कोळगाव – जोड पाच तालुके, चार जिल्हे यांची

5
1156

कोळगाव हे जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील मध्यवर्ती असे महत्त्वाचे गाव आहे. ते गाव एकटे, सुटे असे नाही; त्याला लागून पूर्वेला पिंप्रीहाट नावाचे गाव एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गाव कोळगाव-पिंप्री या नावाने ओळखले जाते. एस टी स्टँडवर उतरल्यावर तेथील गजबजलेला परिसर पाहून गाव खूप मोठे आहे असा प्रथमदर्शनी भास होतो. त्या ठिकाणी असलेली हॉटेले, अनेक प्रकारची दुकाने, तऱ्हतऱ्हेची सरकारी-निमसरकारी कार्यालये – स्टँडला लागूनच असलेली जुनी पोलिस चौकी, पाटबंधारे खात्याचे ऑफिस-बंगला, जवळच असलेले वीज महामंडळाचे सबस्टेशन – कर्मचाऱ्यांसाठीची कॉलनी, हायस्कूल व कॉलेज आणि महादेव मंदिर. तेथेच पंधरा-वीस घरांची दक्षिणोत्तर दलित वस्ती आहे. त्याच्या खुणा बिऱ्हाडे गुरुजींचे घर ते नाना मास्तरांचे घर अशा गंमतीदार पद्धतीने सांगितल्या जातात. त्या घरांची वर्दळ तेथे असतेच. त्यामुळे स्टँड सकाळ-संध्याकाळ कायम गजबजलेला असतो.

स्टँड परिसर आणि त्याच्या आसपासची दुकाने, हॉटेले हे सारे दोन्ही गावांना सामायिक उपयोगी येते. पिंपरी या गावाचे नाव कागदोपत्री पिंप्रीहाट असे आहे. कोळगाव पिंप्री हे गाव शिंदी कोळगाव या नावानेही प्रसिद्ध आहे. शिंदीचे प्रसिद्ध तमासगीर धोंडू कोंडू पाटील यांच्यामुळे तशी ओळख गावाला नंतर लाभली. गंमत म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या एकेका तालुक्यात दोन-तीन तरी पिंप्र्या आहेत. चाळीसगाव तालुक्यात तर पाच पिंप्र्या आहेत !

भडगाव गिरणेच्या काठावर आहे. नदीला 1969 मध्ये मोठा पूर आला, गावात पाणी घुसले. भडगाव-कोळगाव भागात केळी-आंबे अशी पिके होत. कोळगावची केळी तर फार प्रसिद्ध. परंतु गिरणेवर धरण झाले, कोळगावचे पाणी आटले. आंबा-केळी-कापूस ही पिके रोडावली, परंतु आता कमी पाण्यात कोळगाव परिसरात सर्वत्र लिंबू पिकाचे मळे दिसतात. हे उत्पादन गुढेगावहून गुजरातच्या सुरत वगैरे बाजारात जाते. गुढेगाव कोळगावपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे.

भडगाव हा ब्रिटिश काळात पेटा होता. जळगाव जिल्ह्यात दोन पेटे होते- एक भडगाव आणि दुसरा एदलाबाद. भडगाव पेटा हा जिल्हा पूर्व खानदेश म्हणून ओळखला जाई. भडगाव पेट्याची तहसील कचेरी ही वाक येथे होती. ते कार्यालय भडगाव ह्या तालुका झालेल्या गावाला 1960 नंतर हलवण्यात आले. धुळे जिल्हा हा पश्चिम खानदेश तर जळगाव जिल्हा हा पूर्व खानदेश म्हणून ओळखला जाई.

कोळगाव-पिंप्री अशा ठिकाणी वसलेले आहे, की त्या टापूचा संबंध पाच तालुके व चार जिल्हे यांच्याशी येतो. तालुक्याच्या प्रशासकीय कामांसाठी भडगाव तर अन्य अनेक कामांसाठी चाळीसगाव असे गावकरी जात. भडगाव हे कोळगावापासून पंधरा-सोळा किलोमीटरवर आहे. बैलगाड्यांनी होणारा तो प्रवास दिव्य असे. गिरणा नदीतून भडगावपर्यंत जावे लागे. गिरणा नदीला पूल झाल्यानंतर आणि वाहतुकीची साधने वेगवान आणि रस्ते बरे झाल्यानंतर वाहतूक पुलावरूनच होऊ लागली. चाळीसगाव बाजारपेठ अनेकविध मालासाठी प्रसिद्ध होते. तेथे बैलबाजार असे. लग्नाच्या बस्त्यासाठी कोळगावकर तिकडेच जात. काहीजण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून पाचोऱ्याला पसंती देत. पाचोरा हे शहर भडगावपासून दहा-बारा किलोमीटर तर कोळगावपासून पंचवीस-तीस किलोमीटर अंतरावर आहे. चाळीसगाव व पाचोरा ही दोन्ही रेल्वे स्टेशने आहेत. कापूसविक्रीसाठी पाचोऱ्याला चाळीसगावपेक्षा अधिक पसंती मिळे.

पारोळा हे शहर कोळगावपासून धुळे-नागपूर महामार्गावर पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांची किराणा मालासाठी, आंब्या (कैऱ्या)साठी विक्री करण्याकरता पारोळ्याला पसंती असे. शेतमाल विक्रीसाठी मात्र शेतकरी चाळीसगावला जात. तेथे जाताना गावापासून दोन मैलांवर गिरणा नदी लागत असे. शेतमालाने भरलेल्या बैलगाड्या नदी पार करताना, नदीच्या वाळूतून नेताना बैलांची दमछाक होई. एकट्या धुरकऱ्याला (गाडीवान) गाडी नदीतून हाकलून नेणे कठीणच. कधी बैल पाण्यात बसे तर कधी गाडीचे जू (दुसर) मोडे. त्यामुळे दोन-चार गाड्या मिळून एकत्र चाळीसगाव मार्केट गाठत. तसा प्रकार पारोळ्याला जाताना होत नसे. पण त्या रस्त्याला तरवाड्याच्या बल्ल्यामध्ये (डोंगर-टेकडी) लुटमार होई. त्यामुळे तेथेही दोनपाच गाड्या एकत्र मिळूनच जात. शहरालाही आंबे (कैऱ्या), कापूस, ज्वारी वगैरे शेतमालाच्या गाड्या जात. अंमळनेरच्या गाड्या पारोळ्यावरून जात. शेतकरी त्याचा माल कोणत्या ठिकाणी भाव जास्त मिळेल या हिशोबाने त्या शहरात नेत असत. शेतकरी मालक शेतमालाचे पैसे परतताना बसने घेऊन येई. शेतमाल विकून परत येण्यास किमान तीन दिवस लागत.

कैऱ्या आणि इतर शेतमाल यासाठी शेतकरी धुळ्यालाही जात. धुळ्याला जाणारा शॉर्टकट रस्ता हा बराचसा जंगलातून जात असे. जंगलात बऱ्याच वेळा लूटमार होई. गाडीवानांना मारझोडही होई. गावातील बरेच जण शेतमाल विक्रीसाठी, डॉक्टरांसाठी आणि त्यांच्या इतर कामांसाठी धुळ्याला पसंती देत. गावातील आणि गाव परिसरातील बरीच मंडळी कामधंद्यासाठी मात्र नाशिककडे झुकत. कजगाव स्टेशन कोळगावला जवळ. तेथून  नाशिकला जाण्यास रेल्वे सोयीची पडते. त्यामुळे वेळेची व पैशांची बचत होते. आता, चांगल्या वैद्यकीय सेवेसाठीही नाशिक फायदेशीर वाटते.

कोळगाव परिसरातील लोक नोकरी निमित्ताने- विशेषत: शिक्षकाच्या नोकरीसाठी संभाजीनगर जिल्ह्याला पसंती देतात. आमचे गाव हे पाच तालुके आणि चार जिल्हे यांना अशा प्रकारे जोडले गेले आहे. वाहतुकीची साधने व सोयी वाढल्याने तालुकेच काय पण संबंधित चारही जिल्ह्यांच्या ठिकाणी मुक्काम न करता एका दिवसात जाणे-येणे सोयीचे झाले आहे.

– साहेबराव महाजन 9763779709

About Post Author

5 COMMENTS

  1. या विभागाला खानदेश असे नाव का मिळाले याची काही गोष्ट असेल तर सांगाल का

  2. श्री.नारायण वामन मालपुरे (सेवानिवृत्त प्राचार्य)

    साहेबराव पाटील यांनी गाव गाथा या लेखात आमच्या कोळगाव (ता.भडगांव.जि.जळगांव) चे विविध (शहरांपासून)बाजारपेठापासूनचे अंतर, पुर्वी व आता दळणवळणाच्या सोयींमध्ये झालेल्या सुधारणांमुळे गावकऱ्यांच्या शेती व इतर मालासाठी खरेदी -विक्री साठी जाण्यासाठी बदलेली मानसिकता यांसारख्या गावाच्या अतंरंगावर प्रकाश टाकण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.लेख वाचताना गावाच्या जून्या आठवणीत हरखून गेलो.माहितीयुक्त चांगला लेख.पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.–श्री.नारायण वामन मालपुरे.(सेवानिवृत्त प्राचार्य)

  3. खूप छान माहिती सांगितली सर , माहिती थोडक्यात पण मुद्देसुद आहे म्हणून वाचण्यास उत्सुकता व मजा येते. धन्यवाद सर.

    तुमचा एक माजी विद्यार्थी –
    श्री.अनिल पुंडलिक पवार ,
    नाशिक रोड ,नाशिक

  4. Excellent!
    While reading it feels like we are physically moving in that area.
    Good description. Keep it up. All the best.

  5. आपण आपल्या लेखातून अतिशय ग्रामीण परिसरातल्या आठवणी आणि त्यावेळीच असलेल्या सोयी, सुविधा, रस्ते, शिक्षण,रहदारी, लोक वाहतूक,तसंच परंपरा या सर्वांवर मार्मिकपणे प्रकाश टाकला आहे. आपल्या लेखणीला असाच वेग येऊ द्या आणि यापुढे आणखी ती गतिमान होऊ द्या .मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रातून आपले लेखन कर्म आम्हाला दिसू द्या…
    अशा शुभेच्छा देतो…
    धन्यवाद…
    मी एक निवृत्त प्राध्यापक…
    म.श्रा.पाटील
    गिरड, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here