गुणवंत राजेंद्र काकडे

11
30
_Rajendra_kakde_1.jpg

राजेंद्र काकडे हे उत्तर सोलापूर तालुक्यात जमशापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळत विविध छंद जोपासले. त्यांपैकी साबणावर विविध प्रतिमा साकारणे, चरित्रचित्रे रेखाटणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे हे त्यांचे आवडते काम आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे एकशेआठ पानी चरित्र चित्ररूपात पीयूसी पेपरवर मार्करच्या साहाय्याने साकारले आहे. त्यांनी गणपतीच्या विविध आकारांतील एकशेवीस चित्राकृती साबणावर रेखाटल्या आहेत. काकडे त्यांना या अनोख्या छंदाची प्रेरणा सह्याद्री वाहिनीवरील ‘बालचित्रवाणी’ या कार्यक्रमातून मिळाल्याचे सांगतात.

राजेंद्र काकडे हे शिक्षक म्हणून चळवळे आहेत. ते नेहमी काही ना काही प्रयोग करत असतात; त्यांच्या विद्यार्थ्यांनाही त्यात सामील करून घेतात. त्यातील एक महत्त्वपूर्ण प्रयोग म्हणजे ‘पर्यावरण चेंडू’. माती भिजवून त्याचे चेंडूसारखे गोळे करायचे. त्या गोळ्यांमध्ये चिंच, सीताफळ, जांभूळ, बोरे यांसारख्या चार-पाच जातींच्या फळांच्या बिया रोवायच्या. ते गोळे सुकवून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत गावी जाताना द्यायचे. विद्यार्थ्यांनी ते बस वा रेल्वे यांनी प्रवास करताना ठरावीक अंतरावर टाकायचे. जेणेकरून पावसाळ्यात त्या बिया अंकुरित होतील व त्यांची रोपे तयार होऊन पर्यावरणसंवर्धनाचे काम होईल! शिवाय, मुलांमध्येही त्यामुळे निसर्गाची ओढ व आपुलकी वाढीस लागेल. काकडे यांना निसर्गाबद्दल तळमळ आहे. त्याच तळमळीतून त्यांनी सोलापूरमधील पर्यावरणप्रेमी ग्रूपमार्फत पर्यावरणसंवर्धनाची कामे सुरू केली आहेत. मग तो इको-फ्रेंडली गणेशोत्सव असो, वन्य प्राणी-पक्षी संवर्धन असो, की वनसंवर्धन. ते त्या सर्व कामांत हिरिरीने सक्रिय असतात.

राजेंद्र काकडे सर्पमित्र म्हणून सोलापूरमध्ये प्रसिद्ध आहेत. काकडे सापांना का मारू नये, ते कसे पकडायचे, विषारी साप कोणते, बिनविषारी कोणते यांबाबत प्रबोधन करतात. त्यांचा सत्तर-ऐंशी जणांचा ‘रेस्क्यू ग्रूप’ आहे. त्यांच्यामार्फत सर्प पकडून त्यांना जंगलात सोडण्यात येते. ग्रूपकडून तशा बारा-तेरा विषारी सर्पांना जीवदान दिले गेले आहे. त्यांना ‘शॅमेलिऑन’ सरडा एकदा शाळेच्या रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडला. लोकांनी त्याला इजा त्याच्या विचित्र दिसण्यामुळे केली असावी. काकडे यांनी त्याला उचलून शाळेत नेले, त्याच्यावर उपचार केले. त्यांनी विद्यार्थ्यांना तो दुर्मीळ ‘शॅमेलिऑन’ सरडा दाखवून त्याच्याबद्दल माहिती दिली व पुन्हा त्याला जंगलात सोडले. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उन्हाळ्यात सहज उपलब्ध होत नाही. म्हणून काकडे यांनी सोलापूर शहरात समाजप्रबोधन करून पक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी भांडी वाटली. तसेच, त्यांनी डिश टीव्हीच्या भंगारवजा डिश कमी किंमतीत खरेदी करून त्या शाळेच्या आवारात पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवल्या. पक्षी मुक्तपणे त्या पाण्यात अंघोळ करत असल्याचे काकडे यांनी पाहिले आणि ते धन्य झाले. त्यांनी पर्यावरणसंवर्धनासाठी विविध विषयांवर शाळेत, गावांत कार्यशाळा घेतल्या. त्यांनी स्वत: इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवल्या. तसेच, कागद व कापूस यांचा वापर करून गणेशमूर्ती साकारली. तिची शाळेत २०१७ च्या गणेशोत्सवात प्रतिष्ठापना केली.

_Rajendra_kakde_2.jpgराजेंद्र काकडे यांनी स्टोन पेंटिंगला सुरुवात केली आहे. नदीतील सागरगोट्यांवर प्राणी, कार्टून्स यांच्या प्रतिमा रेखाटून त्यांचा पेपरवेटसारखा उपयोग होऊ शकतो, असे ते सांगतात. काकडे यांना एखादी कलाकुसर आवडली वा एखादी कलाकृती नजरेत भरली तर ते तसे कोरीव काम सुईने साबणावर करतात. ते नखे काढण्याच्या टोकदार हत्याराचाही वापर करतात. काकडे चॅाकलेटच्या कागदापासून शाळेतील विविध कार्यक्रमांसाठी गुच्छ व आकर्षक हारदेखील बनवतात. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांस टाकाऊ कागदांपासून प्राणी-पक्षी बनवण्यास शिकवले. त्यामुळे मुले कला जोपासण्याचा आनंद घेऊ लागली. काकडे यांनी त्यांच्या कलाकृती काचेच्या डब्यात संग्रहित करून ठेवल्या आहेत.

राजेंद्र काकडे यांना ट्रेकिंगचीदेखील आवड आहे. त्यांनी आतापर्यंत पन्नासेक किल्ले सर केले आहेत. काकडे यांना अशा अंगभूत वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे सांगोला तालुक्याचा ‘गुणवंत शिक्षक – २०१७’ चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना त्याव्यतिरिक्त ‘आदर्श शिक्षक’ म्हणून बर्‍याचदा सन्मानित करण्यात आले आहे. ते दैनंदिनी लिहितात. काकडे डी.एड., बी.ए. बी.एड. आहेत. त्यांचे वडील भारतीय सैन्यात होते. त्यांना दोन भाऊ व दोन बहिणी आहेत. एक भाऊ सैन्यात आहे, तर दोन्ही बहिणी शिक्षिका आहेत. काकडे त्यांचे आईवडील कमी शिकलेले असले तरी त्यांनी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण व संस्कार दिल्याचा अभिमान व्यक्त करतात.

– वृंदा राकेश परब

माहिती संकलन – श्रीकांत पेटकर

About Post Author

11 COMMENTS

 1. सर…
  सर
  आपले कार्य खूपच सुंदर असून निश्चितच प्रेरणादायक आहे .

 2. खूप छान.. हरफनमौला काकडे सर
  खूप छान.. हरफनमौला काकडे सर

 3. सर, आमच्या केंद्रात कार्यरत…
  सर, आमच्या केंद्रात कार्यरत आहे.त्यांचे कार्य जवळून पाहता आले. अतिशय उपक्रमशील शिक्षक. त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.

 4. Sir I am very happy to know…
  Sir I am very happy to know these aspects of your personality. I wish you many best of lucks and keep it up in your life.

 5. प्रेरणादायी, कृतिशील आणि…
  प्रेरणादायी, कृतिशील आणि हाडाचे शिक्षक विद्यार्थिप्रिय राजेंद्र काकडे सर एक बहुआयामी व्यक्तिमहत्व, सरांचा मार्गदर्शन आम्हालाही वेळोवेळी मिळत असतो

 6. शिक्षकी पेशा संभाळत हे विविध…
  शिक्षकी पेशा संभाळत हे विविध छंद जोपासत आहात!खूपच प्रेरणादायी आहे. शुभेच्छा!

 7. सर खुपच प्रेरणादायी आहे. एक…
  सर खुपच प्रेरणादायी आहे. एक शिक्षक म्हणुन तुमचा अभिमान वाटतो आम्हाला.तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.

Comments are closed.