांनी तेथे अर्ज केला. मुलाखतीस बोलावणे आले. मुलाखत झाली. त्यांनी दोन दिवस मुंबईत थांबून, त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न, ‘मुंबई पाहून’ घेतली.

त्यांना नोकरीवर रुजू होण्यासंबंधी हुकूम सहा महिन्यांनंतर आला. तो त्यांच्या आयुष्यास नवीन वळण देणारा ठरला. ते १९६९ मध्ये विणकर सेवा केंद्र (मुंबई) येथे नोकरीवर रुजू झाले. त्यावेळेस त्यांचे वय पंचवीस वर्षें होते. त्यांच्या ‘विणकर सेवा केंद्रा’तील कामाचे स्वरूप विणकाम संशोधन व विकास असे होते.

त्यांना त्या सेवेत विणकाम हस्तकलेचा नवीन अभ्यास करता आला, वेगवेगळी नवीन डिझाईन (नक्षीकाम) हस्तगत करता आली. पैठणीवरील नक्षीकामाइतकेच महत्त्व पैठणीच्या रंगसंगतीला असते. त्या रंगसंगतीचा अभ्यास त्यांना त्या ठिकाणी करता आला. शांतिलाल यांची बुद्धी अशी, की त्यांनी तेथे नवनिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हातमाग वस्त्रोद्योग प्रदर्शनात सहभाग नोंदवला.

भारत सरकारने भारतीय विणकरांच्या वस्त्रांचे प्रदर्शन १९७२ मध्ये लंडन येथे भरवले होते. शांतिलाल यांनी पैठणी हस्तकलेचे दोन नमुने तयार करून प्रदर्शनात ठेवले. त्यांना नमुने तयार करण्यास सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला होता. प्रदर्शनातील पैठणी हस्तकलेचे ते नमुने बघून पैठणीची मागणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून महाराष्ट्र सरकारकडे होऊ लागली. तेथेच डबघाईला आलेल्या पैठणी वस्त्रोद्योगाला संजिवनी मिळाली असे सांगितले जाते. पैठणीच्या वाढत्या मागणीमुळे त्या प्रकारच्या साड्यांचा पुरवठा करणे महाराष्ट्र सरकारला अशक्य होऊ लागले. महाराष्ट्र सरकारने ‘लघुउद्योग केंद्रा’च्या वतीने पैठणी उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे ठरवले. पैठण येथे ‘पैठणी प्रशिक्षण केंद्र’ स्थापन केले. त्या केंद्रामार्फत विणकरांना प्रशिक्षित करण्यात आले. त्याच प्रशिक्षित विणकरांनी पुढे खासगी पैठणी उत्पादन करून पैठणीच्या वाढत्या मागणी पूर्ण करण्याचा सपाटा लावला. शांतिलाल भांडगे यांचे मार्गदर्शन सतत असे. त्यांनी त्यासाठी ‘विणकर सेवा केंद्रा (मुंबई)’ मार्फत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. त्यांनी सोलापूर, इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, धुळे, धरणगाव (जळगाव) या गावांना भेटी देऊन तेथील विणकरांनाही त्यांच्या वस्त्रप्रावरणांसंबंधी सल्ला दिला, मार्गदर्शन केले. ती एक सदस्य मोहीमच होऊन गेली! त्यांनी विविध केंद्रातील विणकरांना त्यांच्या कामात त्यांना नाविन्य आणण्यास सुचवले.

त्यांनी १९९० मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली व ते त्यांच्या जन्मगावी, येवला येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी त्यांच्या पारंपारिक विणकामात लक्ष केंद्रित केले. तेथील अनेक विणकर बांधवांना त्यांनी मार्गदर्शन केले; विणकाम कलेत विणकरांनी प्राविण्य संपादन करण्यासाठी प्रयत्न केला. आर्ट स्कूल व कॉलेजमधील विद्यार्थी मार्गदर्शनासाठी, माहितीसाठी त्यांच्याकडे येतात. त्यांनी ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’मार्फत घेतल्या जाणाऱ्या विणकाम-हस्तकला अभ्यासक्रमाचे प्राश्नीक (paper setter); तसेच, उत्तरपुस्तिकांचे मूल्यमापन (examiner, moderator) हे कार्यदेखील केले आहे. पैठणी साडीवर सतत नवीन प्रयोग करणे, इतिहासकालीन पैठणीला धक्का न लावता आधुनिकता आणून, त्यात आधुनिक काळातील स्त्रियांना पसंत पडतील व त्यांच्या मनाला भावतील असे बदल करून नवीन पैठणी तयार करणे हा त्यांचा छंदच आहे. त्याकरता त्यांनी घरात एक हातमाग राखून ठेवला आहे.

ब्रिटिश एअरवेज (लंडन) यांनी त्यांच्या सर्व विमानांवर जो लोगो (ओळखचिन्ह) १९९४ मध्ये लागू केला. त्याचा नमुना शांतिलाल यांनी पैठणी साडीच्या माध्यमातून तयार करून दिला होता. तो नमुना ब्रिटिश एअरवेजच्या सर्व विमानांवर दिमाखात एक वर्षासाठी जगभर झळकत होता. त्याचप्रमाणे त्यांनी दिल्ली मेट्रो रेल्वेच्या मुख्य कार्यालयाकरता लक्षवेधक एक पैठणी साडीपदर २०११ मध्ये तयार करून दिला. त्यांचा आकार ५’x८” असा आहे. तो पीस तयार करण्यासाठी शांतिलालना एक वेगळा माग तयार करावा लागला. कारण त्या आकाराचा ‘पीस’ नेहमीच्या मागावर तयार होऊ शकत नाही. त्यांना तो ‘पीस’ तयार करण्यासाठी तीन महिने लागले. तो येवला पैठणीचा ‘पीस’ नवी दिल्ली मेट्रो रेल्वेच्या मुख्य कार्यालयात शोकेसमध्ये येवल्याची परंपरा मिरवत दिमाखात उभा आहे ! त्याचप्रमाणे, नवी दिल्ली येथील हैदराबाद हाऊसमध्ये दारांना व खिडक्यांना जे पडदे लावले आहेत ते शांतिलाल यांनी सेवेत असताना तयार केले आहेत. त्या पडद्यांवर पैठणीच्या नक्षीकामाचा ठसा आहे.

भारत सरकारने १९८६ हे ‘हातमाग वर्ष’ म्हणून साजरे केले. त्या वर्षी भारत सरकारने विणकाम हस्तकलेसाठी योगदान देणाऱ्या भारतातील विणकरांचा पुरस्कार देऊन सत्कार केला. त्यांत शांतिलाल यांचा समावेश होता. त्यांना ‘Handloom Year Award’ देखील प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र, शाल व दहा हजार रुपये रोख असे त्या सन्मानाचे स्वरूप होते. त्यांनी १९९१ मध्ये ‘आसावली ब्रॉकेट’ साडी तयार केली. त्या साडीबद्दल त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. ताम्रपट, शाल, प्रशस्तिपत्र व एक लाख रुपये रोख असे त्याचे स्वरूप होते. त्यांनी विणकाम-हस्तकला क्षेत्रात केलेल्या विशेष कामाबद्दल व दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना मानाचा ‘संत कबीर’ हा राष्ट्रीय पुरस्कार २०१० मध्ये देऊन सन्मानित केले आहे. तो त्यांचा जीवनगौरवच होय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट, सुवर्णपदक, शाल, गौरवपट, प्रमाणपत्र व सहा लाख रुपये रोख असा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारांमुळे त्यांनी स्वतःचेच नाव नव्हे तर येवल्याचे व ‘येवले पैठणीचे नाव’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे!

– राजेन्द्र गोविंदसा वडे

(‘येवले दर्शन’वरून उद्धृत, संपादित – संस्कारीत)

About Post Author

4 COMMENTS

  1. Shri. Shantilalsa Bhandge is
    Shri. Shantilalsa Bhandge is the king of paithani saree. He gave valuable divination to paithani. For his valuable devotion Govt of India gives him Rashtrapati puraskar and the great Sant Kabir puraskar. I thanks to him and I will pray to god about his health, prosperity and happiness.

  2. अभिनंदन, दादा.आम्ही
    अभिनंदन, दादा. आम्ही आपल्याकडील पैठणी साडीच घेतो. एकदम रिच आणि मुलायम असतात. आपल्या कार्यास शुभेच्छा!

  3. Mi pan 1 paithni vinkar aahe
    Mi pan 1 paithni vinkar aahe … Paithniche nav khup durparyant gele aahe yacha mala abhimaan aahe

Comments are closed.