गोंधळी नाटक जपणारे चव्हाण बंधू (Kannad play in border town Wagdari)

गोंधळीसमाजाचे बांधव गोंधळी नाटक दीडशे वर्षांपासून वागदरी येथे करत आले आहेत. वागदरी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील, सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. तेथे मराठी व कन्नड, दोन्ही भाषांचा वावर आहे. सर्व सण-उत्सवातील सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांत द्विभाषा सूत्र फार जाणवते. ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेदरम्यान व
 पालखी महोत्सवात कन्नड नाटक हमखास होत असते. गावची जत्रा म्हणजे सामाजिक विषयावरील कन्नड नाटक असणारच असे समीकरण बनले आहे. गावातील चव्हाण बंधू यांनी परमेश्वर कुस्ती आखाडा या भव्य मैदानात जवळजवळ दोन हजार नागरिक एकत्र बसून नाटके पाहू शकतील अशी व्यवस्था केली आहे. म्हणजे ओपन नाटयगृह! मैदान मंदिराच्या बाजूला आहे.

          डफावर चालणाऱ्या नाटकाचे प्रकार आहेत – त्यात प्रामुख्याने गोंधळी नाटक, राधा नाटक, काशिबाई, तांब्रट ध्वज व नंद गोपाळ यांचा समावेश होतो. त्यांचा बाज प्रबोधन व जनजागृतीपर असा असतो. चव्हाण बंधू यांची नाटके पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. ती परंपरा त्यांची चौथी-पाचवी पिढी सांभाळत आहे. राम, बाळराम, फकिरा ही पूर्वपिढी गोंधळी नाटक सादर करण्यात पारंगत होती. नाटक कन्नड व मराठी या दोन्ही भाषांत असते. पुरातन काळी लाईटची व्यवस्था नव्हती. नाटक त्याकाळी बत्ती लावून, कंदिल-मशालींच्या प्रकाशात होत असे. परमेश्वर कुस्ती आखाडा तुडुंब भरून जात असे. चव्हाणबंधू यांचे नाटक त्यांच्या घरात दुःखद घटना घडली तरी कधी चुकले नाही. जणू शो मस्ट गो ऑन हे सूत्र त्यांना माहीत होते! एकदा ढोलकी, डफ, संगीतपेटी व संबळ आणि तुणतुणे वाजले, की गोंधळी कलाकार वैशिष्ट्यपूर्ण पोशाख व झगे घालून तयार होत. ते त्यांच्या तोंडाला रंग लागले, की नाटकात दंग होऊन जात असत. गोंधळी नाटक सुरू रात्री अकराच्या सुमारास होई, ते सकाळपर्यंत चालत असे. त्यातील कधी पात्रांचे दुःख लोकांच्या डोळ्यांत पाणी आणे, तर हास्य लोकांना खदखद हसवायला भाग पाडत असे. त्यात शब्द आणि वैशिष्ट्यपूर्ण हावभाव यांची प्रभावी जोड असे. बोलणे-चालणे, कार्यक्रमांतील निवेदने, संभाषणे मराठीबरोबर कन्नड भाषेतही होत असतात. जत्रा किंवा यात्रेदरम्यान गावातील लोक एकत्र येतात. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी नाटक हे एकमेव परंपरागत साधन होय.

स्त्री वेशभूषेतील कलाकार

अक्कलकोट संस्थानचे नरेश राजा श्री फत्तेसिंग भोसले महाराज एकदा गोंधळी नाटक पाहण्यासाठी आले असता, राजांना खळखळून हसायला भाग पाडल्याबदल भोसले महाराजांनी नाटक करणाऱ्या कलावंतांवर खूश होऊन स्वतः त्यांना पोशाख भेट म्हणून दिले होते असे चव्हाणबंधू अभिमानाने सांगतात.

          गोंधळीनाटक फक्त परमेश्वराची सेवा म्हणून अनेक वर्षांपासून होत आहे. देवस्थान कमिटी मानधन देऊन त्यांचा सन्मान करत असे. चव्हाणबंधू ती परंपरा जपत परमेश्वर यात्रेत तितक्याच जोशात नाटक करत असतात. विद्यमान पिढी उच्चशिक्षित असून शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी अशा पदांवर कार्यरत आहे. मात्र त्यांचे नाटक करणे सुटलेले नाही. पेशाने शिक्षक असलेले तोरप्पा चव्हाणगुरुजी उत्साहाने नाटक करतात. त्यांना सर्व चव्हाणबंधू नेटाने साथ देतात. पण प्रेक्षक पूर्वीसारखे येत नाहीत;अगदी तुरळक, जुन्या पिढीतील ज्येष्ठ मंडळी नाटक पाहण्यासाठी येतात. मी स्वतः चव्हाणबंधूंना गोंधळी नाटक करताना, गेल्या तीस वर्षांपासून पाहत आलो आहे. गोंधळी नाटक हा वागदरीसाठी ऐतिहासिक ठेवा आहे.       

धोंडप्पा मलकप्पा नंदे 9850619724

ndhondapp@gmail.com
लेखक परिचय – धोंडप्पा मलकप्पा नंदे हे वागदरी येथे राहतात. त्यांनी मराठी विषयात बीए केले आहे. त्यांना लेखन, फोटोग्राफीचा छंद आहे. त्यांनी विविध विषयांवर लेखन दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंक यांतून केले आहे. त्यांचे सहा हजार लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना ग्रामीण संस्कृतीबद्दल विशेष आवड आहे. 
————————————————————————————————————–

About Post Author

5 COMMENTS

  1. नंदे छान आहे पारंपरिक कला जोपासणे गरजेचे आहे. मी ती नाटके पाहिलेली आहेत.अतिशय सुंदर आणि सामाजिक संदेश असणारी ती नाटके असायची. आमचे मामा गुंडू चवण विनोदी भूमिका करत असे. त्यांचे आगमन झाले की लोक खळखळून हसायचे.अभिनंदन छान लेख लिहिला आहे.मी सध्या शिवाजी विद्यापीठ येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here