‘I AM THAT’ हा ग्रंथ जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसिद्धी पावला आहे. ग्रंथाचे भाषांतर त्या त्या देशातील भाषेतही झाले आहे. त्याची भाषांतरे विविध भारतीय भाषांमध्ये झाली आहेतच. आध्यात्मिक क्षेत्रातील विद्वद्जनांनी त्या ग्रंथाला आधुनिक उपनिषद म्हणून गौरवले आहे. त्या ग्रंथामुळे जगातील कानाकोपऱ्यातून शेकडो अभ्यासू, पंडित, संशोधक यांची जणू रीघ भारतात आधुनिक काळात लागली ! या ग्रंथाचे कर्ते निसर्गदत्त महाराज या नावाने ओळखले जातात.

त्यांची जन्मकहाणी सर्वसाधारण मुलासारखी आहे. मुळचे तळकोकणातील एका छोट्या गावातील कांबळी नावाचे गरीब कुटुंब पोटा-पाण्यानिमित्त मुंबईला आले. मुलगा हनुमान जयंतीच्या दिनी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला जन्माला आला, म्हणून त्याचे नाव ‘मारुती’ ठेवले. ते वर्ष होते 1897. मुंबईत प्लेगची साथ आली आणि कांबळी कुटुंब पुन्हा कोकणात परतले. वडिलोपार्जित शेती निर्वाहासाठी होती. मारुतीने शेतीकामात मदत करत असताना, चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण कांदळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. त्याच्यावर वडिलांच्या निधनामुळे कौटुंबिक जबाबदारी आली, तेव्हा मारुतीने ती घेण्यासाठी मुंबई गाठली. त्यांचा स्नेह व्यवसायधंदा सांभाळत असताना, कर्नाटकामधील हिंचगिरी संप्रदायातील सत्पुरुष श्री सिदरामेश्वर महाराज यांच्या अनुग्रहित शिष्याशी जमला. ती वयाच्या बत्तीसाव्या वर्षी अकल्पितपणे घडून आलेली सद्गुरुभेट ठरली. सद्गुरुवचनावरील दृढ विश्वास ही मूळ भारतीय श्रद्धा व परंपरा. मारुती यांना सद्गुरूकडून निजज्ञान प्राप्त झाले ! ते स्थितप्रज्ञ अवस्था अनुभवू लागले. ती गुरुभजन आणि आत्मचिंतन यांची फलश्रुती होती. त्यांनी त्या अवस्थेस साजेसे नाव धारण केले- ‘निसर्गदत्त’ !

खेतवाडीतील (मुंबईचा गिरगाव भाग) पोटमाळ्यावरील त्यांच्या छोट्या (10×15 फूटांच्या) खोलीत भजन-पूजन, दासबोध वाचन, ध्यानधारणा अशा गोष्टी नित्य घडू लागल्या. सोबत, निसर्गदत्त महाराजांची दासबोधावर निरुपणे दर गुरुवारी व रविवारी होऊ लागली. त्या बिऱ्हाडाला ‘निसर्गदत्त आश्रम’ असेच नाव प्राप्त झाले. हा सिलसिला 1951 सालापासूनचा. त्यांची खेतवाडीतील छोट्याश्या पोटमाळ्यावरील ही जागा जणू गुहा होती.

निसर्गदत्त महाराज प्रसिद्धीपराङ्मुख होते. त्यांची ओळख बाहेरच्या जगाला झाली ती पोलंड देशातील मॉरिस फ्रीडमन या गृहस्थांमुळे. ते भारतातील आध्यात्मिक संस्कृतीचा अभ्यास करत होते. ते रमणमहर्षी, जे कृष्णमूर्ती यांच्या सहवासात काही काळ राहिलेले होते. फ्रीडमन निसर्गदत्त महाराजांचा पत्ता शोधत खेतवाडीला (मुंबई) पोचले. त्यांना हिंदी भाषा अवगत होती. ते निसर्गदत्त महाराजांशी हिंदीत संवाद साधू लागले. ते, तसेच इतर साधक यांचे प्रश्न आणि महाराजांनी दिलेली उत्तरे असे प्रश्नोत्तर स्वरूपातील संवाद टेपरेकॉर्डरवर ध्वनिमुद्रित होऊ लागले. त्यातूनच ‘I AM THAT’ या इंग्रजी भाषेतील ग्रंथाची निर्मिती 1973 साली झाली.

उपनिषद याचा अर्थ शिष्यांनी गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. शिष्य गुरूजवळ बसून त्यांच्या मनुष्य जन्म, मृत्यू येथपासून आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, निजस्वरूप इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करतो. तशा प्रकारच्या गूढ-गुह्य-गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा आहे.

फ्रीडमन यांच्यामुळे निसर्गदत्त यांची ओळख जगाला झाली. वेदांताचा अभ्यास केलेले नामवंत विद्वान ज्ञानचर्चेसाठी आश्रमात 1973 सालानंतर येऊ लागले. गांधीवादी विचारवंत अच्युतराव पटवर्धन, विधान परिषदेचे सभापती वि.स. पागे, बाळासाहेब भारदे, इंग्लंडमधील भारतीय राजदूत आप्पा पंत, मामा दांडेकर अशांचा त्यांत समावेश होता. वेदाभ्यास केलेले संस्कृत पंडित, भारतीय व परदेशी विचारवंत हेदेखील येत. त्यांच्या बोलण्यात पारमार्थिक साधना, ध्यानयोग, समाधी, ब्रह्म-परब्रह्म संकल्पना, द्वैत-अद्वैत यांविषयी प्रश्न असत. परमार्थाविषयी अनेक शंका, संशय, गैरसमज! निसर्गदत्त जिज्ञासू, देश-परदेशातील विद्वान, शास्त्रांचा-ग्रंथांचा अभ्यास केलेले पंडित या सर्वाना सहज उत्तरे देऊन त्यांच्या कल्पनांचा छेद करत, शंका दूर करत. तशा ज्ञानचर्चा प्रतिदिनी सकाळी आणि सायंकाळी 1973 पासून ते अगदी 1981 साला (निर्वाण) पर्यंत चालू होत्या. काही टिकाटिप्पणी बघा हं !

Shri V S PAGE :

In fact, ‘know thyself’ is the basic teachings of Vedanta. God has been described as pure ‘I’, indiscriminate, without any qualifications or adjuncts. Nisargadatta Maharaj has many ways to direct us towards ourselves. I have never seen any other Teacher who has known no other Philosophy but that of the Self, no other technique of Realization but that of fixing attention on the Self. He has no other ideal but that of being one with the Self.

Jean Dunn (Ramanashram) :

I still have not been able to put a name to the change which has occurred in me since my first meeting with Sri Maharaj, and I don’t not believe that I can, or that I want to. Suffice it to say that ‘I’ feel very blessed to have found him.

Jean Riviere Joffroy, Prof. of Indology, University of Madrid :

Maharaj does not quote from any scriptures and when we read his answers, it is like the fulgurating voice of the Atman, I consider them as authentic Mantras, which we have to read carefully and meditate. He is understandable by everybody, Western or Eastern People because whatever he speaks has an unmistakable stamp of authenticity and is universal by its own nature. It is the great race for the world to have in the world the presence of a living Self-realized Teacher, a modern Rishi we can visit and venerate.

महाराज आत्मज्ञानासारखा गहन विषय सोपा करून सांगत. महाराज निरुपणात ‘I AM THAT’ ग्रंथाचा अधून मधून ओझरता उल्लेख करत. ते ‘मी ते आहे’ असे न म्हणता ‘मी आहेच आहे’ म्हणा असे सांगत. त्यांचे ‘मी आहे’ याचे स्पष्टीकरण असे – “…पाच भुते आणि तीन गुण मिळून आठ. मिळून एक ज्ञान. आठ + वाण म्हणजे आठ जणांचा नमुना. तीच परमात्म्याची आठवण; पंचभूतांचा रस हा शुद्ध सत्त्व गुण, ‘मी आहे’ या आठवणीने आहे. ‘मी आहे’ असे मला ज्ञान आहे म्हणून मला जग असल्याचे ज्ञान आहे. ही दोन्ही एकदमच येतात. माझ्या जन्माच्या निमित्ताने जगाचा जन्म झालेला आहे. आपण आहो तसे भासतो, तेव्हाच जगाचा भास होतो. ‘मी’ म्हणजेच जग आणि जग म्हणजेच मी ! ‘मी’ असल्याची जाग आहे. म्हणून या जगाचे दर्शन आहे. म्हणजे ‘मी’ आपोआप जगजीवन आहे. सकाळी आलेली जाग शुद्ध ‘मी आहे’ची आहे. तीच झोपेपर्यंत असते. पण माणूस दिवसा सर्व व्यवहार देहरूपाने करतो म्हणून त्याला त्याची आठवण नसते. जाग आल्यावर वृत्ती येते आणि देहरूपाला पकडते. मग मनुष्य संस्काराप्रमाणे वागू लागतो. वृत्ती ही देहरूप झाल्याशिवाय मनुष्यास कामकाज स्फुरण पावणार नाही. मनुष्य हा ज्ञानस्वरूप: तेच देवरूप आहे असे नि:शंक मानावे. तेच ते ध्यान, चिंतन, स्मरण, आठवण. तीच ती जाणीव. जे जे पाहिले जाते, ऐकले जाते, त्याचे आपोआप जाणिवेत फोटो घेतले जातात. त्यासाठी मनुष्य काही करत नाही. म्हणून त्याचा कर्तासवरता कोणी नाही. मनुष्य असल्याची जाणीवच माणसास देहाच्या रूपाने मानते. तेच ते कर्म आहे. तुम्ही जाणीव जाणवण्याआधी भ्रमरहित होता. जाणीव हाच तो भ्रम. मनुष्य असल्याची जाणीव असे जे वाटते, तीच मूळ भक्ती, मूळ प्रेम.

उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात. म्हणून त्यांस ब्रह्मविद्या असेही म्हणतात. त्यात आत्मा-परमात्मा, ब्रह्म-परब्रह्म, मोक्ष, ध्यानधारणा, साधना इत्यादी विषयक चर्चा आहे. त्यासाठी आचार्य शिष्याला पराविद्येचा उपदेश करतात. अशा या गुह्य विषयांवरील अनेक प्रश्न चर्चे दरम्यान साधक, जिज्ञासू किंवा ग्रंथ वाचलेले विद्वान लोक निसर्गदत्त महाराजांना विचारत असत व ते त्या सर्वांना विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत, त्यांचे शंका निरसन करत असत.

त्यांच्या प्रतिपादनाची झलक – ब्रह्म अखंड आहे असे म्हणतात. मध्ये तुटलेले कापलेले असे काही नाही. त्याचा तुकडा पडत नाही. त्याला छिद्रे पडत नाहीत; ब्रह्म ही व्यापक संज्ञा आमच्या-तुमच्या ठिकाणी आहे. जाणीव, स्मरण यालाच ज्ञान ही संज्ञा आहे. स्मरण न करता आपण असल्याचे स्मरण, आपण असल्याचे ज्ञान. गुरू न म्हणताही हे ज्ञान गुरू आहे. देव-देव न म्हणता हे ज्ञान ब्रह्म आहे. हे ज्ञान तू धरून ठेव. पण रीत काय? ‘मी ज्ञानस्वरूप आहे’ त्याला संज्ञा ब्रह्म ही आहे. मी ब्रह्म आहे. शब्द वा स्मरण वा जाणीव वा ज्ञान मिळून शब्द आणि अस्मिता. आपण असल्याचा आपोआप बोध. शब्द आणि अस्मिता म्हणून ते ब्रह्म ! जणू शब्द ‘मी आहे’ ! साधना करून ते साधनातीत, आयते असलेले तुम्हाला सापडणार नाही. जगातील अनंत साधनांनी स्वरूपावरील आवरण जात नाही. उलट, त्यावर आवरणे वाढतात. दिलेले दृष्टांत मनाची समजूत घालण्यासाठीच ! वस्तूला सर्व दृष्टांत हीन असतात. वस्तूला दृष्टांत नाही. अनेक उपासना सांगितल्या आहेत, त्या केवळ आपली प्राप्ती होण्यासाठी सांगितल्या आहेत. तुम्ही हातात बॅटरी घेऊन तुम्हालाच शोधण्यास चालला आहात ! सापडणार? बॅटरी हे ज्ञान आहे. ते देहात्मबुद्धीचे ज्ञान घेऊन स्वरूप बघण्यास जाल तर मिळणार नाही. वस्तुत: आत्मा हरवत नाही. आत्मा हे माणसाचे स्वयंभू आत्मरूप आहे. तो तोच आहे. ते ज्ञान कधी हरवत नाही, मग शोध कशाचा?”

निसर्गदत्त महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या ज्ञानवाणीचे श्रवण लाभलेल्या असंख्य विद्वत्जनांनी एकमुखाने त्यांचे वर्णन केले आहे, की त्यांनी वेद-उपनिषदे वा इतर कोठल्याही शास्त्रपुराणांचा अभ्यास केला नाही, पण उपनिषदातील ज्ञान आणि महाराजांच्या शिकवणीतील सार यांत कमालीची साम्यता अनुभवता येते आणि म्हणून उपनिषदकालीन ऋषी याज्ञवल्क्य किंवा गौतम यांच्या सारखेच ते आधुनिक महात्मा होत.

निसर्गदत्त महाराजांचे देहावसान मुंबईत राहत्या घरी 8 सप्टेंबर 1981 रोजी झाले. देहावर अग्निसंस्कार वाळकेश्वर येथील बाणगंगा दहनभूमीत करण्यात आले. त्यांचे समाधी मंदिर त्याच स्थळी उभारण्यात आले आहे.

श्री निसर्गदत्त अध्यात्मकेंद्र दहिसरमधील (पश्चिम मुंबई) पाठारेवाडी येथे उभारले गेले आहे. सांप्रदायिक कार्यक्रमांचे तेथे नियमित आयोजन केले जाते. जगभरातील अनेक  जिज्ञासूंनी फेसबुकवर ‘निसर्गदत्त महाराज पब्लिक ग्रूप’ स्थापन केले आहेत, महाराजांच्या शिकवणीवर आधारित ‘वेबसाईट्स’ आहेत. मोबाईलवरही असंख्य ‘व्हॉट्स अॅप ग्रूप’ आहेत.

प्रेमानंद (अनिल) धोंडदेव चुबे 9819214661  premchube@gmail.com

————————————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

 1. भारता बाहेरील देशात निसर्गदत्त महाराज प्रसिद्ध आहेत.त्या मानाने महाराष्ट्रात अनेकांना महाराजांची माहिती नाही.
  खूप चांगली व अस्सल माहिती या लेखाद्वारे समजते.
  लेखक श्री.अनिल चुबे ह्यांचे अभिनंदन.
  महाराजांच्या अनेक अनुयायी सज्जनांपर्यंत हा लेख गेला पाहिजे.
  सर्वांना आवडेल.
  संध्या जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here