– विलास माने
– विलास माने
महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती नाजूक झाला आहे आणि अपप्रवृत्ती कशा आपल्या वस्तूपर्यंत आणि घटना कशा वस्तूशी संबंधित घडू लागल्या आहेत ते पाहा. मुख्यमंत्र्यांची सुटकेस मुंबई-कराड प्रवासात त्यांच्याच माणसाकडून गहाळ होते आणि सातारा बसस्थानक पोलिसांना बेवारस म्हणून ती प्रारंभी ताब्यात घ्यावी लागते. तपासात, त्या सुटकेसचे मूळ मालक कोण? तर खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा हे लक्षात येताच पोलिसांचे धाबेच दणाणते आणि नजरचुकीने, फसगतीने झालेला हा प्रकार; पण सुटकेस मूळ मालकाच्या ताब्यात सहीसलामत जाईपर्यंत पोलिस खात्याची तारबंळ उडते. मुख्यमंत्र्यांची सुटकेस त्यांच्याच जिल्ह्यात त्यांच्याच पोलिसांना सातारा बसथानकावर बेवारस मिळणे आणि मूळ मालकाच्या ताब्यात जाईपर्यंत त्या खात्याचा जीव टांगणीला लागणे, ही बाब काय कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत साधीसुधी होती काय? आबांच्याकडेच हे खाते आहे म्हणून बरे, नाहीतर केवढी मोठी नामुष्की म्हणायची!
आता दुसरी गोष्ट म्हणजे पर्सच्या चोरीची. असल्या भुरट्या चोर्या म्हणजे काही ठळक बातमीचा विषय होऊ शकत नाहीत. कोणा गरीब-सामान्य महिलेची पर्स ती काय? आणि ती चोरीला जाते, त्यात काय एवढं? पण आता पोलिसांनाच काय पण चोरांनापण आपल्या कृष्णकृत्याचा फेरआढावा आणि पुनरावलोकन करण्याची वेळ आली आहे. निदान चोरांवर आपण कोणाचे काय चोरत आहोत एवढा तरी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आपण कोणाचे काय चोरतो हासुद्धा प्रेस्टिज पॉईंट होऊ शकतो. आपण काही आलतुफालतू, भुरटे, उचले नाही तर क्षुल्लक वस्तू का असेना पण ती कोणाची, कोणा बड्या असामीची आहे यावरसुद्धा चोरांचे रेप्युटेशेन ठरत असावे की काय?
परवा म्हणे उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपल्या चपला एका सभेत मंचावर बसल्यानंतर गादीखाली आधी सुरक्षित जपून ठेवल्या! दादांच्या चपला त्यापूर्वी जेव्हा, जर का कोणी चोराने उचलून किंवा पायात सरकावून नेल्या असतील तर तो अनुभव दादांच्या दृष्टीने महत्त्वाचा नसावा, पण आता तसे नाही. खुद्द या राज्यात राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या पायातील चपला राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या जिल्ह्यातून भरदिवसा चोरीला जाऊ शकतात, ही बाब मात्र खूपच नामुष्कीची ठरली असती. पण अजितदादा मुळचे हुषार. त्यांनी मागचा कधीचा अनुभव जमेस धरून मंचावर पदार्पण करतानाच, बैठक मारण्यापूर्वी आपल्या चरणांच्या दासींना सुरक्षित स्थळी ठेवून प्रथम सुव्यवस्थेची काळजी घेतली.
तसे पर्सबाबत घडले नाही. चोरांनी ती चालत्या रेल्वेतून लांबवली. त्यांना काय माहीत असणार, की ही वस्तू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नीची आहे म्हणून! नाहीतर एरवी कोण कशाला युद्धपातळीवर या छाटछुट चोरीचा तपास आणि पाठपुरावा करतो! पोलिसांनी चक्क एका आठवड्याच्या आत रेल्वेतून चोरीस गेलेली ही पर्स सहीसलामत मूळ मालकिणीला परत मिळवून दिली. सामान्य व्यक्तीबाबत एवढी चतुराई घडली असती का हा बावळट प्रश्न बाजूला ठेवून आपण एवढेच म्हणू शकतो, की किमान आबांचे गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या वस्तू तरी त्यांना सहीसलामत परत करू शकते! त्यामुळे महराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे असे म्हणण्याचा आणि त्याचा ठपका राष्ट्रवादीवर आणि त्यातल्या त्यात गृहखात्यावर ठेवण्याचा नैतिक अधिकारच मुख्यमंत्र्यांना राहिलेला नाही.
आता सुटकेसमध्ये काय होते आणि पर्समध्ये किती रक्कम होती, या प्रश्नाला फारसे महत्त्व राहिलेले नाही. पण राज्यात लाखो-करोडोंचा भ्रष्टाचार, घोटाळे, दरोडे, चोर्या होत असताना आणि त्याबाबतची अनेक प्रकरणे प्रत्येक पोलिस स्टेशनवर पेंडिंग असताना पर्स आणि सुटकेस या दोन्ही वस्तू मूळ मालकाला परत मिळतात ही बाब काय कमी आहे काय? आता, गृहखाते हे आबांकडेच असले पाहिजे हे काँग्रेसने कबूल करायला पाहिजे.
विलास माने
‘साप्ताहिक मनोमन’च्या संपादकीयामधून
{jcomments on}