आमच्या इंदूचे शिक्षण

0
31
_Aaamchya_Induche_Shikshan_1.png

नावापासून कुतुहल तयार व्हावे असा प्रकार ज्या पुस्तकांच्या बाबतीत घडतो त्यांपैकी ‘आमच्या इंदूचे शिक्षण’ हे पुस्तक. ह्या पुस्तकाचा नक्की विषय काय व त्याचा आकृतिबंध कोठला हे प्रश्न पाठोपाठ उद्भवतातच. प्रस्तावनेत लेखक म्हणतात, “माझे हे छोटेसे पुस्तक – वाटल्यास चोपडे म्हणा. म्हणजे धड ना शिक्षणशास्त्र – ना अध्ययनकला. धड ना काल्पनिक गोष्ट ना वास्तविक चरित्र. असे काही तरी विचित्र झाले आहे, झाले! करायला गेलो समन्वय पण झाली मात्र खिचडी.”

“सदरहु पुस्तकात कोणकोणते शैक्षणिक प्रश्न आले आहेत याची एक जंत्री अनुक्रमणिकेच्या रुपाने दिली आहे. त्यांपैकी पुष्कळांचा उल्लेख निव्वळ नावाचा असून त्यापेक्षा जास्त काही बोध होत नाही याची जाणीव लेखकाला पूर्णपणे आहे. पण हे शैक्षणिक प्रश्न तरी काय आहेत ते समजावून घेतले पाहिजेत अशी शिक्षकांना व आईबापांना जिज्ञासा झाली आणि प्रत्यक्ष शिक्षणशास्त्रात डोकावण्याच्या इच्छेने ते त्याच्या उंबरठ्यापर्यंत गेले म्हणजे या पुस्तकाचे अवतारकार्य संपले असे होईल.” (आरंभी- पुस्तकाची प्रस्तावना)

लेखकाचा हेतू आणि विषय यांचा अंदाज प्रस्तावनेतून साधारण येतो. पण आकृतिबंध कोणता? न.चिं. केळकरांनी प्रथम ती कादंबरी आहे असे समजून वाचण्यास सुरुवात केली, पण ‘बालमानसशास्त्र मुख्यत: मनात धरून तद् नुरोधाने शिक्षण कसे द्यावे याची चर्चा पुस्तकात फार चांगली साधली आहे असे त्यांच्या लक्षात आले. (अभिप्राय- पृष्ठ ७) तर आचार्य अत्रे तिला ठाशीवपणे कादंबरीच म्हणतात, ‘माझे मित्र श्री. नाना पटवर्धन यांनी लिहिलेले ‘आमच्या इंदूचे शिक्षण’ हे मराठी भाषेतील एक अपूर्व पुस्तक म्हणून ठरणार आहे. ती शिक्षणशास्त्रावरील हृदयंगम कादंबरीच आहे, म्हणा ना’ (अभिप्राय, पृष्ठ८)

आता, पुस्तकाचा मुख्य विषय मुलांचे मानसशास्त्र असा निश्चित झाला, की त्याचा अधिक परिचय करून घेऊ. लेखकाने प्रथम पुरुषी निवेदनाने त्यांच्या मुलीच्या जन्मापासून, ती शाळेत जायला लागून पौगंडावस्थेत पोचेपर्यंतची हकीकत गोष्टीसारख्या फॉर्ममध्ये सांगितली आहे. ती सांगताना सत्तावीस प्रकरणांत विभागली आहे. त्यांची शीर्षके ‘तान्ही इंदू’, ‘खेळकर इंदू’, ‘महत्त्वाच्या सहजप्रवृत्ती’, ‘शिक्षणाचे ध्येये’, ‘इंदूच्या बौद्धिक शक्तीचा विकास…’ अशासारखी देऊन वाचन करताना येऊ शकणारा कंटाळा दूर सारण्याचा प्रयत्न केला आहे.

मुलगी जन्माला आल्यापासून रोजच्या जीवनात घडणार्‍या प्रसंगांत सामान्यपणे घडणार्‍या आई-बापांच्या प्रतिक्रिया आणि आई-बापांच्या रोजच्या जीवनात वागण्याच्या पद्धतीचा मुलांच्या मनावर होणारा परिणाम असा परस्पर परिणाम प्रवाह कोणत्या

मानसशास्त्रीय तत्त्वांवर आधारित असतो आणि तो प्रवाह मुलांच्या मानसिक व त्या परिणामस्वरुप शारीरिक वाढीसाठी कसा अनुकूल करायला हवा याची मांडणी या सकृत्दर्शनी कथा वाटणार्‍या लिखाणात केली आहे.

त्यातील प्रसंग आजही महाराष्ट्रीय मुलांच्या आणि मराठी जीवनात घडतात हे वाचकाला सहज पडताळता येते. त्या घटनांचे तपशील बदलले असतील एवढेच.

प्रस्तुत पुस्तकातील ‘मार्गदर्शन’ किंवा विवेचन पंच्याहत्तर वर्षांपूर्वी प्रथम केले गेले हे लक्षात घेतले, की त्याचे महत्त्व मनावर ठसते. ज्या वेळी हे पुस्तक लिहिले गेले, त्यावेळी मध्यमवर्गीय पांढरपेशा घरात तीन ते चार (क्वचित अधिक) मुले असत. कुटुंबकर्त्याचे उत्पन्न फार नसे आणि मुलांना ‘शिस्तीत’ वाढवायचे असते हे तत्त्व सर्वमान्य असे. स्त्रियांचा मुलांच्या घडणीत भाग मोठा असला तरी पुरुषांचा शब्दच अखेरचा असे.

अशा स्थितीत मुलांना त्यांच्या कलाकलाने घेऊन निरोगी विचारसरणी देण्याचा प्रयत्न पालकांना करण्यास सांगणे हे तसे धाडसाचे काम होते. शिवाय, ते मार्ग बदलण्याचे सुचवताना पालकांनी स्वत:ही वर्तनबदल करायला हवा हे ओघानेच येते. ते सांगणे म्हणजे परंपराप्रिय व्यक्तींचा रोष ओढवून घेणे होते. पण तरीही लेखकाने त्या दोन्ही गोष्टी साध्यासोप्या भाषेत व उदाहरणे देऊन सांगितल्या आहेत. कथानायिका (आपण या सार्‍या विवेचनाला ‘कथा’ हा ढोबळपणे घेतलेला फॉर्म स्वीकारून कथाच म्हणू.) शाळेत शिकण्यासाठी मुंबईला वसतिगृहात राहते. त्यानंतर तिच्या प्रतिक्रिया व त्यावर लेखकाचे उत्तर पत्ररूपाने दिले आहे. त्यामुळे वीस ते चोवीस ही पाच प्रकरणे पत्रस्वरूपात आहेत.

बालमानसशास्त्र आणि वर्तणूकशास्त्र यांची महत्त्वाची तत्त्वे मनाशी निश्चित करून त्या त्या भोवती प्रकरणे बेतली आहेत. उदाहरणार्थ, शिक्षणाला सुरुवात या प्रकरणात एक – दोष दाखवण्याच्या काकवृत्तीपेक्षा गुण घेण्याची हंसवृत्ती कितीतरी चांगली आणि या हंसवृत्तीचा शील संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय उपयोग होतो. दोन – हल्लीच्या प्रमुख शिक्षणशास्त्रज्ञ माँटेसरीबाईही असली बक्षिसे देण्याच्या पद्धतीविरुद्ध असून, करायचे कामच इतके चांगले असावे व ते करण्याची क्रियाही इतकी आनंददायी असावी, की दुसरे काही बक्षीस मिळाले नाही तरी काम करण्यात सुख व्हावे. या दोन सूत्राना मध्यभागी ठेवून प्रकरण रचले आहे.

काही प्रकरणे फार छोटी आहेत. जुन्यानव्याची तुलना, पती-पत्नीचा संवाद. लहानशा चुकीचा मोठा परिणाम, मानसशास्त्राचा एक सिद्धांत ही सारी प्रकरणे प्रत्येकी तीन-चार पानांची आहेत. पण गोष्टीत घडणार्‍या घटनांसंबंधी थोडक्यात विवेचन केले आहे.

प्रत्येक प्रकरणात काही उपशीर्षके दिली आहेत – उदाहरणार्थ, ‘मानवशास्त्राचा एक सिद्धांत’मध्ये ‘इंदूचा देवांवर नितांत विश्वास’, ‘वावड्या उल्लेखाला पायबंद’ अशी दोन उपशीर्षके तर ‘एकलकोंडे जीवन’मध्ये ‘सौभाग्यवतीने चांगलीच शोभा केली’, ‘इंदूचे पत्र, चूक कोणाची’ अशी दोन उपशीर्षके आहेत. वाचकाची उत्सुकता कायम राखण्यास अशा उपशीर्षकांची चांगली मदत होते.

पुस्तकात विवेचन एकांगी होणार नाही याची काळजी घेतली आहे. विरुद्ध मताचा नुसता उल्लेख नाही तर त्यात असलेला (कमी-अधिक प्रमाणात) वास्तव भाग यांचीही कबुली आहे. काही ठिकाणी ताण कमी करण्यासाठी विनोदही आहेत.

‘बाप म्हणजे कोण गं?’ असे लेखकाच्या मुलीला विचारल्यावर ती उत्तरते, “घलात आईच्याबलोबल नसतो का एक मोथा माणूस? तो बाप!”(पृष्ठ ५०)

ते घरी येऊन गेल्यावर इंदू आमच्याकडे धावत धावत आली आणि मोठ्या गंभीर व आश्चर्ययुक्त स्वरात म्हणाली, “कशावरून काय विचारता? त्यांची ती पांढरी शुभ्र दाढी व त्यांचा पांढराशुभ्र पोशाख पाहिला नाही का तुम्ही? पापी माणसं अशी नाही दिसत.” (पृष्ठ ७८)

बालमानसशास्त्रावरील आजच्या विस्कळीत लिखाणापेक्षा गोष्टीरूपाने सांगितलेले काहीसे स्वैर पण तरीही विचारपूर्वक बेतलेले हे लिखाण पाऊणशे वर्षांपूर्वीचे असले तरी महत्त्वाचे वाटते.

आमच्या इंदूचे शिक्षण

लेखक. ना.म. पटवर्धन

प्रकाशक- केशव भिकाजी ढवळे प्रकाशन

यशोदा-चितांमणी- ट्रस्ट पुरस्कृत ग्रंथमाला. ग्रंथ नंबर ५.

प्रथम आवृत्ती १९३६, पुनर्मुद्रण १९४२/ १९४८. पृष्ठे १७६, मूल्य २ रु.

– मुकुंद वझे

vazemukund@yahoo.com

About Post Author