नीलिमा मिश्रा – ऐसी कळवळ्याची जाती

2
48

आशिया खंडातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणा-या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं आतापर्यंत पंचेचाळीसहून अधिक भारतीयांना सन्मानित करण्यात आलं आहे. या प्रभावळीतील नवीन नाव आहे, धुळे-जळगावच्या नीलिमा मिश्रा . या पुरस्कारासाठी निवड झालेली देशातील ती सर्वांत तरुण महिला आहे. 

महाराष्ट्राच्या नकाशात ठिपक्याएवढं अस्तित्व असणा-या बहाद्दरपूर या खेड्यातील तिच्या ग्रामरचनेच्या कार्याला हा पुरस्कार मिळाला आहे. या ग्रामरचनेत आर्थिक स्वयंपूर्णतेबरोबर स्वच्छतेलाही तितकंच महत्त्व आहे. म्हणूनच तिथं बचतगट स्थापना, विपणनव्यवस्था, उद्योजकता यांबरोबरच शौचालय-बांधणीच्या कामालाही प्राधान्य दिलं गेलं आहे. स्वयंपूर्ण ग्राम आणि ग्रामस्थांचा विकास या ध्यासानं झपाटून काम करणा-या नीलिमा मिश्रा या झंझावाताची ही कहाणी आहे.

बहाद्दरपूर हे धुळे–जळगावच्या सीमेवरचं छोटंसं खेडं. अल्प उत्पन्न देणारी शेती आणि महाराष्ट्रातील विकासाच्या वाटांपासून दूर वसलेलं हे गाव. मिश्रा कुटुंबाच्या साताठ पिढ्या तिथंच नांदल्या. खाऊनपिऊन सुखी असलेल्या मिश्रा कुटुंबानं स्वत:भोवती सुखी सुरक्षिततेचा कोष मात्र विणला नाही.

त्यातही नीलिमा ही मिश्रा कुटुंबातली विलक्षण मुलगी. वाचन केलेल्या, उघड्या डोळ्यांनी आणि जागत्या मनानं जग अनुभवलेल्या वडिलांनी केलेल्या संस्कारांमधून नीलिमाच्या मनाची मूस वेगळीच घडली. नीलिमाच्या संवेदनाक्षम मनावर सभोवतालच्या दारिद्र्यातून असहाय आणि कष्टी आयुष्य जगणा-या गावक-यांच्या दु:खाचा खोल ठसा उमटला! ती अधिकाधिक अंतर्मुख होत गेली. ती बरोबरीच्या मुलामुलींत कधी रमू शकली नाही. ती भोवतालच्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या, दु:ख दूर करण्याच्या विचारात मग्न होऊन जाई. तिला कोणी छांदिष्ट, खुळीदेखील म्हणे. पण तिच्या संस्कारक्षम वयातल्या स्वप्नांनी तिच्या ध्येयाची वाट तिला दाखवली. तिनं अवघ्या तेराव्या वर्षी अविवाहित राहण्याचा आणि स्वत:च्या गावाचं नष्टचर्य संपवून विकासाची कास धरण्याचा निश्चय करून टाकला. मात्र ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना तिला ‘वज्राहून कठोर’ होऊन ठाम निर्धारानं कष्ट उपसावे लागले.

तिनं बहाद्दरपूरमध्येच शालेय शिक्षण पुरं केलं आणि धुळ्यातून पदवी घेतली. नीलिमा मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी पुणे विद्यापीठा त दाखल झाली. त्याच टप्प्यावर तिला पुन्हा एकदा तिच्या स्वप्नांची वाट खुणावू लागली. त्यासाठी तिनं डॉ. श्रीनाथ कलबाग यांच्या पाबळ येथील विज्ञानाश्रमाची निवड केली. शिक्षण आणि विज्ञान यांच्या मदतीनं ग्रामविकासाचं उत्तम मॉडेल तिथं राबवलेलं आहे. नीलिमानं तिथं पाच वर्षं काम केलं. त्या ओघात नीलिमा ही डॉ.श्रीनाथ कलबाग यांची जणू मानसकन्या बनली. तरीही, तिनं त्यांची विज्ञानाश्रमाचा व्याप सांभाळावा ही विनंती अमान्य केली आणि तिनं पुन्हा एकदा बहाद्दरपूरची वाट धरली!

तिथं काम करणं सोपं नव्हतं. गावक-यांच्या अनेक समस्या होत्या. संघटना बांधणं आणि संघर्षात्मक चळवळी उभारणं हे उत्तर त्यावर पुरेसं नाही, तिनं समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रश्नांच्या मुळांचा शोध घेतला! विकासाच्या मोठमोठ्या कल्पना लादण्यापेक्षा छोट्या छोट्या प्रयत्नांतून मार्ग काढण्याचा उपाय अवलंबला. तिनं गावामधल्या तरुणांशी बोलून, त्यांना आपल्या वाटेवरचे सहप्रवासी करून घेतलं.

नीलिमाची स्वत:ची ग्रामविकासाची कल्पना आहे. दारिद्र्य हा मुख्य शत्रू असला, तरी केवळ पैशांची खैरात करणा-या सरकारी योजनांमागे धावायचं नाही. सोयीसवलती देऊन मानसिक दौर्बल्य वाढवणा-या फसव्या गोष्टींवर थांबायचं नाही; त्यापेक्षा प्रत्यक्ष काम आणि सहभाग या मार्गानं विकास साधायचा या तत्त्वावर ती ठाम होती. सरकारी योजनांमधून मिळणारी मदत हा हक्कच आहे असे मानून, काम करण्याची इच्छाशक्ती हरवून बसलेल्या समाजाच्या मानसिकतेशी लढण्याचं आव्हान सर्वांत मोठं होतं असं नीलिमाचं मत आहे. अडीअडचणी सांगायला येणा-या बायकांचे बचतगट स्थापन करण्यापासून तिच्या कामाची सुरुवात झाली. उन्हाळी वाळवणाचे खाद्यपदार्थ बनवून त्यांची विक्री हा पहिला उद्योग या बचतगटांतून हाती घेण्यात आला. नीलिमानं स्थापन केलेल्या ‘भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन’चं गावाला स्वयंपूर्णतेकडे नेणारं ते पहिलं पाऊल ठरलं. स्थानिक पातळीवर उपलब्ध होईल असा कच्चा माल, गावातील बायकांकडचं पारंपरिक कौशल्य आणि जवळच शहरांमध्ये उपलब्ध असलेली बाजारपेठ यांचा मेळ घातला गेल्यानं हा उपक्रम यशस्वी ठरला. त्यानंतर अनेक खाद्यपदार्थ निर्मिती, गोधड्या वगैरेंचं शिवणकाम, भरतकाम, संगणकप्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांतून महिला सक्रिय झाल्या, सक्षम झाल्या आणि त्यांच्यात ताठ मानेनं जगण्याचा आत्मविश्वासही आला!

संस्थेची गोधड्यांच्या निर्यातीची पहिलीच मोठी ऑर्डर, माल पसंत नाही म्हणून नाकारली गेली होती. त्यामुळे बायका निराश झाल्या. त्यांना पुन्हा कामाला उद्युक्त करण्याचा अनुभव नीलिमाला खूप काही शिकवून गेला. त्यावेळी अॅन गॉडफ्रे ही परदेशी डिझायनर तिच्या मदतीला धावली आणि तिनं बायकांना गोधड्या बनवण्याचं रीतसर प्रशिक्षण दिलं, त्यातून निर्यात होणा-या गोधड्या ही ‘भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन’ची खास ओळख बनली आहे. नीलिमानं बचत गटांच्या स्वयंपूर्णतेसाठी तयार होणा-या मालाची विपणन व्यवस्थाही स्थानिक महिलांच्या मदतीनं उभी केली आहे. स्‍त्रीयांनी स्वत: विक्रीकौशल्य आत्मसात केलं पाहिजे यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. ही महिला व्यापारी संघटना पूर्ण भरात आहे. वेगवेगळी उत्पादनं बनवणारी बहाद्दरपूर येथील सगळी यंत्रेही अशिक्षित महिला चालवतात.

एव्हाना विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांचं लोण बहाद्दरपूरच्या उंब-यापर्यंत येऊन पोचलं होतं. प्रश्नाची व्याप्ती मोठी आहे. आधीच कर्जात बुडालेल्या शेतक-यांना कुठूनही नवं कर्ज मिळणं शक्य नव्हतं. नीलिमानं अशा शेतक-यांना एकत्र आणलं. माणशी एक रुपया इतक्या कमी रकमेच्या सहभागातून त्यांचे बचतगट उभे केले. त्यांना आवश्यकतेनुसार पतपुरवठा करतानाच तिनं त्यांच्या शेतीच्या पद्धतीचा अभ्यास केला. सातत्यानं एकपीक पद्धत राबवल्यानं जैवविविधतेचा र्‍हास झाला असल्याचं अभ्यासातून लक्षात आलं. जोडीला महागड्या रासायनिक खतांच्या वापरानं नुकसानीत भरच पडत होती. म्हणूनच त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देताना बहुपीक, आंतरपीक पद्धती आणि सेंद्रिय शेती यांचं महत्त्व पटवून देण्यावर तिनं भर दिला. तिच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा शेतक-यांपाठोपाठ परिसरातील आदिवासी, धुळ्यासारख्या शहरांतील झोपडपट्टीवासीय अशा अनेक घटकांपर्यंत रुंदावत गेल्या.

तिनं शेतक-यांसाठी उभ्या केलेल्या कामाचा विशेष उल्लेख करायला हवा, कारण सरकारकडून शेतक-यांचे पीकनिहाय बचत गट स्थापन करण्याची योजना घोषित करण्‍यात आली आहे. मग काही वर्षं आधीच ही योजना यशस्वीपणे राबवणा-या नीलिमाचं श्रेय नक्कीच मोठं आहे. कामाच्या या यशाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे आतापर्यंत भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतननं वितरीत केलेल्या कर्जांची शंभर टक्के परतफेड झाली आहे.

या वाटचालीत काही प्रकल्प अपयश देणारेही ठरले. त्यात दुग्धव्यवसाय प्रकल्पाचा समावेश होता. पण अशा गोष्टींनी खचून माघार न घेता, चुका सुधारून नव्यानं प्रकल्प उभारण्याची हिंमत नीलिमात आणि तिच्या सहका-यांमध्येही आहे.

मुंबईतील केअरिंग फ्रेण्डस, ल्युपिन फाऊंडेशन, गजानन महाराज संस्थान-शेगाव, लेट्स ड्रीम अशा संस्थांबरोबरच रमेशभाई कचोलिया, डॉ.जगन्नाथ वाणी असे खंदे पाठीराखे तिच्या कार्यामागे उभे राहिले.

त्या पाठिंब्याच्या जोरावर स्वयंपूर्ण खेड्याचं स्वप्न घेऊन नीलिमा जोमानं काम करत आहे. मात्र कामाचा गवगवा करण्यासाठी तिनं कधी स्टार व्हॅल्यू मुलाखती दिल्या नाहीत. तिनं फक्त अंतरीच्या तळमळीनं काम केलं; लोकांचा विश्वास जिंकला. त्यांना दारिद्रयावर मात करण्याची प्रेरणा दिली आणि आर्थिक, सामाजिक व मानसिक स्तरावरही चमत्कार वाटावा असा बदल त्यांच्यात घडवून आणला. आज केवळ बहाद्दरपूर नव्हे, तर आजुबाजूच्या चार जिल्ह्यांत निलिमा मिश्रा हे प्रकाशाच्या वाटेचं, आधाराच्या गावाचं नाव बनलं आहे. ती नीलिमा मिश्रा राहिलेली नाही; नीलिमादीदी झाली आहे!

नीलिमा मिश्रा –
भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन,
पो. बहाद्दरपूर, जि. जळगाव, पिन. 425113,
02597 230585,
nilammishra02@yahoo.com

– नेहा काळे

Last Updated On – 8th Nov 2016

About Post Author

2 COMMENTS

  1. आपण एवढ्या उच्चशिक्षित असुन…
    आपण एवढ्या उच्चशिक्षित असुन सुद्धा, सुखी आयुष्य सोडून, आपल्या जन्मगावी परत जावुन तेथील लोकांना कष्ट करून चार घास सुखाचे मिळावेत म्हणून आपले आयुष्य वेचत आहात त्या साठी मी आपणास salute करतो. साहेबराव पाटील, लातूर. मुळ गाव किल्लारी /कवठा ता. उमरगा जिल्हा. उस्मानाबाद.

  2. मी सहाय्यक प्राध्यापक…
    मी सहाय्यक प्राध्यापक स्वप्निल रणखांबे,रत्नाई महाविद्यालय,राजगुरूनगर, पुणे.मी मराठी साहित्यचा अध्यापक आहे.प्रथम वर्ष वाणिज्य विभागासाठी ‘उत्कर्षवाटा’ हे पाठयपुस्तक अभ्यासण्यासाठी आहे.यामध्ये पुस्तकांती ‘मार्ग शोधताना’ असा नीलिमा मिश्रा यांचा स्व लिखित अंक आहे.तो शिकवत असताना सामाजिक कार्याचा पारदर्शी आरसा मला विद्यार्थ्यांसमोर मांडायला फारच भाग्याचं वाटलं.याचं कारण आज सामाजिक कार्य म्हणत आपली प्रतिष्ठा मरवणारे लोकं पावलोपावली दिसतात परंतु, नीलिमा मिश्रा म्हणजे सामाजिक कार्याची मूलगामी पाळंमुळं रोवणाऱ्या प्रतिभान व्यक्ती आहेत.म्हणून त्यांच्या कार्याची दुरदृष्टी मनाला चेतना देऊन जाते.या सर्व जाणिवेचा परिणाम विद्यार्थ्यांवरही नक्कीच जाणवला.

Comments are closed.