नवा बेडूक आणि जुनं डबकं

नवा बेडूक आणि जुनं डबकं

     कुठल्याही नव्या विहिरीत नव्या बेडकाने डराँव डराँव केले तर चार-पाच प्रतिक्रिया एका झटक्यात समोर येतात. पहिली प्रतिक्रिया येते बाबा बेडकांकडून. दोन विरुद्ध पक्षांतले बाबा बेडूक आधी नव्या बेडुकल्याला जवळ घेतात. नव्या बेडुकल्याची ‘ती फुलराणी’ करायला ते उत्सुक असतात. या कौतुकाने नव्या बेडकाचा हुरूप वाढतो. मग नवा बेडूक जुन्याच पद्धतीने कसा ‘डराँव डराँव’ करतोय हे सांगणार्‍यांचा गट. त्याचे आजोबा संघाचे कार्यकर्ते होते, त्याचा मामा सेवादलात होता, आत्याच्या मिस्टरांनी फ्रॉड करून ते केवढे मोठे पैसेवाले झाले अशा घराण्यांच्या दोर्‍या तपासल्या जातात. नव्या बेडकाच्या ‘डराँव’मध्ये संघिष्ट / समाजवादी/लाल निशाण/मराठा महासंघ/ स्युडो इंटेलेक्टुअल आवाज कसा मिसळलाय यावरही चर्चा होते – जर नवा बेडूक थोड्या ताकदीचा दिसला तर…

     नवा बेडूक अमेरिकेने इन्फ्लुएन्स्ड आहे, की युरोपने, त्याची मुळे देशी, की विदेशी, त्याला समता हवी, की ममता… आणि सामोपचाराने घेऊन नंतर सर्वसमावेशक झुंड- डराँवचा हा भाग घेणार, की नाही.. फार उंच उडी मारून हा विहिरीबाहेर तर नाही ना जाणार? आणि काय केले, की याचा आवाज बसेल? असे या बेडकाचे कोऑर्डिनेट्स जमवणारी एक फळी असतेच. ते फटाफट ‘टोटल’ लावतात या नव्या बेडकाची.

     ‘आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज’ च्या सुरुवातीला फुको नावाचा एक तत्त्वज्ञ-इतिहासकार जुन्या विचारसरण्या नव्या विचाराला आपलेसे करून त्याचा नवेपणा कसा शोषून घेतात यावर विवेचन करतो, ते आठवते हे सारे बघताना.

     तुम्ही तरूण गाणारे असाल तर ‘सवाई’त गायल्यानंतर आवाजाला जशी ‘लेजिटिमसी’ प्राप्त होते, तसे या नव्या बेडकाला सत्तेची आशा असली तर आपली ‘सवाई’ शोधावी लागते. मग ‘सवाई’त बेडकाचा आवाज प्रस्थापित होतो.

     गेल्या चार-पाच वर्षांत तयार झालेल्या ताज्या मराठी विचारवंतांकडे बघितले, की ही गंडाबंधन परंपरा तात्काळ लक्षात येते. या सार्‍या ठरलेल्या ‘बेडूक आणि विहिरीं’पलीकडे छलांग मारणार्‍या जिनिअसबद्दल काय बोलावे? बहुधा त्यांचा अकाली मृत्यू झालेला दिसतो किंवा त्यांना अनुल्लेखाने मारून वजा केलेले असते.

     निर्मल वर्माचे पुस्तक हातात आल्यावर हे डायनॅमिक्स अजूनच उलगडले. डाव्या समीक्षकांची ‘प्रेयसी स्वरूपिणी झुंड’ – म्हणजे तुमच्या ऊर्जेवर, क्रांतीच्या स्वप्नावर, संस्थेच्या कडव्या समीक्षेवर प्रेम करणारी, नंतर तुम्ही डाव्यांकडून डावलले गेलात, की उजव्यांची ‘मॉमी ब्रिगेड’ असतेच सामोरी – उजव्यांची ‘मॉमी ब्रिगेड’ – तुमच्या दुर्लक्षित अहंकाराला जोजावून कवेत घेणारी. नानाजी देशमुखांच्या मॉमी ब्रिगेडनं नाही का जॉर्जला कवेत घेतले!  नामदेवची ‘समष्टी’ही देखील या सत्तेच्या मॉमी ब्रिगेडचीच कमाल! या आपल्या महाकाय देशात एकास-एक असा व्यक्तिवादी बेडूक जिवंत राहू शकत नाही. एक म्हणजे एक अधिक पंचवीस, पाच, पन्नास, पाच लाख, ‘एक’ म्हणजे एका व्टि्टला ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ म्हणणार्‍या फॉलोअर्सचा जथ्था. सगळेच ‘एक म्हणजे अनेक’या समीकरणाने बांधलेले समूह. विविधतेतच एकता.

     प्रत्येक बेडूक सरतेशेवटी कोणत्या विहिरीत जातो ते पक्के ठाऊक आहे सर्वांना. फार उंच स्वरात डराँव डराँव न करणार्‍या मोठ्या बेडकांची पण एक फळी आहे.

     या सार्‍या पलीकड खरा खर्ज ते जाणतात. नेमाड्यांच्या ‘हिंदू’त जसा भावडू म्हणतो तसे – ‘लोक काय ते जाणतात’. ‘लोक’ फायनली इन्फ्रारेड बेडकांनाही जाणतात. फारसे व्यक्त न होणार्‍या गप्प बेडकांची फौज सारे काही जाणते. ‘लोक’ नावाच्या व्यवस्थेचा काव्यगत न्याय प्रत्येक विहिरीत होतोच… कधी तात्काळ- कधी कालांतराने.

ज्ञानदा देशपांडे
भ्रमणध्वनी : ९९३०३६०५५०
dnyanada_d@yahoo.com

About Post Author