परीटाचा दिवा – कोकणातील मानसन्मानाची रीत (Washerman Community – Ritual in Konkan)

6
45

परीटाचा दिवाहा शब्द कोकणात एकेकाळी प्रसिद्ध होता. तेव्हा परीट समाजाकडून दिवाळीत दिव्यांनी होणारी ओवाळणी सन्मानाची, प्रतिष्ठेची गावोगावी मानली जात असे. अगदी आरंभीच्या काळी परीट स्त्रिया बांबूच्या वैशिष्ट्यपूर्ण खोबणीत लामणदिवा लावून, घरोघरी जाऊन घरातील कर्त्या पुरुषाला ओवाळायच्या. तो काळ कोणता हे अंदाजताही येत नाही. शिवाय, गावागणिक त्या प्रथेच्या वर्णनात बदलही ऐकण्यास मिळतात. त्याआधी अर्थातच, गाव-समाजातील घराघरातून परीट आळीत परीट मंडळींच्या घरी जाऊन स्त्रियांना आमंत्रण केले जाई. परीट स्त्रीला तिने केलेल्या ओवाळणीनंतर फराळ आणि ओवाळणी भेट दिली जाई. ती परंपरा शंभर वर्षापूर्वीपर्यंत अस्तित्वात असावी. चिपळूण तालुक्याच्या निवळी-पालवण-ढोक्रवली पंचक्रोशीतील ज्ञात परंपरा मात्र ती प्रथा पुरुषांकडे वर्ग झालेल्या काळापासूनची ऐकण्यास मिळते.

दिव्याची ही ओवाळणी मुख्यत: गावच्या खोतांना आणि मानकऱ्यांना असायची. ओवाळणारेही परीट समाजातील मानकरी असायचे. त्यांचा आब सांभाळत गावच्या खोताच्या घरी ओवाळायला जात. तत्पूर्वी, नरकचतुर्दशीअभ्यंगस्नानाच्या पूर्वरात्री देवळात पहाटेच्या वेळी ग्रामदेवतेला रूपे लावली जायची. सकाळी ग्रामदेवतेच्या देवळात देवाला आणि उपस्थित मानकऱ्यांना तो दिवा दाखवला (ओवाळला) जायचा. दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याला गावच्या खोतांना, मानकऱ्यांना घरोघरी हळदीकुंकू लावून ओवाळले जायचे. ती मंडळी ओवाळणीच्या वेळी पाटावर किंवा घोंगडीवर बसायची. खोत मानकरी परटांकडून ओवाळून घेतल्यावर स्वेच्छेने ताटात ओवाळणी टाकत असत. शिधा मिळायचा. आबा महाडिक यांनी सांगितले, की परंपरा पुढे चालवण्यास सुरुवात केली तेव्हा परीट पुरुष घरपट जायचे. दिवसभरात चाळीस/पन्नास घरी जाणे व्हायचे. अनेक गावांतून जुनी माणसे आणि नवीन माणसे यांच्यातील संवादभेदामुळेही परंपरांमध्ये बदल होत गेला असावा असे निरीक्षण सहज मनात आले. मंदिरातील दिवा ओवाळणीच्या परंपरेचा मूळ मान हा परीट समाजाचा आहे. कालांतराने, त्यांच्या जोडीला मंदिराचे गुरव आणि चार-पाच गावकर मंडळी जोडली गेली आहेत.

ओवाळणीची ती परंपरा, वर्तमानकाळात श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवतेच्या मंदिरात दिवाळीच्या उत्सवी वातावरणात साजरी होत असते. ओवाळणीच्या ताम्हनात साधा दिवा, अक्षता आणि हळदी-कुंकू असते. मी चिपळूण तालुक्यातील निवळी गावचे रहिवासी आणि संत गाडगेबाबा परीट समाज सेवा संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताराम गोविंद ऊर्फ आबा महाडिक यांची जीवनकथा ग्रामसेवक ते समाजसेवकही लिहिली आहे. त्यावेळी त्यांच्याकडून या प्रथा-परंपरेची माहिती मला झाली.

परीट हा बारा बलुतेदारांपैकी एक मेहनती समाज आहे. परीट समाज देशभरात दहाएक कोटी लोकसंख्येचा असावा. तो सर्वत्र विखुरलेला आहे. गाडगेबाबा त्याच समाजात जन्मले. परीट समाजाचे मुख्य काम घरोघरचे कपडे गोळा करून, ते धुऊन-इस्त्री करून घरोघरी पुन्हा पोचवणे हे होते. त्यांना गावकऱ्यांचे धुणे धुण्याचे काम लग्नकार्य आणि सोयर-सुतकप्रसंगी विशेषत्वाने करावे लागे. गावातील लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चादर धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा त्या समाजाकडे होती. परीट लोक नदीच्या काठाला बांधलेल्या घाटांवर धुणे धुवायचे. त्या बदल्यात त्यांना पोटाला तयार खाणे मिळायचे, नंतर नंतर धान्य मिळू लागले आणि कालौघात पैसारूपी विनिमय चलनाची सुरुवात झाली. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोठे कोणा वृद्ध परीट व्यक्तीच्या तोंडून, ‘आरं, अलिकडंची पोरं तुम्ही कशी वळखशीला! तुझी आज्जी आमच्याकडं द्यायची धडूती धुवायला! असे शब्द ऐकू येतात.

सध्याच्या काळात पहिल्या अंघोळीला, नरकचतुर्दशीला सकाळी श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवतेला रूपे (मुकुट) लावून झाल्यावर गुरवाकडून पूजा होते. पूजा आटोपल्यावर गुरव हे गावाकडून आणि खोतांकडून, ‘परटांनी दिवा करायचा का?’ असा हुकूम (परवानगी) घेतात. मंदिराच्या बाहेर असलेल्या तुळशीजवळ पिठाचा दिवा प्रज्वलित केला जातो. ह्याही दिव्याने पहिल्यांदा ग्रामदेवतेला ओवाळले जाते. मंदिराला पाच फेऱ्या मारून देवाला नैवेद्य दाखवला जातो. नंतर गावातील खोतांना परटाचा दिवा दाखवून ओवाळले जाते. ओवाळण्याचे हे काम परीट कुटुंबातील पुरुष मंडळी करतात. मंदिरात जमलेल्या खोतांना आणि मानकऱ्यांना ओवाळले जाते. त्यावेळी गुरवही एक दिवा घेऊन सोबत असतात. त्यांच्या सोबत गावकर मानकऱ्यांपैकी चार-पाच जण असतात. दिवा ओवाळण्याची ती परंपरा पहिल्या दिवाळीला आणि देव दिवाळीला अशी दोन वेळा होते. त्याला पारंपरिक भाषेत दिवा चढवणे आणि दिवा उतरवणे असे म्हणतात. देवदिवाळीचा दिवा उतरवण्याचा कार्यक्रम मोठा असतो.

शिमगोत्सवादरम्यान, होळीला दोन दिवस शिल्लक असताना श्रीबाजी वाघंबर मंदिरातील ग्रामदेवतेची पालखी पालवण गावच्या सहाणेवर आणून ठेवली जाते. पालखीत देव दुसऱ्या दिवशी बसवले जात असताना, ग्रामस्थ शिमग्याचा माडआणण्यास जातात. सकाळी परीट समाजाचे मानकरी त्यांच्या घरून सहाणेवर पालखीजवळ पांढरे निशाण आणून ठेवतात. ते निशाण म्हणजे त्रिकोणी पताका आकाराचा पांढरा ध्वज असतो. तो मान निवळी-पालवण-ढोक्रवली या गावात अस्तित्वात आहे. पांढरे निशाण महत्त्वाच्या प्रसंगी फडकावण्याचा परटांचा तो मान अनेक गावांत सुरू आहे. होळीसाठीचा माड सायंकाळी आणल्यावर त्याच्या शेंड्याला ते पांढरे निशाण बांधले जाते. माड उभा केला जातो. शिंपणे कार्यक्रमाच्या वेळी माडाचा शेंडा गावकरांकडून तोडला जातो. गावकर माडाचा शेंडा आणि शेंड्यावरील निशाणाचा पांढरा झेंडा हे खोतांच्या दारात आणून ठेवतात.

पालवण-ढोक्रवली गावातच शिमगोत्सवात श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेची पालखी सहाणेवर बसल्यावर नाभिक समाजातील मानाच्या दोन व्यक्ती पालखीतील प्रत्येक देवाला दुरून आरसा दाखवतात. देवावर सूर्यकिरणोत्सव घडवला जातो. गावाचा होम भद्रेच्या दिवशी (धुलीवंदन) सकाळी दहा वाजता लागतो. होमाला प्रदक्षिणा केल्यावर होमाला प्रज्वलित केले जाते. ग्रामदेवतेची सहाणेवर असलेली पालखी दुपारी ढोक्रवलीला रवाना होते. तत्पूर्वी पालखीसमोर खोतांकडून पुकार देऊन हाणून घेणाऱ्या मानकऱ्यांना बोलावले जाते. हाणून घेण्याचा विधी हे एक त्या वेळचे वैशिष्ट्य होय. बोलावणे झाल्यावर, देवाच्या पालखीसमोर खोतांनी आणून ठेवलेली तलवार (शस्त्र) त्यांच्या दोन्ही हातात घट्ट धरून अन्य दोघे मानकरी त्यांच्या उघड्या अंगावर, पोटाच्या बाजूला हाणून (स्वतःच्या अंगावर मारून) घेतात. परंपरेनुसार त्यांनी तीन वेळा त्यांच्या पोटावर तलवार हाणून घेतल्यावर गुरवांकडून, ‘पुरे…पुरे…पुरे !असे म्हटले जाते. मग हाणून घेणे थांबवले जाते. हाणून घेण्याचे हे काम पूर्वी कोणी अन्य ग्रामस्थ करायचे. त्यांचा वंश संपुष्टात आल्याने त्यांनी हाणून घेण्याचे काम दुसऱ्या मानकऱ्यांकडे सोपवले आहे. ते त्या परंपरेचे मानकरी आहेत.

श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवता मंदिर

श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवतेची पालखी शिमगोत्सवानंतर देवळात पोचल्यावर मंदिरातील देव भंडारला जातो. तेव्हा देवतांनी परिधान केलेली वस्त्रे ही धुण्यासाठी पासोड्यात (ग्रामदेवतेच्या पालखीवरील शाल किंवा वस्त्र) गुंडाळून त्याच परीट समाजाच्या महाडिक कुटुंबीयांकडे दिली जातात. त्यांच्याकडून ती वस्त्रे धुऊनइस्त्री करून (परिटघडी) गुरवाच्या स्वाधीन होतात. परटांना एक नारळ आणि पासोडा भेट त्या कामी दिला जातो. कधी कधी धुण्यासाठी म्हणून आलेल्या देवाच्या कपड्यांना अडकून, भाविकांनी नवसात अर्पण केलेला एखादा सोन्याचा दागिना, चांदीची फुले सोबत येण्याची शक्यता असते. अशा वेळी ते दागिने गुरव किंवा गावकर यांच्याकडे आणून दिले जात असल्याची आठवण विलास महाडिक यांनी सांगितली. तो मान निवळी-पालवण-ढोक्रवली या तिन्ही गावांत अस्तित्वात आहे. धुतलेली ती वस्त्रे देवांना पवतं अर्पण (नागपंचमी ते नारळीपोर्णिमा दरम्यान) करण्यावेळी पहिल्यांदा आणि त्यानंतर अनुक्रमे दसरा, दीपावली, देवदिवाळीआणि शिमगा या सणांना परिधान केली जातात. वस्त्रे कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक वेळी पूर्ववत पेटीत ठेवली जातात. ती वस्त्रे धुण्याचे काम वर्षातून एकदा केले जाते. ग्रामदेवतेचे कपडे धुणे, दिवाळीची ओवाळणी, शिमगा पालखीला निशाण लावणे आदी धार्मिक कामे करायची कोणी? असा प्रश्न निर्माण झाल्यावर चिपळूण तालुक्यातील निवळी-पालवण-ढोक्रवली पंचक्रोशीतील खोतांनी आणि मानकऱ्यांनी दापोली तालुक्यातील दाभोळमधून परीट समाजातील महाडिक कुटुंब गावाची धार्मिक गरज म्हणून तेथे आणून वसवले आहे. पालवणच्या मंदिरामागील बाजूस, कोष्टेवाडीत परटांचे जुने घर होते. तेथील विहिरीजवळ त्या कुटुंबाचे जोते पाहण्यास मिळते.

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

धीरज वाटेकर 98603 60948 dheerajwatekar@gmail.com

धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर हे मुक्त पत्रकार आणि छायाचित्रकार आहेत. त्‍यांनी चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन अशा विविध पुस्तकांचे लेखन केले आहे. त्‍यांच्‍याकडे भूतान हिमाचल अंदमान व देशभरातील विविध विषयांवरील सुमारे तीस हजार फोटोंचा संग्रह आहे. त्‍यांनी कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन केले आहे. त्‍यांचे लेख विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होत असतात. त्‍यांना लेखनासाठी उत्‍कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार’, ‘उल्हास प्रभात’, ‘नलगे ग्रंथ पुरस्कारअसे काही गौरव प्राप्‍त झाले आहेत.

———————————————————————————————————————————————————————————————

About Post Author

6 COMMENTS

  1. काळानुरूप लोप पावत जाणारी माहिती देणारा लेख आहे.सण उत्सव रीती परंपरा मान आणि समारंभ प्रिय समाज निर्मितीचे सुन्दर योग आणून.. समाजव्यवस्था टिकवून राहण्यास मदत होत जातानाचा अनुभव आहे

  2. चांगला व माहिती प्रद लेख आहे ज्यातून पूर्वीच्या परंपरांचा बोध होतो व समस्त गाव कसे एकमेकांशी अशा परंपरेतून जोडले गेले होते ते कळते.आम्ही सिन्नर जिल्हा नाशिक इथे बरीच वर्षे राहत होतो.तिथे एक परीट घराणे आमच्या तसेच गावातील अन्य व्यापारी, शिक्षक, इ.कडून कपडे घेऊन जात.संपूर्ण वर्षभराचे पैसे ते दिवाळीत घेत.पाडव्याच्या दिवशी दोघे पती पत्नी आपल्या नेहमीच्या आश्रयदात्यांकडे जाऊन घरातील मुख्य माणसाला ओवाळत.यजमान ओवाळणी म्हणून आपल्या सामाजिक स्थानानुसार ओवाळणी घालत असे व दिवाळीचे फराळाचे पदार्थ पण देत असे.असे ग्राहकांकडे जाऊन त्यांना ओवळण्यात आणि त्यांच्याकडून ओवाळणी, फराळ स्वीकारण्यात त्यांना कुठलाही कमीपणा वाटत नसायचा.

  3. मालेगांव तालुका नाशिक जिल्हा येथे अजूनही परीट दीप दर्शन दिवाळी पाडव्याला पहाटेसच घेतात.

  4. मागील पंचवीसेक वर्षा पूर्वी ही परंपरा थोड्या फार फरकाने मराठवाड्यातही होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here