तालवेड्यांचे ‘रिधम इव्होल्युशन’: ढोलाची नवी ओळख

carasole1

ढोल-ताश्यांची पारंपरिक ओळख बदलून त्याला वेगळी उंची मिळवून देण्यासाठी पुण्यातील पंधरा तालवेडे ‘रिधम इव्होल्युशन’ या प्लॅटफॉर्मवर एकत्र आले आहेत. ढोल-ताश्यांच्या सर्व भागांचा पुरेपूर वापर करत ते इतर चर्मवाद्यांतील नाद आणि ठेके ढोल-ताश्यांवर वाजवून पाहत आहेत. त्यांना त्यांच्या या प्रयोगशीलतेतून आणि नावीन्याच्या ध्यासातून संगीतातील नवे दालन खुले होण्याची शक्यता वाटते.

सुजित सोमण, ऋषीकेश आपटे, सचिन खेडकर, अमित वाघ, हर्षवर्धन रानडे, अनिश प्रभुणे, वरुण मुळे, गिरीश गोखले, रोहित कुलकर्णी यांनी मिळून ‘रिधम इव्होल्युशन’ची सुरुवात 2012 साली केली. ते आहेत वेगवेगळ्या शाळांतील, पण ते ढोलवादनासाठी रमणबागेच्या पथकात एकत्र आले होते. त्यांची वाढ पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणात झाल्याने सगळयांना लहानपणापासून ढोल-ताश्यांबद्दल आकर्षण होते. त्यांनी रमणबागेच्या पथकात एकवीस ठेक्यांचा नैवेद्य म्हणून वेगळे ठेके ढोलांवर बसवले होते. त्या यशस्वी प्रयोगानंतर ‘रिधम इव्होल्युशन’ने आकार घेतला. ढोलांवर आणखी काही ताल आणून ढोलाची वेगवेगळी ओळख निर्माण करता येईल का असा त्यांचा विचार होता. ओंकार दीक्षित, हर्षद कुरुडकर, प्रथमेश हेंद्रे, अमेय बागडे. अद्वैत काणे, राहुल जंगम हे प्रथम त्या ग्रूपमध्ये एकत्र आले.

सुमित सांगतो, “रिधम म्हणजे ताल. ढोलाच्या आवाजात ‘धम’ असा ध्वनी आहे. आम्ही रिधममध्ये हा ‘धम’ आणला. आम्ही इतर वाद्ये ‘सपोर्ट’ला ठेवून प्रामुख्याने ढोल-ताश्ये वापरतो. आम्ही इतर चर्मवाद्यांवर वाजणारे ताल ढोलांवर वाजवण्याचा प्रयत्न करतो. ते तालांमधील इव्होल्युशनच होय! त्यामुळे ‘रिधम इव्होल्युशन’ हे नाव आम्हाला योग्य वाटले.”

अनिश सांगतो, “खूप वेगवेगळी वाद्ये एकत्रितपणे वापरण्याचा प्रयोग झाला आहे. मात्र, चर्मवाद्यांमध्ये तो प्रयोग पहिल्यांदा होत आहे. ढोल-ताश्ये प्रामुख्याने वाजवण्याचा प्रयोग यापूर्वी केला गेल्याचे ऐकिवात नाही.”

रिधम इव्होल्युशन’मध्ये काम करण्यासाठी जमलेले सगळेजण त्यांची कॉलेज वा त्यांचे जॉब सांभाळून वेळ काढत असतात; त्यांतील कोणी संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षणही घेतलेले नाही. सगळे कानसेन आहेत. त्यांना काय चांगले आणि काय वाईट वाजत आहे ते समजते. सुजित वयाच्या सोळाव्या वर्षापासून गायक म्हणून काम करतो. त्याचे आजोबा (आईचे वडील) राम कदमांना पेटीची साथ करत. त्याच्या लहानपणापासूनच त्याच्या गाणे घरात असल्याने सुजितलाही त्याची गोडी निर्माण झाली. अकरा-बारा वर्षांचा असताना त्याने बालचित्रवाणीच्या टायटल साँगला साथ केली! एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनीयर आणि या बँडचा व्हिज्युअलायझर असलेला सुजित सांगतो, “रमणबाग पथकात काही वर्षे वादन केल्यानंतर काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने रिधम इव्होल्युशन’ची सुरुवात झाली. युद्धाला जाताना राजे-रजवाडे ढोल वापरून शक्तिप्रदर्शन करत. ढोलाचा आवाज जेवढा जास्त तेवढा त्या राजाचा दबदबा अधिक! त्यामुळे ढोल म्हटले, की फक्त दणदणाट समोर येतो. आम्ही त्याच ढोलाचा वापर करून मेलोडियस काही करता येईल का, याचा विचार सुरू केला.”

तबला, ढोलक, दीडकी अशा चर्मवाद्यांवर वाजणारे ताल ढोल-ताश्यांवर वाजवण्याचा रिधम इव्होल्युशन’चा प्रयत्न आहे. तबला, ढोलकी या वाद्यांच्या मात्रा काऊंटिंग आणि ढोलाचे काऊंटिंग यांत फरक असतो. साडेसात मात्रा, त्या ढोलात कशा आणायच्या असे प्रश्न… त्यासाठी संगीताचा अभ्यास महत्त्वाचा. वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट वापरायची झाली, तर त्यांचे काऊंटिंग वेगळे असते. सुमित म्हणतो, “व्हर्टिकल आणि हॉरिझाँटल वादन यांत मूलभूत फरक आहे.

व्हर्टिकल वाद्यांवरील ताल ढोलावर आणताना आम्हाला अभ्यास, मेहनत करावी लागते. तो ठेका ढोलावर आणण्यासाठी तालाची फोड करावी लागते. भजनी ठेक्याचे उदाहरण घेतले, तर आम्ही तो आधी अर्धा वाजवायचो. तो रंगवत न्यायचो. नंतर पुढचा अर्धा उचलायचो. एकेक मात्रा वाढवत जात शेवटी एकत्रित भजनी ठेक्याचा अनुभव मिळतो.” भजनी ठेका समजावून देत असताना त्यांच्या हातापायांच्या होणाऱ्या लयबद्ध हालचाली त्यांच्या तालवेडेपणाची कल्पना देऊन जातात. पारंपरिक वादनातही भजनी ठेका ढोलांवर वाजवला जातो. मात्र, तो फक्त वादकांना समजतो. तो सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोचण्यासाठी सुजित आणि त्याच्या ग्रूपने तालांची फोड करून तोच ठेका नव्या पद्धतीने सर्वांसमोर आणला आहे. त्यांनी शास्त्रीय संगीतात वापरली जाणारी तिहाईदेखील ढोलावर वापरून पाहिली. शास्त्रीय संगीतात साथीसाठी वापरल्या जाणा-या चर्मवाद्यांवर तिहाई वाजवली जाते. ढोल हेही चर्मवाद्य आहे. मग ढोलावर तिहाई वाजवली तर… अशा विचारातून त्यांनी ढोलावर तिहाई आणली. “आम्ही 2012 च्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत एकशेअकरा ढोलांवर तिहाई वाजवली. फक्त तिहाई नाही, तर चक्रधार तिहाईसुद्धा (एक तिहाई तीन वेळा) वाजवली. तिहाईसारखी गोष्ट ढोलात! ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.” असे अनिश सांगतो.

‘ग्रूप’मधील पंधरा जणांचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी असे सारे वेगवेगळे असल्याने त्या वेगवेगळेपणाचाही टीमला फायदा होतो. अनिश म्हणतो, “सचिन स्पोर्ट्समन आहे. आमच्या प्रयोगांत अनेकदा अपयश आले तरी त्याच्यातील ‘माघार न घेण्याच्या’ (नेव्हर गिव्ह अप) वृत्तीमुळे, पळवाटा शोधता येत नाहीत. त्याची परिणती आम्हाला हवे ते मिळण्यात होते. ऋषीकेश व्यवसायाने वकील असल्याने त्याला अनेक मूलभूत प्रश्न पडतात. दोन मात्रा का कापतो? हा बदल का करतो? अशा प्रश्नांची उत्तरे  शोधताना आमच्या संकल्पना अधिक स्पष्ट होत जातात. रोहितला तबला उत्तम वाजवता येत असल्याने ढोलावर ताल वाजवताना काय केले पाहिजे हे तो नेमकेपणाने सांगू शकतो.” त्याचाच मुद्दा पुढे नेत सुजित सांगतो, “प्रथमेश, अमेय, अद्वैत ही कॉलेजवयीन मुले ग्रूपमध्ये असल्याने आम्हाला त्यांच्या प्रॅक्टिकल अॅप्रोचचा फायदा होतो. त्यांना काही आवडले नाही तर ते पटकन् सांगतात.” एमबीए झालेला वरुण आणि मार्केटिंगमध्ये जॉब करणारा अमित नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतात. अनिशला पाश्चात्य संगीताची जाण आहे. त्याला क्लासिकलबरोबर जॅझही समजते. प्रत्येकाकडे काहीतरी वेगळा गुण असल्याचा फायदा आम्हाला ‘रिधम’साठी होतो.”

ढोलवादन म्हटले, की हातातील टिपरू ढोलाच्या मध्यभागी असलेल्या शाईवर आपटणे, असा पारंपरिक समज. कड्या, पिंपाची कड, पानाची रिंग, पिंप, पानाचे वेगवेगळे भाग असे ढोलाचे अनेक भाग वादनासाठी वापरले गेलेले नाहीत. त्यांचा वादनासाठी उपयोग करून घेता येईल असा ‘रिधम’चा विचार आहे. मुख्य दोन पानांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आवाज येतात. पिंप प्लेन वापरले तर त्याचा वेगळा आवाज असतो. ते पावडर कोटेड असेल तर, ढोलातून निघणारे ध्वनी वेगळे असतात. पिंपाच्या रंगानुसारही ढोलाचा आवाज बदलतो. निळ्या रंगाचा ढोल लवकर तापत नाही तर केशरी रंगाचा ढोल पटकन तापतो. त्यामुळे ढोलावरच्या व्हायब्रेशन्समध्ये फरक पडतो. दोरीची जाडी किती आणि ती बांधताना किती ताणली गेली आहे यावरसुद्धा आवाज अवलंबून असतो. सुजित सांगतो, “अजून बऱ्याच गोष्टींवर आमचा अभ्यास सुरू आहे.”

ते कर्वेनगरमधील हॉलमध्ये प्रॅक्टिस करतात. ते प्रत्येक वेळी ढोल-ताश्यांवर वाजवू शकत नाहीत. म्हणून त्यांनी प्रॅक्टिस पॅड तयार केले आहे. दहा बाय दहाच्या प्लायवूडवर फोम लावून त्यावर प्रॅक्टिस चालते. पुण्यातील आनंद गोडसे, अमृता गोडसे आणि वरुण गोडसे या तिघांनी मिळून ढोल-ताश्यांचा म्युझिक थेरपीसाठी काय उपयोग होऊ शकतो, यावर अभ्यास केला. सुजित सांगतो, ‘अनंत, अमृता आणि वरुण आम्हाला येऊन भेटले. त्यांनी ढोल-ताश्यांच्या मनावर आणि शरीरावर होणाऱ्या परिणामांविषयी… प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून विसर्जनानंतर शेवटचा ढोल ठेवेपर्यंतचा सगळा प्रवास त्यांनी त्यात मांडला आहे. त्या बडवण्यातून मनाला शांतता आणि आनंद कसा मिळतो, हे त्यांनी त्यात मांडले आहे. ढोल-ताश्येसुद्धा म्युझिक थेरपीसाठी वापरले जाऊ शकतात, हे आम्हाला त्यांच्याकडून कळाले.”

रिधम इव्होल्युशन’ने दोन-तीन चित्रपटांसाठी वादन केले आहे. त्यांनी त्यांची कला शिवामणींसोबत दोन वेळा सादर केली आहे. अधुनमधून वेगवेगळ्या इव्हेंटमध्येही त्यांचा सहभाग असतो. रिधम इव्हॅल्युशन पथकापासून सुरू झाले आणि अल्पावधीत चित्रपटापर्यंत पोचले. त्‍या सर्व तालवेड्यांची यापुढचा मोठा पल्ला गाठायची महत्त्वाकांक्षा आहे.

सुजित सोमण(रिधम इव्होलुशन) – 9822054222

– सोनाली बोराटे

(सकाळ साप्ताहिक, 8 नोव्हेंबर 2014 वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleकारहुनवी – बैलांची मिरवणूक
Next articleवैराग-मंदिरांचे गाव (Vairag Temples Village)
सोनाली बोराटे 'दैनिक सकाळ'च्या पुणे येथील मुख्य कार्यालयात उप-संपादक पदावर काम करत आहेत. पुणे विद्यापीठातून बीएस्सी बायोटेक केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या "जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन' विभागातून (रानडे इन्स्ट्यिुट) 'मास्टर इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन'ची पदवी घेतली. त्‍यांनी पुण्यातील 'लोकसत्ते'मध्ये प्रशिक्षणार्थी बातमीदार म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली. पुढे दैनिक 'प्रभात'मध्ये वार्ताहर आणि उपसंपादक म्हणून काम करत असताना त्यांनी पुरवण्याची जबाबदारीही सांभाळली होती. याशिवाय, त्यांनी 'तनिष्का', 'साप्ताहिक सकाळ' या मासिकांसह काही दिवाळी अंकांसाठी लिखाण तसेच अनुवादन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 8796488642

3 COMMENTS

  1. Sundar agralekh………Proud
    Sundar agralekh………Proud to be a part of Rhydhhm Evolution…..!!!!!!

  2. अप्रतिम …रिधम इव्होल्युशन
    अप्रतिम …रिधम इव्होल्युशन

Comments are closed.