कोबाड गांधी यांची स्वातंत्र्य गाथा

0
246

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक म्हणजे कोबाड गांधी हा प्रामाणिक व हुशार माणूस आणि त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी, कठीण ध्येय समोर ठेवून केलेल्या वाटचालीबद्दलचे आत्मकथन होय. ती कहाणी त्या दोघांची आहे. त्यांनी उपेक्षितांसाठी काम करण्याकरता आयुष्य वेचले. अधिक मानवी, अधिक न्याय्य समाजासाठी थेट कृती आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती. त्यांनी त्यांच्या गत आयुष्यातील आठवणी, तुरुंगातील अनुभव पुस्तकात सांगितले आहेत. कोबाड गांधी यांनी ते कथन करत असताना त्यांचे आयुष्य, प्रेम, गमावलेल्या गोष्टी, राजकारण अशा एकमेकांत गुंतलेल्या सगळ्या गोष्टींकडे, मागे वळून पाहिले आहे.

कोबाड यांची प्रतिमा ‘डून स्कूलमधून शिक्षण घेतलेला, लंडनमध्ये राहून आलेला मोठा नक्षलवादी नेता’ अशी होती. त्या काळी नक्षलवाद हा ज्वलंत विषय होता. त्या चळवळीतील माणसाची प्रतिमा रोमँटिक रॉबिनहूडसारखी काहीशी होती. त्यामुळे कोबाड यांच्या जीवनाची ‘स्टोरी’ चित्रपटासाठी आदर्श वाटली होती. त्यांच्या जीवनावरून प्रेरणा घेऊन तीन चित्रपट काढण्यात आले. पहिला चित्रपट प्रकाश झा यांचा ‘चक्रव्यूह’. त्यामध्ये ओम पुरीने कोबाड गांधी यांची भूमिका केली होती. दुसरा चित्रपट मणिरत्नम यांचा ‘रावण’. त्यामध्ये अभिषेक बच्चनने कोबाड यांची भूमिका केल्याची जाहिरात होती आणि तिसरा चित्रपट होता फारसा गाजावाजा न झालेला ‘रेड अलर्ट’. त्या चित्रपटात विनोद खन्ना यांनी नक्षलवादी कार्यकर्त्याची भूमिका केली होती.

कोबाड व त्यांच्या पत्नी अनुराधा ही दोघेही मूळ मुंबईची. त्यांना अनुराधा यांच्या कुटुंबीयांच्या सुधारक चळवळीच्या पार्श्वभूमीमुळे सामाजिक कार्य हाती घेण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी 1970 च्या दशकात तळागाळातील लोकांमध्ये कार्य आरंभले. त्या दाम्पत्याच्या आयुष्यातील चढउताराच्या वेळी अनुराधा यांच्या आई-वडिलांनी त्यांना पाठिंबा दिला. अनुराधा यांचे आईवडील- कुमुद आणि गणेश शानबाग दोघेही जुन्या ‘सीपीआय’च्या (अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्ष) काळातील कम्युनिस्ट होते. अनुराधा यांचे मामा चंद्रगुप्त चौधरी हे दोन वेळा ‘सीपीआय’चे आमदार झाले होते. अनुराधा यांच्या आईच्या सहापैकी तीन बहिणी ‘सीपीआय’च्या सदस्य होत्या. त्या सर्वांनी देशभरातील विविध भागांतील कम्युनिस्ट नेत्यांशी विवाह केले होते.

नोव्हेंबर 1977 मध्ये आणीबाणी उठल्यानंतर, कोबाड त्यांच्या महाबळेश्वरच्या घरात एका घरगुती समारंभात अनुराधाशी विवाहबद्ध झाले. त्या दोघांचे पालक आणि काही जवळचे नातेवाईक एवढेच लोक लग्नाला उपस्थित होते. अनुराधा ह्या त्या वेळेस मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रामध्ये एम ए आणि एम फिल झाल्या होत्या व त्या लेक्चररची नोकरी करत होत्या. अनुराधा यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेक लेख लिहिले. त्यात त्यांचा मार्क्सवादी दृष्टिकोन असे, त्यांचा पहिला निबंध होता- The Caste Question Returns

अनुराधा यांना तीव्र संधिवात 2000 साली जडला. सिस्टिमिक स्कलेरोसिस नावाच्या ऑटो इम्युन आजाराचे निदान झाले. त्या आजाराचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत गेला. तशाही परिस्थितीत त्यांचे काम चालू होते. त्या कामानिमित्त झारखंडला 2008 मध्ये गेल्या. त्यांची प्रकृती चांगली नव्हतीच, तेथे त्यांना मलेरिया जडला. पण त्यांना किेंवा तेथील महिला कार्यकर्त्यांना ते समजले नाही. त्या मुंबईला परत आल्या, पण त्या मलेरियाचे वेळेत निदान झाले नाही. त्यांना अचानकच फॅल्सिपॅरम मलेरियाचा अटॅक आला. त्यातून त्या एकदम कोमात गेल्या. त्यांचे निधन 12 एप्रिल 2008 च्या रात्री झाले.

कोबाड यांना भारतातील विविध तुरुंगांमध्ये शारीरिक त्रास दहा वर्षे सोसावे लागले. त्यांनी त्यांच्या त्या दीर्घ तुरुंगवासाबद्दल, त्यांच्या बरोबर तुरुंगात असलेल्या कैद्यांबद्दल, भारतीय कायदा व्यवस्थेच्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. एक अन्याय्य व्यवस्था एका शूर, धैर्यवान माणसालाही कशी दुबळी, असहाय्य बनवते त्याचे ते प्रामाणिक आणि आडपडदा न ठेवता लिहिलेले वर्णन आहे. ती कहाणी उच्चभ्रू जगातील संपन्नतेची आणि आत्यंतिक निराशेची आहे. ‘फॅक्चर्ड फ्रीडम’ हे मूळ पुस्तक इंग्रजीमध्ये आहे. त्याचा अनुवाद अनघा लेले यांनी सहज व सोप्या भाषेत केला आहे; असा, की तो अनुवाद वाटतच नाही !

कोबाड यांना अटक 2009 मध्ये झाली. त्यांना माओवाद्यांचा मुख्य लिडर म्हणून दहा वर्षांची शिक्षा झाली. त्या वेळेस त्यांचे वय होते बासष्ट वर्षे. त्यांनाही तेव्हा वेगवेगळे आजार होते. त्यांच्यावरील ते सर्व आरोप नंतर खोटे निघाले. शेवटी, त्यांची निर्दोष सुटका झाली, पण त्यामध्ये त्यांच्या आयुष्याची दहा वर्षे तुरुंगात गेली होती. दिल्लीच्या एका प्रकरणात ओळख लपवल्याचा चारेशेवीस (420) संबंधित आरोप मात्र त्यांच्यावर सिद्ध झाला.

कोबाड गांधी हे अभ्यासू विद्यार्थी होते. त्यांना त्यांचे ‘सेंट मेरीज स्कूल’मधील पाचवीपर्यंतचे दिवस फारसे आठवत नाहीत. पालक त्यांना गाडीने शाळेत सोडत असत. एवढेच आठवते. ते व त्यांचा थोरला भाऊ फारूक दोघे संध्याकाळी पोहण्यास शिकण्यासाठी ‘विलिंग्डन क्लब’मध्ये जात. दोघे भाऊ पुढे डेहराडूनच्या डून स्कूलमध्ये होते. फारूक तर चांगला जलतरणपटू झाला. तो ‘डून स्कूल’च्या जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेत असे. फारूक आणि राजीव गांधी एका वर्गात शिक्षण घेत होते. कोबाड यांच्या वर्गात संजय गांधी, कमलनाथ आणि नवीन पटनाईक हे होते. डून स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाई. खेळ हेही अभ्यासाइतकेच महत्त्वाचे मानले जात असत. कोबाड जवळजवळ सगळे खेळ खेळले आहेत. उदाहरणार्थ हॉकी, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्विमिंग, बॉक्सिंग वगैरे. पण त्यांना बक्षीस एकच मिळाले, ते बुद्धिबळामध्ये ! डून स्कूल म्हणजे शिस्तप्रिय, जीवनमूल्यांना महत्त्व देणारी आणि ध्येयवादी अशी होती. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू हे राजीव आणि संजय यांना भेटण्यास शाळेत आले होते. तेव्हा शाळेचे हेडमास्तर ‘जॉन मार्टिन’ यांनी नेहरू यांचे मदतनीस पांचू यांना विचारले, की ते पंतप्रधान म्हणून आले आहेत की आजोबा म्हणून? त्यांना ‘आजोबा’ असे उत्तर मिळाले. तेव्हा मार्टिन यांनी त्यांना थांबण्यास सांगितले, कारण ते स्वत:च मुलांशी फुटबॉल खेळण्यात व्यस्त होते.

कोबाड यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास मुंबई विद्यापीठात केला. त्यांचे वडील सीए होते आणि ते ‘ग्लॅक्सो’ कंपनीमध्ये फायनान्स डिरेक्टर होते. कोबाड यांनी त्याच क्षेत्रात इंग्लंडमध्ये शिक्षण (सी ए) घेतले. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात ‘इंग्लंड’सह युरोपच्या बऱ्याच भागांत डाव्या चळवळीचा जोर वाढला होता. ब्रिटनमध्ये त्याच्या पूर्वीच्या वसाहतींमधून येणाऱ्या स्थलांतरितांच्या वर्णद्वेषविरूद्ध चळवळीचाही उदय झाला होता. कोबाड त्या चळवळींच्या संपर्कात आले आणि त्यांचे पूर्ण जीवनच बदलून गेले ! त्याचबरोबर त्यांनी तेथे जो वर्णद्वेष अनुभवला त्यामुळे ब्रिटिश समाजामध्ये भारतीयांना स्वाभिमानाचे स्थान मिळवून दिले पाहिजे अशी प्रेरणा त्यांना मिळाली. त्यामुळे ते डाव्या चळवळीकडे वळले. पोलिसांनी त्यांना एका निदर्शनाच्या वेळी अटक केली. त्यांना तीन महिने लंडनच्या तुरुंगवासात काढावे लागले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. ते1972 मध्ये भारतात आले. त्यांनी येथील त्यांचे आयुष्य शोषित समूहांमध्ये काम करण्यासाठी समर्पित करण्याचे ठरवले.

कोबाड गांधी हे मुंबईला आल्यानंतर प्रोग्रेसिव्ह यूथ मूव्हमेंट या संघटनेमध्ये सामील झाले. त्यांनी त्यांची कर्मभूमी 1982 मध्ये नागपूरला बनवले. ते दोन दशके तेथेच राहिले. नागपूरमध्ये ते इंदोरा या दलित वस्तीमध्ये राहत आणि विद्यार्थी, नागरी अधिकार, स्त्रिया, कामगार, दलित आणि आदिवासी अशा विविध भागांतील चळवळीमध्ये आघाडीवर राहून काम करत. कोबाड गांधी यांना सप्टेंबर 2009 मध्ये अटक झाली आणि त्यानंतर त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ भारतातील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये काढला. त्यांची सुटका ऑक्टोबर 2019 मध्ये झाली.

कोबाड यांनी तुरुंगवासाच्या दहा वर्षांपैकी पावणेसात वर्षे तिहारमध्ये, एक वर्ष हैदराबादच्या तुरुंगात, एक महिना पतियाळाच्या तुरुंगात आणि सहा महिने विशाखापट्टणमच्या तुरुंगात काढली. त्यांनी एकदा सुटका होऊन पुन्हा अटक झाल्यानंतर पावणेदोन वर्षे झारखंडमधील तुरुंगामध्ये आणि शेवटी दोन महिने सुरतच्या तुरुंगात व कस्टडीमध्ये काढली. त्यांना प्रत्येक तुरुंगामध्ये भेटलेले कैदी आणि त्यांच्यात झालेल्या संवादातून, चर्चेतून मिळालेली माहिती पुस्तकामध्ये दिलेली आहे. प्रत्येक तुरुंगामधील कैद्यांचे जीवन, तेथील शिस्त, कठीण परिस्थिती या सर्वांचे वर्णन पुस्तकात केलेले आहे.

कोबाड यांना तिहार तुरुंगात असताना, भगभगीत दिव्यांच्या उजेडात झोपावे लागे. त्या दिव्यांची बटणे कोठडीच्या बाहेर असत. बल्ब झाकण्याचा प्रयत्न कधी केला तर रात्री राऊंडवर येणारे वॉर्डन त्यांच्यावर आरडाओरड करत. तो छळच होता, झोपू न देण्याचा. अंधारामुळे मेलॅटोनिन हे संप्रेरक तयार होते, त्यामुळे व्यक्तीला झोप लागते. प्रकाश असेल तर कोर्टिसोल हे संप्रेरक तयार होते आणि व्यक्ती जागी राहते. कोबाड तिहारमधील संपूर्ण वास्तव्यात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा असलेल्या कोठडीमध्ये होते आणि त्यांच्यावर लक्ष रात्रंदिवस ठेवले जात होते. कोबाड बाथरुम, टॉयलेट वगळता बाकी चोवीस तास निगराणीमध्ये असत.

पुस्तकातील अनुभव विदारक आहेत. कोबाड यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आज्ञापालन करावे लागत असे. त्यांना वाटे, की त्यांच्या संवेदना बधीर होणार की काय? कोबाड त्यांचे मानसिक संतुलन राखण्यासाठी व शारीरिक आरोग्य सांभाळण्यासाठी योग व व्यायाम दररोज करत असे; लेखन व वाचन करत असत. त्यांनी लिहिलेले लेख तेथूनसुद्धा प्रसारित होत. त्यांना लेख प्रसारित होत असल्यामुळे लिहिण्याची प्रेरणा मिळत असे. कोबाड तुरुंगात असताना अमरसिंग आणि अभिनेत्री खासदार जयाप्रदा हे दोघे त्यांना भेटण्यास आले. त्या काळात अमरसिंग हे समाजवादी पक्षाचे राजकीय वर्तुळातील महत्त्वाचे ब्रोकर होते. ते अमिताभ बच्चन यांचे जवळचे मित्र होते. त्यांचे पुढे निधन झाले.

कोबाड यांना अखेरीस 16 ऑक्टोबर 2019 मध्ये जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यांची मुक्तता झाली. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र त्यांना समाजात पुन्हा मिसळताना अवघड जात होते. पत्नीचे निधन झालेले होते. त्यांना जेथे परत जावे असे घर किंवा कुटुंब उरले नव्हते. इतक्या वर्षांनंतर पुन्हा समाजात सुस्थापित होणे हे अवघड होते. कोबाड यांना आधार कार्ड मिळवणे, बँकेत खाते उघडणे, कायदेशीर ओळख आणि पत्ता मिळवणे, मोबाईल घेणे अशा छोट्या गोष्टीसुद्धा कठीण वाटत होत्या. त्या वयात उत्पन्नाचा स्रोत कोठून मिळवावा, वैद्यकीय उपचाराचे काय करावे? हा सर्व खर्च कसा चालवावा? शिवाय, न्यायालयात खटले चालूच होते. एवढेच की बाहेर मोकळा श्वास घेता येत होता, ती मोठी समाधानाची बाब होती ! तसे कोबाड यांनी नमूद करून ठेवले आहे.

त्यांची त्यांच्यावरील सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता झाली; तरी पण त्यांना दहा वर्षे तुरुंगातच का राहवे लागले? हा खरा प्रश्न पुस्तक वाचून संपवल्यानंतर मनी येतो. कोबाड म्हणतात, की हा जो प्रश्न आहे तो राज्यकर्त्यांना आणि न्यायव्यवस्थेला विचारला पाहिजे. पोलिस आणि सरकार ही व्यवस्था स्वत:ला हवी तशी वाकवून कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरी करणार्‍या गुन्हेगाराला कायद्याच्या कचाट्यातून मोकळे करतात आणि गरीब लोकांसाठी काम करणार्‍या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मात्र तुरुंगात डांबतात. कारण संपूर्ण कायदा व व्यवस्था अजूनही ब्रिटिशांनी बनवलेली, जुनी वासाहतिक आहे. भारताचा राज्यकर्ता उच्चभ्रू वर्ग ब्रिटिशांप्रमाणेच विरोधकांना, समाज कार्यकर्त्यांना ‘देशद्रोही’ मानू लागला आहे. म्हणजे भारतीय लोक पुन्हा एक प्रकारच्या वासाहतिक राजवटीखाली आहेत का? गोर्‍यांची जागा काळ्यासावळ्या लोकांनी घेतली आहे, एवढेच.

पुस्तकाचे नाव – फ्रॅक्चर्ड फ्रीडम : (तुरुंगातील आठवणी व चिंतन)
लेखक – कोबाड गांधी
लोकवाङ्मय प्रकाशन, मुंबई
अनुवादः अनघा लेले 9766645028 leleaa@yahoo.com  

–  रत्नकला बनसोड 9503877175 bhimraobansod@gmail.com

——————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here