तिबेटचा झेंडा

  0
  195
  तिबेटचा झेंडा

        तिबेट चीनने गिळंकृत केला. त्यानंतर दलाई लामाला भारताने आश्रय दिला, त्यास दशके लोटली. तिबेटचा चीनला प्रतिकार खुद्द त्या प्रदेशातून आणि बाहेरूनही सतत चालू असतो, पण तो क्षीण. कारण चीनची आर्थिक आणि लष्करी सत्ता जबरदस्त आहे. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायला अमेरिकासुद्धा धजावणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारात तसेच अमेरिकेबरोबरच्या व्यापारात चीनचा वाटा फार मोठा आहे. भारताबरोबरच्या संबंधातही चीनचा व्यापार ही महत्त्वाची गोष्ट ठरते. त्यामुळे चीनच्या अरुणाचल प्रदेशातील घुसखोरीकडे भारत दुर्लक्ष करतो.

        चीनने दुसर्‍या बाजूस आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका व आजुबाजूची बेटे यांना भरपूर आर्थिक साहाय्य देऊन तेथे आपल्या अखत्यारीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे आरंभली आहेत. चीनच्या अशा आक्रमक पवित्र्यामुळे तिबेटच्या न्याय्य मागणीकडे सध्या सारे जग दुर्लक्ष करुन राहिले आहे. त्यातील राजकीय विसंगतीचा भाग असा, की भारतदेखील तिबेटमधील जुलूम व तिबेटी जनतेच्या मानवी हक्कांचे उल्लंघन यांबाबत उपेक्षा करत आहे.

        हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे तो ‘रॉकस्टार’ या नव्या हिंदी चित्रपटामुळे. त्या चित्रपटात ‘सदा हक्क’ हे गाणे रणबीर कपूर जोर- जोरात गात असताना समोरचा असंख्य जमाव बेभान झाला आहे. पडद्यावर जमावाच्या वर आकाशात एक धूसर, काळपट केलेला झेंडा फ़डकताना दिसतो. मुळात तो झेंडा तिबेटचा आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांना गाण्याच्या अंगाने तोच तिथे अभिप्रेत होता. परंतु सेन्सॉर बोर्डाने त्यास आक्षेप घेतला व त्यामुळे झेंड्याचे मूळ रूप चित्रपटात खोडून काढावे लागले. त्या दृश्यात तो बारीकसा ठिपका विद्रूप दिसत नाही हे खरे, परंतु सेन्सॉर बोर्डाच्या एका कृत्याने आणि सरकारचा बोर्डास पाठिंबा असल्याने किती जणांच्या मनावर केवढा मोठा आघात झाल आहे! त्याचा सल केवळ तिबेटी लोकांना नव्हे तर स्वातंत्र्यप्रेमी भारतीय जनांनादेखील आहे.

        भारत सरकारला तिबेटच्या संदर्भात केव्हातरी स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. भारत सरकार याबाबतचा कठोर निर्णय केव्हा घेईल? त्यामुळे एकतर घीन किंवा दलाई लामा आणि त्यांचे स्वातत्र्यप्रेमी तिबेटी नागरिक, कोणीतरी कष्टी होणार हे नक्की. अशा छोट्या छोट्या जखमांनी लोकांची मने मात्र दुखावली जातात.

        तिबेटमध्ये चीनने ल्हासापर्यंत आगगाडी नेली आहे. त्यामधून रोजच्या रोज शेकडो चिनी नागरिक विकासकामांच्या निमित्ताने तिबेटमध्ये येऊन राहत असतात. खुद्द तिबेटला चीनच्या लष्करी छावणीचेच रुप आले आहे. तरी तेथील अन्यायाविरुद्धचा प्रतिकार चार दशकांनंतरही थंडावलेला नाही. गेल्याच आठवड्यात एका बौद्ध भिक्षूने स्वत:ला चिनी सत्तेविरुद्ध निदर्शने करत असताना जाळून घेतले.

  (संकलित)

  {jcomments on}

  About Post Author

  Previous articleएक आहे ‘मलाना’ गाव…
  Next articleनिवांत अंधमुक्त विकासालय
  दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.