पद्मश्री प्रेमा पुरव – स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारी महिला

1
97

2 जुलैची सकाळ. उदास उदास. धड पाऊस नाही, धड ऊन नाही. मेधाताईचा उठल्यावर एसएमएस पाहिला, ‘आई गेली रात्री’. आई म्हणजे प्रेमाताई पुरव आणि मेधाताई म्हणजे त्यांची मुलगी मेधा पुरव-सामंत. पद्मश्री प्रेमा पुरव यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले. त्यांची अधूनमधून तब्येत बरी नसायची. त्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असायच्या पण बऱ्या होऊन घरी यायच्या. मात्र मृत्यूने येताना चाहूलही लागू दिली नाही. प्रेमाताई झोपेत असतानाच शांतपणे गेल्या अशीच बातमी आली.

प्रेमा तेंडुलकर, गोवा मुक्तीसंग्रामातील क्रांतिकारक, सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘अन्नपूर्णा महिला मंडळ, मुंबई’च्या संस्थापक. अत्यंत सधन कुटुंबात 15 ऑगस्ट 1935 रोजी गोव्यात, वेळगे गावात जन्माला आलेली प्रेमा, सर्वांची लाडकी. दिसायला सुंदर, उंचीपुरी… तेंडुलकरांच्या घरातील शेंडेफळ. घरची सुपीक शेती, पैसा, सुबत्ता असे असतानाही घरातील वातावरण, संस्कार आणि त्याकाळच्या गोवा मुक्तीसंग्रामातील सहभाग यामुळे प्रेमा वेगळीच झाली. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी मुक्तीसंग्रामात सहभागी होण्यासाठी घर सोडले. भाऊ काशिनाथ यांच्यासोबत गोवा मुक्त व्हावा यासाठी भूमिगत झाली. त्यांच्या दोन्ही पायांना आंदोलनादरम्यान गोळ्या लागल्या. बेळगावच्या रुग्णालयात दीड वर्ष आणि पुढे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सहा महिने उपचार घ्यावे लागले. पोर्तुगीजांच्या त्रासामुळे बेळगाव येथे भूमिगत राहून काम केले. त्यांच्याकडून हे सगळे वर्णन ऐकताना अक्षरशः अंगावर काटा यायचा. प्रेमाताई कोवळ्या वयात गोवा सोडून मुंबईस आल्या. प्रवाससुध्दा प्रचंड त्रासदायक. पण त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. त्या मुंबईत आचार्य अत्रे, कॉ. डांगे यांच्यासोबत कम्युनिस्ट पक्षात पोचल्या. आचार्य अत्रे प्रेमाताईंना ‘न थकणारी कार्यकर्ती’ असे म्हणत असत. त्यांनी प्रेमाताईंना मुलगी मानले होते. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकातही काही काळ काम केले होते.

प्रेमाताईंची कॉम्रेड नरेंद्र तथा दादा पुरव ह्यांच्याशी पक्षाचे काम करत असताना गाठ पडली. दोघेही एकत्र काम करत होते. दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडत होता.  यथावकाश लग्न झाले. प्रेमा तेंडुलकरची प्रेमा पुरव झाली. दहा माणसांच्या घरात, दोन खोल्यात संसार सुरू झाला. घर, पार्टीचे काम, दौरे अशा सगळ्या व्यग्र आयुष्यात प्रेमाताई झपाटून गेल्या. त्यातच गोवा मुक्त झाला. त्याचा त्यांना अत्यानंद झाला.

ताई ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’, ‘महागाई प्रतिकार समिती’, ‘साने गुरुजी व्याख्यानमाला’ अशा संस्थांमधून घडत गेल्या. प्रेमाताईंचे नाव कॉ. गोदावरी परुळेकर, कॉ. अहिल्या रांगणेकर, कॉ. तारा रेड्डी, कॉ. मंजू गांधी यांच्या बरोबरीने या सर्व चळवळींमध्ये घेतले जाते. प्रेमाताईंनी ‘भारतीय महिला फेडरेशन’, ‘गिरणी कामगार युनियन’, दादांची बँक कर्मचारी संघटना, ‘AIBEA’ ह्या साऱ्यांमध्ये झपाटून काम केले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सीमा भाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी झालेली आंदोलने, महागाई विरोधी आंदोलने, गिरणी कामगारांचे लढे यामध्ये प्रेमाताईंचा सक्रिय सहभाग होता. त्यांचे गिरगावातील कम्यूनमध्ये कैफी आझमी, बलराज सहानी, अण्णाभाऊ साठे हे सहनिवासी होते. तिथेच चळवळीची गीते रचली गेली.

काही कामगार कायदे बदलले आणि स्त्रियांना गिरण्यांमधून काम मिळेनासे झाले. त्यांच्यापैकी अनेक स्त्रियांनी घरगुती खानावळी सुरू केल्या होत्या. प्रेमाताईंनी त्यांना एकत्र आणून ‘अन्नपूर्णा महिला सहकारी सोसायटी लिमिटेड’ ही संस्था सुरू केली. कामाच्या ठिकाणी ताजे, सकस जेवण ही मुंबईतील नोकरदारांची गरज होती आणि या स्त्रिया अर्थार्जनाचे मार्ग शोधत होत्या. ‘अन्नपूर्णा’ने या दोन घटकांची सांगड घातली आणि स्त्रियांच्या स्वावलंबनाचे एक मोठे काम उभे राहिले. गिरणी कामगारांना जेवण, डबे देणाऱ्या खानावळवाल्या महिलांना खाजगी सावकार लुबाडत होते. त्यांच्यासाठी प्रेमाताईंनी दादा पुरव ह्यांच्या मदतीने सुरुवातीला ‘बँक ऑफ बडोदा’ मधून कर्ज मिळवून दिले. त्यातूनच ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ स्थापन झाले. 1975 साल होते. तो राजकीय आणीबाणीचा काळ होता. वीस कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत अल्प व्याज दराने दुर्बल घटकातील व्यक्तींना कर्ज देण्याची योजना अस्तित्वात आली होती. त्याचा उपयोग करून हजारो खानावळवाल्या महिलांना सावकारी पाशातून मुक्त केले गेले. अन्नपूर्णा महिला मंडळ ह्या संघटनेची स्थापना कॉ. दादा पुरव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तर ह्या संघटनेची घटना कामगार चळवळीचे भीष्म पितामह कॉ. श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी लिहून दिली होती.

प्रेमाताई गिरणी कामगार संपाच्यावेळी कामगारांच्या घरी जात असत. त्यांना घरच्या बाईकडून त्या घरातली परिस्थिती समजून येत असे. त्यांना घरातल्या बाईने स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे असे वाटे. हे सर्व त्या दादांशी बोलत असत. त्या दादांच्या अकाली मृत्यूनंतर काही काळ डळमळल्या होत्या. त्यांना त्या काळात कॉ. कृष्णा मेणसे, कॉ. सुरेश धोपेश्वरकर इत्यादी सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

प्रेमाताईंनी पुन्हा कामासाठी कंबर कसून वाशीमध्ये ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’चे मोठे ऑफिस उभारले. कित्येक गरजू स्त्रियांना रोजगार मिळाला. कित्येक परित्यक्त्यांना आधार मिळाला आणि अन्नपूर्णा खूप वाढली.

प्रेमा तेंडुलकर ते पद्मश्री प्रेमा पुरव हा प्रवास कठीण होता परंतु या खडतर प्रवासामुळे लाखो गोरगरीब स्त्रियांचे सुंदर स्वप्न प्रत्यक्षात आले. पुढे 1982 साली कॉ. दादा पुरव ह्यांच्या अकाली मृत्यूनंतर आणि अभूतपूर्व अशा गिरणी कामगारांच्या संपानंतर प्रेमाताई मोठ्या प्रमाणात महिलांच्या खाद्यपदार्थ व्यवसायात उतरल्या. त्यातून त्यांनी अनेक निराधार महिलांना सक्षम करण्याचे कार्य पुढील वीस- बावीस वर्षे केले.

त्यांची जन्मभूमी गोवा आणि कर्मभूमी महाराष्ट्र राहिली. त्यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल 2002 मध्ये भारत सरकारने पद्मश्री हा चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार प्रदान केला. प्रेमाताईंना तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला होता. त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ‘दुर्गाबाई देशमुख पुरस्कार’, मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘आनंदमयी’ पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. प्रेमाताईंना ‘अखिल भारतीय महिला शिक्षण निधी संस्थे’चा (AIWEFA) ‘स्त्री रत्न पुरस्कार’, सामाजिक कृतज्ञता निधीच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

प्रेमाताई गेली वीस वर्षे पुण्यामध्ये त्यांच्या मुलीच्या घरी निवृत्तीचे जीवन जगत होत्या. प्रेमाताई व दादांना मेधा पुरव सामंत, विशाखा पुरंदरे, माधवी कोलांकरी ह्या तीन कन्या आहेत. तीन कन्या, तीन जावई, नातवंडे, तसेच अनेक जवळचे नातेवाईक, स्नेही, कार्यकर्ते हे वैकुंठ स्मशानभूमीत प्रेमाताईंना शेवटचा निरोप द्यायला, लाल सलाम करायला उपस्थित होते.

त्यांच्या ज्येष्ठ कन्या मेधा पुरव सामंत ह्यांनी ‘अन्नपूर्णा परिवार’ ह्या माध्यमातून गेल्या तीस वर्षात पुणे, मुंबई येथे महिला सक्षमीकरणाचे कार्य विस्तारले आहे. महिला सक्षमीकरणाची चळवळ सतत जागी ठेवणे हीच प्रेमाताईंना खरी श्रद्धांजली ठरेल!

-अंजली दिवाण पाटील 9423572735 diwan.anju@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री प्रेमाताई पुरव यांना आदरांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here