जलदेवी अमला रुईया व त्यांचा आकार ट्रस्ट (Amla Ruia’s water conservation work with Aakar Trust)

3
58

अमला रुईया

       अमला रुईया हे व्यक्तिमत्त्व भारतात पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये परिचित आहे. त्या या कार्याकडे राजस्थानात पडलेल्या दुष्काळांनी (1999-2000 आणि 2003) वळल्या. त्यांनी राजस्थानातील खेड्यांमध्ये पाण्याची साठवण सुधारण्यासाठी आकार चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. संस्थेने पाणी साठवण आणि पाण्याची सुरक्षा देण्यासाठी बंधारे (चेक डॅम) बांधणे या कामासाठी त्या खेड्यांनाच भागीदार करून घेतले आहे. अमला रुईया या आकार चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक आणि अध्यक्षही आहेत. रुईया यांनी त्यांच्या कामाची व्याप्ती उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, हरियाणा आणि उडिसापर्यंत वाढवली आहे. तर संस्थेने  महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील बारा खेड्यांत सोळा बंधारे बांधले असून त्यांचा फायदा सात हजार सहाशेपन्नास शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांना विजयअण्णा बोराडे यांचे तेथे सहाय्य लाभले.

        अमला रुईया यांचे मत असे आहे, की कोणाला कोणतीही गोष्ट फुकट देऊ नये;फुकट दिली की तिची किंमत लोकांना कळत नाही. म्हणून त्यांनी बंधारे बांधणीच्या कामात त्या त्या खेड्याला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सतत ठेवला. ऐंशी टक्के भागीदारी संस्थेची तर वीस टक्के भागीदारी ही त्या खेड्याची अपेक्षित असते. खेड्याची वीस टक्के भागीदारी आल्याशिवाय कामाला सुरुवात करायची नाही हा संस्थेचा नियम आहे. बंधाऱ्यात मालकी हक्क खेड्याला मिळतो. त्याच्या संरक्षणाची जबाबदारीपण त्या खेड्यावर असते.

         अमला रुईया चौऱ्याहत्तर वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या संपन्न डालमिया परिवारात झाला. त्यांना पाण्याच्या कमतरतेमुळे वणवण फिरणाऱ्या बायका, दुष्काळाने त्रस्त झालेली खेडी, सतत कमी होणारी पाण्याची उपलब्धता व त्यामुळे पसरणारी उपासमारी हे सगळे चित्र पाहून चैन पडेना. त्या त्यांच्या श्रीमंत घरातून खेड्यांमध्ये पाण्याचे स्रोत तयार करून पाण्याची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने बाहेर पडल्या. त्यांना भारताचे जलपुरुष राजेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. आकार चॅरिटेबल ट्रस्ट वर्षाला नव्वद बंधाऱ्यांची कामे पूर्ण करते.

 

 

       अमला यांच्या आरंभीच लक्षात आले, की दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याकरता दुष्काळग्रस्तांना पैसे पुरवणे, कपडे पाठवणे किंवा औषधे पाठवणे हा समस्येचा तोडगा कायमस्वरूपी नव्हे. त्यांनी समृद्ध जीवनाचा त्याग त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी केला आणि खेड्यांना पाण्याची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने आकार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमाने साडेतीनशे बंधारे बांधले. त्यांचा फायदा चारशे खेड्यांना झाला आहे. तेथे गावकरी वर्षाला तीन पिके घेऊ लागले. सिंचनाखाली आलेल्या जमिनीत वाढ झाली. त्याचा मुख्य फायदा म्हणजे जे लोक पाण्याच्या अभावी कामाच्या शोधात गाव सोडून गेले होते ते गावाकडे परतू लागले. बायकांचा पाण्याच्या शोधात वणवण फिरण्याचा त्रास कमी झाला. मुली शाळेत जाऊ लागल्या;तसेच,गावाच्या स्वास्थ्यामध्येसुद्धा सुधारणा झाली.

अमला रुईया यांचा ग्रामीण भागात तीन हजार बंधारे बांधण्याचा मानस आहे. त्यांची संस्था महिन्याला तीस बंधारे बांधण्याचे लक्ष्य ठेवते. ट्रस्टने धरण बांधण्याचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे परंतु गावकऱ्यांच्या पाठिंब्याअभावी निर्धारित धरणे पूर्ण होत नाहीत. त्यांच्या कामाची सुरुवात राजस्थानमधील रामगढपासून झाली. त्यांनी आरंभी त्यांचे स्वत:चे पैसे घातले व त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले. नंतर रोटरी त्यांच्या मदतीला आली व नंतर काही मोठ्या संस्थांनी त्यांना निधी दिला. संस्थेकडे त्यांच्या प्रकल्पांकरता प्रायोजकांकडून अकरा कोटी रुपये आणि लोकांकडून चार कोटी सत्तर लाख रुपये जमा झाले आहे. त्याचा फायदा प्रकल्प पूर्ण झाल्यावर लाभार्थींना पाच हजार कोटी रुपयांच्या जवळपास झाला आहे.

        रुईया सांगतात, की त्यांनी बांधलेल्या बंधाऱ्यांपैकी मारवाड भागातील पाली जिल्ह्यातील गुंडा-बेर्रा येथे बांधलेला बंधारा सगळ्यात मोठा आहे. त्याचा खर्च छत्तीस लाख रुपये होता. त्यांपैकी पंचवीस लाख रुपये संस्थेने दिले तर उरलेले अकरा लाख रुपये ग्रामस्थांनी गोळा केले. संस्थेने तीनशेसतरा बंधाऱ्यांची निर्मिती 2006 ते 2018 या बारा वर्षांच्या काळात केली. त्याचा लाभ प्रत्यक्षात हा एकशेब्याऐंशी गावांतील दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार लोकांना झाला. बंधाऱ्यांचा अप्रत्यक्ष लाभ दोनशेदहा गावांच्या दोन लाख पंच्याऐंशी हजार लोकांनाही झाला आहे. एकंदरीत साडेचारशे बंधाऱ्यांमुळे लाभांकित झालेली सहाशे खेडी व तेथील साडेसात लाख लोक आहेत. यामुळे लोकांचे वार्षिक उत्पन्न तेराशे कोटी रुपयांपर्यंत झाले असून खर्च सत्तावीस कोटी रुपये झाला आहे. काम राजस्थानात जास्त व त्याखालोखाल महाराष्ट्रात आहे. त्या सांगतात, की 2016 साली बंधारे बांधण्याच्या आधी सत्तावीस हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न होते अकरा कोटी एकाहत्तर लाख बारा हजार दोनशेपन्नास रुपये; पण 2017 साली बंधारे बांधल्यानंतर त्याच शेतकऱ्यांचे उत्पन्न चौपन्न कोटी एकतीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे रुपये झाले आहे! बंधाऱ्यांनी तो फरक शेतकऱ्यांच्या जीवनात पडलेला आहे.

बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे होणारे फायदे –

* शेतकरी वर्षाला तीन पिके घेऊ लागले, * सिंचनाखाली येणाऱ्या जमिनीत दर वर्षाला वाढ होऊ लागली, * पशुसंवर्धनामुळे त्यांच्या आमदनीत बरीच भर पडली, * पाण्याच्या अभावी गाव सोडून गेलेले लोक गावात परतू लागले, * स्त्रियांची पाण्याकरता पायपीट करण्यातून मुक्ती झाली, * पाण्याच्या उपलब्धतेमुळे आरोग्य आणि स्वच्छता यांत सुधारणा झाली, * पाण्यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होऊ लागले.

बंधारा हे पूर आणि दुष्काळ यांवरही एक उत्तर ठरू शकते. संस्थेने म्युनिसिपालटीच्या पिण्याच्या पाण्याच्या वितरणाच्या सोयी जेथे उपलब्ध नव्हत्या त्या ठिकाणी 2000 ते 2005 या काळात पिण्याच्या पाण्याचे दोनशे कुंड तयार केले. त्यांची साठवण क्षमता जवळ जवळ एक कोटी लिटर पाण्याची आहे. अशा प्रकारे एक कोटी लिटर पाणी गावकऱ्यांना उपलब्ध झाले, पण ते त्यांना फुकट नसून त्याकरता त्यांच्याकडून कुंड बांधकामाच्या किंमतीच्या पंचवीस टक्के किंमत घेण्यात आली. संस्थेने महाराष्ट्रातसुद्धा गावकऱ्यांना पावसाच्या पाण्याचे संवर्धन व नियोजन यांकडे आकर्षित करण्याकरता एक लाख रुपयांच्या आकार जल पुरस्कारची घोषणा 2003-2006 या काळात केली. जो गाव पावसाचे पाणी जास्त साठवेल त्या खेड्याला तो पुरस्कार देण्यात येत असे.

          मला रुईया यांनी शिक्षणक्षेत्रातपण उल्लेखनीय काम केले आहे. त्या सांगतात, की संस्थेने पालघर जिल्ह्यातील ग्राममंगलनावाच्या स्वयंसेवी संस्थेशी प्राथमिक शिक्षणासाठी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे जगात कोठेही उत्तम पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या चांगल्या शैक्षणिक मॉडेल्सशी स्पर्धा करू शकतो असा एक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे. त्यांतील आठशे टीचिंग एड्स मुलांना प्रत्येक विद्याशाखेत प्रगती करण्यास मदत करतात.

          संस्थेने लोकांना आध्यात्मिक संज्ञा आत्मसात करता यावी म्हणून श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाच प्रसिद्ध अशा काव्यशास्त्र ग्रंथांचे संस्कृतमधून सोप्या हिंदी भाषेत भाषांतर केले आहे, ते पुढील प्रमाणे – * अष्टावक्र गीता, * नारद भक्ती सूत्र, * शिवसूत्र, * पतंजली योगसूत्र, * ईशावस्य उपनिषद

          अमला रुईया या मुंबईच्या फिनिक्स मिलच्या मालकवर्गातील आहेत. रुईया यांनी केलेल्या कामाची दखल अनेक संस्था, गैर-सरकारी संस्था यांच्याद्वारे घेतली गेली आहे. त्यांना अनेक पुरस्कारपण प्राप्त झाले आहेत. त्यांना जल-देवीया नावाने सन्मानित करण्यात आले आहे. पण लोक त्यांना पानी माता म्हणून ओळखतात.

अमला रुईया 09833298801ruiaamla@hotmail.com, aakartrust31@gmail.com

विनोद हांडे 9423677795 vkh0811@gmail.com

विनोद हांडे नागपूरला राहतात. ते बी.एस.एन.एलया कंपनीतून सहाय्यक मुख्‍य व्‍यवस्‍थापक पदावरून निवृत्‍त 2011 साली झाले. त्‍यांनी पाणी आणि पर्यावरण या विषयांवर लेख लिहिण्‍यास आणि भाषणे देण्‍यास 2012 पासून सुरूवात केली. त्‍यांनी बिसलेरी सारख्या पाण्याचे व बाटलीचे, मनुष्यावर आणि पर्यावरणावर होणारे दुष्‍पपरिणाम’, धर्मांमधील दहन-अफन विधींमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, श्वास घेऊ द्या गंगेला, ‘मधुमेहीमहाराष्ट्र असे अनेक विषय हाताळले आहेत. हांडे यांनी लिहिलेले लेख विविध मासिके आणि वृत्तपत्रांत प्रकाशित होत असतात.

————————————————————————————————————-

 

 

 

 

 

————————————————————————————————————————————–

About Post Author

Previous articleराज्याचे भाषासंस्कृती धोरण (Maharashtra State’s Language & Cultural Policy)
Next articleअजात ही झाली जात (Ganpati – Bussing’s Social reformer defeated by the Government)
विनोद हांडे नागपूरला राहतात. ते 'बी.एस.एन.एल' कंपनीतून सहाय्यक मुख्‍य व्‍यवस्‍थापक पदावरून 2011 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी पाणी आणि पर्यावरण या विषयांवर लेख लिहिण्‍यास आणि भाषणे देण्‍यास सुरूवात 2012 पासून केली. त्‍यांनी ‘बिसलेरी सारख्या पाण्याचे व बाटलीचे, मनुष्यावर आणि पर्यावरणावर होणारे दुष्‍पपरिणाम’, धर्मांमधील दहन-अफन विधींमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, श्वास घेऊद्या गंगेला, मधुमेही' महाराष्ट्र असे अनेक विषय हाताळले आहेत. हांडे यांनी लिहिलेले लेख अनेक मासिके आणि वृत्तपत्रांतून प्रकाशित झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9423677795

3 COMMENTS

  1. फारच महत्वाचं काम समर्पण वृत्तीने केले आहे.माझ्या जलसुक्तह्या पुस्तकात जलाबद्दल बरीच माहिती आहे.त्यात मला मला रुइयांचे काम नोंदवायला आवडेल.सरकारवर अवलंबून राहणे ऐवजी लोकांनी आपली नियती आपणच ठरवावी..पाणी फाउंडेशन असेच काम करीत आहे.

  2. अतिशय दिशादर्शक, ग्रामीण विकासाला चालना देणारे कार्य रुईया ताईचे व त्यांच्या सर्वच टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा…आम्ही टाटा सामाजिक विज्ञान संस्था,(अभिमत विद्यापीठ), तुळजापूर जि. उस्मानाबाद आपल्या आकार चॅरिटेबल ट्रस्ट सोबत जलसंधारण कामाच्या माध्यमातुन ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी कार्य करण्यास इच्छुक आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here