‘टिंबख्तू’: एक विदारक सत्य!

0
21

– संजय भास्कर जोशी

     ‘टिंबख्तू’ ही लेखकाची कल्पना. त्यामुळे तसा वास्तव प्रदेश असणं शक्य नाही. परंतु पुण्याचे लेखक संजय भास्कर जोशी यांना नातवाच्या शाळाप्रवेशासंदर्भात ही कल्पना निर्माण करावी लागली. त्याची हकिगत त्यांनी वर्णन करून सांगितली आहे. त्यांचा नातू पावणेदोन वर्षांचा. त्याला भरपूर फी देऊन प्री नर्सरी शाळेमध्ये (?) टाकले. तर तिथे त्याला शिक्षणाऐवजी चोप मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मग करायचे काय? शाळा बदलली पण नातू शाळेत जायला तयार नाही. तेव्हा जावयाने शक्कल लढवली आणि ‘टिंबख्तू’ नावाचा प्रदेश तयार केला. तिथं त्यांचा मुलगा छान रमला. आता प्रश्न असा निर्माण झाला, की मुलगा शाळेत कधी आणि कसा जाणार……

– संजय भास्कर जोशी

     खरंच असतो का अस्तित्वात ‘टिंबख्तू’ नावाचा प्रदेश? असतो, दुर्दैवानं असतो. त्याचं असं झालं. माझा नातू सिद्धार्थ पावणेदोन वर्षांचा झाला, तोच माझ्या मुलीनं त्याला शाळेत, म्हणजे काय ते प्री नर्सरी म्हणतात तिथं घालायचा घाट घातला. मी त्याची श्रीमंतांचं पाळणाघर  वगैरे म्हणून चेष्टा करत विरोध करायचा क्षीण प्रयत्न केला. पण साताठ हजार रुपये फी भरून त्याला तिनं घातलंच त्या शाळेत. नवा ड्रेस वगैरे सर्व छान झालं. पण तो इतर सर्वांसारखा नॉर्मल मुलगा असल्यानं पहिले चार दिवस त्यानं रडून गोंधळ घातला. सगळी मुलं तो घालतातच! त्यात विशेष काही नाही. पण दुस-या आठवड्यात तेच. मग ज़रा चिंता वाटली. एरवी पोरगं इतकं हसरं अन खेळकर. पण आता एरवीदेखील घरी किरकिर करायला लागलं. मुलीने शाळेत जाऊन बघितलं अन तिला आश्चर्याचा धक्का बसला!
     शाळेतल्या बाई मुलांना म्हणत होत्या, कोण तो रडतोय, आता मी या पट्टीनं मारणार आहे. बघितली ही पट्टी? तो कोण रडतोय तिथं? ठेवू कोंडून? ठेवू जिन्याखाली कोंडून? आणि पोरं अजूनच रडत होती.
     मुलीला धक्काच बसला. मुलीने स्वत: मोंटेसरीचा  कोर्स केलेला. एक तर शाळेत मारणं वगैरे अलिकडे एरवीदेखील हद्दपार झालेलं आहे. अन ही तर पावणेदोन-दोन वर्षांची कोवळी मुलं! मुलगी अर्थातच लगेच त्या बाईंशी भांडली. बरं, हजारो रुपये फी घेणारी ही तथाकथित उच्चभ्रू शाळा! अन तिथं हां प्रकार. मला हे समजलं तरी माझा विश्वासच बसेना. मुलगी म्हणाली, मी याला या शाळेतून काढ़ते. आम्ही सर्वांनी त्याला अर्थातच पाठिंबा दिला. दरम्यान, लेकरू बदलत चाललं. तो आईला सोडून राहीच ना. घरीदेखील. हातातल्या वस्तू फेकायला लागला. सतत चिड़चिड करायला लागला. हातानं फटके मारायला लागला. मुलीनं वेळ न घालवता जवळचीच दुसरी शाळा शोधली. तिथं अजून पंधरा का वीस हजार रुपये फी. पण ही शाळा वेगळी वाटली. तिथं दर आठ-दहा मुलांमागे एक ताई. खूप खूप खेळणी. बाग़…  मुलगा आधी तयारच नव्हता. पण या नव्या बाईनी कडेवर घेऊनच पहिला दिवस त्याला रमवलं. खेळवलं. पण दुस-या दिवशी ‘शाळेत’ जायचं असं म्हटलं तर मुलगा रडायला लागला. तेव्हा आमच्या जावयानं युक्ती केली. तो म्हणाला, चल बेटा, आपण शाळेत नको हं , आपण की नै, ‘टिंबख्तू’ला जाउया. तिथं छान छान खेळ असतात ना? ‘टिंबख्तू’ हे म्हणायला अवघड होतं, पण ते निदान ‘शाळा’ नव्हतं. मुलगा तयार झाला. तिंबा, तिंबा करायला लागला. अन मग रमलाच तिथं.
     आठ दिवस झाले… मस्तपैकी आमचा नातू ‘टिंबख्तू’ला जातो. आम्ही चुकुनही घरात  ‘शाळा’ शब्द काढत नाही. एका अतिमधुर शब्दाला निदान काही दिवस तरी आमच्या घरात स्थान नाही. ‘टिंबख्तू’ हे एक दुर्देवी वास्तव झालं आहे खरं. 
     प्रसंग खरं तर साधा आहे. कदाचित घरोघरी घडणारा. पण एखादी चुक मुलाची शाळेकडे बघायची दृष्टी आयुष्यभरासाठी बदलू शकते. या युगातही अशा तथाकथित ‘शिस्त’ लावणार-या शाळा असू शकतात हेच भयानक आहे. जुन्या पद्धतीनं मुलाला मारूनमुटकून तसंच शाळेत पाठवलं असतं तर? माझं महाविद्यालयापर्यंतचं शिक्षण जितक्या पैशांत झालं तेवढी फी या पावणेदोन वर्षांच्या मुलाला एका वर्षी भरूनही अशी भयानक शाळा असू शकते? हा  प्रसंग शंभर टक्के सत्य असला तरी त्या शाळांची नावं देण्यात अर्थ नाही. आजुबाजूला असं काय काय असणारच. आपणच मुलांवर विश्वास ठेवायला हवा. तो रडतो म्हणून उलट त्यालाच ओरडून शिस्त लावण्यापेक्षा खोलात जाऊन कारणं तपासली पाहिजेत.
     नाही तर अशा कित्येक गोष्टींना आपण पर्यायी ‘टिंबख्तू’ तयार करत जाणार! वयात येणा-या मुलीनं बसमध्ये मुलं त्रास देतात म्हटलं तर कित्येक पालक मुलीलाच ओरडून ‘आपण नीट वागावे’ असा सल्ला देतात. बलात्कार झालेल्या मुलीबद्दलदेखील ‘ती कशाला असे टंच आणि चवचाल कपडे घालते?’ असं बोलणा-या मूर्ख समाजाबद्दल काय बोलावं? या सर्व बाबतींत आपण नवनवे ‘टिंबख्तू’ तयार करतो.
     आता इच्छा इतकीच, की सिद्धार्थचा हां ‘टिंबख्तू’ प्रदेश तात्पुरता असो. आमच्या नातवाला लवकरच ‘ही आवडते मज मनापासुनी..’ कवितेतली शाळा मिळो!
– संजय भास्कर जोशी – भ्रमणध्वनी – 09822003411, इमेल – sanjaybhaskarj@gmail.com

About Post Author

Previous articleमला तुझ्याशी मैत्री करायचीय!!!
Next articleअसंतोषाचे आंदोलन
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.