आनंदाची बातमी
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही वेबसाईट चालवण्यासाठी नॉन-प्रॉफिट कंपनी निर्माण करण्याची योजना होती. त्या कंपनीसाठी ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’ असे नाव आपण सुचवले ते नाव कंपनी रजिस्ट्रारने सहा महिन्यांपूर्वी मान्य केले व आता, या नावाने कंपनी रजिस्टर करण्याचा परवानाही (सेक्शन 25) दिला. तसे पत्र रजिस्ट्रारकडून या आठवड्यात मिळाले. श्रीरंग पाध्ये व सीमा दांडेकर यांची या कामी आपणास मदत झाली. यामुळे आपली कामे सोपी व सोयीची होणार आहेत.
‘थिंक महाराष्ट्र’ ही वेबसाईट गेल्या मार्चमध्ये औपचारिकरीत्या सुरू झाली. तेव्हापासून, ही निव्वळ वेबसाईट नव्हे तर व्यासपीठ आहे; यावर समाजातील प्रज्ञा-प्रतिभेच्या व चांगुलपणाच्या गोष्टींची नोंद केली जाईल असे आपण म्हणत आलो व तशा माहितीचे संकलन चालू ठेवले. त्यामधून पिंपरीजवळ केवळ कमळांचे उद्यान (आशियातील एकमेव?) सुरू करू पाहणा-या सतीश गदियाची ओळख झाली, त्याचप्रमाणे जुन्या पोथ्या डिजिटाइज करून त्यातील ज्ञानसंपदा चिरंतन संरक्षित करण्याचा प्रयत्न चालवलेल्या दिनेश वैद्यचा खटाटोपही कळला. अशी कितीतरी उदाहरणे! महाराष्ट्रातील कर्तृत्त्ववान व्यक्तींची नोंद आणि व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर चाललेल्या स्वयंसेवेचा तपशील आस्थेने टिपण्याचा प्रयत्न सुरु केला, तो समाजाची ही ताकद कळावी म्हणून. याप्रकारच्या वेगवेगळ्या मजकुरात जे सांस्कृतिक महत्त्वाचे शब्द येतात त्या शब्दांच्या निमित्ताने त्यांची महती अधोरेखित करण्याचा प्रयत्न सांस्कृतिक नोंदी या सदरात होतो. त्यामुळे आपले संचित सतत नजरेसमोर राहील, परंतु त्यात रमण्याची वृत्ती कमी होईल. शेवटी, शिवाजी व ज्ञानेश्वर-तुकाराम हा महाराष्ट्राचा इतिहास आहे; त्यांचा नामजप करुन वतर्मान घडणार नाही ही दृष्टी महत्त्वाची.
याशिवाय प्रासंगिक, सांस्कृतिक ठेवा व घटना अशा सदरांमधूनही संस्कृतिसंचित नोंदले जाते. तर वादचर्चा, अवांतर, बृहत्कथा व मूल्यविवेकसारखे नियमित लेखन यांमधून बौद्धिकतेला स्फुरण मिळेल असा विचार असतो. समाज घडतो तो सचिन तेंडुलकरच्या अफाट पराक्रमाने किंवा माधुरी दीक्षितच्या सुरेख चित्रपट अभिनयामुळे नव्हे; ती उत्तुंगता हे समाजाचे भूषण, परंतु समाजाची कामगिरी सर्वसामान्य माणसाच्या कर्तबगारीने, त्याच्या ज्ञानकलावेडाने ठरते. ती महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षांत शून्यवत भासते. कारण अशा माणसांचे समाजाला चीज नाही. ही विद्यमान महाराष्ट्राची मोठी उणीव आहे. खरेतर बुद्धिमता, प्रबोधन हे या समाजाचे भूषण होते. फुले-टिळक-आगरकर-आंबेडकर अशी पंचवीस तरी राष्ट्रपातळीवरील माणसे १९५० पर्यंतच्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेली. आज २४x७ चॅनेलवरच्या चर्चेत भाग घेऊ शकणारा एक ‘स्मार्ट’ माणूसदेखील सांगता येत नाही. बौद्धिकतातर विद्यापीठांतील विशेष अभ्यासात अडकून पडली आहे, समाजाला तिचा काही उपयोग नाही. स्वयंप्रज्ञ, उपक्रमशील, स्वतंत्र बुद्धिविचार असलेल्या मंडळींचा शोध हे ‘थिंक महाराष्ट्र’च्या माध्यमातून करायचे काम आहे. अशा कामाला चालना द्यायची आहे.
वेबसाईटचे असे विविधांगी रूप ठेवताना त्यामधून ‘थिंक महाराष्ट्र – लिंक महाराष्ट्र’ हे जे आपले प्रमुख सूत्र आहे ते कसे साध्य होईल ही दृष्टी ठेवली जाते. महाराष्ट्रातील समाजाचे खरे दुखणे हे आहे, की या समाजात कर्तृत्त्वास व चांगुलपणास संधी राहिलेली नाही, हे दोन्ही गुण जोपासले जातील अशी व्यवस्था येथे नाही आणि त्यामुळे हा समाज न्यूनगंडाने ग्रासला गेला आहे. या व्यथेस तोंड फोडावे आणि समाजात पुन्हा चैतन्य यावे यासाठी ‘थिंक महाराष्ट्र…’ या वेबसाईटचा खटाटोप आरंभला आहे. वेबसाईट चालवण्यासाठी कंपनी निर्माण होत असल्याने सर्व गोष्टी औपचारिकरीत्या व सार्वजनिकरीत्या करणे शक्य होईल. सर्व वाचकांना निधी संकलन, ध्येयधोरणाची आखणी आणि वेबसाईट चालवणे व कंपनीचे अन्य उपक्रम यांमध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी अर्थातच पद्धत असेल. अशा त-हेने वाचकांचा जबाबदारीचा सहभाग आम्हांस हवा आहे. या विशेष महत्त्वाच्या गोष्टीकडे वाचकांचे लक्ष वेधून येथेच थांबतो. त्यामुळेच या शुक्रवारी ज्ञानदा देशपांडेचा ‘बृहत्कथा’ सदरातील लेख आणि नियमित सादर होणारी ‘ग्रथोपजीविये’ ही पुस्तकसूची ( संकलन : ज्योती शेट्ये) आणि नियतकालिकांतील लेखसूची ( संकलन : प्रमोद शेंडे) एवढाच मजकूर सादर केला आहे. औगस्ट महिन्यात वेबसाईटला अधिकाधिक आकर्षक रूप देण्याचा व ती सघनरीत्या आशयसंपन्न करण्याचा संकल्प सोडत आहोत… वेबसाईटच्या या कामात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या वाचकांनी जरूर
संपर्क साधावा : thinkm2010@gmail.com
– दिनकर गांगल
संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम