देवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास

_Devpur_2.jpg

देवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे. त्या परंपरेतील संत बाबा भागवत महाराज यांचा जन्म देवपूर गावी झालेला आहे. भागवत बाबांच्या जन्माचा भाग अनेक चरित्रकारांनी रसाळ पद्धतीने रंगवलेला आहे.

देवपूर गाव देवनदी तीरावर वसले आहे. गावाच्या चौफेर हिरवीगार झाडी आहे. त्या वनराईच्या आश्रयाने अनेक त-हेचे पशूपक्षी वास्तव्य करून आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचा पक्षी म्हणजे मोर. ब्रिटिशांनी देव नदीवर कालवा बांधला. नदीतील पूरपाणी गावानजीकच्या शेतीला त्या कालव्यातून पुरवले जाते. त्यामुळे गावाचा बराचसा भाग हा ओलिताखाली आला.

गावामध्ये विविध जाती-धर्मांचे लोक आहेत. मराठा, जरेमाळी, मांग, महार, ढोर, परिट, भिल्ल, चांभार, सोनार, मारवाडी, कोळी, ब्राह्मण इत्यादी जातींचे लोक एकत्र राहतात.

सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या विडी उद्योगाचे काही कारखाने देवपूर गावामध्ये पूर्वी चालत. परंतु विड्यांची मागणी कमी होत असल्याने तो उद्योगधंदा मंदीच्या मार्गावर आहे.

देवपूरात वर्षभरातून दोन वेळा यात्रोत्सव पार पडतो. यात्रा म्हणजे गावकऱ्यांसाठी जणू ती पर्वणी असते! चैत्र शुद्ध पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी संत बाबा भागवत महाराज पालखीची ग्रामप्रदक्षिणा सुरू होते. त्या दिंडी सोहळ्यासाठी देवपूर, धारगाव, फर्दापूर, पंचाळे, शिंदेवाडी या पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. टाळ, मृदंग, वीणा या वाद्यांच्या तालात दिंडी प्रदक्षिणा सुरू असते. पालखी पहाटे पाच वाजता ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून मंदिराच्या गाभाऱ्यात येते. कावडीची मिरवणूक दुसऱ्या दिवशी होते. त्यासाठी भाविक ग्रामस्थ गोदावरीचे पाणी पायी जाऊन घेऊन येतात व गावातील देवतांना त्या जलाने स्नान घालतात. त्याच दिवशी कुस्त्या होतात. सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. काल्याच्या कीर्तनाने यात्रेचा शेवट तिसऱ्या दिवशी होतो.

श्रावण महिन्यामध्ये सव्वा महिना महादेवाच्या मंदिरात अखंड नंदादीप तेवत ठेवतात. गावातील प्रत्येक कुटुंबातून नंदादीप लावला जातो. ते दीप लावण्याचे काम गावातील गुरव समाजाचे लोक करतात. त्या बदल्यात त्यांना दक्षिणा दिली जाते. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्रावण पंचमीच्या दिवसापासून गावामध्ये केले जाते. गावातील वाड्यानुसार पहारा (वीणा किंवा टाळ यांचा नाद अखंड सुरू ठेवणे) दिला जातो. सात दिवस सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ होतो. रात्री नऊ वाजता कीर्तन, पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होते. श्रावण वद्य एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाचा समारोप होतो.

_Ranekhan_Wada_1.jpgगावातील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सव मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीच्या दिवशी भरतो. त्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे खंडेराव महाराजांचा भगत बारा बैलगाड्या ओढत आणतो. जागरण, गोंधळ यांसारखे महत्त्वाचे कार्यक्रम (विधी) उत्सवात पार पाडले जातात. त्र्यंबकेश्वर येथे होणा-या निवृत्ती महाराज यात्रेसाठी श्री क्षेत्र बेलापूर येथून सुमारे चारशे वर्षांपासून पायी दिंडी सोहळा पौष महिन्यामध्ये आयोजित केला जातो. त्यासाठी लागणारी शिधासामग्री, बैलांसाठी चारा ही व्यवस्था गावकरी करतात. श्री क्षेत्र देवपूर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा असतो. शेकडो भाविक त्या सोहळ्यात सहभागी होतात.

पंचक्रोशीतील लोक बाबा भागवत महाराजांच्या दर्शनासाठी प्रत्येक एकादशीला येतात. संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होतो. गावामध्ये नवरात्रोत्सव, गणेशोत्सव हे देखील मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

देवपूरला पौराणिक ऐतिहासिक महत्त्वही आहे. अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी झाले. त्या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला. त्या गदारोळांत दोन व्यक्ती बचावल्या. त्यांपैकी नाना फडणवीस अंगाला राख फासून बैराग्याच्या झुंडीत घुसले तर महादजी शिंदे तोफेचा गोळा लागल्याने जखमी अवस्थेत पडले होते. राणेखान हे शिंद्यांच्या फौजेत पखालीवरून पाणी वाहण्याचे काम करत.त्यांनी महादजींना उचलून त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केला आणि त्यांचे प्राण वाचवले. राणेखानने शत्रूपासून लपत-छपत मैलोगणिक प्रवास केला व त्याने त्याच्या मुलुखात महादजींना आणले. महादजींनी राणेखानने दाखवलेल्या स्वामीनिष्ठेमुळे त्याला सरदारकी व जहागिरीही प्रदान केली. त्यांत सिन्नर तालुक्यातील देवपूर, पिंपळवाडी, निमगाव, पास्ते या गावांचा समावेश होता. राणेखानने त्यांपैकी देवनदीच्या किनारी वसलेल्या निसर्गसंपन्न देवपूर गावाची वास्तव्यासाठी निवड केली. राणेखानने देवपुरात काही वास्तूंचे बांधकाम केले. संपूर्ण देवपूरला कोट बांधून त्यात दिवाणखाना, नगारखाना, कबुतरखाना, दारूखाना, मशीद आणि मंदिर या वास्तूही बांधल्या. गावाला लागून असलेल्या देवनदीच्या पलीकडील तीरावर कोट बांधून तेथे बडाबाग नावाचे शाही कबरस्थान बनवले आहे. त्या बडाबागेतच राणेखानची भव्य कबर आहे.

– सोपान वासुदेव गडाख

About Post Author