गझल आणि ‘ग्रामीण गझल’

वीस-पंचवीस वर्षांपासून एक नवा तरुण वर्ग गझलेकडे वळला. तो मोठ्या संख्येने ग्रामीण परिवेशातील आहे. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा उत्साह, जोश, दांडगा आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या गझलांची संख्यात्मक वाढही वेगवान आहे. तेथेच एक गडबड आहे.

त्या गझलांच्या रचनेत एक विचलन दिसते. ते गझलेला अजिबात पोषक नाही. ‘गझलेच्या आकृतिबंधात अन्य कवितेचा भरणा’ किंवा ‘ग्रामीण जीवनवर्णनाचा भरणा’ हे ते विचलन. त्या गझलांमध्ये जे दिसते ते जर अन्य कोठल्याही प्रकारच्या छंदोबद्ध, वृत्तबद्ध कवितेत येऊ शकते. तर ते गझलेत बसवण्याचे काय कारण? शेत, वावर, दुष्काळ, पिकपाणी, माय-बाप, त्यांच्या हालअपेष्टा, चूल, भाकर, भूक, अवर्षण, ग्रामीण परिवेशातील स्त्री, स्त्रीजीवन, प्रेम, प्रेमभंग असे आणि अशा स्वरूपाचे विषय जसेच्या तसे थेट गझलेत येऊ लागले आणि ते वर्णन, तपशील, निवेदन, रिपोर्टिंग, वृत्तांत, माहिती, मुद्दा या आणि तेवढ्याच स्वरूपात येऊ लागले आहेत. त्या विषयांचे ठीक आहे, आक्षेप आहे तो त्यांच्या सपाटपणावर. आक्षेप आहे तो वर्णनपर मांडणीवर. उदाहरणार्थ, मायबापांच्या हालअपेष्टांचा मुद्दा आला, की श्रोते गलबलून जातात, कंठ दाटतात, डोळे पाणावतात. मग त्यावर करूणामय दाद! ती दाद त्या मुद्याला, विषयाला असते, शेराला किंवा गझलेला नव्हे. वास्तविक, त्या विषयाचा गझलकर्त्याला लागलेला किंवा त्याने लावलेला मार्मिक अन्वय गझलेमध्ये, शेरामध्ये येण्यास हवा. तो गझल या काव्यशैलीचा गाभा आहे. तोच या नव्या गझलांतून अभावाने दिसतो. तरुण गझलेच्छू ते गझलकाम समजून घेताना दिसत नाही.

गझलची जबरदस्त आवाहकता तरुणांमध्ये दिसते. ग्रामीण परिवेशातील तरुण गझलेच्छू त्यांचे सगळे कविताकाम त्या जबरदस्त मोहामुळेच गझलेच्या माध्यमातून करू लागला आहे. गझलची प्रकृती व त्याची कुवत या गोष्टी मात्र तो अजिबात समजून घेत नाही. तो त्याचा काव्यमजकूर जसाच्या तसा किंवा कथनाच्या स्वरूपात गझलेच्या आकृतिबंधात बसवू पाहतो, म्हणजे तो काफिय, रदीफ, वृत्त यांची तांत्रिक पूर्तता केलेला गझलेचा बाह्य आकृतिबंध उभा करतो! त्यामुळे झाले असे, की गझलेचा आभास निर्माण होतो.

गझल ना ग्रामीण ना शहरी. ना तिला अशा परिवेशाचा निषेध ना त्याच्याशी बांधिलकी. तिच्या केंद्रस्थानी आहे तो माणूस व त्याचे जीवन. परिवेश गौण, दुय्यम. त्याच्याबरोबर त्याचा परिवेश येईल पण तो गझलेत थेटपणे भौगोलिकता व परिसर विशेष म्हणून येणार नाही. त्या परिवेशातील दैनंदिन जीवनव्यवहाराचे तपशील गझलेचा विषय होऊ शकत नाही. तो कसा व कशा रूपात येईल हा गझलविवेकाचा प्रश्न आहे!

तो प्रश्न सोडवावा कसा? त्यासाठी आदर्श वस्तुपाठ हा सुरेश भट यांचा आणि त्यांच्या गझलेचाच आहे. भटसाहेब तशाच ग्रामीण परिवेशात जन्मले, प्रेरित झाले, वाढले, घडले, विकसित झाले. पण त्यांच्या गझलेत ग्रामीणत्वाचा बोजा दिसत नाही आणि जेव्हा केव्हा तो संदर्भ आला असेल तो गझलेच्या प्रकृतीला पोषक असाच आलेला आहे. ग्रामीण परिवेशातील सगळे विषय, मुद्दे, प्रवृत्ती, पेच, प्रश्न त्यांच्याही काळात होते, ते त्यांच्याही वाट्याला आले होते. ते त्याच परिस्थितीत जगले. पण त्यांनी त्याचा अणूएवढाही बोजा गझलेवर टाकला नाही. त्यांनी त्या ग्रामीण जीवनाच्या वर्णनासाठी वेगळी कविता लिहिता येते, त्यासाठी गझलेला वेठीला धरण्याचे कारण नाही हे अचूक जाणले आणि ते गझलेतून प्रतीतही केले. ते कसे केले हे समजून घेण्यासाठी त्यांची गझल उपलब्ध आहेच. उदाहरणार्थ म्हणून हा त्यांचा शेर. शेर जातीपातीच्या बुरसटलेल्या मानसिकतेविषयीचा आहे.
अखेर गावामधून मी त्या निघून गेलो
तिथे उषेचा प्रकाशही जातवार होता

ग्रामीण परिवेशातील गझलेच्छूंनी पुन्हा एकदा या दृष्टिकोनातून भटसाहेबांच्या गझलेचे अवलोकन करावे. त्यांचा गोंधळ त्यांच्याच लक्षात येईल.
टीप- मुनव्वर रानासारख्या काही उर्दू शायरांनी माय-बाप या विषयाचे गझलेत अलिकडच्या काळात प्राबल्य वाढवले आहे. त्याचा हा परिणाम आहे का?

गझलांची संख्या त्या तांत्रिक आघाडीवर भरमसाठ वाढू लागली आहे. पण विषय व मांडणी पाहता ग्रामीण कविता गझलेचा पोशाख घालून समोर येते की काय असे वाटते. उद्या कोणी ‘ग्रामीण गझल’ अशी भलतीच चूल मांडली तर धक्का बसू नये एवढी ही मानसिकता प्रबळ आहे.

चंद्रशेखर सानेकर 9820166243

(हा लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ‘मंथन’ या सदरामध्ये प्रसिद्ध झाला आहे. या तऱ्हेचे इतर लेख वाचण्यासाठी ‘थिंक महाराष्ट्र’चे अॅप डाउनलोड करा. अॅपची लिंक – https://goo.gl/zhJhQp) © ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’)   

 

About Post Author

1 COMMENT

 1. सानेजी,
  मला गझल आणि गोंधळ…

  सानेजी,
  मला गझल आणि गोंधळ यातील फरक कळत नाही
  काव्यही दूर हे गद्य नित्य जीवनी.
  अशी अवस्था
  पण आपण मांडलेली मतं विचार दिशा मात्र शतप्रतिशत
  खऱ्या आहेत.
  चांगली चर्चा जरुर व्हावी यावर.
  धन्यवाद.
  – चंद्रकांत जोशी

Comments are closed.