निखिल वागळेची सच्ची पत्रकारिता

7
30
carasole

निखिल वागळेपत्रकारामध्ये जर सामाजिक भान प्रखर असणारा निर्भीड कार्यकर्ता दडलेला असेल तर ती पत्रकारिता अधिक परिणामकारक होते. निखिल वागळे हे त्या विधानाचे मूर्तिमंत रूप! ते लोकशाहीच्या चौथ्या खांबाला भक्कम ठेवण्यासाठी तब्बल पस्तीस वर्षे झगडत महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना पाठबळ देत आहेत.

त्यांनी ‘राष्ट्र सेवा दला’च्या विद्यार्थी चळवळीपासून 1974 साली सार्वजनिक जीवनास सुरुवात केली. निखिल वागळे यांचे नाव गेल्या चाळीस वर्षांत महाराष्ट्राच्या घराघरात पोचले आहे.

त्यांनी ‘माणूस’, ‘सोबत’, ‘साधना’ अशा नियतकालिकांमधील सदरे, ‘साप्ताहिक दिनांक’, ‘आपलं महानगर’मधील संपादकीय लेख येथपासून ते टेलिव्हिजनवरील ‘आमने सामने’ यांसारखे टॉक शो, ‘आयबीएन लोकमत’वरील ‘ग्रेट भेट’, ‘आजचा सवाल’ यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केले व नाव कमावले. पण ते विशेष चर्चेत आले ते ‘आयबीएन लोकमत’वरील ‘आजचा सवाल’ कार्यक्रमामुळे. त्यांना त्याचमुळे त्या वाहिनीचे प्रमुखपद गमावावे लागले असेही म्हणतात.

वागळे यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गिरगावातील आर्यन शाळेत झाले. त्यांचे वडील ‘एमएसईबी’मध्ये इंजिनीयर होते. पुढे त्यांचे कुटुंब ठाण्याला गेले. तेथे एम एच शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्या काळातील त्यांचे शिक्षक डी.टी. कुलकर्णी (पुढे ते एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष झाले) यांचा त्यांच्या जडणघडणीवर प्रभाव पडला. डी.टी. विद्यार्थ्यांना घरी बोलावून ‘साधना’, ‘सोबत’ यांसारख्या नियतकालिकांमधील लेख वाचून दाखवत. शाळेत असताना, वागळे यांच्या काही कविता मासिकांमध्ये छापून आल्या होत्या. त्यांची लिखाणाची आवड कुलकर्णीसरांमुळे जोपासली गेली, वाढली असे ते आवर्जून सांगतात.

पुढे, त्यांना ते रुईया कॉलेजमध्ये असताना जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’च्या विचाराने भारावून टाकले. जयप्रकाश यांचा ‘रूढ शिक्षण पद्धतीत काही अर्थ नाही, ते खरे शिक्षण नाही’ हा विचार वागळे यांच्यावर इतका ठसला, की त्यांनी बी.एस्सी. करत असताना मध्येच शिक्षण सोडले आणि काही मित्रांच्या सोबतीने बिहार गाठले. तेथे ते सहा महिने निरनिराळ्या गावांमध्ये हिंडले, त्यांनी पडेल ते काम केले. त्या भारावलेल्या दिवसांविषयी ते म्हणतात, “बिहारमध्ये सरंजामशाहीचा प्रभाव होता. मुंबईच्या घरातील सुरक्षित आयुष्य आणि तिकडची गरिबी, मागसलेपणा यांची तुलनाच होऊ शकत नव्हती. बिहारने मला आयुष्याची खरी जाणीव करून दिली. आम्ही जयप्रकाशजींच्या कदमकुवा या गावी त्यांची भेट घेतली. त्यावेळी लालुप्रसाद यादव, पासवान, नीतिशकुमार हे तरुण नेते तेथे चळवळीत सक्रिय होते. आमच्यासारखे हजारो तरुण त्यांची हाक ऐकून बिहारमध्ये आले होते. जयप्रकाशजी सांगत, ‘बिहार देखो, जैसे गांधीजीने देखा वैसा पुरा भारत देखो और हमेशा सवाल पुछना सिखो’’

ते बिहारमधून परतले तेच क्रांतीचे वारे डोक्यात घेऊन. त्यांच्या मध्यमवर्गीय घरामध्ये कोणाचाही राजकारणाशी संबंध नव्हता. एस.एस.सी.ला  बोर्डात आलेल्या निखिलने शिक्षण सोडावे याला घरून साहजिकच विरोध झाला. ते ज्या लोकांमध्ये वावरत होते त्यांपैकी एस.एम. जोशींसारख्या नेत्यांनीही त्यांना पदवी पूर्ण करण्याचा आग्रह केला. पण एक तत्त्व म्हणून घेतलेल्या त्यांच्या निर्णयावर ते ठाम राहिले. वागळे यांनी ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’चे पहिले ‘कन्व्हेनर’म्हणून जबाबदारी स्विकारली. त्यांनी ‘राष्ट्र सेवा दला’साठी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणूनही काम केले. त्यांनी काही वर्षे संघटनेचे काम केल्यानंतर पुन्हा वेगळ्या वाटेने जायचे ठरवले.

“संघटनेच्या कामाच्या निमित्ताने माझा निरनिराळ्या नेत्यांशी जवळून संबंध आला. माझ्या असे लक्षात आले, की अनेकदा नेत्याचे काही चुकले, त्याचा एखादा विचार पटला नाही तरी त्याविरुद्ध कोणी काही बोलत नाहीत. नेत्याला देवपण देणे मला कधीच मान्य नव्हते, सर्वोदयी नेत्यांचे विचारही मला पटत नव्हते. मुळात माझा देवावर विश्वास नाही. कोठल्याही पुढाऱ्याला देवपण देण्यापेक्षा त्याच्या विचारांना महत्त्व द्यावे हे माझे स्पष्ट मत. एकंदरीतच, माझा स्वभाव संघटनेत काम करण्याचा नाही हे मला जाणवले.”

संघटनेच्या कामादरम्यान त्यांचे लिखाण चालू होते. ते ‘साधना’, ‘माणूस’, ‘दिनांक’, त्या काळी मराठीतूनही प्रसिद्ध होणारे ‘ब्लिट्झ’ अशा नियतकालिकांमध्ये सदरे लिहित. आंध्रमध्ये मोठे वादळ 1978 साली आले होते. तेव्हा त्यांनी तेथे जाऊन ‘रिपोर्ट’ लिहिले होते. मोरवीचे धरण फुटले तेव्हाही त्यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन ‘कव्हर स्टोरी’ लिहिली. त्यांनी विल्यम शेररच्या इंग्रजी पुस्तकाचे केलेले मराठी भाषांतर ‘गांधी – महात्मा आणि माणूस’ या नावाने माजगावकरांनी प्रसिद्ध केले.

पत्रकार म्हणून ओळख प्रस्थापित करणारा एक क्षण त्यांच्या आयुष्यात आला. त्याबद्दल ते सांगतात, “ ‘इंडिया टुडे’च्या धर्तीवर मराठी साप्ताहिक सुरू व्हावे या संकल्पनेतून 1979 मध्ये ‘साप्ताहिक दिनांक’ सुरू झाले. मी त्यामध्ये फ्रिलान्सर म्हणून लिहित असे. काही काळानंतर, निळू दामले आणि अशोक शहाणे यांनी ‘साप्ताहिक दिनांक’च्या संपादकपदाचा अचानक राजीनामा दिला. साप्ताहिकाच्या विश्वस्तपदावर दुर्गा भागवत, सदानंद वर्दे, दिनू रणदिवे यांसारखी मातब्बर मंडळी होती. मला ‘तू संपादक होशील का?’ अशी विचारणा करण्यात आली. मीही फारसा विचार न करता होकार दिला. आव्हान स्वीकारण्याची हौस होतीच. कामही आवडीचे होते. कामाच्या निमित्ताने माझा अनेक मोठ्या तसेच नवीन लेखकांशी जवळून परिचय झाला. तेव्हा मी अवघा एकोणीस वर्षांचा होतो. त्याकाळी मी भारतातील सर्वांत तरुण संपादक होतो.”

“द्वारकानाथ संझगिरी, सतीश तांबे, मेघना पेठे, आनंद नाडकर्णी, कुमार केतकर अशा अनेकांनी त्यांच्या लिखाणाला ‘दिनांक’पासून सुरुवात केली. अरुण साधू, दिनकर गांगल यांचा पाठिंबा मिळाला. मी ‘ग्रंथाली’च्या चळवळीतही भाग घेत असे. श्रीपाद हळबे, अविनाश परांजपे आमच्यासाठी नेहमी लिहायचे. त्या दिवसांत आम्ही सगळी हौशी मंडळी दर रविवारी जमायचो. आजुबाजूच्या घटनांवर, साहित्यावर चर्चा व्हायच्या. मी संगमरवरी मनोऱ्यात बसणारा संपादक नव्हतो. मी नेहमी लोकांमध्ये राहिलो. लेखक जोडत गेलो. अनेकांना लिहिते केले. पुढे, ‘दिनांक’मधील आर्थिक अडचणींमुळे मी बाहेर पडलो. तेव्हा गोविंद तळवलकरांनी मला ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये लिहिण्यासाठी बोलावले. मग मी त्यांच्या रविवार पुरवणीसाठी नियमित लिहू लागलो.” वागळे यांनी किर्लोस्कर ग्रूपच्या ‘मनोहर’मध्येही दोन वर्षे काम केले.

निखिल वागळेवागळे यांची संपादकीय कारकीर्द गाजली ती ‘आपलं महानगर’ या सायंदैनिकामुळे. त्यांनी तेथे स्वत:ची प्रकाशन संस्था स्थापन केली व प्रकाशनात नवनवे प्रयोग केले. त्यांनी 1982 मध्ये ‘अक्षर’ दिवाळी अंक सुरू केला, नंतर 1983 मध्ये क्रिकेटला वाहिलेले ‘षटकार’ आले व मग 1984 मध्ये सिने-नाट्य क्षेत्रासंबंधी ‘चंदेरी’ सुरू झाले. ती सर्व प्रकाशने गाजली. ‘महानगर’ने तत्कालिन प्रत्येक सामाजिक प्रश्नांवर, समस्यांवर आवाज उठवला. मुंबईतील दंगल, अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील ‘निर्भय बनो’ आंदोलन येथपासून नर्मदा आंदोलनापर्यंत सर्वांची दखल घेतली. वागळे यांनी स्वत: चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला; काही वेळा, नेतृत्वाची धुरादेखील सांभाळली. साहजिकच, त्यांच्यावर राजकारण्यांचा रोष ओढवला. ‘महानगर’वर हल्लेही झाले. त्यांनी पत्नी मीना हिच्या साथीने ‘महानगर’ अठरा वर्षे एखाद्या झंझावातासारखे चालू ठेवले. त्यांची पावले ‘महानगर’ 2006 मध्ये विकल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मिडियाकडे वळली. त्याला कारणीभूत ठरले त्यांचे जुने मित्र राजदीप सरदेसाई. ‘आयबीएन’ने जेव्हा मराठी चॅनेल सुरू करण्याचे ठरवले तेव्हा संपादकपदासाठी वागळे यांची निवड झाली.

दोन्ही माध्यमांची ताकद आणि त्यांच्यातील फरक यांविषयी ते म्हणाले, “जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे हा या दोन्हींमधील मुख्य फरक आहे. लोकप्रिय दैनिक जर दोनेक लाख लोकांपर्यंत पोचत असेल तर टीव्ही चॅनेल वीस-पंचवीस लाखांपर्यंत पोचतो. जे वाचू शकत नाहीत तेसुद्धा टीव्ही बघतात. विचारवंत, राजकारणी आणि सामान्य लोक यांच्यातील दुवा बनण्याचे काम टीव्हीवर राहून करता येते. ‘आयबीएन लोकमत’मुळे जास्त लोक मला ओळखू लागले. टेलिव्हिजनवर लेखनाच्या सवयीचा खूप फायदा होतो. लिहिणाऱ्याला आपले विचार बोलतानाही मुद्देसूदपणे मांडता येतात.” त्याच वेळी त्यांनी स्वत: लेख लिहिणे आणि त्याखाली आपले नाव छापून येणे याची मजा वेगळी आहे. ते समाधान टीव्हीवर मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. त्यांचा मुलगा क्रीडा पत्रकारिता शिकत आहे.

चॅनेलवर सादरीकरणाला जास्त महत्त्व असते. तेथे समोरच्या व्यक्तीशी थेट संवाद साधता येतो. कॅमेऱ्यासमोर माणूस खोटे नाही वागू शकत. तो प्रत्यक्षात जसा आहे तसाच टीव्हीवर दिसतो. “समोरच्याची एखादी गोष्ट पटली नाही तर मी प्रतिक्रिया देणारच! लेखक त्याच्या लेखात कठोर शब्दांमधून व्यक्त होतो; तसाच, खटकणाऱ्या गोष्टींबद्दल माझ्या बोलण्यातून, हावभावातून संताप व्यक्त होतो. म्हणूनच तेथे अभिनय करण्याचा प्रश्न येत नाही. माझ्या कार्यक्रमाचा पूर्ण आराखडा माझ्या डोक्यात तयार असतो. मी माझ्या पाहुण्यांना कार्यक्रमाची दिशा ठरवू देत नाही. तो कार्यक्रम माझा आहे आणि मला हवा तसा तो पुढे जाणार या बाबतीत मी ठाम असतो. मी काहींना बोलू देत नाही असाही आरोप माझ्यावर केला जातो, पण कोणी चुकीचे बोलत असेल तर मी गप्प का राहायचे? भ्रष्ट राजकारणी जर समोर असेल तर मी त्याच्याशी प्रेमाने कसा बोलू? म्हणून मी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडतो असा विश्वास लोकांना वाटतो. पोलिस ऐकत नाहीत, सरकार ऐकत नाही मग सांगणार कुणाला? हा ‘दाढीवाला’ बाबा त्यांचा आहे असे त्यांना वाटते. मला दिवसात चारपाचशे तरी फोन येतात. सगळ्यांशी बोलत बसलो तर कामच होणार नाही. कधीकधी, ‘बायकोशी भांडण झाले आहे, काय करू?’ असे गंमतीशीर फोनपण येतात.”

चांगला पत्रकार हा समाजाची दृष्टी अधिक स्पष्ट, कान अधिक तीक्ष्ण तर मेंदू अधिक सजग करतो. देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असतानाच्या काळात समाजाचे प्रतिनिधी म्हणून पत्रकारांनी काही ठोस भूमिका घ्यावी, की तटस्थपणे त्याने त्यांची निरीक्षणे नोंदवावी याबद्दल त्यांचे विचार स्पष्ट आहेत.

“कुठल्याही घटनेची नोंद करताना किंवा परिस्थिती जनतेपुढे मांडताना आम्ही तटस्थच राहणार. मात्र जे चूक आहे त्याविरुद्ध आम्ही नेहमीच बोलणार. पत्रकार म्हणून स्टँड घेणारच. प्रत्येक पक्षात बरेवाईट लोक आहेत. लोकांनाही चांगल्या माणसाची किंमत नाही, ती असती तर त्यांनी अयोग्य प्रतिनिधींना निवडून दिले नसते. मी पूर्णपणे भारतीय घटनेच्या चौकटीत वागणारा पत्रकार आहे. आपल्या घटनेने काही मूल्ये ठरवून दिली आहेत. त्यामुळे समता, धर्मनिरपेक्षता या बाबतींमध्ये तडजोड होऊच शकत नाही. धर्माच्या आधारे राजकारण करणाऱ्यांना मी विरोध करणारच. हवी तर त्यांनी घटनादुरुस्ती करावी.”

तडजोडी करणे शक्य नाही म्हणून निखिल वागळे राजकारणात जात नाहीत. “मी काहींच्या विचारांना विरोध केला तरी त्या माणसाशी वैर मात्र पत्करत नाही. मला माणसे जोडायला आवडतात. माझ्या कार्यक्रमातून जर कोणी दुखावले गेले असेल तर मी स्वत: फोन करून त्यांच्याशी काही दिवसांनी बोलतो. आता डॉक्टर ऑपरेशन करतो तेव्हा थोडे दुखणारच! माणसे महत्त्वाची. संवाद तोडणे पत्रकाराला परवडणारे नाही. त्या बाबतीत विजय तेंडुलकर यांचा माझ्यावर मोठा संस्कार आहे. माणसातील निरनिराळ्या प्रवृत्तींचे मला आकर्षण आहे. त्यांच्यात रस आहे. चांगल्या, वाईट, वेड्या…  सर्व माणसांशी बोलायला मला आवडते. विशेषत: वेड्यांशी.”

‘आयबीएन लोकमत’वरील ‘ग्रेट भेट’ ही काहीशी नवीन कल्पना 2008 मध्ये सुरू करण्यात आली. सचिन तेंडुलकरच्या पहिल्या मुलाखतीपासून ‘ग्रेट भेट’ला उत्तम प्रतिसाद लाभला. ‘ग्रेट भेट’विषयी बोलताना वागळे खूप रंगून गेले. त्यांनी त्या निमित्ताने अडीचशे मुलाखती घेतल्या. त्यातील निवडक मुलाखतींच्या पुस्तकालाही छान प्रतिसाद मिळाला आहे. तो ‘आजचा सवाल’सारखा आक्रमक कार्यक्रम नाही. कार्यक्रमात जर चांगला कंटेंट असेल तर लोक ऐकतात हे त्या कार्यक्रमाने सिद्ध झाले. “लहान मुलाच्या उत्सुकतेने मी या थोरामोठ्यांच्या यशाची कहाणी, संघर्ष, अपयश जाणून घेण्याचा प्रयत्न केला.”

वागळे ‘आयबीएन लोकमत’वरून मोकळे झाल्यावर ‘मी मराठी’ वाहिनीवर ‘पॉइंट ब्लँक’ नावाचा ‘आजचा सवाल’च्या धर्तीचा चर्चात्मक कार्यक्रम ‘अँकर’ करत आहेत.

पत्रकारितेच्या सर्व क्षेत्रांमध्ये मुशाफिरी केल्यानंतर पुढचे मनसुबे सांगताना वागळे म्हणाले, “अजून काही वर्षांनी पुन्हा एकदा लिखाणावर लक्ष केंद्रित करण्याचा मानस आहे. माझे शब्दांवर मनापासून प्रेम आहे. ‘महानगर’च्या काळातील संघर्षाविषयी लिहायचे मनात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरही माझे वेगळे संबंध होते. आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी माणूस म्हणून मला त्यांच्याविषयी आकर्षण वाटत राहिले. त्यांच्याशी अनेक भेटी झाल्या आहेत. त्यांच्यावर एक पुस्तक लिहायचे मनात आहे.”

– चित्रा वाघ

(‘आम्ही पार्लेकर’ वार्षिक विशेषांक 2013 मधील लेखावरून उद्धृत)

About Post Author

Previous articleसोलापूर जिल्हा संस्कृतिवेधचे साफल्य
Next articleअशी असावी शाळा!
चित्रा वाघ 'आम्ही पार्लेकर’ व ’महाराष्ट्राचे उद्योगविश्व’ या दोन मासिकांच्‍या सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी यापूर्वी HSBC बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यांच्‍या अनेक मासिकांमधून कथा, ललित लेख आणि मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्‍यांनी स्वरचित कथाकथनाचे कार्यक्रम आकाशवाणी व इतरत्र सादर केले आहेत. त्‍यांनी ’पार्ले कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत डॉ. नरेंद्र दाभोलकर, अशोक हांडे, डॉ.रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे, प्रवीण दवणे अशा अनेक मान्यवरांच्‍या जाहीर मुलाखती घेतल्‍या आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9821116936

7 COMMENTS

 1. निखील वागळे यांनी पत्रकारिता
  निखील वागळे यांनी पत्रकारिता आणि सामाजिक राजकीय कर्तव्य याचा सुंदर समन्वय निर्माण केला आहे . साप्ताहिक दिनांक मध्ये संपादक म्हणून त्यांची प्रथम ओळख झाली . दिनांक मधील रिपोर्ट्स खूप प्रभावी होते . अक्षर दिवाळी यामुळे त्यांचा लौकिक वाढला . षटकार आणि चंदेरी यामुळे त्यांची क्रेझ वाढली पण ही साप्ताहिके आत्ता कुठे आहेत ? असे का ? नवीन इलेक्ट्रोनिक माध्यमे आल्यावर पूर्ण पत्रकारिता बदलून गेली का ? पूर्वीची जुनाट वाटू लागली का ? त्यांची पुस्तके आणि लेखन वाचकांना मिळवीत ही अपेक्षा

 2. खूप खुप छान पत्रकार आहेत.
  खूप खुप छान पत्रकार आहेत.

 3. साहेब मी हेमंत मी Rashtriy
  साहेब मी हेमंत मी Rashtriy chemical and fatilazer chembur ya कंपानीत माथाडी कामगार म्हणून काम कर ते आहे 10 महिने झाले आम्हा 102 कामागाराना कामनसल्यामुळे पगार पण नाही तर आम्ही मुंबईत जगावे कसे आम्ही खायचे काय ? आम्हा 102 कामगाराची तुमच्या सहकार्यची गरज आहे आह्मी पत्रव्यवहार करून देखील काम बंद आहे

 4. पत्रकार असावा तर असा
  पत्रकार असावा तर असा

 5. निखीलजी तुमच्या पत्रकारीतेला
  निखीलजी तुमच्या पत्रकारीतेला मनःपूर्वक नमस्कार निखीलजी तुम्हाला रोज ऐकाव वाटतय पण पत्रकारी सुदधा भांडवलशाहीच्या
  हातात गेली व काही पुढाऱ्यांची गुलाम झाली आहेआहे पत्रकारिता अशी झाली की एखाद्याला झिरोचा हिरो किंवा हीरोचा झिरो
  चारच दिवसात करतात निखीलजी तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे तुम्हाला बोलायची सुद्द्धा इच्छा आहे तुमच्या सारखे पत्रकार फार कमी आहेत तुम्ही स्वतः एखाद T V चॅनल काढाव आणि आपल्या सारख्या पत्रकाराचे मार्गदर्शन आमच्या सारख्या कित्त्येक आपल्या च्यहत्यांना मिळो हि माझी इच्छा आहे
  जय हिंद

 6. सेल्युट…. सर …
  सेल्युट…. सर …
  मला तुम्हाला पहाता क्षणी फक्त राष्ट्रध्वज तिरंगा दिसतो.

Comments are closed.