गणपती आणि वीरगळ

1
71
_Ganpati_Aani_Virgal_1.jpg

महाराष्ट्रात भटकंती करताना बऱ्याच गावांच्या वेशीजवळ, मंदिरांजवळ किंवा किल्ल्यांवर युद्धप्रसंग कोरलेल्या स्मृतिशिळा आढळून येतात. त्या शिळा कोणाच्या आहेत, कशासाठी कोरल्या गेल्या आहेत हे सांगता येत नाही. त्यांना वीरगळ म्हणतात असे कळाले.

वीरगळ हा शब्द वीरकल्लू (कल्लू = दगड) या कानडी शब्दापासून तयार झाला आहे. वीरकल्लू म्हणजे वीराचा दगड. थोडक्यात, वीरगळ कोरून वीराच्या स्मृती जिवंत ठेवल्या गेलेल्या असतात. वीरगळ आकाराने दोन-अडीच फुट उंचीचे असून त्याच्या चारही बाजूंना तीन-चार चौकटी कोरलेल्या असतात. तळच्या चौकटीत आडवा पडलेला वीर असतो. कधीकधी त्या मेलेल्या वीराजवळ गाई कोरलेल्या असतात. त्याच्या वरील चौकटीमध्ये युद्धाचा प्रसंग असतो. त्यांवरील चौकटीत अप्सरा त्या वीराला स्वर्गात घेऊन जात असल्याचे शिल्पांकन असते. सर्वात वरील चौकटीमध्ये वीर त्याच्या पत्नीबरोबर शिवपूजा (लिंग स्वरूपात) करत असल्याचे कोरलेले असते. तसेच सूर्य-चंद्रसुद्धा कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत वीराचे स्मरण लोकांना राहील असा त्याचा अर्थ!

वीराला युद्धात वीरगती प्राप्त झाल्यास त्याला स्वर्गप्राप्ती होणार अशी सर्वसामान्य धारणा असते. जे शिल्प पूजा करताना दाखवलेले असते, त्यात वीर त्याच्या उपास्यदेवतेची पूजा करतो असे दाखवलेले असते. त्यांच्यावर शिवपूजाच अनेक वेळा दाखवलेली असते, म्हणजे शिव ही त्या अनामिक वीरांची उपास्यदेवता असणार. परंतु शिवाच्याऐवजी दुसरी एखादी उपास्यदेवता असू शकते का?

डॉ. मंजिरी भालेराव यांनी लिहिलेल्या ‘गाणपत्य सांप्रदाय आणि पुणे’ या लेखात कसबा परिसरात गणपती ही उपास्यदेवता असलेले वीरगळ आहेत हे नमूद केलेले आढळले. त्यांपैकी पहिला वीरगळ ‘सूर्या सह्याद्री हॉस्पिटल’च्या मागे असलेल्या ‘मुंजोबा बाळ मंदिरा’त आहे. त्या मंदिरात मुंजोबा बाळ ह्याच्या स्मरणार्थ वीरगळ कोरलेला आहे. वीरगळ चारी दिशांना कोरलेला आहे. दोन दिशांना गणपती असून उरलेल्या दोन दिशांना शिवलिंगाची पूजा आहे. वीरगळाला शेंदरी रंग दिलेला असल्यामुळे त्याच्यावर असलेले युद्ध शिल्पपट अस्पष्ट झाले आहेत आणि ओळखता येत नाहीत.

_Ganpati_Aani_Virgal_2_1.jpgहजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन दर्गा तेराव्या शतकात पुण्येश्वर मंदिर उद्धस्त करून त्याच्या जागी मंदिराचेच दगड वापरून बांधला गेला आहे. दर्ग्याच्याजवळ रस्त्याच्यालगत नवीन बांधलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या बाहेर दोन वीरगळ आहेत. दोन्ही वीरगळ काळ्या रंगात रंगवले गेले आहेत. तरी एका वीरगळीवरील गणपती स्पष्ट दिसतो. गणपतीच्या मागील बाजूला स्त्री पूजा करताना दाखवली आहे. वीरगळीचा अर्धा भाग मंदिराच्या भिंतीत गेलेला असल्यामुळे गणपती अर्धाच दिसतो. इतर शिल्पपट अस्पष्ट झाल्यामुळे ओळखता येत नाहीत. दुसऱ्या वीरगळीवर शिवपूजा आणि इतर शिल्पे आहेत. त्यावर असलेली शिल्पे ही ओळखण्याच्या पलीकडे गेली आहेत.

सोमवार पेठेत नागेश्वर मंदिर आहे. मंदिर परिसरात असलेल्या अवशेषांवरून तेथे नागेश्वराचे जुने मंदिर असावे व पेशवेकाळात जुने मंदिर पाडून त्याच्या जागी नवीन मंदिर बांधले गेले असावे असे वाटते. त्याच मंदिराच्या आवारात गणपती असलेली स्मृतिशिळा आहे. तो वीरगळ नाही. कारण वीरगळावर असणारे शिल्पपट तेथे नाहीत. त्या स्मृतिशिळेचा खालील भाग गोलाकार असून वरील भागात चार खण आहेत. प्रत्येक खणात अनुक्रमे सूर्य, गणपती, चंद्र आणि मानवी आकृती कोरलेल्या आहेत. मंदिरपरिसरात उत्खनन चालू होते तेव्हा ती शिळा मिळाली. ती स्मृतिशिळा कोणाची आहे ते कळून येत नाही, पण गणपतीच्या मागील बाजूला कोरलेल्या माणसाची ती स्मृतिशिळा असावी.

पुण्येश्वर व बाळोबा मुंजा मंदिरातील वीरगळ बाराव्या-तेराव्या शतकातील व नागेश्वर मंदिरात असलेली स्मृतिशिळा नंतरच्या काळातील असावी. त्या काळात शिवाबरोबर गणपतीसुद्धा आराध्यदैवत म्हणून पूजला जाऊ लागला होता व गणपतीच्या लोकप्रियतेमध्ये भर पडत होती असे ध्यानी येते.

– पंकज समेळ
pankajsamel.1978@outlook.com
 

About Post Author

Previous articleनिफाडच्या वैनतेयाचे विविध ज्ञानामृत
Next articleअरुण साधू यांना झिप-याची आदरांजली
पंकज समेळ डोंबिवली येथे राहतात. ते लोअर परेलला शेअर ब्रोकरकडे डेप्युटी मॅनेजरच्या पदावर कार्यरत आहेत. समेळ यांनी भारतीयविद्येमध्ये एम.ए. केले आहे. त्यांना सह्याद्री, लेणी, शिलालेख, वीरगळ, गद्धेगाळ, मंदिर, मूर्तिशास्त्र, सातवाहन याबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यांना वाचनाची आवड आहे. त्यांचा भटकंती व फोटोग्राफी हा छंद. ते ट्रेकिंग करतात. त्यातूनच त्यांची किल्ल्यांबरोबर लेण्यांची भटकंती व अभ्यास सुरू झाला. समेळ यांनी त्यांच्या 'महाराष्ट्र देशा' या ब्लॉगवर विविध ऐतिहासिक वास्तूंवरील लेख प्रसिद्ध केले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9820254601

1 COMMENT

  1. अभ्यासपूर्ण. मुंबईत आमच्या…
    अभ्यासपूर्ण. मुंबईत आमच्या दहिसर परिसरातही एक्सर गावात वीरगळ सापडले आहेत.

Comments are closed.