मधू मंगेश कर्णिक यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ‘तारकर्ली’ ही कादंबरी लिहिली आहे. ती कोकण विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देणारी ठरते. कोकण म्हणजे गोवा ते डहाणू असा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला प्रदेश. कर्णिक यांनी कादंबरी लिहिण्यापूर्वी वेंगुर्ला ते मालवण अशा किनाऱ्यावर घडणाऱ्या मच्छिमार समाजाच्या जीवनातील परिवर्तनाची (की अधोगतीची?) पाहणी केली. ते ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे कार्यकर्ते आहेत. ते स्वतः मालवणला बाबला पिंटो रोजारियो यांच्या सहवासात राहिले. रोजारीयो हे कवी आहेत. मधू मंगेश कर्णिक यांनी काही महिने तारकर्लीजवळ वास्तव्य केले. त्यांनी त्यांना आलेल्या दुःखद अनुभवांच्या आधारे ती कादंबरी लिहिली. ती अंतःकरणाला भिडते आणि पर्यावरणाच्या समस्येमुळे वाचकाला अस्वस्थ करते.
कादंबरीत तारकर्ली व देवबाग या खेड्यांमध्ये होत गेलेल्या परिवर्तनाचे दर्शन घडते. ती वाळूवर वसलेली खेडी म्हणजे मच्छिमार समाजाने वाळूवर उभ्या केलेल्या झोपड्या फक्त निवाऱ्यासाठी! ते पिढ्यान् पिढ्या तेथे राहिले. जवळच सिंधुदुर्ग किल्ला आहे. रापणीच्या वेळी ‘हायलेस हायलेस’ अशी हाताला जोर येण्यासाठी ‘हमवणी’ म्हणत चाळीस-पन्नास रापणकर रापणी किनाऱ्यावर खेचतात. त्या मच्छिमारांत खवणेकर, कुबला, खोबरेकर तसेच सायमन, बस्तँव, फ्रान्सिस हे किरिस्ताँवही आहेत. तेथे धर्माचा, जातीचा भेदभाव नाही. रापणी ओढली, की वेगवेगळ्या माशांची वर्गवारी करणे, जमलेल्या बायका-मुलांना उरलेले मासे देणे आणि चांगली मासळी मालवण येथे ट्रकमधून पाठवणे असे मच्छिमारांचे जीवन आहे.
पावलू (पॉल) हा साठ वर्षांचा तरुण. तो शिविगाळ करत कामे उरकून घेण्यात पटाईत. कादंबरीत हिंदू, ख्रिश्चन कुटुंबे आहेत. चक्रीवादळात सागर शांत व्हावा म्हणून हिंदी किरीस्ताँव विठ्ठल मंदिरात ‘विठ्ठल हा बरवा, माधव तो बरवा’ अशी भजने म्हणतात. कादंबरीत अंतोनचे, बापट गुरुजींची कुटुंबे आहेत. अंतोन मुंबईत नोकरी करून दारूच्या आहारी जातो. त्याची नोकरी सुटते. तो परत गावी येतो. बापट गुरुजींच्या औषधामुळे त्याची दारू सुटते. नानू कांदवळकर आणि अंतोन हे सेवा दलाचे कार्यकर्ते. एकदा चक्रीवादळाने त्या गावांना झोडपले. अपार नुकसान झाले. नाथ पै यांचे कोकणावर अलोट प्रेम. ते धावून आले. त्यांनी पाहणी केली. ताबडतोब त्यांनी पंडित नेहरू यांच्या कानी ते सर्व घातले. त्वरित शासकीय मदत आली. पुन्हा हे काँग्रेसने केले असे सांगणारे काँग्रेसवाले हजर! त्यात पुन्हा वादावादी! अंतोन सुधारतो. तो देखणा आहे. त्याचे लग्न मार्थाशी होते. मार्था ही लंगडी, पण अतिशय सुंदर. दोघांचे शिक्षण एकाच शाळेत झालेले. त्यांचा विवाह थाटात होतो, पण मार्थाला मुलगी होते ती दुर्दैवाने बहिरी आणि मुकी!
त्याच वेळी तारकर्ली हे पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श ठिकाण आहे अशा आशयाचे लेख अमेरिकेत प्रसिद्ध होतात. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे पर्यटकांची पावले तारकर्लीकडे वळतात. मग पर्यटकांसाठी हॉटेल हवे, निवास हवा. तरुण पिढीला पैसे कमावण्याची ती नामी संधी आहे असे वाटते. बापट गुरुजींचे चिरंजीव मनोहर, त्याची केरळची पत्नी यशोदा हेही तेथे येतात. तेही पर्यावरण सांभाळून ‘आरोग्य केंद्र’ उभे करतात. पर्यटकांची गर्दी वाढत जाते. पर्यटक म्हणजे खाणे आणि पिणे, मजा मारणे. सागर किनाऱ्यावर दारूच्या बाटल्या, फेकलेल्या वस्तू दिसू लागतात. विल्यम, अंकुश, महेंद्र या मच्छिमार समाजाच्या नव्या पिढीला रापणीमध्ये स्वारस्य नाही. हॉटेल उभारणे, निवास-व्यवस्था चांगली करणे यांतच त्यांना रस. पर्ससीन, ट्रॉलर्स अशा बोटी सागरावर येऊन यंत्राच्या साहाय्याने मासे पकडू लागल्या. गोव्याहून रात्री सागरात प्रखर सर्च लाइट टाकून सागराच्या तळागाळातील मासे प्रचंड प्रमाणात पकडणाऱ्या मोठ्या बोटी येऊ लागल्या. तरुण मच्छिमार समाजाला हॉटेल-निवास यांद्वारे अमाप पैसा मिळू लागला! श्रीमंत व्यापाऱ्यांचे सरकारी अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्यामुळे अनेक नियम पायदळी तुडवण्यात येऊ लागले.
काही दुर्घटना घडतात. मार्था ही अंतोनची पत्नी सागराच्या लाटांत वाहून जाते. तिचा मृतदेह सापडतो. ती लंगडी असल्यामुळे लाटांत वाहून जात होती. क्लारा ही मार्था-अंतोन यांची मुकी-बहिरी मुलगी लाटांशी खेळत जाते. तिचा मृतदेह सापडतो. तिने तिच्या हातात हलणारी, डोलणारी, हसणारी कचकड्याची बाहुली घट्ट पकडून ठेवली होती. बापट गुरुजी सागराच्या लाटांत वाहून जात असताना पावलो उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण दोघांचे मृतदेह सापडतात. बापट गुरुजी आणि पावलो यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारलेली आहे. हे करूण दृश्य! अखेर धर्म कोणताही असो जन्म आणि मृत्यू अटळ असतात. पावलो आणि बापट गुरुजी यांच्या मिठीद्वारे कर्णिक यांनी खूपच लक्षणीय संदेश दिला आहे.
‘तारकर्ली’ ही कादंबरी अनेक दृष्टींनी संस्मरणीय ठरते. हिंदू, किरिस्ताँव या समाजांच्या मच्छिमारांनी विशाल सागराशी अत्यंत आत्मीयतेचे नाते जोडले होते. रापणीद्वारे जे काही मिळेल त्याच्या आधारे ती कुटुंबे सुखासमाधानाने जगत होती. त्यांनी निसर्गाचे संतुलन बिघडू दिले नव्हते.
निसर्ग बदलला नाही. माणूस बिघडला आहे! पैसा, शारीरिक सुख यांच्यापोटी त्याने सागर, सह्याद्री यांना वेठीस धरले आहे. मोठमोठ्या बोटी मासेमारी करण्यासाठी फिरतात. पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. बांधकामासाठी (अवैध) सागरकिनाऱ्यावरील वाळूचा कोकण किनाऱ्यावर सतत उपसा होत आहे. सह्याद्री आणि त्यावरील किल्ले महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देतात. बांधकामासाठी माती, दगड यांचा भरमसाट वापर होत आहे. सह्याद्रीचे कडे कोसळतात. माती नष्ट होत आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी पावसाने थैमान केरळमध्ये मांडले व त्यामुळे सर्व हादरून गेले असे म्हटले आहे. त्यांच्या मते, आता तीच दुर्दैवी परिस्थिती गोवा, कोकण येथील किनाऱ्यावरील विध्वंसक कामांमुळे होणार आहे.
मधू मंगेश कर्णिक यांनी जणू काय ‘तारकर्ली’ या कादंबरीद्वारे दीपगृहाप्रमाणे भावी संकटाचा, धोक्याचा इशाराच दिला आहे! क्लारा ही मुकी-बहिरी, कचकड्याची हसणारी बाहुली घेऊन फिरणारी! क्लारा हे बिघडलेल्या समाजाचे प्रतीक तर नाही ना?
– पु.द. कोडोलीकर
(‘जनपरिवार’ १७ सप्टेंबर २०१८ वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
It’s eye opener for common…
It’s eye opener for common man