काळी-गोरी, सुंदर-कुरूप…

हिनाकौसर खान

सभोवताली आढळणा-या तथाकथीत पुरूषी संस्‍कृतीत बाईचे ‘बाईपण’ पुसले जात नाही. ‘स्‍त्री – पुरूष’ समानता वगैरे शब्दिक वल्‍गना अनेकांकडून केल्‍या जातात. मात्र समाजाच्‍या मानसिकतेत फरक पडत नाही. अनेक मुली, महिला कॉन्‍स्‍टेबल किंवा तत्‍सम जबाबदार पदांवर कार्यरत असतात. मात्र त्‍या सार्वजनिक ठिकाणी आल्‍या की लोकांच्‍या नजरांना त्‍यातली ‘बाईच’ दिसते. ही मानसिकताच स्‍त्रीसाठी सार्वजनिक जीवनात असुरक्षीतता वाढवण्‍यास कारणीभूत असते. काळी-गोरी, सुंदर-कुरूप… कशीही असली तरी ती बाई आहे एवढं पुरुषांना पुरेसं असतं. ही भावना जितकी घाणेरडी असते तितकीच मनस्ताप देणारीही असते.

हिनाकौसर खान

रात्री साडेनऊ वाजता ऑफिसमधून बाहेर पडले. मनपाच्या स्टॉपवर घाईत पोचले. निघण्याआधी, बाबांना ऑफिसमधून बाहेर पडल्याची कल्पना देण्यासाठी मिसकॉल केला होता. स्टॉपवर पोचले तर कधी नव्हे ती बरीच गर्दी होती. गर्दीचं कारण कळत नव्हतं आणि कोणाला तसं विचारावंसंही वाटतं नव्हतं. पावणेदहाची बस आलीच नाही. पाहता पाहता, दहा वाजले. दहा एक, दोन, पाच, सात…मिनिटं वाढू लागली तसे हृदयाचे ठोके वाढू लागले. बस येईच ना! कोणतीही…कुठल्याच मार्गासाठीची.
 

त्यानंतर, एक रिक्षावाला माझ्यासमोर एकदम थांबत ‘स्वारगेट’ असं ओरडू लागला. रिक्षात दोन मनुष्य बसलेले होते. एकदम, घडलेल्या या प्रकारनं मी थोडी बिचकले आणि मागे सरकले. त्यानंतर, त्यानं मला बस बंद झाल्याची माहिती दिली. पाऊस पडून गेला होता. त्यामुळे रस्ता ओलाचिंब होता. आकाशात ढग अजूनही होते, त्यामुळे रस्त्यावर अंधार अधिकच गर्द झाला. गूढता वाटायला लागली. त्यातच कॉर्पोरेशनचा अंधारलेला स्टॉप. रस्ता बंद? का? कळेनासं झालं. बंदच्या कल्पनेनं मी स्तब्धच झाले. काहीच सुचलं नाही, दोन क्षण. सव्वादहा झाले. रात्रीचा अंधार प्रकर्षानं जाणवला. रिक्षावाल्याचं ओरडणं, दरडावणं, रस्ता बंद असल्याची माहिती… सगळाच भास वाटू लागलं. गर्दी पांगायला लागली, तशी मीही फिरकले. रस्ता ओलांडला. पुलावरून खाली उतरायचं म्हणून मी पायर्‍यांपाशी आले. तिथल्या अंधारात एकदम खूप सार्‍या मुली दिसल्या. तोंडाला घट्ट रुमाल बांधलेल्या..बहुतेक वस्तीतल्या. त्यांचा घोळका पाहून खूप भीती वाटली. ‘आपल्यालाही त्यांच्यातील समजतील’ या ‘सुसंस्कृत’पणासाठी ही भीती होती. तशीच धावत पायर्‍या उतरू लागले.
 

तितक्यात एका बाईंशी नजरानजर झाली. चेहर्‍यावर प्रचंड मेकअप होता. ती माझ्या भांबावलेल्या अवस्थेला पाहून नुसतीच हसली. स्वत:वर किंवा कदाचित व्यवस्थेवर. आपल्या चेहर्‍यावर स्कार्फ असतानाही रस्त्यावरचे सगळे पुरुष रात्रीच्या या वेळेला आपल्याकडे का पाहतात याचं कारण तेव्हा कळलं. त्याही क्षणाला अशाच काही नजरा पाठलाग करू लागल्या. कसले कसले प्रश्न! नजरा… सगळं घाण वाटावी असं. त्या सगळ्या भीतीसह खाली उतरले. काय करावं हे सुचत नव्हतंच. घरची आठवण तीव्र झाली. एकदम निराश आणि तणावग्रस्त वाटलं. वेगानं ‘बालगंधर्व’पर्यंत उलट चालत आले. अगदी सुसाट चालत-धावत. त्या क्षणी काय वेग होता याची कल्पनाही करवत नाही. मागून बारा नंबर अप्पर-निगडी बस येताना पाहिली आणि आणखी वेगानं धावत सुटले. मागून बसवाला हॉर्न वाजवत होता, पण मला त्याच्या आधी स्टॉपवर पोचायचं होतं. बसमध्ये चढले तेव्हा पायाच्या पोटर्‍या एकदम भरून आल्या. पाय दुखण्याची जाणीव झाली. घरी आल्यावर ‘सुरक्षा’ या शब्दाची जाणीव खोलवर आतपर्यंत पोचली. त्या क्षणी, मी खूप भांबावले होते, पण ‘त्या’ बायकांमुळे जास्त चक्रावले होते. बाई असल्याच्या नुकसानीची जाणीव अधोरेखित झाली होती. काळी-गोरी, सुंदर-कुरूप… कशीही असली तरी बाई आहे एवढं पुरुषांना पुरेसं असतं ही भावना जितकी घाणेरडी होती तितकीच मनस्ताप देणारी….!
 

हिनाकौसर खान, 9850308200 ,  greenheena@gmail.com 

हिनाकौसर खान यांचे इतर लेखन

मला तुझ्याशी मैत्री करायचीय!!!

धुआँ उडाताही चला……….

About Post Author

Previous articleआधी पाया; मगच कळस!
Next articleडॉल्बीचा दणदणाट
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200