जवाहरलाल नेहरू आणि सोलापूरचा मि. वेडी

जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवे’ अशी मागणी करणारा ठराव मांडला, तो लाहोर काँग्रेसमध्ये एकमताने मंजूर झाला. तेव्हा एकीकडे सविनय कायदेभंगाच्या च‌ळवळीने उग्ररूप धारण केले, तर दुसरीकडे जवाहरलाल यांना अटक झाली. जवाहरलाल कैदेत सापडल्याने देशभरातील तरुण वर्ग प्रक्षुब्ध झाला. त्यातूनच सोलापूरच्या हाजूभाई चौकात कलेक्टरला खुनाची धमकी देणारे पत्र चिकटवलेले सापडले. त्या पत्राखाली पत्रलेखक म्हणून ‘मि. वेडी’ अशी सही होती…

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सोलापूरच्या युवक संघाने सोलापूरकरांमध्ये जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर पार पाडले. त्यासाठी युवक संघाने वापरलेल्या पद्धती या अभिनव आणि लक्षवेधी होत्या. त्यामागे डॉ. अंत्रोळीकर यांचे कल्पक नेतृत्व होते. सोलापुरात होणारा प्रत्येक उत्सव; मग तो होळीचा असो वा शिवजयंतीचा, त्याचा उपयोग करून सामान्य माणसाला स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षून घेण्याचे काम युवक संघाने चांगल्या तऱ्हेने केले. युवक संघाचा कंठमणी असणाऱ्या जवाहरलालकडे काँग्रेसचे अध्यक्षपद 1929 च्या अखेरीस आले आणि सोलापूरच्या युवक संघात चैतन्याची नवी लहर पसरली. रावीच्या तीरावर लाहोर काँग्रेसमध्ये हिंदुस्थानचा लाडका जवाहर संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडणार होता. पाठोपाठ, महात्माजी सत्याग्रहाचा नवा कार्यक्रम लोकांना देणार होते. ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवे’ अशी मागणी करणारा ठराव लाहोर काँग्रेसमध्ये एकमताने मंजूर झाला. त्यामुळे स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्याची भावना देशातील प्रत्येक युवकाच्या मनात निर्माण झाली. युवक संघात आगळेच चैतन्य आले. त्या ठरावानंतर 26 जानेवारी 1930 हा दिवस भारतीय स्वातंत्र्य दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. साऱ्या देशाबरोबरच जानेवारीमधील देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन सोलापूरकरांनी दीपोत्सव करत साजरा केला.

महात्मा गांधी मिठाचा सत्याग्रह 6 एप्रिलला करणार होते. सत्याग्रहानंतर नेत्यांची धरपकड अटळ होती हे लक्षात घेऊन सत्याग्रह राबवण्यासाठी युद्ध मंडळ व सत्याग्रही यांच्या याद्या तयार होऊ लागल्या. सत्याग्रह सुरू होताच पहिल्या सत्याग्रहीच्या अटकेनंतर नवा सत्याग्रही त्याची जागा घेणार होता. महात्माजींच्या निष्ठेने भारावलेला तरुण वर्ग सत्याग्रहासाठी कमालीचा उत्सुक होता. सोलापुरातही युद्ध मंडळाची स्थापना झाली. परशुराम राठी हे सोलापूरच्या युद्ध मंडळाचे नेते होते. त्यानंतरच्या काळात सोलापुरातील कायदेभंगाच्या चळवळीने उग्ररूप धारण केले, तशातच सरकारने जवाहरलाल नेहरू यांना 14 एप्रिलला अटक केली. तरुणाईची आशा असणारा जवाहर कैदेत पडला, देशभरातील तरुण वर्ग त्या कारणाने प्रक्षुब्ध झाला. ती बातमी त्या दिवशी सायंकाळी सोलापुरात समजली. दुसऱ्या दिवशी 15 एप्रिलला सर्वत्र हरताळ पडला. सोलापूरचा समस्त गिरणी कामगार रस्त्यावर उतरला. सोबत युवक संघाचे कार्यकर्ते होते. तेथे बघता-बघता आठ-दहा हजारांचा जमाव जमला. जवाहरलाल नेहरू यांचा फोटो समोर ठेवून मिरवणूक निघाली. ‘वंदे मातरम्’चा घोष सर्वत्र निनादला. वातावरण तप्त झाले. परदेशी कापडांची होळी पेटली. युवक संघाचे संतप्त कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. म्युनिसिपालिटीच्या शाळा बंद पाडण्यात आल्या, सरकारी हायस्कूलच्या दारावर विद्यार्थ्यांनी पिकेटिंग सुरू केले. शेठ शिवलालचंद यांच्या अध्यक्षतेखाली रात्री आठ वाजता टिळक चौकात मोठी सभा झाली. त्या सभेला प्रचंड जनसमुदाय हजर होता.

सोलापूरच्या हाजूभाई चौकात सोलापूरच्या कलेक्टरला खुनाची धमकी देणारे पत्र 15 एप्रिलला चिकटवलेले आढळले. पंडित नेहरू यांना आठ दिवसांत अटकेतून मुक्त केले नाही, तर कलेक्टरचा खून करण्यात येईल, अशा आशयाचे ते पत्र लाल शाईमध्ये लिहिले होते आणि पत्राखाली पत्रलेखक म्हणून ‘मि. वेडी’ अशी सही होती. ते पत्र पोलिसांनी तात्काळ जप्त केले. गुप्त पोलिस त्या मि. वेडीचा शोध घेऊ लागले. पण अखेरपर्यंत त्या मि. वेडीचा शोध लागला नाही. जवाहरलाल नेहरू यांच्यावर प्रेम करणारा  युवक संघाचा तो कार्यकर्ता अखेरपर्यंत अज्ञातच राहिला.

त्यानंतर अवघ्या महिन्याभरात सोलापूरकरांवर मार्शल लॉ चे संकट ओढावले. त्यावेळी जवाहरलाल नैनीतालच्या कारागृहात अटकेत होते. सोलापूरकरांनी तब्बल एकोणपन्नास दिवस मार्शल लॉ मधील अत्याचार सोसले. चार जणांना परमावधीची म्हणजे फाशीची शिक्षा दिली गेली. तुरुंगातून सुटका झाल्यावर नेहरू यांनी सोलापूरला भेट दिली; तेव्हा सोलापूरकर यांनी सोसलेले अत्याचार पाहून त्या हळव्या मनाच्या नेत्याचा कंठ दाटून आला. त्यानंतरच्या काळात जवाहरलाल नेहरू त्यांच्या भाषणात सोलापूरचा उल्लेख गौरवाने ‘शोलापूर’ असा करत असत.

– अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com

——————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here