घोडे पेंड खाणे

3
67
_Ghode_Pend_Khane_1.jpg

पूर्वी तेलाचे घाणे असत. त्या घाण्यांवर शेंगदाणे, सरकी अशा तेलबियांपसून तेल काढले जाई. तेल काढल्यानंतर जो चोथा राहतो त्याला पेंड म्हणतात. शेंगदाण्याची पेंड फार पौष्टिक असते. म्हणून ती गुरांना आणि घोड्याला खायला घातली जाई. क्वचित लहान मुलेही ती खात.

घोडे पेंड खाणे हा वाक्प्रचार शाळेपासून कानांवर पडलेला असे. मास्तर मुलगा वर्गात उशिरा आला तर ‘तुझं घोडं कुठं पेंड खातंय’ असा प्रश्न त्या मुलाला विचारत. पण मुळात तो वाक्प्रचार ‘घोडे पेंड खाणे’ असा नसून ‘घोडे पेणे खाणे’ असा आहे. पेणे हा शब्द मूळ संस्कृत ‘प्रयाण्कम’वरून तयार झाल्याचे कृ.पां. कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्ती कोशात म्हटले आहे. ‘पेणे’ म्हणजे प्रवास करत असताना वाटेत मुक्काम करण्याचे ठिकाण किंवा जागा. ‘घोडे पेंड खाणे’ याचा अर्थ थांबून राहणे, अडून राहणे असा होतो. पेंड हे घोड्याचे खाद्य असते, हे माहीत असल्यामुळे त्या वाक्प्रचारात चूक आहे असे वाटत नाही.

ज्ञानेश्वरीत सोळाव्या अध्यायातील,

‘तरी तयांसी जेथे जाणे ।

तेथिंचे हें पहिलें पेणें ।

तें पावोनि येरे दारुणें ।

न होती दुंखें ॥ {16.413}

या ओवीत पेणे हा शब्द आला आहे. तो

‘ऐसिया या वाटा ।

इहींचि पेणा सुभटा ।

शांतीचा माजिवाटा ।

ठाकिला जेणें । {12.143}

या बाराव्या अध्यायातील ओवीतही आला आहे. दोन्ही ठिकाणी ‘पेणे’ या शब्दाचा अर्थ ‘मुक्कामाचे ठिकाण’ असाच लागतो. त्यावरून जेव्हा एखादे आडमुठे घोडे चालताना मध्येच थबकते, अडून राहते, तेव्हा ‘घोडे पेणे खाते’ असे म्हणण्याचा प्रघात पडला. उच्चारदोषामुळे ‘घोडे पेणे खाते’ या वाक्प्रचाराचे ‘घोडे पेंड खाते’ असे रूपांतर झाले.

‘पेणे’ या शब्दाचे पोचण्याचे ठिकाण, आश्रयस्थान, प्रवासातील मुक्काम असेही अर्थ आहेत. द.मा. मिरासदार यांची ‘माझ्या बापाची पेंड’ ही खुमासदार कथा प्रसिद्ध आहे. मराठीत ‘बापाची पेंड’ असाही वाक्प्रचार वापरला जातो. त्यातही पेंडऐवजी पेणे हाच शब्द ठिकाण, जागा या अर्थाने वापरला जात असावा. त्यामुळे ‘बापाच्या मालकीची जागा’ या अर्थाने ‘बापाची पेंड’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.

एकंदरीत ‘पुराणातील वानगी’चे रूपांतर ‘पुराणातील वांगी’त जसे झाले, तसेच ‘घोडे पेणे खाते’चे ‘घोडे पेंड खाते’ ह्यात झाले असावे.

– उमेश करंबेळकर

About Post Author

Previous articleगणेश देवींची चिताऱ्याची रंगपाटी!
Next articleसर्पमित्र दत्ता बोंबे
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810

3 COMMENTS

  1. थोडा अजून समर्पक असायला हवा…
    थोडा अजून समर्पक असायला हवा होता लेख. व फोटो..

  2. फारच छान लेख!??वाक् प्रचार…
    फारच छान लेख!??वाक् प्रचार सद्या फारच कमीवापरले जातात!धन्यवाद्!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here