थिंक महाराष्‍ट्रः प्रगतीची पावले

0
19

दिनकर गांगल

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप, मग प्रतिसाद उबदार व धो-धो का येत नाही? कारणे दोन आहेत: एक तर ज्या पिढीला फुरसत आहे व जी पिढी सुखस्वस्थ आहे तिला संगणक, महाजाल या गोष्टी दूरच्या वाटतात, आपल्या जमान्याच्या वाटत नाहीत. उलट, जी पिढी या माध्यमाजवळ आहे ती जीवनसंघर्षात, करिअरच्या प्रगतीत गुंतली आहे. तिला ‘फेसबूक’,ट्विटर्’ ही दैनंदिन गप्पाष्टकांची सदरे फार प्रिय असतात. थोडे वेगळे आणि अधिक ओळखीचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. हे अत्यंत उपयुक्त साधन, परंतु त्यावरील सत्तर ते ऐंशी टक्के संभाषण ही निव्वळ बडबड असते. पण विचार असा करू या, की एरवी घरात तरी असाच वायफळपणा चालू असतो ना? (असायचा ना?) घराघरातली माणसे कमी झाली म्हणून ती गरज मोबाईल फोनमधून जनात भागवली जाते. टेलिव्हिजनवरच्या ‘सोप’ दैनंदिन मालिकांची महती तीच सांगतात. राहण्याची घरे, जागा आणि माणसे या दोन्ही गोष्टींनी लहान झाल्यावर मोठ्या कुटुंबाची गरज सासू-सून-दीर-भावजया अशा, मालिकांतील नाट्यातून, एकत्रितपणातून भागवली जाते. असो.
‘थिंक महाराष्ट्र’ची संकल्पना Think Maharashtra Link Maharashtra अशी माणसांना जोडण्याची असल्याने ती लोकांना पसंत पडते. आतापर्यंत आपण परभणी, नांदेड, अंबाजोगाई, लातूर, धुळे, अमरावती, येथे बैठका घेऊन, तेथे मोठ्या पडद्यावर ‘थिंक महाराष्ट्र’चे पोर्टल दाखवून अनेक माणसांना या जाळ्यात आणले आहे.
कवयत्री अंजली कुळकर्णी यांनी गेल्या महिन्यात सुलभा ब्रह्मे यांच्या सहकार्याने पुण्यात अशी बैठक घेतली. तेथे ‘थिंक महाराष्ट्र’ पोर्टल माहिती- समृध्द करण्याच्या अनेक कल्पना सुचवल्या गेल्या. काही माणसे व्यक्तिगत पातळीवर असे सत्प्रवृती, सत्शक्ती जोडण्याचे काम करत असतात, त्यांचे उल्लेख झाले. स्वत: अंजली कुळकर्णी यांनी पुण्यात ‘थिंक महाराष्ट्र’साठी समन्वय साधण्याचे काम अंगीकारलेसुध्दा व त्या नवनवी माहिती देऊ लागल्या! त्यांचे स्वत:चे अशा आशयाचे लेखनदेखील पोर्टलवर एवढ्यात येईलच. लेखिका आसावरी काकडे बैठकीस हजर होत्या. नंतरच्या रविवारी, गोव्यात सध्या काम करत असलेले अरविंद पित्रे त्यांच्याकडे आले होते. काकडे यांनी आपल्या जीवनातील महत्त्वाची नवी घटना म्हणून ‘थिंक महाराष्ट्र’ बैठकीचा पित्रे यांच्याकडे उल्लेख केला. स्वाभाविकच, पित्रे या जाळ्यात आले. गंमत अशी, की पित्रे त्यांच्या समविचारी मंडळींमार्फत अशीच एक ‘हेल्पलाइन’ सुरू करण्याच्या विचारात आहेत….. तारा अशा जुळत जातात!
वेगवेगळी माणसे व्यक्तिगत पातळीवर बुध्दिप्रतिभेचे, चांगुलपणाचे काम करत आहेत. समाज धरला जातो व बांधला जातो तो अशा सांस्कृतिक विचारांनी, भावनांनी, घटनांनी; आज ते सारे विखुरलेले आहे. ते जर एका व्यासपीठावर (एका झेंड्याखाली नव्हे) व्यक्त झाले तर त्याचा समाजावर परिणाम होईल. एक छोटेसे उदाहरण. बीड जिल्ह्यातील केज येथे स्थानिक साहित्य संमेलन झाले. भास्कर चंदनशीव हे अध्यक्ष होते: ईश्वर मुंडे यांनी सर्व जबाबदारी वाहिली. त्यांच्या वृत्तांतातला एक परिच्छेद येथे नमूद करावासा वाटतो. – तो वृत्तांत ‘थिंकमहाराष्ट्र’ पोर्टलवर येईल.
मोठ्या साहित्य संमेलनांत बहुसंख्य श्रोते वक्त्याला नावाने ओळखत असतात. गावागावातल्या साहित्य संमेलनांत मात्र बहुसंख्य श्रोते वक्त्याला व्यक्‍तीश: ओळखत असतात आणि वक्त्ताही बहुसंख्य श्रोत्यांना ओळखत असतो. परिस्थितीच्या या बदलामुळे तेथील संवादाचे स्वरूपही बदलत असते. समोर बसलेल्या ओळखीच्या श्रोत्यांसमोर थापा मारता येत नाहीत. उक्त्ती आणि कृती यांमध्ये संतुलन ठेवावे लागते. म्हणून गावपातळीवर होणारे उपक्रम अधिक महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच केज येथे एप्रिलमध्ये झालेले साहित्य संमेलन वेगळ्या मोलाचे ठरले.
माणसे एकमेकांस ओळखत असली की जबाबदारीने बोलतात-वागतात. आज इंटरनेटसारखे प्रभावी लोकशाही माध्यम आपल्या वापरास उपलब्ध आहे. एकमेकांच्या भावना-विचार-कृती जाणून घेऊ या- एकमेकांशी जोडले जाऊ या. संपर्क—‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’, 3-वेणू अपार्टमेंट, केसर-बाग, बी.जे.देवरूखकर रोड, ‘शिंदेवाडीसमोर, दादर (पू), मुंबई– 400014

‘थिंक महाराष्ट्र’ मजकुराच्या पुन:प्रसिध्दीसाठी ‘रुची’ने दर अंकात चार पाने देऊ केली आहेत. या अंकात मनोहर नरांजे यांनी विदर्भातल्या नवेगावसाधू या खेड्याच्या बदलाची कहाणी लिहिलेली सादर करत आहोत. नरांजे यांना त्या गावात जाऊन सारे उपक्रम पाहण्यास ‘थिंक महाराष्ट्र’ने सुचवले. नरांजे प्रभावित झाले व त्यांनी लेखन लिहून पाठवले. ते पोर्टलवर आहे. त्या तरुण सरपंचाचे -संजय वाघमारे यांचे विचार किती उदबोधक व परिपक्व वाटतात, पाहा!
दुसरा लेख आहे तो नांदेडच्या रयत रुग्णालयावर. वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार सार्‍या जगाला माहीत आहे, पण काही सेवाभावी डॉक्टर्स व जनसामान्य यांनी एकत्र येऊन हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला. फॅमिली डॉक्टरची पध्दत नष्ट झाली म्हणून आक्रंदन करत बसण्यापेक्षा डॉ.सुरेश खुरसाळे यांनी पुढाकार घेऊन नांदेडला योजलेला हा प्रयोग. त्यांच्याकडे ‘लो कॉस्ट’ कंपनीची औषधे मिळतात, ती ब्रँडेड औषधांच्या एक तृतीयांश किमतीत! मी नांदेडचे ते रुग्णालय पाहिले. आर.डी.लेले या ज्येष्ठातिज्येष्ठ डॉक्टरांपासून बदलापूरच्या योगेंद्र जावडेकरांपर्यंत अनेक डॉक्टर्स रुग्णसेवेच्या चांगल्या पर्यायांबाबत बोलत असतात. नांदेडचा हा एक नमुना आहे.
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या पोर्टलवर आपण रोज नवा मजकूर अपलोड करतो. त्यामध्ये काही टीकाटिप्पणी असते. डॉ. रवीन थत्ते, शिरीष गोपाळ देशपांडे, विजया चौहान, कमलाकर नाडकर्णी, शरद देशपांडे, अशोक जैन असे विविध क्षेत्रांतील लोक समाजात घडते आणि त्यांना उत्कटपणे भावते ते येथे सादर करतात. असे अनेक लोकांनी आपले भावनाविचार येथे नेमकेपणाने व्यक्त करावेत असे अभिप्रेत आहे. आपल्याला या योजनेत सामील व्हायचे असेल तर नितेश शिंदे 9323343406 या संपादकीय सहाय्यकास फोन करावा. तो सर्व मदत करील.
– दिनकर गांगल
info@thinkmaharashtra.com

About Post Author

Previous articleपिपली लाईव्ह, दिगू टिपणीस आणि राकेश…
Next articleदोन प्रसंग
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.