निसर्गकवी बालकवी (Balkavi)

0
255
-heading

बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या आत्मचरित्रात तशी नोंद आहे. काहींनी तो दिनांक 5 मे असा नोंदला आहे. तिथी मात्र चैत्र वद्य नवमी हीच आहे.

बालकवी यांचे नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे. त्यांचे मूळ आडनाव ठोंबरे असे होते. ते त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी उच्यारसौकर्यासाठी ठोमरे असे करून घेतले. त्यांचा जन्म खानदेशात धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 या दिवशी झाला. त्यांच्या आईचे माहेर धरणगाव. ठोमरे कुटुंब मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे. बालकवी हे भावंडांतील मधील. त्यांची मोठी बहीण मनुताई (जिजी) आणि भाऊ अमृत. त्यांच्याहून धाकटी बहीण कोकिला, धाकटा भाऊ भास्कर. त्यांचे वडील पोलिस खात्यातील नोकरीसाठी खानदेशात गेले. वडिलांची बदली वारंवार होत असे आणि कुटुंब बदलीच्या गावी जात असे. बालकवी यांच्या आई गोदुताई यांना मराठी वाचता येत असे. त्या पोथ्या वाचत असत. गोदुताईंची आई दळताना भक्तीपर ओव्या स्वत: रचून म्हणत असे. बालकवी यांच्या मोठ्या बहिणीने-जिजीनेही ‘पांडवप्रताप’, ‘रामविजय’, ‘भक्तलीलामृत’ हौसेने वाचून काढले होते. जिजीचे शिक्षक पती प्रल्हादपंत भावे यांनी तिला ‘नवनीत’ वाचण्यास दिले. ते तिला इतके आवडले, की तिने त्याची पारायणे केली. बालकवी यांनीही जिजीबरोबर नवनीत वाचले. मोरोपंतांचे ‘आर्याभारत’ वाचले. बालकवींनी जिजीबरोबर भेंड्या लावण्यासाठी कविता पाठ केल्या. त्यांना आद्य अक्षराच्या कविता न आठवल्यास ते स्वत: ऐनवेळी कविता रचून म्हणत.      

बालकवी कविता लहान वयात म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी लिहू लागले. त्यांना लहानपणी विटीदांडू, आट्यापाट्या या खेळांची आवड नव्हती. त्यांना मित्रांबरोबर दूर फिरण्यास जाणे आवडे. ते रात्री दिवे लागल्यावर बोटांच्या सावल्यांमधून कुत्रा, घोडा, उंट, मनुष्य असे आकार भिंतीवर उमटवत. त्यांचे शिक्षण एरंडोल, धुळे, बडोदा, अहमदनगर, पुणे येथे झाले. पण ते मॅट्रिक झाले नाहीत. त्या काळात वंगभंग चळवळ, स्वदेशी, स्वातंत्र्य हे शब्द चोहीकडे उसळत होते. बालकवीही त्या देशभक्तीने भारलेले होते. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी ‘रावसाहेबी’’ ही कविता पोकळ साहेबी करणाऱ्यांवर लिहिली होती. त्यांनी त्याच वयात ‘चहा’, ‘कपबशी’ अशाही, साहेबी संस्कृतीवर टिप्पणी करणाऱ्या काही कविता रचल्या होत्या. जिजींनी त्यांच्या आठवणींत बालकवींनी राजमाता जिजाईवर आणि पन्हाळगडावर कविता रचल्याचेही सांगितले आहे. बालकवींचा भाऊ अमृतराव जहाल राजकारणात काही काळ उतरला होता. त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला होता; त्याचा बालकवींनाही त्रास झाला.

वनवासी कवी यांना त्र्यंबक (बालकवी) आवडला. ते कीर्तनकार होते. ते त्याला घेऊन उज्जैन-देवासकडे निघाले. पण त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्र्यंबक अवघ्या दोन महिन्यांत वडिलांकडे परतला. पण त्र्यंबकमधील कवी त्या प्रतिकूल परिस्थितीतही जागा राहिला. जळगावमध्ये कविसंमेलन 1907 मध्ये झाले. त्या संमेलनाला रेव्हरंड टिळक, विष्णू मोरेश्वर महाजनी इत्यादी तेवीस प्रमुख कवी उपस्थित होते. अध्यक्षपदी कवी कर्नल डॉ. कीर्तिकर होते. रेव्हरंड टिळक यांचे ‘चित्रकाव्य’ या विषयावरील भाषण संपता संपता बालकवी उभे राहिले व त्यांनी स्वत:च्या कविता म्हणण्यास सुरुवात केली. कवितेची सुरुवातच ‘अल्पमती मी बालक, नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ती। कविवर्यांनो मदिय बोबडे बोल धरा परि चित्तीं’॥ अशी केली. त्याच्या कविता ऐकताना सभा तल्लीन झाली. रे. टिळक यांनी शाब्बास म्हणून त्यांची पाठ थोपटली. त्यांना ‘बालकवी’ अशी पदवी दिली. त्याचा पागोटे व जरीकाठी उपरणे देऊन गौरव केला. तेव्हापासून ठोमरे ‘बालकवी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या वडिलांचे निधन नंतर वर्षभरातच झाले. घरची सर्व जबाबदारी बालकवींवर पडली. त्यांनी अहमदनगर, पुणे महाबळेश्वर येथे शिक्षकाची नोकरी केली, शिकवण्या केल्या. पण त्याबरोबर त्यांचे काव्यलेखन सतत बहरत गेले. त्यांची कविता आरंभी ‘आत्मज आपण भरतभूमिचे असुनि काय बा केले।’, ‘ठोकोनी दंडा पिटोनी मांड्या, जपान पुढती येई।’ अशा प्रकारची वृत्तबद्ध, काहीशी कृत्रिम होती. ती पुढे मृदुशब्दी, प्रवाही होत गेली. त्यांना निसर्ग-कवितेत स्वत:चा सूर सापडला. त्यांचा चाहता मित्र-परिवार खूप वाढत गेला. त्यांमध्ये गुरूतुल्य ना. वा. आणि लक्ष्मीबाई टिळक यांचे कुटुंब होते; गोविंदाग्रज यांच्यासारखे (रा ग. गडकरी) गाजत असलेले नाटककार-कवीही होते. बालकवींच्या कौटुंबिक जीवनात मात्र सतत कलह होता. त्यांचे बंधू अमृतराव आणि त्यांची पत्नी यांचे वागणे दिवसेंदिवस अधिक बेजबाबदार होत गेले. बालकवी यांची आई, अमृतराव व त्यांची पत्नी या सर्वानी मिळून बालकवींचे मन पत्नी पार्वतीबाईंबद्दल कलुषित केले. त्यामुळे बालकवी घराबाहेर हसूनखेळून सगळ्यात मिसळत. मात्र त्यांनी पत्नीला घरात नीट वागवले नाही; वेळप्रसंगी मारहाण ही केली. अमृतरावांचे आणि बालकवींचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. ते मन शांत होण्यासाठी कविमित्र सोनाळकर यांना भेटण्यास जावे, म्हणून भादली स्टेशनकडे चालत निघाले. ते गाडी पकडण्यासाठी रूळांमधून चालत-पळत जात असताना, मालगाडीखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. 

बालकवी यांच्या पद्यरचना लोकांपर्यंत पोचल्या, पण त्यांनी काही गद्य लेखनही केलेले होते. त्यांचा ‘आधुनिक मराठी कविता : तिचे स्वरूप’ हा लेख 23 जानेवारी 1912 च्या ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाला होता. बालकवींनी मिस डब्ल्यू. एम. हेन यांनी संग्रहित केलेल्या इंग्रजी गोष्टींच्या आधारे सोळा गोष्टी लिहिल्या होत्या. त्या छोट्या बोधकथेच्या वळणाच्या गोष्टी होत्या. ‘बाँबे ट्रॅफर’ आणि ‘बुक सोसायटी’ने त्या ‘सृष्ट चमत्कार’ या नावाने प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांचा पत्रव्यवहार बहरला होता.

बालकवी यांची सहा पत्रे ‘विश्रब्ध शारदा’ या पुस्तकात वाचण्यास मिळतात. त्यांतील चार सोनाळकर यांना लिहिलेली आहेत आणि दोन ना. वा. टिळक यांचा मुलगा देवदत्त. त्याला लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रे’मध्ये दिसणारे बालकवी हसरे, खोडकर आहेत. पार्वतीबाईंच्या आत्मचरित्रात दिसणारे बालकवी कठोर, करड्या स्वभावाचे पारंपरिक नवरा आहेत. पत्रांत दिसणारे बालकवी भावुक आहेत. त्यांनी 12 जून 1915 या दिवशी सोनाळकर यांना लिहिले, ‘…माझे मन तर पाणी टाकून विझवलेल्या विस्तवाप्रमाणे झाले आहे. खाली कोळसे व वर मात्र थोडीशी कल्पनेची धग ह्याशिवाय काही राहिले नाही. सर्वत्र सामसूम. प्रेतकळा आलेली आहे, पण असे सर्वांचे होऊ नये. कोणी तरी काही तरी करा…आत्मा, ईश्वर, ब्रह्म, माया, पूर्वजन्म सगळी स्वप्ने आहेत. ती बालमनाचे समाधान करू शकतील. त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसेल, पण निदान माझा तरी त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. नाइलाज आहे. …असो लिहिताना भलतीकडे वाहवलो. पत्र पाठवा, उद्योगाला लागा.’ त्यांनी देवदत्त टिळक यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी सही करताना लिहिले आहे : ‘पत्र संपले. हृदय भरलेलेच आहे.’ –त्र्यंबक

बालकवी यांच्या अनेक कवितांमधूनही ही उदासीनता, भावनोत्कटता प्रत्ययाला येते. तरी बालकवी यांच्या ‘श्रावणमासी’, ‘फुलराणी’, ‘निर्झरास’ या कविता मराठी मनात ठसल्या आहेत. त्यांच्या कवितेतील आकाश, चद्र-चांदण्या, निर्झर, हिमशिखरे, पुले, हरणे, बगळे, ऊन-पाऊस, इंद्रधनुष्य सारे काही वाचकाला सर्वकाल सुखावते. त्या कवितांना विलक्षण चित्रमयता आहे. दृश्ये डोळ्यांसमोर सहज उभी राहतात. कुसुमाग्रज यांनी बालकवी यांच्यावर रचलेली छोटीशी कविता त्यांच्या मन:सृष्टीवर भाष्य करते : हे अमर विहंगम! गगनाचा रहिवासी! त्या नीलसागरावरचा चतुर खलाशी! प्रिय सखा पुलांचा, ओढ्यांचा सांगाती ! त्यांच्यास्तव धुंडुनि ताराकण आकाशीं ! आणसी धरेवर अक्षर या धनराशी! 
विनया खडपेकर

vinayakhadpekar@gmail.com
——————————————————————————————————–

स्मृतिचित्रे या पुस्तकात बालकवी यांचा आलेला उल्लेख 

‘बालकवी यांच्या आठवणी’ हे लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या पुस्तकातील एक स्वतंत्र प्रकरण आहे. जळगावमध्ये झालेल्या 1907 मधील पहिल्या मराठी कविसंमेलनात उत्स्फूर्तपणे कविता करणाऱ्या मुलाला रेव्हरंड ना.वा. टिळक यांनी पाहिले व त्याला ‘बालकवी’ ही पदवी दिली. टिळक यांना त्यांचे शिक्षण झाले पाहिजे अशी काळजी वाटत होती. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली बालकवी यांना ठेवले. बालकवी अशक्त होते म्हणून टिळक यांनी त्यांच्याकरता कॉर्डलिव्हर ऑइल आणले. बालकवी यांनी लक्ष्मीबाई यांना आईच्या जागी मानले होते. बालकवींना विषमज्वर हा आजार झाला, त्यावेळी त्यांना दोघांनीही फुलांप्रमाणे जपले. बालकवी यांची खरी आई म्हणाली, ‘तुम्हीच त्याला नवा जन्म दिला आहे.’ बालकवी यांनी कविता केली, की ती लक्ष्मीबाई यांनी लगेच ऐकली पाहिजे असा बालकवींचा हट्ट असे. त्या कामात असल्या व त्यांनी कविता ऐकली नाही, की बालकवी त्या कवितेचा कागद फाडूनच टाकायचे. 

लक्ष्मीबाई म्हणतात, ‘बालकवी घरात आल्याचा काळ कवितांचाच काळ होता.’ लक्ष्मीबाई यांनी बालकवी यांच्या मनावर कोणाचा कधी अपमान करू नये हा संस्कार केला. बालकवी यांचा स्वभाव चंचल होता; सतत बदलत असे. ते लक्ष्मीबाई यांच्याकडे असताना, आनंदी, खेळकर असत. पण तेथून बाहेर पडल्यावर त्यांची वृत्ती खिन्न आणि निराश अशी होई. टिळक पती-पत्नी त्यांच्यावर इतके प्रेम करतात म्हणजे त्यांना बालकवींना ख्रिस्ती बनवायचे आहे असे बालकवी यांच्या मनात आले. तेव्हा, लक्ष्मीबाई यांनी सांगितले, ‘जे प्रेम एखाद्या हेतूने केले जाते ते प्रेमच नव्हे. आमचे प्रेम म्हणजे नाटक आहे असे तुला वाटते का’? हा प्रश्न विचारल्यावर बालकवी यांना त्यांची चूक कळली. त्यांना दुसऱ्यांच्या कवितांचा आदर वाटे. त्यांनी एकदा टिळकांची ‘वनवासी फूल’ ही कविता विद्यार्थ्यांना उत्तम शिकवली होती. लक्ष्मीबाई यांनी घरातील खेळ, छोटी छोटी भांडणे अशा बालकवी यांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या म्हणतात, ‘त्यांच्या घरात माणसे खूप आली, पण बालकवींप्रमाणे कोणीच नाही! ते प्रेमळ, मनमिळावऊ व निष्कपट होते.’ 

– नितेश शिंदे 

info@thinkmaharashtra.com

9892611767
 

 

 

About Post Author