एका दिग्दर्शकाची हुकूमत!

0
75

दिनकर गांगल  

mani kaul  मणी कौलचे निधन आकस्मिक नव्हते. गेली काही वर्षे तो कॅन्सरने आजारी होता. परंतु गेल्या दशक-दोन दशकांत तो प्रकाशातही नव्हता. अनेक प्रयोगशील दिग्दर्शकांनी मुंबईत राहून 1965 नंतर मराठी रसिकजनांवर मोठा प्रभाव टाकला. त्यामुळे ते जरी वेगवेगळ्या प्रदेशांमधून आले होते. तरी त्यांना मराठी जीवनाबद्दल आस्था होती आणि मराठी जनांनाही त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटे. कुमृद मेहता, विजय तेडुंलकर यांच्यासारखी जाणकार मंडळी हा त्यांना मोठा आधार असे. अशाच वातावरणामधून पुढे जब्बार पटेल, अमोल पालेकर असे मराठी चित्रपट दिग्दर्शक घडत गेले. या सर्वांमध्येही मणी कौल अगदी वेगळा होता…..


दिनकर गांगल

     मणी कौल गेली दोन-अडीच दशके प्रकाशात नव्हता; त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा एकदम 1965 ते 1985 हा काळ नजरेसमोर उभा रहिला- तो आमच्या पिढीसाठी काही घडण्या-घडवण्याचा काळ होता. त्याच काळात समांतर सिनेमा, कलात्मक सिनेमा, नवा प्रवाह अशा वेगवेगळ्या नावांनी भारतीय चित्रपटसृष्टीत नवे वारे आले. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षित झालेले अथवा सत्यजित राय यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडून स्फुरण घेतलेले चित्रपटकर्ते पुढे आले. नव्या जाणिवांच्या शोधात असलेल्या प्रेक्षकांनी नव्या माध्यमातील या नव्या प्रयोगांचे उत्साहाने स्वागत केले. या प्रेक्षकांमधला मी होतो आणि मणी कौल चित्रपटकर्त्यांमध्ये होता. आमचे हे नाते पाच-सात वर्षे छान फुलत गेले. मी कधी त्याच्याकडे, त्याच्या पेडररोडमागच्या घरी (तेंडुलकरांबरोबर) गेलो; तो कधी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये माझ्याकडे, माझ्या टेबलासमोर येऊन बसत असे. त्याचे ते कमालीच्या निर्मितीचे दिवस होते, खूप धडपड असे.

     आम्हाला नव्या  लाटेतल्या सगळ्या दिग्दर्शकांच्या सगळ्याच कृतींबंद्दल औत्सुक्य असे, आस्थाही वाटे. पण त्यांच्यातदेखील मणी कौल वेगळा होता, स्वंयपूर्ण होता. त्याच्या डोक्यात त्या त्या काळात जे विश्व असेल त्यापलीकडे तो फार संबंधित नसे; तो त्या प्रकारची कदर तर कोणाचीच करत नसे. कलावंताची मस्ती त्याच्यात जाणवे. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्याचे शिक्षक होते ऋत्विक घटक. घटक यांचे सिनेमा पाहणे आणि त्यांचे अर्थ लावणे ही आम्हा प्रेक्षकांची हौस. निर्मिती-आस्वाद हे सारे प्रयोगच होते असा तो काळ. त्या काळावर समाजवादी व डाव्या वृत्तीचा प्रभाव होता. तो आस्वाद-समीक्षेतदेखील जाणवे.

     पण मणी कौल सौंदर्यवादी होता. तो चित्रकारच व्हायचा, पण तो ज्या काळात जन्मला वाढला त्या काळाचे आकर्षक माध्यम होते सिनेमाचे आणि त्याने ते स्वेच्छेने स्वीकारले होते.  मणी कौलची स्वत:ची हुकूमत कथाबीजापासून कॅमेरावर्कपर्यंत, निर्मितीच्या प्रत्येक घटकावर असे आणि त्याच्यात त्याची स्वत:ची छाप त्या प्रत्येक ठिकाणी टाकण्याची हिंमत होती. त्याच्या या गुणांचा परमोत्कर्ष ‘दुविधा’मध्ये झालेला दिसेल.

     ‘दुविधा’मधील फ्रेम न फ्रेम कमालीची सुंदर होती- एकेक चित्रकृतीच जणू! आणि तरीही त्या प्रत्येक फ्रेमचे एकूण कथावस्तूशी एकात्म नाते होते. त्यामुळे चित्रपट अतिशय आकर्षकतेने उलगडत जातो आणि प्रेक्षकाला वेधकतेने बांधून ठेवतो. ‘उस की रोटी’, ‘आषाढ का एक दिन’ या त्याच्या आधीच्या चित्रपटांमध्ये त्याची जी संथ शैली कंटाळवाणी वाटत होती तीच येथे संथगतीत वेगवान बनून गेली होती. ही विसंगती खरी, परंतु तोच तर त्या कथावस्तूचा प्राण होता. पात्रांना दिलेली संवादोच्चाराची विशिष्ट एकसूरी ढब- तिला गोडवा आहे, परंतु ती निर्लेप आणि कथेची गूढता गडद करत जाणारी आहे. एक कलावंत म्हणून मणी कौल या चित्रपटात लय-ताल सांभाळतो आणि काल-अवकाशाचे भान अचूक जपतो.

     म्हणूनच, ‘दुविधा’नंतर सत्यजित राय म्हणाले, की ‘मणी कौल याची स्वत:ची चित्रपटनिर्मितीची शैली आहे आणि ती त्याची त्याने निर्माण केलेली आहे हे विशेष’. ‘केवळ प्रयोगाच्या पातळीवर मणी कौल हे राय यांच्या इतक्याच महत्त्वाचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक ठरतात’ हे श्याम बेनेगल यांचे म्हणणेदेखील त्याच संदर्भार महत्त्वाचे ठरते.

     मणी कौल हा खूपच विचारी व आत्ममग्न माणूस होता. त्याची स्वत:ची दिग्दर्शन शैली ‘उस की रोटी’, ‘आषाढ का एक दिन’ या त्याच्या पहिल्या चित्रपटांत व्यक्त झाली, परंतु ती एक प्रायोगिक चूष म्हणून त्याकडे पाहिले गेले. खरोखरीच, ती प्रायोगिक स्तरावर होती. ‘दुविधा’त मात्र त्याने आपली शैली परिपूर्णतेला नेली. पुढे, त्याने ‘सिध्देश्वरी’, ध्रुपद’ यांसारखे माहितीपट निर्माण केले- त्यामध्येही त्याचे प्रेक्षकांशी संवादी अवधान प्रकट होते. एरवी, तो स्वतासाठी स्वत:च्या मस्तीत निर्मिती करणारा कलाकार होता. सिनेमासारखे आमप्रेक्षकांना साक्षात भिडणारे माध्यम अशा कलाकारांसाठी किती योग्य असाही प्रश्न काही वेळा पडतो.

     मणी कौलचा कोणताच चित्रपट सर्वसाधारण प्रेक्षकांना प्रिय झाला नाही. तो त्यांच्यासाठी चित्रपट बनवतच नव्हता. ती त्याची स्वत:ची मस्ती होती आणि त्या काळात ती परवडत होती, कारण समाजात प्रायोगिकतेचे वारे होते. चित्रपटकलेत तंत्राचा एवढा बडिवार माजला नव्हता आणि कॅमेरावर्क व संकलन ही चित्रपटातील जी मुख्य तंत्रांगे, त्यामध्ये उपक्रमशक्यता अधिक होत्या- नव्या चित्रपटांच्या लाटेतले सगळे दिग्दर्शक असे प्रयोग करत, परंतु मणी कौल त्या सर्वांच्या पुढे होता. त्यामुळे त्याची तंत्रावर आणि माणसांवर (कलावंत व तंत्रज्ञ) हुकूमत चालू शके.

     मणी कौलची कलावंत म्हणून गुर्मी व स्वान्तता ‘घाशीराम कोतवाल’ चित्रपटानंतर फार प्रकर्षाने प्रकट झाली. त्या चित्रपटाचा एनसीपीएमध्ये खेळ होता. नेमके निमंत्रित त्यासाठी बोलावले गेले होते. चित्रपट संपला. प्रेक्षक सुन्न झाले होते. आपण जे पाहिले ते काय होते? नाना फडणवीसांशी त्याचा संबंध काय? आपण तेंडुलकरांचे नाटक पाहिलेले आहे ते खरे होते की हा सिनेमा? प्रेक्षकांना उलगडत नव्हते. कृ.रा.सावंत यांचे लंडनहून आलेले मित्र शशी देव त्या खेळास उपस्थित होते. त्यांनी चर्चेला तोंड फोडले. देव लंडनमधील मुख्यत: नाट्यजगाशी संबंधित होते. त्यांनी ‘मला चित्रपट काही कळला नाही’ हे बेधडक सांगितले. त्यावर तर्‍हेतर्‍हेने, हडसूनखडसून चर्चा झाली. या चित्रपटास देना बँकेचे साहाय्य होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने अशा ‘अनाकलनीय प्रयोगां’ना अर्थपुरवठा करावा का? असाही प्रश्न विचारला गेला. त्या ओघात मणी कौलने जोरात सांगितले, की मी माझ्यासाठी चित्रपट बनवतो. प्रेक्षकांना हवे तर ते त्यांनी पाहावे!

     चित्रपटात अर्थकारण एवढे मोठे आहे, की त्यामध्ये या प्रकारची व्यक्तिनिष्ठा चालत नाही. त्या वेळच्या एनसीपीएच्या कार्यक्रम संचालक कुमुद मेहता फार चतुर होत्या. त्यांचा या नव्या नाटकवाल्यांना व चित्रपटकर्त्यांना मोठा आधार असे. त्यांनी मणी कौलच्या ‘घाशीराम कोलवाल’चे ‘फिल्म-एसे’ म्हणून समर्थन केले.

     मणी कौलने ‘घाशीराम’नंतर चित्रपट बनवला नाही, परंतु ‘सिध्देश्वरी’, ‘ध्रुपद’ असे उत्तम माहितीपट निर्माण केले व ते जाणकारांना आवडले. तो स्वत:त रमणारा कमालीचा आत्मनिष्ठ कलावंत होता, परंतु एरवी वागा-बोलायला त्याच्या मित्रभाव उत्तम असे.

-दिनकर गांगल-  thinkm2010@gmail.com , भ्रमणध्वनी – 9867118517 

{jcomments on}

About Post Author

Previous articleविठ्ठल
Next article–हासपर्वातील संधी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.