कुमुदिनी मेमोरियल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट

0
33
_rohini_athvale

फटाक्यांच्या  कारखान्यात आग लागून दहा बळी…

‘बीपीसीएल रिफीयनरी’मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन त्रेचाळीस जण गंभीर जखमी…

दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये आग लागून सत्तावीस लोक जळून खाक झाली…

पुण्याला साड्यांच्या गोडाऊनला आग लागून पाच जण मृत्यूमुखी व लाखो रुपयांचे नुकसान…

आग लागण्याच्या अपघातांच्या अशा पन्नास ते साठ घटना भारतात रोज घडत असतात. त्या घटनांच्या बातम्या आपण वाचत असतो, टीव्हीवर पाहत असतो, मनापासून हळहळतो आणि विसरून जातो. पण भाजण्याच्या अपघातांविषयी आणि भाजणाऱ्या व्यक्तींविषयी खूप गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे –

WHO रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी साधारण आठ ते दहा लाख लोकांना भाजण्याच्या अपघातांना सामोरे जावे लागते. त्यातील जवळ जवळ दीड ते दोन लाख रुग्ण मृत्यूमुखी पडतात आणि एक ते दीड लाख रुग्णांना तात्पुरते किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येते. हाच निष्कर्ष वेगळ्याप्रकारे मांडला तर दर चार मिनिटाला एक व्यक्ती भाजण्यामुळे मरण पावते. म्हणजेच रोड अॅक्सिडेंटनंतर आकडेवारीनुसार भाजण्याने मृत्यू पावणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातील अजून एक धक्कादायक बाब म्हणजे भाजण्याच्या अपघातात साठ ते सत्तर टक्के स्त्रिया व मुले (दहा ते पंचेचाळीस वर्षें) असतात. भाजल्यानंतरचा एक तास हा गोल्डन पिरियड समजला जातो आणि ताबडतोब उपचार सुरू केल्यास रुग्ण वाचण्याचे प्रमाण अधिक असते.

भाजण्याची जखम ही अत्यंत वेदनादायी, अनेकदा चिघळणारी व दीर्घकाळानंतर बरी होणारी असते. गंभीर भाजण्यामुळे व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिक; तसेच, सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होते. इस्पितळातील दीर्घकालीन वास्तव्य आणि महागडे उपचार यांमुळे अनेक कुटुंबे आयुष्यातून उठतात. कोणतीही जखम शारीरिक हानी तर पोचवतेच पण भाजण्याचे व्रण आणि या घटनेचा धक्का मनावर खोलवर परिणाम करणारा असतो. आयुष्यभरासाठी त्या खुणा अंगावर बाळगताना मोठेच मानसिक धैर्य लागते.

शरीराचा किती भाग भाजला आहे; ते वैद्यकीय परिभाषेत मोजण्याचे परिमाण म्हणजे TBSA -Total Body Surface Area –  (दहा टक्के/वीस टक्के/तीस टक्के/……. /शंभर टक्के). मनुष्याच्या त्वचेचे एकूण आठ स्तर असतात. जखम किती खोलवर आहे हे कळण्यासाठी 1st degree, 2nd degree, 3rd degree burns अशी परिभाषा वापरतात. पन्नास ते साठ टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेल्या व्यक्ती मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण मोठे आहे.

त्या सगळ्या प्रकारात अजून एक बोचणारी/खंतावणारी/विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे भाजलेल्या रुग्णांवर सगळ्या इस्पितळांमध्ये उपचार होत नाहीत. दहा-वीस टक्के TBSA असेल तर मलमपट्टी करून, औषधे देऊन रुग्णांना घरी पाठवतात. पण त्यापेक्षा जास्त भाजलेल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असते. त्यांना मात्र जेथे ‘Burn Ward’ आहे असाच हॉस्पिटलमध्ये जावे लागते. कारण _janjagruti karneजंतुसंसर्गाचा मोठा धोका अशा रुग्णांना असतो व त्यासाठी वेगळ्या सोयींची गरज असते. त्यासाठी स्वतंत्र ‘Burn Ward’ लागतो. सध्या भारतामध्ये एकंदरीत तेराशेपन्नास ते चौदाशे बेड्स आणि तीनशे आयसीयू बेड्स आहेत, जेथे भाजलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. भारताची एकूण लोकसंख्या आणि भाजण्याच्या अपघातांचे प्रमाण पाहिले तर साधारण सहा हजार बेड्स व आठशे आयसीयू बेड्सची आवश्यकता आहे.

भाजण्याच्या अपघातांची कारणे पुढीलप्रमाणे –

1. आग (Flame) – पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर टक्के
2.गरम पाणी (liquid) – पाच टक्के
3.इलेक्ट्रिकल – बारा ते पंधरा टक्के
4.केमिकल – तीन ते पाच टक्के

स्वयंपाक करताना चुली, स्टोव्ह, गॅस, चिमणी, टेंभे यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. म्हणूनच स्त्रिया व मुले गंभीर रीत्या भाजण्याचे प्रमाणही जास्तच आहे. भाजण्याचे बरेचसे अपघात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये होण्याचे प्रमाण खूप आहे. खर्चिक उपचार न परवडल्याने बऱ्याचदा ते अर्धवट सोडले जातात व बरा होऊ शकणारा रुग्णही मृत्यूमुखी पडतो.

भाजलेल्या रुग्णांवर उपचार करताना, वरदान ठरणारे त्वचादान व त्वचापेढी. रक्तपेढीमध्ये जसे रक्त साठवले जाते तसेच त्वचापेढीमध्ये त्वचा साठवून ठेवता येते. त्या त्वचेचे रोपण भाजलेल्या जखमेवर केल्यास जखम लवकर भरून येते. अगदी ऐंशी टक्के (TBSA) भाजलेला रुग्णसुद्धा वेळेवर त्वचारोपण केल्यास मृत्यूच्या खाईतून परत येऊ शकतो. विकसित देशांमध्ये अत्याधुनिक उपचार आणि त्वचेची उपलब्धता यांमुळे सत्तर टक्क्यांपेक्षा (TBSA) जास्त भाजलेले रुग्णही वाचवले जातात. अठरा वर्षांवरील कोणतीही निरोगी व्यक्ती मृत्यूपश्चात सहा तासांच्या आत त्वचादान करू शकते. (त्वचादान म्हणजे काय? त्याची आवश्यकता, उपयोग हा एक वेगळ्या लेखाचा विषय होईल.)

भारतातील त्वचादान आणि त्वचापेढींची उपलब्धता हा एक गंभीर चिंतेचा विषय आहे. सध्या भारतात फक्त दहा त्वचापेढी किंवा त्वचेचे संकलन करणारी केंद्रे आहेत (खरे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक त्वचापेढी व ‘Burn Ward’ असणारे इस्पितळ यांची गरज आहे). त्याचे कारण म्हणजे सामाजिक तसेच शासकीय पातळीवरची त्वचादान व त्वचापेढीबाबतची अनभिज्ञता आणि उदासीनता!

त्वचा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. ते शरीराचे संरक्षक कवच असते जे भाजल्यामुळे नष्ट होते. त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. त्वचेचे रोपण केल्यास जखम लवकर भरून येते व हा धोका टळतो.

त्याचबरोबर आग विझवण्यासाठी भारतात उपलब्ध असणारी अग्निशमन यंत्रणा हासुद्धा अभ्यासाचा विषय आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सतर्फे 2017 साली पार्लमेंटमध्ये एका उत्तरात असे सांगण्यात आले, की भारतात 2012 पर्यंत दोन हजार नऊशेसत्त्याऐंशी अग्निशमन केंद्रे होती आणि गरज आहे ती आठ हजार पाचशेएकोणसाठ केंद्रे असण्याची.

त्याशिवाय भारताला पाच लाख एकोणसाठ हजार सहाशेएक्याऐंशी प्रशिक्षित अग्निशमन अधिकारी/कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि भारतात साधारण ऐंशी हजार ते नव्वद हजार प्रशिक्षित कर्मचारी आहेत. अग्निशमनाची साधने व वाहने सहा हजार सातशेबारा आहेत व आवश्यक बत्तीस हजार सातशेदहा आहेत. ही आकडेवारी 2012 सालची आहे. (https://dgfscdhg.gov.in/https://dgfscdhg.gapfirese) थोडक्यात, भारतात फायर ब्रिगेड स्टेशन्स, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग; तसेच, आग विझवण्याची साधने व आगीचे बंब सगळ्याचीच कमतरता आहे (scarciety by 50% or more).

माझ्या आईचा भाजल्याने मृत्यू झाला. मी त्या अनुभवातून संशोधन सुरू केले. इंटरनेटवर माहिती शोधली, वाचन केले. त्यावेळी माझ्या लक्षात आले, की आईच्यावेळी आपल्याला अपघाताची, उपचाराची माहिती नसल्याने आपण काही करू शकलो नाही. परंतु, या पुढे होणाऱ्या अशा अपघातातून इतरांचे प्राण नक्कीच वाचवू शकतो. त्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून त्यामध्ये व्यक्तिगत तसेच सामाजिक पातळीवर सुधारणा करण्याच्या हेतूने आम्ही ‘कुमुदिनी मेमोरियल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना 2016 साली केली. मी आणि माझे पती विनायक आठवले, मुलगी ज्ञानदा आठवले आणि मुलगा सौमित्र आठवले अशा _kumudini_trustकौटुंबिक पातळीवर ‘कुमुदिनी मेमोरियल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’चे कार्य सुरु केले. आता आमची टीम वाढली असून आम्ही त्यासाठी तीन पातळ्यांवर कार्यरत आहोत –

1.प्रतिबंध, 2. उपचार आणि 3. पुनर्वसन.

भाजण्याच्या अपघातांना एक सोनेरी किनार आहे असे म्हटले जाते. म्हणजेच त्यातील बरेचसे अपघात योग्य काळजी आणि प्रशिक्षण घेतले तर टाळता येतात. आग लागण्याची/भाजण्याची कारणे टाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांची योजना घरगुती स्तरावर/सोसायट्यांमध्ये/कारखान्यांमध्ये/नागरी वस्त्यांमध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच अपघात झाल्यास प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी अर्थसाहाय्य देण्यास संस्था प्रयत्नशील आहे/राहील. त्याच प्रमाणे मानसिक धक्क्यातून बाहेर येण्यासाठी रुग्णांना कौन्सिलिंग करणे व फिजिओथेरपीच्या माध्यमातून त्यांना अपंगत्व टाळण्यासाठी मदत करण्याचेही आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही त्वचादानासाठी जागृतीपर व्याख्याने विविध संस्था, महाविद्यालये, सोसायट्यांमध्ये देऊन याबाबत जनजागृती करत आहोत.

1. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भाजलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी सुसज्ज यंत्रणा असावी.

2. आवश्यकतेनुसार जखमी रुग्णांना ‘AIRLIFT’ करून लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचता यावे.

3. प्रत्येक राज्यात किमान एक त्वचापेढी असावी व आवश्यकेतनुसार त्याची संकलन केंद्रेही असावीत.

4. खेडोपाडी सगळीकडे लोकांना त्वचादानाचे महत्त्व समजावे यासाठी जनजागृती करणे.

5.सरकारी पातळीवरूनसुद्धा जास्तीत जास्त कार्यक्षम यंत्रणा उभी करण्याचा आग्रह धरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगीचे प्रतिबंधात्मक उपाय योजून अपघातांची संख्या व जीवितहानी कमी करणे.

अशी सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक लोकचळवळ उभारायची आहे.

सध्या आम्ही दोन मुख्य उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील पहिला उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल वस्त्यांमधला सर्व्हे आणि दुसरा आर्थिक सबळ सोसायटीमधील सर्व्हे. आगीचे प्रकार दुर्बल वस्त्यांमध्ये जास्त घडतात. तेथे त्यांना त्याबाबत योग्य माहिती देणारे कोणी नसते. त्यामुळे पुण्यातील दोन भागात आम्ही सर्वे सुरु केला आहे. नागरी वस्तींमध्ये घरे लहान असतात, काही ठिकाणी पत्र्याची घरे असतात. तेथील स्वयंपाकाची _kumudini_trustसुविधा कशी आहे? याची माहिती घेतली जाते. आधी स्वयंपाक हा चूलीवर किंवा स्टोव्हवर व्हायचा. आता गॅसची सुविधा असते. मग तेथे सिलेंडर, त्याचे कनेक्शन कसे आहे? याची माहिती घेतली जाते. त्याची सुरक्षिता कशी आहे? त्याची तपासणी? कौटुंबिक माहिती, कुटुंबातील कोणती व्यक्ती गॅस वापरते? त्याची सुरक्षित हाताळणी कशी करावी? असा तो प्रश्न-उत्तर सर्व्हे आहे.

दुसरा सर्व्हे सोसायटीमध्ये करत आहोत. अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कोठलीही निवासी इमारत चार मजल्यापेक्षा मोठी असेल तर तेथे त्यांच्याकडे फायर फायटिंगचे सर्व साधन असणे हे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार बिल्डींगमध्ये अशी सुविधा आहे का? त्यांना त्याबाबत माहिती आहे का? त्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स होते का? मोकड्रील होते का?( प्रसंग उद्भवला तर कसे सामोरे जावे हा सराव) अशी प्रश्नावली तयार करून विविध सोसायटीमध्ये जनजागृती करण्याचे उपक्रम ‘कुमुदिनी ट्रस्ट’ तर्फे राबवण्यात येत आहेत.   

‘कुमुदिनी ट्रस्ट’ सध्या पुणे येथे कार्यरत आहे. पण ती चळवळ आम्हाला हळुहळू महाराष्ट्रात आणि मग भारतभर पसरवायची आहे.  

(अधिक माहितीसाठी www.kumudinicharitabletrust.org)

– डॉ. रोहिणी आठवले 9423007913
rohiniathavale@yahoo.com

About Post Author

Previous articleअम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती…
Next articleअसे घडले – सुलभा स्पेशल स्कूल
रोहिणी आठवले पुण्‍यातील 'ज्ञानमित्र अकादमी'च्‍या प्रोपरायटर आहेत. त्‍यांनी मुंबई विद्यापीठातून एम.एसस्‍सी.ची पदवी (प्रथम श्रेणी) मिळवली. त्‍यांनी त्‍यानंतर Plant Tissue Culture या विषयावरील पीएचडी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली. त्‍यांनी 'ज्ञानमित्र अकादमी'मध्‍ये वनस्‍पतीशास्‍त्र हा विषय बारा वर्षे शिकवला. पुढे त्‍या अध्‍यापनाच्‍या कामातून निवृत्‍त झाल्‍या. त्‍या 'समवेदना' या संस्‍थेसोबत २०१६ पासून कार्यरत आहेत. रोहिणी आठवले त्‍या संस्‍थेकरता 'त्‍वचा दान' या विषयावर जनजागृती करण्‍यासाठी प्रयत्‍नशील असतात. लेखकाचा दूरध्वनी 9423007913