गहुराणी – अनुभवरूपी हिऱ्यामोत्यांची माळ

0
25
_Gahurani_1.jpg

कांचन प्रकाश संगीत ह्यांचा ‘गहुराणी’ हा ललितकथा संग्रह त्यांच्या लेखनाचे वेगळेपण जपतो. त्यांचे यापूर्वी ‘अन्वयार्थ’ आणि ‘हरितायन’ हे संग्रह त्याच प्रकारचे म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘गहुराणी’ या पुस्तकाच्या हटके असलेल्या शीर्षकापासून उत्कंठा वाढत जाते. पुस्तक हातात घेतल्याक्षणी पुस्तकाचे मुखपृष्ठ नजरेत भरते. गहुराणी ह्या अक्षरांचा टाइप शीर्षकाला शोभणारा आहे. छोट्या बालिकेचा उडणारा फ्रॉक आणि वेण्या दाखवणारे चित्रही कथांना चपखल बसणारे आहे.

लेखिकेची नैसर्गिक व उत्स्फूर्त शैली कथा वाचताना जाणवते. वेगवेगळ्या फुलांना एकत्र गुंफून सुंदर हार बनवावा, तशा प्रकारे वेगवेगळे प्रसंग एकामागे एक मांडून एक सुंदर ओघवती कथा बनवणे ही कांचन प्रकाश संगीत ह्यांची हातोटी ‘गहुराणी’तही दिसते. वाचक सहजरीत्या त्यात गुंतून जातो.

कथांमध्ये मानवी मनाचे अनेक कंगोरे दिसतात. अनेकांना त्यांच्या बालपणात तेही ‘चोचपि’चाच एक भाग होते ह्याची आठवण ‘चोचपि’ ही पहिली कथा करून देते. लहानग्या छबीची वेगळीच सवय, घरच्या लोकांनी त्यावर अकांडतांडव केले, पण सासरेबुवांनी घाणेरड्या वाटणाऱ्या त्या सवयीवर शांतपणे मात केली व त्यावर तोडगा काढला ते कसे हे शिकण्यासारखे आहे. चहाची चव मिळावी म्हणून पाण्यात भिजवून बिस्किट खाणारा गरीब मजुराचा प्रसंग वाचून त्याच्या युक्तीला दाद द्यावी की त्याच्या दारिद्र्याने गलबलून जावे ह्या संभ्रमात पडण्यास होते. सिंहगडच्या पावसातील पिकनिकचा अनुभव जागवणारी ‘ढग विशाल तान्हुला मेघ’ ही कथा लेखिकेचे हळवे मन दाखवते. लेखिका निसर्गावर अतोनात प्रेम करणारी आहे. ती लहानग्या शाममध्येही विशाल ढगातील आरास बघते. भरगच्च गर्दीतील शहरी माणसेही ‘ए डुकरे’, ‘पाय फाकून गठूळं घेऊन कशी बसलीस, म्हशीसारखी’ वगैरे म्हणून तासाभरच्या प्रवासातही भांडत असतात, त्यावेळी घागरी व घारी ह्या, तिच्या बालपणातील म्हशींची आठवण कथानायिकेला येते. सुंदर दिसणाऱ्या कुमीआत्याला ती म्हशीवर बसली म्हणून मुले न होणे हे लेखिकेला न पटणारे व म्हशीवरही उगाचच आळ कशाला असे वाटते व ती ते तसे सांगून टाकते. ‘हवळा’ ह्या कथेत शेवंती, शामली व इतर मैत्रिणी यांचे प्रसंग फार सुंदर रीतीने रंगवले आहेत. खूप वर्षांनी पुन्हा भेटलेली शेवंती आणि परत कधीही न भेटलेली शामली, दोघीही कथानायिकेला दुःखच देतात. त्यांच्याबद्दल तिला वाटत असलेली ओढ व हुरहूर यांमध्ये सहजपणे मिसळून जाण्यास होते.

लेखिकेने मुरलीधरबुवा आणि मथुराबाई ह्यांचा जीवनपटही सोप्या भाषेत उभा केला आहे. कधीही एकत्र न फिरणारे, एकमेकांशी न बोलणारे ते जोडपे, पण मुरलीबुवा गेल्यावर मथुराबाईंची झालेली दयनीय स्थिती अस्वस्थ करते. मथुराबाईंना उगाचच भीती! तशी परिस्थिती आल्यावर ‘आपले काय?’ ही प्रत्येक माणसाची भावना कथेतून व्यक्त होते. ‘चिंचीआ लाचिंचीआ’मधील काशीला मोठेपणाची आवड असते, तर चिमुकलेपणाचे आकर्षण असणाऱ्या लहानगीला मात्र मोठेपणी बोन्साय बघून चीड येते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या आत, त्याचे चिमुकलेपण असतेच आणि ते चिमुकले आनंद मोठेपणी त्याला सुखी करतात हे लेखिकेचे म्हणणे पटल्याशिवाय राहत नाही.

‘गहुराणी आणि हरीणपाठ’ ह्या कथेतील आजोळी जाण्यासाठी हट्ट करणारी छोटी कथानायिका सर्व काही निमूटपणे सहन करते. तिचे आजोळी गेल्यावर रोज काही ना काही उपद्व्याप चालूच असतात, पण आजीची तिच्यावरील माया काही कमी होत नाही. आजी पाठ दुखते म्हणून तापत्या सळईचे चटके पाठीवर घेते, तरीही तिच्या पाठीला हरीणपाठ म्हणणारी छोटी ताई, गव्हाच्या घमेल्यात बसून ‘गोल गोल राणी’सारखे ‘गहुराणी, गहुराणी’ असे गाणे म्हणत असताना ती आजीचा मार खाते, पण आजीचा राग निवळल्यावर तिच्या कुशीत शिरते. ते निष्पाप पहिल्या व तिसऱ्या पिढीतील संस्कारी प्रेम सुखावून जाते. हसतखेळत असणाऱ्या घरात, नंतर होणाऱ्या वाटण्यांमुळे शकले झाली व मने दुभंगली, ही बऱ्याच घरांची शोकांतिका आहे.

एकूण नऊ कथा ‘गहुराणी’मध्ये आहेत. त्या सर्व कथा कोठे ना कोठे तरी मानवी जीवनाशी जोडल्या गेल्या आहेत. असे वाटते, की लेखिका गेल्या पिढीतील माणसांचे अनुभव सांगत आहे. लेखिकेचे निसर्गावरील अतोनात प्रेम प्रत्येक कथेत जाणवत राहते. ‘गहुराणी’त लेखिकेचे संवेदनशील व हळवे मन ती कथा वाचत असताना नकळत हळवे करून जाते.

_Gahurani_2.jpgघारी व घागरी ह्या म्हशींवर, कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच प्रेम करणारी माणसे, प्राणी-पक्ष्यांना माया लावणारी मिया, मित्र-मैत्रिणींच्या सुखदुःखात सहभागी होणारे तारुण्यातील दिवस, सुट्टीत ओढ लावणारे खेडेगावातील आजोळ, हे सर्व वाचताना जुन्या आठवणींना उजाळा मिळतोच; पण त्याहीपेक्षा धावपळीच्या, धकाधकीच्या सध्याच्या जगात कोठेतरी काहीतरी हरवत चाललो आहे ह्याची जाणीव होऊन मन अस्वस्थ होते.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची कुटुंबरचना, त्यावेळच्या माणसांचे बाहेरून काटेरी पण आतून मायेने भरलेले फणसासारखे स्वभाव, त्यावेळची भाषाशैली, एकमेकांबद्दल असलेला आदर, लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांची मन राखण्यासाठी होत असणारी धडपड, माणसांचे प्राणी-पक्षी व निसर्गावरील निस्सीम प्रेम, काहीही न बोलता कृतीतून दिसणारे हळवे मन हे ‘गहुराणी’तील सर्वच कथांमधून अनुभवता येते.

पुस्तकातील कथा वाचताना त्या कथा ऐकत असल्यासारखे वाटते, अर्थात त्याचे श्रेय कथालेखनात कथाकथनाची शैली असणाऱ्या लेखिकेला जाते. पुस्तकाला मधु मंगेश कर्णिक ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. मलपृष्ठामध्ये लेखिकेचा थोडक्यात परिचय व पूर्वप्रकाशित साहित्याची यादी दिली आहे. मलपृष्ठामध्ये लिहिल्याप्रमाणे ‘गहुराणी’ हे केवळ वेगळ्या आणि सहज, ओघवत्या शैलीचे पुस्तकच नव्हे तर ती लेखिकेच्या अनुभवाच्या हिऱ्या-मोत्यांची माळ आहे. स्वानुभवावर आधारित असल्यामुळे वास्तवतेच्या जवळ जाणारे व त्यामुळेच त्यातील प्रत्येक कथा वाचकाच्या मनाला भिडणारी आहे. सर्व कथांची शीर्षकेही अगदी वेगळी. ह्या पुस्तकाचे वेगळेपण पुस्तकाच्या शीर्षकापासून सुरू होते. शीर्षकामुळे वाचकांत नक्कीच उत्सुकता निर्माण होते. पुस्तकाची रचना व अक्षरजुळणी सुंदर आहे. प्राजक्त प्रकाशनचे ‘गहुराणी’ हे पुस्तक वाचनीय व संग्राह्य आहे ह्यात शंका नाही.

गहुराणी
लेखिका – कांचन प्रकाश संगीत
किंमत : २८० रुपये
पृष्ठे : २६४
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन

कांचन प्रकाश संगीत 9987111487, 3006kanak@gmail.com

– दिलीप कुलकर्णी Deeldeep@gmail.com

About Post Author