नव्या जुन्या (महिला वर्गासाठी विनोदपूर्ण बोधप्रद नाटिका)

0
24
carasole

‘नव्या जुन्या’ हे नाटक इचलकरंजी येथील अद्वितीय व अविस्मरणीय समाजसेविका यशोदामाई वारखंडकर ‘हरे राम’ यांच्या चरणी सादर समर्पण.

प्रस्‍तुत पुस्तकाच्या उपशीर्षकात ‘नाटिका’ असा उल्लेख केला असला तरी प्रत्यक्षात ते तीन अंकी नाटक आहे. नाटिका/एकांकिका व नाटक यांत फरक केवळ लांबीचा असतो असे नाही तर साधारणपणे एकांकिका ही थोड्या काळात घडलेल्या घटना मांडणारी असते. कधी कधी, हा काल फार थोडा – काही तासांचा असू शकतो तर काही वेळेला घटना एका दिवसात घडलेल्या असतील. नाटकात साधारणपणे मंचावर दाखवला जाणारा खेळ जास्त लांबीचा तर असतोच, पण घडणाऱ्या घटनाही बहुधा दीर्घ काळात घडतात. प्रस्तुत नाटकात दुसरा अंक व पहिला अंक यांत दीड महिन्यांचा काळ लोटला आहे. नाटकात एक पुरुष नोकर वगळला तर सारी स्त्री पात्रे आहेत. नाटक प्रसिद्ध झाले १९४० साली. त्यावेळेस स्त्रियांच्या भूमिका स्त्रिया करू लागल्या होत्या, तरीपण पुरुष- स्त्रियांची एकत्र नाटके स्थानिक पातळीवर सहज होत नसावीत. प्रयोगास सुकर व्हावे म्हणून त्यातील सर्व पात्रे स्त्रियांच्या रूपात निर्मिली असावीत.

या नाटकाला कथानक असे काही नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सून पदवीधर आहे. ती बोलताना अवाजवी इंग्रजी शब्दांचा वापर करणारी असते (हा बहुधा विनोदनिर्मितीचा स्रोत). ती नवऱ्याचा एकेरी उल्लेख करते, ते सासूला पसंत पडत नाही. तसेच, सासूने हरितालिका व्रताची पूजा करावी असा आग्रह धरलेला सुनेला पटत नाही. सुनेने नवऱ्याचा एकेरी उल्लेख करणे एवढेच नव्हे तर त्याला पत्र लिहिणे (तो परदेशी गेला आहे) याचे सासूला सखेद आश्चर्य वाटते. अशा नव्या-जुन्या पिढीच्या मतांतील व त्यामुळे आचारातील फरकामुळे उद्भवणारा संघर्ष कसा टाळावा याचे केलेले मार्गदर्शन म्हणजे या नाटकाचा मुख्य विषय.

हे मार्गदर्शन करणारी स्त्री म्हणजे गावातील प्रोफेसरांची पत्नी. तिला सगळे प्रोफेसरीण म्हणतात. ती फक्त एकदा चहा पिते. तिचे कापड घेण्याचे दोन-तीन नियम आहेत – ‘पहिले कपडे फाटू लागल्याशिवाय दुसरे घ्यायचे नाहीत. ते घेताना देशीच आहेत याबद्दल खात्री करून घ्यावी. तिसरी गोष्ट म्हणजे ते टिकण्यास चांगले आहेत आणि दिसण्यास ओंगळ नाहीत एवढे पाहायचे.’ सुनबाईकडे काम करणारी मोलकरीण दु:खी आहे, कारण तिच्या नवऱ्याला तमाशाचा नाद आहे आणि त्यामुळे तो वारंवार कर्ज काढतो. मोलकरीण व तिचा नवरा निरक्षर आहेत.

प्राध्यापकपत्नी सुनबाईला तिने मोलकरणीस साक्षर करावे यासाठी प्रवृत्त करते. सासुबार्इंची केवळ जुन्या चालीरीतींवरून थट्टा न करता नव्या-जुन्याचा मेळ घालण्याचा सल्ला देते.

‘ज्या परिवारात आपणाला नांदायचे असेल त्यांची मने दुखवण्याचा दोष आपल्याला लागू न देण्याची खबरदारी घ्यायला हवी. जुन्या विचारांनी दडपलेल्या जुन्या माणसांचे मतपरिवर्तन करा. त्यांना त्यांच्या वर्तनाचा रास्तपणा पटवा, चुचकारून सांगा. जुनी माणसेही तुमचे ऐकतील आणि त्यांनी ऐकून न घेण्याचा हटवादीपणा केला तर त्यांच्या वाटेलाच जाऊ नका. पण मुळातच उपहासबुद्धी नको असे आपले मला वेडीला वाटते.’ नाटकाच्या शेवटी ती म्हणते, ‘दोन पक्षांत मुख्य भेद कोठे आहे, काय आहे आणि तो कसा नाहीसा होईल हे पाहिले पाहिजे. साधनाबाई, हे काम तुम्हा शिकलेल्या स्त्रियांचे आहे. तुम्ही जुन्याकडे सहानुभूतीने आणि गुणग्राहकतेच्या दृष्टीने पाहाल तर त्यातूनही घेण्याजोग्या पुष्कळ गोष्टी तुम्हाला मिळतील… आणि सत्यभामाबाई, साळुबाई,  तुम्हीही ठाकठीकपणा, कलाकुसर, लेखन-वाचन अशा गोष्टी या नव्या मुलांपासून शिकल्या पाहिजेत.’

वरील विधाने केंद्रस्थानी असण्याचे कारण ना.धों. ताम्हनकरांना ‘बोधप्रद’ नाटक लिहायचे असावे. विधाने केंद्रस्थानी आहेत म्हणून ती नाटकाच्या शेवटास येतात – साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सांगितल्याप्रमाणे.

नाटकात त्या काळात रुचतील व खरे वाटतील असे साधे विनोदी प्रसंग आहेत. आज त्याला कोणी ‘विनोदी’ म्हणून गणेल का याची शंका वाटते. पण त्यांना जो बोध करायचा होता तो न्यायमूर्ती रानडे पठडीतील आहे आणि नव्याजुन्यांनी सहिष्णुता – एकमेकांबद्दल – बाळगावी हे त्रिकालाबाधित सत्य आहे. उत्सुकता अशी वाटते, की या नाटकाचे प्रयोग झाले असतील तर ते कोठे आणि कोणत्या वर्गात? त्यात संगीत नाही, भव्य नेपथ्य नाही. संघर्ष आहे तो केवळ तो असतो असे सांगण्यापुरता. तरीही नाटकाची दुसरी आवृत्ती निघावी हे कौतुकास्पद.

या नाटकाबद्दल कोणी अधिक प्रकाश टाकला तर फार बरे होईल.

(‘प्रयोगाबद्दलचे हक्क लेखकाकडे आहेत. दर प्रयोगामागे तीन रुपये ‘लेखक-दक्षिणा’ मिळावी अशी लेखकाची मागणी आहे.’)

नव्या जुन्या (महिला वर्गासाठी विनोदपूर्ण बोधप्रद नाटिका) तीन अंकी नाटक
लेखक – नो.धों. ताम्हनकर
पृष्ठे ५४, मूल्य एक रुपया
प्रकाशन १९४० (दुसरी आवृत्ती १९५२)
प्रकाशक – रा.ज. देशमुख

– मुकुंद वझे

About Post Author

Previous articleशुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था
Next articleबहुगुणी सिनेमावाले नानासाहेब सरपोतदार
रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.