शो टाइम :
10 मार्च 2010. किर्लोस्करवाडीमधील विस्तीर्ण मैदान, पाच हजार प्रेक्षक बसतील असा शामियाना, मोठे व्यासपीठ; त्यावर सिनेमाचा मोठा पडदा. शामियान्यामध्ये ठिकठिकाणी स्पीकरची सोय. संध्याकाळचे 7.30 वाजलेले आणि फिल्म्ची सुरुवात होते. एका मध्यंतरासह अडीच तास पाच हजार प्रेक्षक समोरच्या पडद्यावर उलगडणा-या नाटयाचाच एक भाग होऊन गेलेले! फिल्मच्या शेवटी तिरंगा आकाशात डौलाने फडकत असताना टाळयांच्या कडकडाटात, माजी खासदार श्रीनीवास पाटील मोठया आवाजात हाक घालून सुधीर मोघे यांना बोलावतात आणि कडकडून मिठी मारून खास कोल्हापुरी फेटा बांधतात.
व्ही.आय.पी. कक्षातील प्रेक्षकांच्या आणि बाकीच्या गावकऱ्यांच्या डोळयांच्या कडा ओलावलेल्या. अनेकांना आपण राहात असलेल्या गावचा इतिहासच माहीत नसतो. या मातीने काय काय घटना पाहिल्या, किती श्रमिकांचा घाम झेलला, किती आव्हाने पेलली, किती पिढया पोसल्या याचीच चर्चा सर्वत्र चालू झालेली.
आणि आम्ही चित्रपटाचे कर्ते 'चित्रकथी जिंकलो!' या अवस्थेमध्ये.
फ्लॅशबॅक :
बरोबर, एक वर्ष आधी, 1 मार्च 2009 च्या सकाळी सुधीर मोघ्यांचा फोन आला. आपल्याला किर्लोस्करांच्या शतकपूर्ती- नीमित्त फिल्म करायची आहे. आपण वाडीला जात आहोत. वाडी म्हटले की माझ्यासमोर नरसोबाची वाडी येते, कारण दुस-या एका फिल्मसाठी आम्ही रेकी करण्याकरता नरसोबाच्या वाडीला गेलो होतो.
''वाडीचा काय संबंध?'' मी.
''अरे, ती वाडी नाही, ही किर्लोस्करवाडी''- इती मोघे.
मोघ्यांचा जन्म, बालपण आणि वर्षभराची पहिली कोवळी नोकरी वाडीत झाल्यामुळे वाडीचे व त्यांचे संबंध, नातवाचे आजीसमवेत असावेत तसे मऊ जुने-यासारखे आहेत. पुण्याहून वाडीला जाताना, गाडीमध्ये, मोघ्यांनी आख्खी किर्लोस्करवाडी आमच्यासमोर उभी केली!
सोबत, जुना मित्र आणि प्रथितयश छायाचित्रकार देबू देवधर होता.
किर्लोस्करवाडीमधील थ्री स्टार नव्या-को-या गेस्ट हाऊसमध्ये आम्ही सामान टाकले आणि वाडी बघण्यास निघालो.
(कॅमेरामॅन)
– या पार्किंगच्या जागी, पूर्वी किर्लोस्कर प्रेस होता. येथे 'किर्लोस्कर खबर' छापले जात असे. पुढे 'किर्लोस्कर', 'स्त्री', 'मनोहर' या, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील प्रमुख मासिकांचा जन्मही इथलाच. 'विजापुरे' नावाचा मुद्रणाचा टाईपही याच जागेत जन्मला.
(कट)
– ही कार्यालयाची इमारत. शंभर वर्षे मराठी माणसाने यशस्वी व्यवसाय केला, याचा सार्थ अभिमान बाळगणारी.
(कट)
– हे हॉस्पिटल, येथे राधाबाईंनी कामगारांच्या बायकांची बाळंतपणे केली.
(कट)
– ही पाण्याची विहीर.
(कट)
– ही टुमदार दगडी घरे. या नवीन क्वार्टर्स, ही तालीम. हा नवा स्विमिंग पूल, ही शाळा, हे गणपतीचे मंदिर. हे मय्यपाचे देऊळ आणि रस्त्यावर आजही बागडणारे हे मोर. एक ना दोन… अनेक गोष्टी, अनेक आठवणी.
मालक मंडळींच्या बंगल्यामधील चिंचा, बोरे काढताना पडल्यामुळे झालेल्या जखमांचे व्रण विजय जांभेकर शूरविराच्या मेडलप्रमाणे दाखवत होता!
(फेड इन्)
– रेल्वे लाईनला समांतर उभी कारखान्याची इमारत आणि त्याच्या काटकोनात वसलेले टुमदार गाव. दादरच्या शिवाजी पार्कात मावेल एवढेच! पण कर्तृत्वाने आणि लौकिकाने आंतरराष्ट्रीय नकाशावर गेलेले. जगातील पहिल्या पाच पंप नीर्मिती कंपन्यांमध्ये समावेश असलेले. शूटिंगच्या दरम्यान, आम्ही एक प्रचंड पंप शूट केला. चार मजली इमारतीएवढा! त्याची मोटार सुरू करण्यासाठी कारखाना लंच टाईमला बंद करून आजुबाजूच्या पन्नास गावांतील वीज तोडून पॉवर घ्यावी लागत असे!
त्याने फेकलेले पाणी त्सुनामीच्या लाटेसारखे उसळत येत असे. अमेरिकेमधील अणू ऊर्जा प्रकल्पासाठी तो बांधला गेला होता.
(कट्)
– हे झाले वर्तमान! पण आम्हाला शंभर वर्षांचा, किंबहुना त्या आधीपासूनचा इतिहास चित्रित करायचा होता. त्यासाठी या माळरानावर लक्ष्मणराव किर्लोस्कर येण्याआधीपासून असलेले आणि पारंब्याच्या जटा झालेले वड आणि पिंपळ यांनाच बोलते करावे लागले असते! या वडा-पिंपळांच्या बरोबरीने या माळावर वडार समाजाच्या 'मय्यपा' देवाचे देऊळ आहे. आजही वाडीला जाग या देळातील काकड आरतीने येते. ढोल आणि झांजांच्या आवाजाबरोबर आरतीच्या सुरात कारखान्याचा भोंगाही आवाज मिसळतो. हा शंभर वर्षांचा इतिहास येथे राहणा-या, काम केलेल्या, नीवृत्त झालेल्या किंवा आज कार्यरत असलेल्या गुणवंत कामगारांच्या तोंडून वदवून घ्यावा म्हणून आम्ही 90 ते 70, 70 ते 50, 50 ते 30 अशा वयोगटांतील माणसे शोधू लागलो. कोणीतरी सांगितले, की या मय्यपाच्या देवळाचा म्हातारा पुजारी रोज पहाटे जवळच्या गावाहून एस्.टी.ने येतो आणि काकड आरती करून जातो. त्याला गाठायचे ठरवले.
(कट्)
– म्हाता-या पुजा-यांचे खेडयातील झोपडीवजा घर. म्हाता-याला ऐकू कमी येत होते. म्हणून त्याच्या कानात ओरडून म्हणालो, ''किर्लोस्कर कंपनी आहे ना! तिला शंभर वर्षं झाली म्हणून फिल्म् करतोय, तुम्ही तुमच्या आठवणी सांगा.''
म्हातारा म्हणाला, ''कंपनीला शंभर वर्षं झाली! म्हणजे मी कंपनीपेक्षा मोठा आहे, वयानं. कारण कंपनीच्या इमारतीचे दगड मी स्वत: हातानं फोडले आहेत!''
आमचा फुटबॉल झालेला!
म्हाता-याने खणखणीत आवाजात सांगितले, ''मय्यपाच्या देवळात धोंडी महाराज म्हणून सत्पुरूष येऊन बसत असत. त्यांनी सांगितलं होतं, 'या माळरानावर दिवसा दिवे लागतील!' झाला की नाही महाराजाचा शबुत खरा? लागत्यात की नाही कंपनीत दिवसा दिवे?''
आमच्या कॅमे-यासमोर एकशेआठ वर्षांचा काळच साक्षात बोलत होता!
– लक्ष्मणराव आणि राधाबाईंना उगवती-मावळतीचे देव म्हणून हात जोडणारी म्हातारी भेटली.
– भटा-ब्राह्मणांच्या घराशेजारी एकाच आळीत राहणारी म्हातारी 'वाडीमध्ये जातीपातीचे, नाटक न्हवते, समदे घराच्या वाणी' म्हणून अभिमानाने पदर सावरत सांगत होती.
– दंडाला धरून, दंडाची बेटकुळी बघून 'तू उद्यापासून 'फॉउण्ड्री'मध्ये कामाला ये' असे म्हणून लक्ष्मणरावांनी घेतलेला इन्टरव्ह्यू; एक कामगार हसत हसत सांगत होता.
– 'आमची चौथी पिढी कारखान्यात कामाला आहे. आमच्या घराचे अन्नदाते आहेत मालक' म्हणून डोळंयाला रूमाल लावणारे अनेक भेटले.
– औंधच्या महाराजांनी जमीन दिल्यानंतर लक्ष्मणरावांनी त्यांच्याकडे आणखी एक मागणी केली. 'खतरनाक दरोडेखोर पि-या मांग ताब्यात द्या. मी त्याला कारखान्याचा सुरक्षा प्रमुख करतो' म्हणाले.
'हे म्हणजे चोराच्या हाती खजिन्याच्या किल्ल्या देण्यासारखे' असे म्हणत महाराजांनी लक्ष्मणरावांवर विश्वास दाखवला व पि-या मांगाची सुटका केली. जगप्रसिध्द झालेल्या 'दो ऑंखे बारह हाथ' चित्रपटाचा खराखुरा प्रयोग वाडीत सादर झाला!
असे प्रसंग आम्ही नाटयरूपाने चित्रित करत होतो. एकूण, हे प्रोजेक्ट 'डॉक्युफिचर' या कॅटेगरीत मोडणारे होणार होते.
(कट्)
– एके दिवशी, किर्लोस्करांना कर्नाटकामधून त्यांच्या कारखान्यासकट बाहेर काढले. ते गाव, ते ठिकाण बघावे म्हणून आम्ही बेळगावला पोचलो. तिथे सायकलचे पहिले दुकान, त्याची पहिली जाहिरात, एवढेच काय पहिल्या काही सायकल चालवणा-या महिलांपैकी श्रीमती कित्तुर, वय वर्षे 84, याही बोलत्या झाल्या.
(कट्)
धारवाडपासून तीस किलोमीटरवर असणा-या सौंधत्तीजवळील गुलहौसूर हे पाण्याखाली गेलेले गाव किर्लोस्करांचे मूळ गाव, आम्ही बघण्याचे ठरवले. तो अनुभव रोमांचकारी होता. बेळगावचे पेंटिंगचा कॅनव्हास बनवणारे हरहुन्नरी उपाध्याय आणि आर्किटेक्ट मोरे आमच्या सोबतीला होते. सौधत्तीच्या पोलिस एस्.पी.ने मार्ग दाखवण्यासाठी वाटेवर एक शिपाई उभा केला होता. आम्ही गावातून वळणावळणाने धरणाच्या बॅक वॉटरकडे नीघालो. धरणाच्या बॅक वॉटरखाली आख्खे गुलहौसुर गाव बुडाले होते, तेव्हा फक्त पाणी पाहवे लागणार, त्यात चित्रित करण्यायोग्य काय मिळणार या चिंतेत आम्ही असताना, एका वळणानंतर पाण्यातून वर आलेली मंदिरांची दोन शिखरे दिसली आणि आम्हाला अक्षरश: देव पावल्याप्रमाणे वाटले.
उन्हातला एवढ्या लांबचा प्रवास कारणी लागला. मे महिन्यात पाण्याची पातळी खाली गेल्यावर शूट करू म्हणून आम्ही पुढच्या फेरीत आलो तेव्हा पूर्वी पाण्याखाली लपलेली मंदिरातील विष्णूची मूर्तीही दिसू लागली होती!
(फेड इन)
– पण किर्लोस्कर हे नाव पडले कसे? याचा विचार करता करता शोध लागला, कणकवलीजवळील 'किर्लोस' गावाचा. तीस-चाळीस घरांचा टुमदार गाव. सगळे किर्लोस्कर इथले! येथे लक्ष्मणरावांच्या घराचा फक्त दगडी चौथरा उरलेला आहे, तोही पालापाचोळयाचे रान झाडून आम्ही शूट केला. कोण म्हणते, ऋषीचे कुळ शोधू नये म्हणून? त्यातही थरार असतोच की, आणि असा आधुनीक ऋषी! ज्याने महाराष्ट्रात औद्योगिकीकरणांची मुहूर्तमेढ रोवली.
– नुसता कारखाना नव्हे, आख्खे गाव तेथील माणसांसकट उभे करणे, तेही शंभर वर्षांपूर्वींचे, हे छोटे काम नव्हते. पण मोठया कामात मोठी माणसे एकत्र येतात. वाडीच्या इतिहासात अशी माणसे आली. कर्मवीर भाऊराव पाटील इथे कामाला होते. काच कारखाना काढणारे ओगले इथलेच. नाटक-सिनेमांत नावाजलेला श्रीकांत मोघे इथलाच. क्रिकेटचे मैदान गाजवणारा चाबुकस्वार आणि विठ्ठल जोशी याच मैदानात खेळले. नंदू नाटेकर इथे सराव करत असत. पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण येथे आलेले.
स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक क्रांतिकारक इंग्रजी फौजांकडून अटक टाळण्यासाठी औंध संस्थानाच्या नीवा-याला हमखास येत असत. वाडी त्याच औंध संस्थानात वसले.
(लाँग शॉट)
– महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचा आगडोंब उसळला. 'बामनाची कंपनी' म्हणून रात्री मशाली घेऊन जमाव कारखान्यावर चालून आला. या दृश्याच्या चित्रिकरणासाठी दीड-दोनशे कामगार खास गांधी टोप्या घालून पांढरे सदरे-लेंगे, धोतर अशा वेषात हजर झाले. हातात पेटत्या मशाली. एका शॉटमध्ये सारा प्रसंग चित्रित करायचा होता. शंकरराव किर्लोस्कर चालून येणा-या जमावाला सामोरे जातात आणि म्हणतात, ''आम्ही कर्नाटकातून इथे आलो. कारखाना जाळलात तर इथून दुसरीकडे जाऊ. आमचे काही बिघडणार नाही. पण तुमच्या घरांचे कसे होईल? मुलाबाळांची पोटे कोण भरणार? द्या मला तो पलिता! मी स्वत: आग लावतो कारखान्याला!''
रागाने थरथरणा-या जमावाला सामोरे जाणे आणि आपल्या बोलण्याने परत पाठवणे हे येरागबाळयाचे काम नाही.
शंकररावांच्या या बोलण्याने, आलेला जमाव माना खाली घालून परत गेला.
मोठा सीन, मोठा मॉब, बरेच लायटिंग, बरोबर टायमिंग जमणे. देबू कॅमे-यासोबत उंच क्रेनवर बसलेला. एकमेकांचे बोलणे मॉबच्या आवाजात ऐकू येणे कठीण. अशा परिस्थितीमध्ये 'ऍक्शन'च्या ऑर्डरवर मॉब घोषणा देत कारखान्याच्या दारावर चालून आला, तेव्हा हा भाग चित्रिकरणाचा आहे हे माहीत असूनसुध्दा अंगावर काटा उभा राहिला! कारखान्याचा बंद दरवाजा जमावाच्या जोराने उघडला तर हाहाकार होईल असे सतत वाटत राहिले.
प्रत्यक्ष प्रसंगाला सामोरे जाणारे शंकरराव प्रत्येकाच्या मनात हिरो झाले होते!
(फेड् इन्)
लहानमोठे सीन नाटयरूपाने सादर करण्यासाठी नट मंडळी शोधणे चालू होते. कास्टिंग डोक्यात असले म्हणजे समोर येणा-या प्रत्येक व्यक्तीला आपण आपल्या डोळयांसमोरील व्यक्तिरेखेशी पडताळून बघतो. मोठया (वयस्कर) लक्ष्मणरावांसाठी अरूण नलावडे नक्की झाला होता, पण तरुणपणीचे लक्ष्मणराव; लहानपणीचे-शाळेतील! तसेच, तरूण व वृध्द राधाबाई; तरूण शंतनुराव, तरूण यमुताई, रामुअण्णा, औंधचे महाराज, गिंडे सावकार, शाळा मास्तर, असे अनेक चेहरे हवे होते आणि आश्चर्य म्हणजे ही माणसे वाडीमध्येच भेटू लागली. काही चेहरे युनीटमध्ये सापडले. पि-या मांग कारखान्यातील कामगारांत मिळाला.
कास्टिंगचे भूत डोक्यात घेऊन फिरणे मजेशीर असते. काही चेहरे, व्यक्तिरेखा सहज समोर येतात, तर काही शेवटच्या क्षणापर्यंत मिळत नाहीत आणि अचानक सापडतात. कवितेची ओळ सहज स्फुरावी, त्याप्रमाणे!
आमच्यासाठी कास्टिंगचे टेन्शन नव्हते. कारण आम्ही कारखान्याच्या 'कास्टिंग डिपार्टमेण्ट'मध्येच फिरत होतो ना! (हा युनीटमधला विनोद)
(कट्)
शूटिंगसाठी प्रॉपर्टी लागते, ती सर्व तकलादू सामानाची असते आणि तशीच ती पाहण्याची आमची सवय. पण इथे वाडीमध्ये सर्व काही मजबूत. तुरूंगाचे गजाचे दरवाजे हवे आहेत म्हटल्यावर दुस-याच दिवशी दीड इंची व्यासाचे लोखंडी गजाचे दरवाजे चक्क हजर! ते उचलून ठेवायला चार माणसे लागायची. वाडीमध्ये लोखंडाला काय तोटा! लाकूड मिळणेच अवघड.
नाही, नाही म्हणता किर्लोस्करवाडी, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, धारवाड, बेळगाव, गुलहौसुर, कणकवली, किर्लोस, मुंबई असे, वर्षभरात अनेक प्रवास व शुटिंग झाले. एकूण अडतीस तासांपेक्षा जास्त शुटिंग हाती लागले. सर्व ऐवज इतिहास म्हणून जतन करण्यासारखा आहे. असे डॉक्युमेंटेशन होणे जरूरीचे होते. आपल्याकडे असे डॉक्युमेंटेशनचे भान नाही हे दुर्दैव आहे. पण या नीमित्ताने असे वेगळे काम झाल्याचे समाधान मोठे आहे. त्या अडतीस तासांमधून अडीच तास काढून लोकांसमोर ठेवले. लोकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. तरी आमच्या मनामध्ये पूर्ण वर्षभराचा प्रवास, अनुभव, आनंद आणि समाधान अनेक वर्षे ताजाच राहील.
– रघुवीर कुल
9930023299