गजानन महाराज – नरसिंग महाराज स्नेहबंध !

0
63

महाराजांच्या घरी श्रीमंती होती. त्यांच्याकडे मूळ गावी शेकडो एकर जमीन होती. पुढे ते आकोटला आले व आकोटचे नरसिंग महाराज म्हणून प्रसिद्ध झाले.

गजानन महाराज हे नरसिंग महाराज यांना त्यांचे बंधू मानत असत. ते त्यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज यांना समवेत घेऊन आकोटला नरसिंग महाराज यांना भेटण्यास येत असत. भास्कर महाराज हे नरसिंग महाराज यांचे पूर्वीचे नातेवाईकच होते. नरसिंग महाराज यांची मंजाई नावाची एकुलती एक बहीण भास्कर महाराज यांचे बंधू जायले (आकोली जहागीर) येथील नथ्थू पाटील यांना दिलेली होती. त्या भेटीचे वर्णन दासगणू महाराज यांनी गजानन विजय ग्रंथाच्या अध्याय 6 मध्ये केले आहे – असो पुढे एक वेळां l महाराज गेले आकोटाला l आपल्या बंधूस भेटण्याला l श्रीनरसिंगजीकारणें ll 44ll

नरसिंग महाराज आकोट जवळच्या अरण्यात एकांतवासात राहात असत. तेथे मोठमोठे वृक्ष असल्याचे वर्णन त्याच ग्रंथात व त्याच अध्यायामध्ये आहे. ते जंगल तसे राहिलेले नाही. तो परिसर आकोट शहरात आला आहे. तो परिसर नरसिंग महाराज झोपडी म्हणून ओळखला जातो. त्या स्थळी निंब, पिंपळादी त्या काळातील वृक्ष मात्र अजून आहेत. त्याच ठिकाणी प्रथम त्या दोन्ही संतांची भेट झाली. दोघांचाही अधिकार मोठा होता.

एक हिरा कोहिनूर l
एक कौस्तुभ साचार ll 57 ll (अ.6)
दोघे भेटले एकमेकाl
दोघा आनंद सारखा l
बैसते झाले आसनीं एका l
हितगुज ते करावया ll58ll (अ.6)

नरसिंग व गजानन महाराज दोघे संत भजनात तल्लीन होऊन जात. दोन्ही संतांची गूढ आध्यात्मिक विषयांवर चर्चा होई. नरसिंग महाराज यांनी आकोट येथे माघ शुद्ध पौर्णिमेला शके 1809 मध्ये (इसवी सन 1887) समाधी घेतली.

गजानन महाराज हे आकोट तालुक्यातील मुंडगाव येथे झ्यामसिंग राजपूत यांच्या घरी 1909 साली आले होते. तेव्हा त्यांनी त्यांची चिलीम सेवेकरी विष्णुपंत गोंविदराव पाठक (ब्राह्मण) यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रसादाच्या रूपात भेट म्हणून दिली. ती चिलीम विष्णुपंत पाठक यांनी देह सोडण्यापूर्वी त्यांचे विश्वासू सहकारी त्र्यंबकराव वडाळकर यांना देखभाल करण्यासाठी 1978 साली सोपवली. ती चिलीम नंदकिशोर वडाळकर यांच्याकडे (सावरकर चौक) आहे. चिलीम साडेसहा इंच लांब असून त्यावर अष्टधातूंचे वेष्टन आहे. त्यावर बारीक रंगीत तारेचे सुंदर नक्षीकामसुद्धा केलेले आहे.

महाराजांनी ती चिलीम विस्तवाविना पेटवून दाखवली होती अशी दंतकथा आहे.  तसेच, त्यांच्याकडे चांदीचा लहान बिल्ला व चांदीच्या लहान पादुका पेटीमध्ये जतन करून ठेवल्या आहेत.

मुंडगावचे त्र्यंबकराव वडाळकर यांच्या आई कृष्णामाई यांनी चांदीचा बिल्ला व लहान पादुका चरणस्पर्श करून घेतलेल्या आहेत. दास भार्गव यांनी लिहिलेल्या गजानन महाराज चरित्रात तसा उल्लेख आहे.

गजानन महाराजांची शेगाव समाधी हे मोठे तीर्थस्थान होऊन गेले आहे, मात्र आकोटच्या नरसिंग महाराजांचे जीवनतत्त्वज्ञान तशाच प्रकारचे असून त्यांचा लौकिक तेवढा पसरला नाही याबद्दल आकोटमध्ये कधी कधी बोलले जाते. शेगाव मुख्य रस्त्यावर आहे, तर आकोटमध्ये आत खोलात जावे लागते. शेवटी, देव/संत भक्तीच्या ठिकाणी डेरा टाकावा लागतो !
 वामन जकाते 9822462204

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here