दक्षिण सोलापुरातील शिवक्षेत्रे- सोमेश्वर, संगमेश्वर, रामलिंगेश्वर, शंभू महादेव, नागनाथ

1
169

शिवक्षेत्रे दक्षिण भारतातखास करून महाराष्ट्रात अधिक पाहण्यास मिळतात. धारणा अशी आहेकी जेथे जेथे शिवलिंगांची स्थापना झालेली आहे ती सर्व क्षेत्रे संवेदनशील भूभागावर वसलेली आहेत. म्हणजे ज्वालामुखीची तोंडे किंवा भूकंपप्रवण क्षेत्रे. शिवमंदिरातील शांत गंभीरता भक्तांना शिवाच्या चरणी लीन होण्यास भाग पाडण्याइतकी प्रभावी असते.

सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात मागील एक हजार वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिकसाहित्यिक वारसा जपून शिल्लक राहिलेला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणजे तेथील आगळीवेगळी शिवतीर्थे.

1. सोमेश्वर मंदिर (हत्तुर) : हत्तुर हे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेले गाव. तेथे सोमेश्वर शिवमंदिर आहे. ते सर्व राजकीय पक्षांसह सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. निवडणुका जवळ आल्या की त्या मंदिरात दर्शनाला येणाऱ्यांची संख्या वाढते. कारण असे म्हटले जाते की तेथील महादेवाला साकडे घातले की निवडणुकीत यश मिळते !

2. हरिहरेश्वरसंगमेश्वर मंदिर (हत्तरसंगकुडल) : हत्तरसंगकुडल येथील हे मंदिर अद्वैतवादाचे प्रतीक मानले जाते. ते चालुक्यकालीन स्थापत्य शैलीचा नमुना मानले जाते. तेथे अद्वैत तत्त्वज्ञानाचे अभ्यासकेंद्र आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सीना-भीमा नद्यांचा संगम असलेले वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक क्षेत्र असे त्याचे वर्णन आहे. ते दक्षिण सोलापूरचे ओअॅसिस मानले जाते. त्याबरोबरच मराठीतील पहिला शिलालेख ‘वाचिता विजयी होआवे’ हा या मंदिरात मिळाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. तो मंदिरातील सभामंडपाच्या तुळईवर कोरलेला आहे. त्या शिलालेखाचे वाचन सोलापूरचे शिलालेख तज्ज्ञ आनंद कुंभार यांनी केले आहे. त्या लेखामध्ये, जो कोणी हा लेख वाचेल तो विजयी होईल” असे म्हटले आहे. शिलालेखात उल्लेख शके 940 म्हणजे इ. स. 1018 असा स्पष्ट आहे.

भारतात सर्वत्र द्वैत पंथियांचा कट्टरवाद असतानाच्या काळात अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार मांडणारे मंदिर येथे होते हे उत्खननातून सापडलेल्या हरिहराच्या मंदिरामुळे कळले. उत्खननावेळी शिवलिंग व श्रीकृष्ण यांची एकत्र दुर्मीळ मूर्ती तेथे मिळाली. श्रीकृष्णाच्या या मूर्तीची मागणी इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्सियसनेस) या आंतरराष्ट्रीय संस्थेने केली आहे. तेथे तीनशेसाठ शिवमूर्ती असलेले अखंड दगडातील जगातील एकमेव शिल्प आहे. तेच बहुमुखी शिवलिंग होय. तेथे शिवपिंडीवर असलेल्या तीनशेएकोणसाठ शिवमूर्ती पाहण्यास मिळतात. तीनशेएकोणसाठ शिवमूर्ती आणि एक शिवपिंड अशा भगवान शंकराच्या तीनशेसाठ मूर्ती एकत्र या एकमेव ठिकाणी आहेत. सजीवांची उत्पत्तीस्थिती व लय हा क्रम पंच महाभूतांच्या आधारे होत असतो. म्हणून मानवाचा पहिला देव हा पंचमहाभूत असतो हे दर्शवणारे पंचमुखी शिवलिंगही तेथे आहे. संगमेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, पाडव्याला व सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायन होताना पूर्व दिशेच्या बरोबर मध्यास सूर्य आला असताना उगवत्या सूर्याची पहिली किरणे मंदिराचे पाच दरवाजे ओलांडून गाभाऱ्यातील थेट शिवलिंगावर पडतात. या मंदिरात महात्मा बसवेश्वरांसह अन्य काही संतमहात्म्यांनी तप केल्याचे सांगितले जाते.

3. रामलिंगेश्वर मंदिर (तीर्थ) : मंदिराचे वैशिष्ट्य हे की ते प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे असे मानले जाते. रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येला परत जाताना रामाने तेथे शिवाची आराधना केली होती. तेथे श्रीरामाने स्वहस्ते स्थापन केलेले शिवलिंग आहे. तशी समजूत भक्तभाविकांची करून दिली गेली आहे. मंदिराशेजारी रामकुंड आहे. तेथील पाणी प्राशन केल्याने व्यथा व चिंतामुक्त होता येते अशी आख्यायिका आहे.

4. शंभू महादेव मंदिर (कासेगाव) : कासेगाव सोलापूर-तुळजापूर रोडवर उळेगावापासून तीन किलोमीटरवर आहे. तेथे काशी विश्वनाथाची साक्ष देणारे शंभू महादेव मंदिर आहे ! सुमारे तेराव्या शतकात बांधलेले हे ‘हेमाडपंती मंदिर’ वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिरात पितळी नंदी आहेत्याशिवाय गणपती व बळी या परिवार देवतांची मंदिरेही तेथे आहेत. जवळच असलेल्या गंगेवाडी या गावावरून गंगा नदी व कासेगावचे हे काशी विश्वनाथ मंदिर अशी आख्यायिका जोडून या मंदिराचा उत्तर भारतातील काशी विश्वनाथ मंदिराशी संदर्भ जोडला जातो.

5. नागनाथ मंदिर (धोत्री) : मंदिर धोत्री गावाच्या मध्यभागी आहे. ते सुंदर आहे. हनुमान मंदिर हे पारिवारिक मंदिरही तेथे आहे. त्या दोन्ही मंदिरांचा परिसर देखणा आहे. चैत्र महिन्यात भरणाऱ्या यात्रेदरम्यान अनेक भाविक नागनाथाच्या दर्शनाला येतात.

– मानसी चिटणीस 9881132407 manasichitnis1978@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. खूपच माहितीपूर्ण लेख ! आवडला !! धन्यवाद आणि शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here