लैंगिक शिक्षण, लिंगसमभाव, वेगवेगळ्या प्रकारची लैंगिकता वगैरे गोष्टींबद्दल उघडपणे बोलणे हे पूर्वी अगदीच अमान्य समजले जात असे. जागतिकीकरणानंतर सगळीकडे, सगळ्याच पातळ्यांवर खूप वेगाने परिवर्तन झाले. एक जोरदार धक्का बसावा आणि आपल्या नकळत आपण खूपच पुढे ढकलले गेलो आहोत अशा जाणीव अनेक क्षेत्रात दिसल्या. एक वेगवान लाटच आली. आई वडलांना शांतपणे मी ‘गे’ आहे किंवा मी ‘लेस्बियन’ आहे हे वर मान करून संगण्याइतका धीटपणा तरुण पिढीत आला. सुरुवातीला घाबरून, बेचैन होऊन गोंधळून गेलेले पालक, नंतर विचार करून त्याचा स्वीकार करून या बदलाला सामोरे गेले. स्त्री-पुरुष यांच्या एकत्र राहण्याच्या व्याख्या बदलल्या. हे विषय गुप्तपणे नव्हे, तर मोकळेपणाने बोलले गेले तरच निरोगी नातेसंबंध आणि त्या अनुषंगाने निरोगी समाज निर्माण होईल, या विचाराने वेगवेगळ्या पातळींवर बोलणे, व्याख्याने, चर्चासत्रे, फिल्ममधून जाणीवजागृती असे बदल दिसू लागले. त्यातून ऑनर किलिंग सारखे भयानक प्रश्नही निर्माण झाले. आलेल्या या लाटेतील ‘परिवर्तनाचे बारकावे आणि त्याकडे पाहण्याचे दृष्टीकोन’ या विषयावर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेला हा वैचारिक लेख.
– अपर्णा महाजन
—————————————————————————–
जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती (खोलवर परिणाम करणारे) व प्रपाती (वेगवान) स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही.
सर्वप्रथम काही प्रश्न. त्यांची प्रामाणिक उत्तरे वाचकांनी स्वतःशीच द्यावी-
- समलैंगिकता, गे, लेस्बियन, ट्रान्सजेण्डर हे शब्द सार्वजनिक रीत्या वापरण्यास सुरुवात केव्हा झाली? ह्या शब्दांचा नेमका अर्थ कोणत्या वयात समजला? पुढच्या पिढीला तो केव्हा समजला?
- बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड, डेटिंग, लिव्ह इन रिलेशनशिप ह्या शब्दांचा उदय भारतात केव्हा झाला? हे शब्द आसपासच नव्हे, तर घरात दाखल झाले आहेत, हे माहीत आहे का?
- पुरुष वयात येतो, तेव्हा त्यात होणाऱ्या शारीरिक व मानसिक घडामोडींची-बदलांची माहिती त्याला कोठून मिळते? ती आधीच्या पिढीला कोठून मिळाली? त्या वयात पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशातून मिळत होती? ती कितपत विश्वसनीय होती?
- स्त्रीची मासिक पाळी हा मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा आधार. परंतु पाळीबद्दलची वैज्ञानिक माहिती होती का? तीविषयीचा सामाजिक व्यवहार कसा होता? शाळेत तीबद्दल, तसेच स्त्री-पुरुषांच्या पुनरुत्पादक संस्थांबद्दल शिकवले जात होते का?
- मागील पिढ्यांतील पुरुष प्रेमभंग झाल्यावर काय करत? आताचे काय करतात? त्यांच्या मानसिकतेचे सिनेमा-नाटके ह्यांत पडलेले प्रतिबिंब काय दाखवते?
- स्वत:ची लैंगिक ओळख काय आहे, ह्याबद्दल काय वाटते? विज्ञान त्याबद्दल काय सांगते? त्याबाबत काही माहिती आहे?
माणूस वयात येतो, तेव्हापासूनचा त्याचा स्त्रीत्व किंवा पुरुषत्व ह्याकडे जाण्याचा प्रवास वर्ग-जात-शहरी/ग्रामीण अशा विविध सामाजिक घटकांतून आकार घेत असतो. म्हणजेच, वरील प्रश्नांची सर्वांची उत्तरे सारखी असतील असे नाही. पण नव्वदच्या दशकापूर्वी वयात आलेल्या असंख्य पुरुषांचे अनुभव बऱ्याच प्रमाणात समान आहेत. तीच बाब स्त्रियांच्या बाबतीत खरी आहे. सारेजण ‘गप्प बसा संस्कृती’चे बळी होते. स्त्री-पुरुष संबंधांसारख्या नैसर्गिक व मूलभूत गोष्टीबद्दल प्रचंड गुप्तता राखली जात होती. तो विषय अभ्यासक्रमात असला, तरी तो शिकवला जात नसे. मासिक पाळी ही काहीतरी घाणेरडी बाब आहे असे मानून ती सुरू झाली की मुलीच्या वाट्याला आलेले थोडेफार मोकळेपणदेखील समाप्त होत असे. पुरुषांच्या बाबतीत वयात येणे ही रजोदर्शनासारखी ‘घटना’ नसल्यामुळे तर तेथे परिस्थिती अधिकच बिकट होती. एकीकडे शरीर-मनात होणाऱ्या प्रचंड बदलामुळे येणारे दडपण, कमालीची उत्सुकता आणि त्याविषयी कोणाला काही विचारणे म्हणजे ‘फाजीलपणा’, घाणेरडी वृत्ती असा सार्वत्रिक समज. अज्ञ, अननुभवी व गोंधळलेल्या मित्रांकडून आणि ‘पिवळ्या पुस्तकां’तून मिळणारे ज्ञान हाच माहितीचा स्रोत. स्त्रियांच्या बाबतीत तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार. एकूण, लैंगिकता ही मानवी जीवनाच्या व एकूणच सृजनाच्या मुळाशी स्थित प्रेरणा असली तरी भारतीय दांभिक समाजात त्याविषयी बोलण्याची सोय नव्हती. स्त्री-पुरुष भेदभाव आणि स्त्रीच्या लैंगिकतेला नियंत्रित करण्याची पुरुषी लालसा इतकी तीव्र, की त्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसून येत. एकीकडे मातृदेवतेची-शक्तीची पूजा, तर दुसरीकडे देवदासी म्हणून धार्मिक आधारावर तिचे होणारे शोषण. ‘खानदानी’ कुटुंबात विधवा विवाह मान्य नव्हता (अजूनही नाही). बालविवाह समाजात सर्रास सुरू आहेत ह्याचे कोणाला फारसे आश्चर्य वाटत नसे, असा तो काळ. स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्यांचे निकष इतके ठळक, की ‘मधला’ म्हणून हेटाळणी होऊ नये ह्याबद्दल स्त्री-पुरुष अतिशय दक्ष असत. मुंबईतील एक प्रतिष्ठित मराठी शाळेत मुला-मुलींनी परस्परांशी बोलण्यास बंदी होती.
मुंबई-पुणे वगळल्यास, इतरत्र, कॉलेजांतील मुला-मुलींनी एकत्र हिंडणे-फिरणे ही बाब समाजमान्य नव्हती. स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार झपाट्याने होत होता, पण पुरुषांना त्यांच्यासोबत वावरण्याची सवय नव्हती. त्यामुळे खूप विचित्र गोष्टी घडत. नागपूर शहरात विद्यापीठ परिसरात मराठी साहित्यात एम ए करणारा माझा रूम पार्टनर 1970 च्या दशकात पूर्ण दोन वर्षांत वर्गातील मुलींशी एक शब्दही बोलू शकला नाही. तो भर उन्हातदेखील होस्टेलपासून कॅम्पसपर्यंत पायी चालत जाई. कारण बसमध्ये गर्दीत मुलीचा स्पर्श झाला तर मनात वाईट विचार येतात, असे त्याचे मत. ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ हे इतिहासाचार्य राजवाडे यांचे पुस्तक वाच, असे म्हणणारे आम्ही मित्र त्याच्या दृष्टीने धर्म व संस्कृती यांचे दुश्मन होतो. तो परंपरेला प्रश्न विचारण्याच्या कल्पनेनेच पार भेदरून जात असे. त्यामुळे त्याची कोंडी व तगमग विलक्षण होत असे. एकूण, आम्ही सर्व पुरुष तेव्हा दुभंगलेल्या मनोवस्थेत वावरत होतो. ‘बायको असावी तर सात्त्विक ‘जया’सारखी, पण तिच्या जोडीला ‘रेखा’सारखी मैत्रीण असावी- ह्या दोन भूमिकांची चुकूनही अदलाबदल करू नये’ ह्यावर आधीच्या पिढीचे एकमत होते आणि बायकोला मित्र असण्याचा तर प्रश्नच नव्हता. ते उतारवयातील राजकपूर आणि राजश्री प्रॉडक्शन ह्या दोन्ही निर्मात्यांचे चित्रपट जोरात चालण्याचे दिवस होते.
नवे पर्व, नवे प्रश्न- नव्वदचे दशक आले. खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा) पर्व सुरू झाले आणि सर्व काही वेगाने बदलले. त्यापूर्वी शहरीकरण, आधुनिकीकरण, शिक्षणाचा प्रसार या घटकांमुळे खेडे व शहर यांतील वातावरण हळूहळू बदलत होते. स्त्रीमुक्ती चळवळ आकार घेत होती. बलात्कार, माध्यमांतून घडणारे स्त्रीदेहाचे प्रदर्शन असे प्रश्न सार्वजनिक चर्चेत आणण्याचा तिचा प्रयत्न सुरू झाला होता. पण नव्या पर्वातील बदल अतिशय तीव्र आणि वेगवान होते. जीवनाची बहुतेक सूत्रे बाजारपेठेच्या हातात आली. स्त्रीस्वातंत्र्याच्या चळवळी मागे पडल्या. सौंदर्य स्पर्धांचे वारे आले आणि त्यांचे लोण जागतिक पातळीपासून गल्लीबोळापर्यंत पसरले. तरुण मुलींना ह्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी अर्धशहरी भागातही त्यांच्या मध्यमवयीन आया उत्तेजन देऊ लागल्या. स्त्रियांच्या कितीतरी पिढ्यांच्या मनात दबून राहिलेली वाफ वेगाने बाहेर पडू लागली. खुली लैंगिकता हा रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. सर्वसंचारी व खाजगीपणा जपणाऱ्या सोशल मीडियामुळे हे बदल समाजाच्या सर्व स्तरांत जाऊन पोचले आहेत, स्थिरावले आहेत. शहरातील उच्चभ्रू वर्गापासून लहान गावातील माध्यमिक शाळांपर्यंत सर्वत्र बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड यांच्या जोड्या जमलेल्या दिसतात. ग्रामीण भागातील चित्र आणखी विचित्र आहे. तेथे सोशल मीडिया आणि दीड जीबी फ्री डेटा यांमुळे पोर्नोग्राफी प्रत्येक घरापर्यंत पोचली आहे. मुलगे स्वैर झाले, पण त्याच वेळी मुलींवरील बंधने सैलावलेली नाहीत. मुला-मुलींमधील तारुण्यसुलभ आकर्षण नाकारणे, मुलीने खालच्या जातीच्या मुलाशी बोलण्याने खानदानाची इज्जत जाते अशा सरंजामशाही कल्पना जोपासणे ह्यामुळे नवे पेच निर्माण झाले आहेत. किशोरवयीन मुलग्यांचे काय करावे हे शिक्षक, पालक, समाज -कोणालाच कळेनासे झाले आहे. ती मुले कोणाचेच ऐकत नाहीत. त्यांचे लक्ष अभ्यासात अजिबात नसते. मोबाईलवरील क्लिप्स पाहणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे कार्य होऊन बसले आहे. आमच्या परिसरात नुकती घडलेली दोन उदाहरणे बोलकी आहेत: एका शाळेतील मुलाने वर्गातील मुलीने ‘फ्रेण्डशिप’ नाकारली, म्हणून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला. तो सुधारगृहात आहे. दुसऱ्या एका गावातील ज्युनियर कॉलेजात बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यास जी विद्यार्थिनी आली, तिच्यासोबत तिचे पंधरा दिवसांचे मूल होते. तिला त्याला कोठे ठेवण्याइतपतही आधार मिळाला नाही. तरुण प्रेमभंग झाल्यावर पूर्वी दाढी वाढवून देवदास बनत. आता, त्यांनी त्यांची लैंगिक सुखाची मागणी ‘डर’ चित्रपटातील ‘तू हां कर, या ना कर, तू है मेरी किरण’ हे गीत म्हणजे ब्रह्मवाक्य आहे असे मानून झिडकारणाऱ्या मुलीला धडा शिकवण्याचे व्रत घेतले आहे. ते लोण दिल्ली-बिहार सोडाच, मुंबई-पुण्यापासून महाराष्ट्रातील दूर गावांपर्यंत पसरलेले दिसते. त्या युवकांची मर्दानगी त्यांना पेट्रोल, सुरी, तलवार, अॅसिड अशा साधनांचा वापर करून तथाकथित प्रेयसीला ‘धडा शिकवला पाहिजे’ अशी सांगते. ते त्याचे पालनही करतात. दुसरीकडे, मुलीने ‘खालच्या’ जातीतील मुलाशी लग्न करून खानदानाची इज्जत धुळीला मिळवली, म्हणून मुलगी-जावई ह्यांची कत्तल करण्याची साथही ‘सैराट’ सुटली आहे.
लैंगिकतेची ही लाट थोपवून धरणे केवळ अशक्य आहे. ऑनर किलिंग, पॉर्नोग्राफी साईट्सवर बंदी, मुली-स्त्रिया ह्यांनी कोणते कपडे घालावे ह्याबद्दलचे फतवे अशा उपायांनी तिला वेसण घालता येणार नाही. ती तिच्या हातातील मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोचण्याचा हरक्षणी प्रयत्न करत आहे. मला ह्या माध्यमातून आठवड्यातून किमान दोनदा ‘फ्रेण्डशिप क्लब’ जॉईन करण्याची निमंत्रणे येतात. मी शहरातील ज्या रस्त्याने फिरतो, त्यात पावलोपावली पब्ज, क्लब्ज, डिस्कोथेक, हुक्का पार्लर आहेत. माझ्या शहरात ‘पुरेसे नाईट लाईफ’ नाही, त्यामुळे ते पुरेसे स्मार्ट नाही, ही माझ्या भाषेतील एका प्रमुख वृत्तपत्राला पडलेली चिंता आहे.
उत्तर प्रदेश-बिहार यांच्यासारख्या हिंदी भाषिक गरीब राज्यांतदेखील कपडे, फॅशन, देहबोली, शारीरता, माध्यमे ह्यांतून हे बदल ठळक होताना दिसतात. सरंजामशाही जुने समाजमानस आणि लैंगिकतेची नवी लाट, पोट भरण्यासाठी पुरुषांचे इतर राज्यात होणारे स्थलांतर आणि स्त्रीगर्भहत्येमुळे स्त्री-पुरुष संख्येचा ढासळलेला समतोल अशा अनेक कारक घटकांच्या एकत्र येण्यातून तेथे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची दखल समाजशास्त्रीय अभ्यासक, माध्यमे व विचारवंत घेत नसले, तरी ‘पॉप्युलर कल्चर’मधून ते समोर येत आहेत. एकेकाळी भोजपुरी लोकसंगीत हा भारतीय परंपरेतील मोलाचा ठेवा मानला जात असे. आता मात्र भोजपुरी गाण्यांतून उघडीनागडी लैंगिकता दुथडी भरून वाहताना दिसते. त्यात दूरदेशी गेलेला पती, बुभुक्षित पत्नी आणि कामातुर दीर ही थीम केंद्रस्थानी असते. अशा एका गाण्यात जेव्हा पत्नी ‘दीर माझ्याशी वेळीअवेळी लगट करतो, तेव्हा तू नोकरी सोडून लौकर इकडे ये’ अशी तक्रार पतीकडे करते, तेव्हा तो तिला ‘सध्या दिरावरच काम भागवून घे’ असा सल्ला देतो ! त्याकडे केवळ धमाल किंवा भावना उद्दीपित करण्याचे साधन असे न पाहता त्यामागील समाजशास्त्रीय वास्तव जाणून घेणे आवश्यक आहे.
लैंगिकतेविषयीचे निषेध-निकष (taboos) बाजूला सारले गेले, ह्याचे काही चांगले परिणामही झाले आहेत. निसर्गामध्ये स्त्री-पुरुष भेदांच्या पलीकडे अन्य भेदही आहेत हे भान समाजाला आले. तृतीयपंथी व त्यांतील उपभेद, तसेच समलैंगिकता ह्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला. मासिक पाळी हा उघडपणे बोलण्याचा, समजून घेण्याचा विषय झाला. लैंगिक शिक्षण हे जीवनशिक्षण आहे हे भान रुजले. विविध वयोगटांतील स्त्री-पुरुष मैत्री ही बाब पूर्वीइतकी भुवया उंचावणारी राहिली नाही. विशेषतः मोठ्या शहरात, मुला-मुलींचे गट मोकळेपणाने वावरताना दिसू लागले. त्यांच्यात नातेसंबंधांचे गोंधळ असले, तरी मैत्री हे मूल्य बऱ्यापैकी प्रस्थापित झाल्याचे दिसते. मुख्य धारा मानल्या जाणाऱ्या माध्यमांतून स्त्री-पुरुषांचे ठोकळेबाज चित्रण होताना दिसत असले, तरी नाटक-चित्रपट, साहित्य, वेब सीरीज ह्या माध्यमांतून व्यक्त होणाऱ्या नव्या पिढीने त्यात अनेक अंगांनी नवेपण आणले आहे. ही पिढी शारीरिकता, लैंगिकता, मानसिकता यांचे कंगोरे संवेदनशीलतेने आणि धीटपणाने चितारण्याचे कौशल्य दाखवत आहे. ह्या बाबतीत झालेली अध्ययने, संशोधने :
नववधू आणि कौमार्यपट्टा – इला त्रिवेदी ह्या अमेरिकास्थित भारतीय अभ्यासकाने लिहिलेले ‘India in Love: Marriage and Sexuality in 21st Century’ हे पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकात त्यांनी भारतीय महानगरातील लैंगिकता आणि विवाहसंस्था ह्यांत घडणाऱ्या बदलांचा शोध घेतला आहे. विवाहसंस्था आणि लैंगिकता या संबंधित शेकडो व्यक्तींच्या मुलाखतींवर आधारित ह्या पुस्तकातील महत्त्वाची निरीक्षणे व निष्कर्ष –
– स्त्री-पुरुष नात्यात गेल्या दशकात जेवढे बदल झाले तितके गेल्या तीन हजार वर्षांतही झाले नाहीत.
– बहुतेक भारतीयांचा प्राधान्यक्रम लग्न, सेक्स व त्यानंतर (मिळाले तर) प्रेम असा होता. आता, तो क्रम प्रेम-सेक्स (किंवा उलट) आणि नंतर वाटले तर लग्न असा झाला आहे. युवक-युवतींना आयुष्यात फक्त सेक्स व प्रेम हेच महत्त्वाचे आहेत असे वाटू लागले आहे.
– सेक्स आणि लग्न ह्या दोन्ही बाबींत क्रांती एकाच वेळी होऊ घातली आहे. त्यामुळे होणारे परिवर्तन हे वेगाने आणि अनेक क्षेत्रांत होत आहे. स्त्रियांची मुक्तीची आकांक्षा वाढत आहे. त्या सारी बंधने नाकारत आहेत. लैंगिक धारणा मुळापासून बदलत आहेत. युवा पिढीचा कल ‘ठरवून’ लग्न करण्याऐवजी स्वतः जोडीदार शोधण्याकडे झुकला आहे. कुटुंब हे अर्थव्यवस्थेचे एकक राहिलेले नाही; त्याची जागा व्यक्तीने घेतली आहे.
– आर्थिक विकास, शहरीकरण, जागतिकीकरण, विस्थापन, प्रसार क्रांती (मोबाईल क्रांती), चंगळवाद ह्या सर्व घटकांचा हा एकत्रित परिणाम आहे.
– ही ओसरणारी लाट नाही, तर पुढे रेटणारा जबरदस्त प्रवाह आहे.
– शहरे आणि महानगरे ह्यांत राहणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष, दोघांनाही सेक्स ही क्रयवस्तू म्हणून सहज उपलब्ध आहे. कॉलेज युवती, मध्यमवयीन गृहिणी ह्यांना हे कमाईचे सहज साधन वाटत आहे.
– मध्यमवर्ग हा ह्या परिवर्तनाचा वाहक आहे. त्यामुळे हा बदल दीर्घकाळ टिकणार आहे, कारण त्याचेच अनुकरण तळचा वर्ग करत असतो. भारतातील मध्यमवर्ग आकाराने खूप मोठा- युरोपमधील अनेक राष्ट्रांएवढा आहे. त्याला त्याच्या क्रयशक्तीचे आणि राजकीय ताकदीचे भान येऊ लागले आहे. त्यामुळे, तो त्याला हवे ते बदल समाजात घडवून आणण्याबद्दल आग्रही झाला आहे.
– गेल्या दशकात प्रेमविवाहांचे प्रमाण पाच टक्क्यांवरून तीस टक्क्यांवर गेले आहे. महानगरात ते ह्याहून अधिक असण्याची शक्यता आहे.
– सेक्सची खेळणी, पुरुष वेश्या ह्या बाबी नवलाईच्या राहिलेल्या नाहीत.
लेखिकेच्या शब्दांत ह्या पुस्तकाचे सार असे आहे – “एखाद्या लाजऱ्या परंतु उत्सुक नववधूप्रमाणे हा देश त्याचा कौमार्यपट्टा हळूहळू दूर सारत आहे.”
अन्य संशोधने – गुगलने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगात पॉर्नोग्राफी पाहण्यात भारताचा सहावा क्रमांक लागतो. भारतात सर्वेक्षण केलेल्या पुरुषांपैकी पंच्याहत्तर टक्के पॉर्नोग्राफी बघतात. भारतीय स्त्रिया ह्यात पुरुषांच्या तुलनेत फारशा मागे नाहीत. भारत सरकारने मध्यंतरी हजारो पॉर्नोग्राफी साईट्सवर बंदी घातली. पण ती कागदावरच उरली. कारण वेबसाईटवरील सारा मजकूर काही तासांत नव्या साईटवर टाकणे शक्य आहे. त्यामुळे अशी बंदी कधीच यशस्वी होऊ शकत नाही.
व्यक्तीला स्वतःची लैंगिक ओळख ही स्त्री किंवा पुरुष अशा द्वंद्वात्मक पद्धतीने होत होती. पण मेंदुविज्ञान, पुनरुत्पादक अंतस्रावविज्ञान इत्यादी विषयांतील अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे, की असले ठोकळेबाज वर्गीकरण कालबाह्य झाले आहे. सर्वांच्या शरीर-मनात स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्या दोन्ही प्रकारचे गुणधर्म आहेत. त्यांचे परस्परप्रमाण कमी जास्त होते, त्यानुसार एखाद्या व्यक्तीला स्त्री किंवा पुरुष म्हणून संबोधले जाते. पण ते प्रमाणही बदलत असते. म्हणजे व्यक्ती काही प्रसंगी स्त्रीसुलभ भूमिका घेते, तर कधी ती पुरुषत्व अधोरेखित करणारी असते. व्यक्तीची लैंगिक ओळख ही स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्या दोन बिंदूंमधील गतिमान पटासारखी आहे किंवा एखाद्या गोधडीप्रमाणे (mosaic) आहे, असे विज्ञान सांगते. खा-उ-जाने आणलेल्या लैंगिकतेच्या ह्या तुफानाने भारतीय समाजजीवनात महत्त्वाचे बदल घडवले आहेत. आणखीही अनेक बदल भविष्यात घडणार आहेत. प्रश्न हा आहे की ह्यांकडे कसे पाहणार?
ह्या बदलांकडे पाहण्याचे प्रामुख्याने तीन दृष्टिकोन आहेत:
- पारंपरिक-नैतिक: भारतीय संस्कृती थोर आहे. तिच्यात ह्या ‘थेरां’ना जागा नाही. पाश्चात्य संस्कृतीने आणलेली ही विकृती आहे. भारतीय संस्कृतीने अशी अनेक वादळे पचवली आहेत असे मानणारी ही विचारधारा आहे. मुळात ती स्त्री-पुरुष विषमता आणि वर्णवर्चस्व ह्यांवर आधारित आहे. तिचे पाठीराखे मोठ्या संख्येने दिसतात. तरी मुळात ती काळाच्या उलट दिशेने जाणारी विचारधारा आहे. बदलत्या काळाने निर्माण केलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे नाहीत. स्त्रीच्या लैंगिकतेवर बंधने घालून तिला नियंत्रित करण्याचे ह्या पूर्वीचे प्रयत्न, उदाहरणार्थ सती, विधवाविवाहबंदी, कौमार्यचाचणी यशस्वी झाले नाहीत आणि एकविसाव्या शतकात आत्मभान आलेल्या स्त्रीला बंदिस्त करणे, सार्वजनिक स्थळी दिसणाऱ्या जोडप्यांना मारहाण करणे आणि ‘मर्यादाभंग करणाऱ्यां’ना जातपंचायतींनी शिक्षा ठोठावणे ह्या मार्गाने हे प्रश्न सुटणार नाहीत, हे निश्चित!
- यांत्रिक, न-नैतिक: हा तथाकथित आधुनिकतावादी विचार आहे. त्याच्या मते काळाच्या ओघात होणारे बदल स्वीकारणे एवढेच माणसाच्या हाती असते व ते त्यांनी स्वीकारले पाहिजेत. ह्या प्रश्नावर नैतिकतेची भूमिका घेणारे हे कोण? जगात घडणाऱ्या तंत्रज्ञानीय-राजकीय-अर्थशास्त्रीय बदलांतून खा-उ-जा घडले. त्याला पर्याय नाही व ते बदल परत फिरवता येणार नाहीत. त्यांच्यानुसार स्वतःला बदलून घेणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. ह्या दृष्टिकोनामागे एक (अराजकीय म्हणवला जाणारा) राजकीय विचार आहे; पण त्याला मूल्यविवेकाची बैठक नाही. जे येईल ते कसलीही चिकित्सा न करता स्वीकारणे असा हा ‘नव-नियतीवादी’ विचार एकविसाव्या शतकाच्या आव्हानांना सामोरे जाताना पुरेसा आहे असे वाटत नाही.
- विवेकवादी, न-नैतिक: हा विचारही स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत किंवा कोणाही व्यक्तीच्या आचार-विचाराच्या संदर्भात न्यायाधीशाची भूमिका घेत नाही. तो एखादी गोष्ट नैतिक आहे की नाही ही संबंधित व्यक्तींनी ठरवण्याची बाब आहे, असे मानतो. पण लैंगिकता आणि समाज ह्यांचे नाते काय असावे, ह्याबद्दल त्याची विशिष्ट भूमिका आहे. तो विचार स्त्री-पुरुष (व अन्य) ह्यांच्या नात्याबद्दल काय चूक, काय बरोबर अशी निवड करता येते, करण्यास हवी असे मानतो. मात्र तो विचार केवळ परंपरा किंवा नवता ह्या आधारावर निवड न करता समानता, परस्परांचा आदर, वैविध्याचा स्वीकार, शोषण, दडपण व ब्लॅकमेलिंग ह्यांना नकार, कोणाही व्यक्तीचे किंवा नात्याचे बाजारीकरण करण्यास नकार ह्या निकषांवर ती करावी असे मानतो. थोडक्यात त्यामागे मूल्यविवेकाची बैठक आहे. तो परंपरेतून येणाऱ्या सती, देवदासी, स्त्री-पुरुष भेदभाव व नैतिकतेचे दुहेरी मापदंड ह्या गोष्टीना नकार देतो, त्याचप्रमाणे खा-उ-जाने मानवी नात्याचे बाजारीकरण केले ह्याचीही त्याला चीड आहे. खा-उ-जा ही आकाशातून पडलेली गोष्ट नाही, तर अनियंत्रित भांडवलशाहीने स्वार्थासाठी, जगभरातील नैसर्गिक साधनांचे दोहन करता यावे ह्यासाठी उभारलेली व्यवस्था आहे, साम्राज्यशाहीचा तो नवा अवतार आहे, ह्याचे भान त्याला आहे. सौंदर्यस्पर्धा असोत की पोर्नोग्राफीचे जगभर विणलेले जाळे, त्यामागे नफ्याची गणिते आहेत. तो विचार स्त्री आणि पुरुष हे केवळ देह आहेत व अमर्याद उपभोग हेच त्यांचे अंतिम श्रेयस व प्रेयस आहे, ह्या तत्त्वज्ञानातून ह्या व्यवस्थेचा जन्म झाला आहे, असे मानतो. म्हणूनच त्या विचाराची आकांक्षा जुन्या आणि नव्या अशा सर्व शोषक व्यवस्थांमध्ये गुदमरणारे स्त्री-पुरुष व अन्य ह्यांचे नाते नव्या शतकात तरी मुक्त व निरामय व्हावे ही त्या आहे.
एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध कसे असण्यास हवेत, हे सांगण्यासाठी विसाव्या शतकातील ख्यातनाम साहित्यिक अमृता प्रीतम ह्यांची ही रचना पुरेशी आहे; ते म्हणतात –
पुरुष
स्त्रीसोबत
झोपतो,
जागत
का नाही?
शारीरिकतेच्या पलीकडे जाणारे, स्त्री-पुरुष ह्यांच्यातील वेगळेपण ओळखून त्यांच्यातील समता आणि पारस्परिकता जपणारे मैत्रीचे नाते त्यांच्यात उमलावे, अनेक शतकांच्या निद्रेतून दोघांनीही जागावे, ह्याहून वेगळे आपणही काय मागणार?
– रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ 9833346534 ravindrarp@gmail.com
(वि.सा.संघद्वारा आयोजित ग.त्र्यं.माडखोलकर स्मृती व्याख्यानमालेत केलेल्या भाषणाचा संपादित अंश)
———————————————————————————————-
या प्रश्नाचा सर्वांगीण आढावा घेणारा अतिशय संतुलित लेख.