कवितेची भाषा

0
167

mangesh_padgaonkar_hp मंगेश पाडगांवकर यांचे ‘शोध कवितेचा’ नावाचे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनातर्फे अलिकडेच प्रसिद्ध झाले आहे. अस्मिता मोहिते व संगीता बापट यांनी त्याचे संपादन केले आहे. त्या पुस्तकातील तीन वेगवेगळी उद्धृते पुढे दिली आहेत. त्यामधून भाषा किती काळजीपूर्वक वापरावी लागते हे कळून येईल; त्याचबरोबर भाषेचे सामर्थ्यंही ध्यानात येईल.

मंगेश पाडगांवकर यांची उद्धृते
मंगेश पाडगांवकर यांचे ‘शोध कवितेचा’ नावाचे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनातर्फे अलिकडेच प्रसिद्ध झाले आहे. अस्मिता मोहिते व संगीता बापट यांनी त्याचे संपादन केले आहे. त्या पुस्तकातील तीन वेगवेगळी उद्धृते पुढे दिली आहेत. त्यामधून भाषा किती काळजीपूर्वक वापरावी लागते हे कळून येईल; त्याचबरोबर भाषेचे सामर्थ्यंही ध्यानात येईल.

साहित्य भाषेतून व्यक्त होते. प्रत्येक माणूस उठल्यापासून झोपेपर्यंत भाषेतूनच आपला व्यवहार करतो. म्हणजे, ज्याला भाषा येते त्याला साहित्य लिहायला यायला काहीच हरकत नाही असा गैरसमज बर्‍याच लोकांचा झालेला असतो. ज्या भाषेत आपण आपले दैनंदिन व्यवहार करतो त्याच भाषेत साहित्याची निर्मिती केली जाते, हे विधान वरवर पाहता खरे वाटत असले तरी ते खरे नाही. व्यवहारात जी भाषा आपण वापरतो ती साधनरूप असते. जे सांगायचे आहे ते कळले, की ते सांगणारे वाक्य उरत नाही, त्याचे कार्य संपल्यामुळे ते वाक्य कायमचे संपते. पण साहित्यातील कलाकृती निर्माण करणारी भाषा अशी साधनरूप असत नाही. त्या भाषेची पातळी वेगळी असते — ती व्यवहारोपयोगी साधन नसून कलाकृतीचे माध्यम बनलेली असते. “आनंदी आनंद गडे, इकडे, तिकडे, चोहिकडे” या ओळीचा ‘अर्थ’ समजला, की ती ओळ गळून पडली असे होऊच शकत नाही. या शब्दांशी कलात्मक अनुभव एकात्म, एकजीव असतो. हे शब्द आणि अनुभव यांचा प्रत्यय केव्हाही एकाच वेळी घ्यावा लागतो आणि म्हणूनच नानाविध मानवी अनुभवांच्या संदर्भात भाषेच्या नवनव्या सर्जनशक्ती शोधणे हे लेखक–कवींपुढील आव्हान असते. वाचन, चिंतन, मनन, सतत शोधणे, जीवन आणि भाषेच्या शक्ती यांच्याविषयीचे अपार कुतूहल यांच्या साहाय्याने आपण आपला विकास घडवत आहोत की नाही याविषयी नवोदित लेखकांनी सतत जागृत राहायला हवे. त्यासाठी कष्ट घ्यायला हवे. कष्ट हा शब्द मी वापरला खरा, पण आवडीचे काम करताना कष्ट कधीच जाणवत नाही. आनंदाने गाणे गुणगुणताना कष्ट होत नाहीत. तसेच इथे आहे. पण कष्टांचे गाणे करणारी अशी खोल, उत्कट आवड असायला हवी. भाषा येते म्हणजे कविता लिहिण्याचा परवाना आहे ही मठ्ठ समजूत इथे उपयोगी नाही. कवितेच्या सर्जनशील भाषेचा सतत नव्याने शोध घ्यावा लागतो, ती एक साधना आहे याची जाणीव नवोदितांनी ठेवली पाहिजे.

 X —————————— X ———————————- X

 कवितेच्या निर्मितीला दोन बाजू असतात : नानाविध सुखदु:खांतला, अनुभवांतला माणूस समजून घेणे ही झाली या निर्मितीची एक बाजू; आणि सर्जनशक्तीचा शोध घेणे ही या निर्मितीची दुसरी बाजू. या दोन्ही बाजू अखेर व्यक्त होतात भाषेतून. भाषेची प्रामाणिकता कसल्याही दडपणाला न भिता जीवनाला भिडण्यात असते आणि म्हणूनच, श्लील-अश्लिल, योग्यायोग्य, नैतिक-अनैतिक हे रूढ लौकिक संकेत कवीला बांधू शकत नाहीत. कविता शब्द स्वीकारते तो या लौकिक संकेतांची त्याला मान्यता आहे म्हणून नव्हे;  कविता शब्द स्वीकारते तो जीवनाला भिडत असेल तरच. कवितेची निर्मिती करत असताना कवी या प्रकियेतून कसा जातो हे कळण्यासाठी मी माझ्या दोन कवितांचे उदाहरण इथे आपल्यासमोर सादर करतो. या दोन्ही कविता ‘गझल ’ आहेत. पहिली कविता अशी आहे :

डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी,

त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी!

कामात गुंतलेले असतील हात दोन्ही

तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी !

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती,

ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी !

कळणार हाय नाही दुनिया तुला मलाही,

मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी!

mangesh_padgaonkar_02  ही कविता लिहिल्यानंतर एक नवा अनुभव कवितेतून व्यक्त होण्यासाठी माझ्या मनात येऊन उभा राहिला. तो अनुभव मला म्हणाला, “डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी हा तुझा गझल मला फार आवडला. मलाही गझल व्हायचे आहे. तू मला गझलचा आकार दे.” मी त्याला म्हणालो, “मला कबूल आहे. एक गझल लिहिला की तशीच रचना पुन्हा पुन्हा गिरवून नवा गझल म्हणून पेश करणे अगदी सोपे आहे!” हे ऐकून तो अनुभव मला म्हणाला, “मला गझल व्हायचे आहे हे अगदी खरे, पण मी मला आवडला असे म्हटले तसला गझल मला व्हायचे नाही! जो गझल मला व्हायचे आहे त्यातून माझा चेहरा, माझे व्यक्तिमत्त्व, माझा आत्मा व्यक्त झालेला मला हवा आहे. तू मला एकदा नीट न्याहाळ.” चकित होऊन मी त्या अनुभवाकडे तल्लीनतेने पाहू लागलो. कोणता अनुभव होता तो?  कुठल्याशा हिंदी सिनेमातले “चोली के पीछे क्या है” हे गाणे त्या काळात गाजत होते. एखादा टारगट तरुण पोरगा तरुण पोरीजवळून जाऊ लागल्या की ते गाणे गुणगुणायचा!  समजा, आपला देह विकून जगणार्‍या पथवेश्येला उद्देशून एखाद्या तरुणाने हे गाणं म्हटले! ती बाई पथवेश्या असली तरी मुळात ती स्त्री आहे. परिस्थितीने तिच्या आयुष्याचे विडंबन केले आहे. तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करणारी ही थट्टा तिला असह्य झाली तर ती काय उत्तर देईल? हा तो अनुभव होता आणि त्याला गझल व्हायचे होते, पण त्याला त्याचा चेहरा–त्याचा आकार हवा होता! मला तो चेहरा दिसला आणि मी आतून हललो. त्या क्षणी मी त्या अनुभवाला गझलचे रूप दिले ते असे :

चोळी के पीछे कहू मी काय आहे ?

ऐक रे भडव्या तुझी मी माय आहे !

सूज आलेल्या स्तनांना त्राण नाही,

पेटली पोटी भुकेची खाय आहे!

हातभट्टी झोकल्या बारा जणांनी

रात्रभर मी तुडवलेली गाय आहे!

पोलिसांनी घेतले मोजून अर्धे,

कुंटिणीला रोजची मी साय आहे!

चुनरिके नीचे कहू मी काय आहे?

क्रूर दैवाचा अघोरी घाय आहे!

 हा गझल लिहिताना सभ्य-असभ्य, श्लील-अश्लील, नैतिक-अनैतिक असले शब्दांविषयचे कुठलेही संकेत मला अडवू शकले नाहीत. या कवितेतला प्रत्येक शब्द आयुष्याला, आयुष्याच्या वेदनेला भिडत होता — आणि म्हणूनच, खर्‍या अर्थाने शब्द होता. शब्द असे आयुष्याला भिडतात तेव्हा शिवी आणि ओवी यांत फरक राहत नाही! कवितेतले शब्द सांकेतिक सभ्यतेचा नव्हे, माणसाचा शोध घेत असतात. “कोलाहलात सार्‍या माणूस शोधतो मी/ गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी/ हे धर्म, देवळे ही धुंडून सर्व आलो / भिंतीपल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी” असे म्हणत कवितेचे शब्द अनुभूतीच्या प्रवासाला निघतात.

X——————————-X—————————–X

 नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा साहित्याच्या निर्मितीला दोन बाजू असतात. नानाविध अनुभवांतला माणूस समजून घेणे ही झाली या निर्मितीची एक बाजू आणि समजलेला–जाणवलेला माणूस भाषेच्या नव्या नव्या सर्जनशक्तींचा शोध घेत व्यक्त करणे ही झाली या निर्मितीची दुसरी बाजू. इथे भाषा ही उपयोग संपला की फेकून देण्याचे साधन नसते. इथे भाषा ही कलानिर्मितीचे सर्जनशील माध्यम असते.

इथे साधन आणि माध्यम यांच्यातला फरक ध्यानात घ्यायला हवा. समजा, आंब्याचे झाड आहे. काही आंबे उत्तम पिकले आहेत. तिथे गेलेला माणूस छोटा दगड उचलतो आणि नेम धरुन पिकलेला आंबा खाली पा़डतो. पिकलेला तो आंबा हातात आल्यावर तो पाडण्यासाठी साधन म्हणून ज्या दगडाचा त्याने उपयोग केला त्या दगडाशी त्याचा काहीही संबंध उरत नाही. तो दगड कुठे जाऊन पडला हे त्याला ठाऊक असण्याचे कारणच उरत नाही.
त्याच आंब्याच्या झाड़ाखाली मोठा दग़ड आहे. तिथे प्रतिभाशाली मूर्तीकार येतो. त्या दगडातून तो सुंदर मूर्ती निर्माण करतो. इथे दगडाचा उपयोग संपला, द्या तो कुठेही फेकून असे होऊ शकत नाही. दगड आणि ती कलात्मक मूर्ती एकात्म, एकरूप होतात. इथे दगड हे साधन न होता सर्जनशील माध्यम होते.
‘मला तुम्ही भेटलात. खूप आनंद झाला’ हे वाक्य तुम्ही माझ्याशी बोलता आणि या वाक्याचा उपयोग संपतो. पण बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे’ या ओळीचा अर्थ कळल्यावर तिचा उपयोग संपला असे होत नाही. ती ओळ पुन्हा पुन्हा, पिढ्यान् पिढ्या तुम्ही गुणगुणता. तेथे शब्दांची रचना हे साधन नाही. ते कलासौंदर्याच्या निर्मितीचे माध्यम आहे. साधन म्हणून जिचा दैनंदिन वापर होत असतो अशी भाषा सर्जनशील माध्यमाच्या पातळीवर नेणे हीच लेखकाची–कवीची साधना असते.
संबंधित लेख –

शोध घ्या, मराठी भाषेचा…मराठी मनाचा: पाडगांवकर

कवितेचं नामशेष होत जाणं…

‘शहरयार’ आणि सुखद योगायोग!

{jcomments on}

About Post Author