आधुनिक हिरकणी – लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर

2
242

डॉ. माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या भूदलातील दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर नियुक्‍ती 2020 मध्ये झाली. त्या समकक्ष पदावर जाणारी पहिली मराठी स्त्री हा बहुमान त्यांना लाभला. त्यांना 26 जानेवारी 2022 रोजी परम विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवण्यात आले. त्या निवृत्तीनंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून जबाबदारी पार  पाडत आहेत…

डॉक्टर माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या भूदलातील दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर नियुक्ती 29 फेब्रुवारी 2020 या दिवशी झाली. त्या समकक्ष पदावर जाणारी तिसरी भारतीय महिला आणि पहिली मराठी स्त्री हा बहुमान त्यांना लाभला.  त्यापूर्वी कानिटकर पुणे येथील आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता होत्या. त्या डॉक्टर त्याच महाविद्यालयातून झाल्या होत्या. त्रितारांकित अधिकाऱ्यांचे पद नौदलात व्हाईस अॅडमिरलभूदलात लेफ्टनंट जनरल तर हवाई दलात एअर मार्शल या किताबाने ओळखले जाते. लेफ्टनंट जनरलपद भूषवण्याचा पहिला मान पुनिता अरोरा यांना मिळाला आहे. त्यानंतर पद्मावती बंदोपाध्याय पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या होत्या. माधुरी कानिटकर यांना 26 जानेवारी 2022 रोजी परम विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवण्यात आले. कानिटकर लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्या जबाबदारी पार  पाडत आहेत.

माधुरी आणि त्यांचे पती राजीव असे दोघेही लेफ्टनंट जनरल असल्याचे हे  भारतीय लष्करातील एकमेव उदाहरण आहे. माधुरी यांच्यापूर्वीच राजीव निवृत्त झाले आहेत. कानिटकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात व वैद्यकीय शिक्षण बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात घेतले. त्या एम. बी. बी. एस.च्या तिन्ही सत्रांत पुणे विद्यापीठात प्रथम आल्या. पुढे त्यांनी लष्करात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर तयार करणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर लखनौ येथे लष्करी प्रशिक्षण घेतले. त्यांनी एम. डी. (शिशुरोग तज्ज्ञ) ही पदवी मुंबईमधून घेतली तर पीडियाट्रिक नेफ्रॉंलॉजीचे प्रशिक्षण नवी दिल्ली येथील एम्समधून पूर्ण केले.

कानिटकर यांनी लष्करात सदतीस वर्षे सेवा केली आहे. त्यांना लष्करात असताना अभ्यास आणि शिक्षणेतर क्षेत्रातील कामगिरी याबद्दल राष्ट्रपतींचे सुवर्णपदक 1982 मध्ये मिळाले. कानिटकर यांना कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि बालकांच्या काळजीसाठी दिलेले योगदान’ यासाठी विशिष्ट सेवा पदक (VSM) 2014  साली मिळाले. त्यांना अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) 2018 साली देऊन गौरवण्यात आले. त्या म्हणतातकी लष्करात महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी निश्चितच मिळते. त्यांनी स्वतःच स्वत:समोर अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान ठेवावे. कधीही हार मानू नये. मुली नवनवीन क्षेत्रांत मोलाचे योगदान देत आहेत. लष्करामध्येही अनेक महत्त्वाची पदे मुली सांभाळत आहेत. अनेक क्षेत्रांत मुलींना संधी उपलब्ध आहे. त्याचा लाभ मुलींनी घ्यावा. माधुरी यांनी पंतप्रधानांच्या विज्ञान-तंत्रज्ञान सल्लागार कक्षामधील एकमेव डॉक्टर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्या सांगतातकी त्यांना स्त्री अधिकारी म्हणून त्यांचे स्वतःचे अधिकार प्राप्त करण्यासाठी संघर्ष कधीही करावा लागला नाही.

माधुरी यांची पहिली नेमणूक जोधपूर येथील लष्करी रुग्णालयात झाली. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह सीमा भागातील सैनिकांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे शिवधनुष्य जम्मू काश्मीर विभागात आत्मविश्वासाने उचलले. त्या त्या क्षेत्रातील वैद्यकीय सेवा विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी अति उंचावरील सियाचीन हिमनदीसह सीमेवरील प्रत्येक ठाण्याला भेट देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. महिलांनी प्रत्यक्ष युद्धभूमीत सहभागी होण्याबाबत कानिटकर थोडा सबुरीचा सल्ला देतात. त्या म्हणतात की वैद्यकीय क्षेत्र पूर्णपणे भिन्न आहे. मुली तेथे सर्व काही करू शकतात.

कानिटकर यांच्या लष्करी सेवेतील अनेक थरारक आठवणी आहेत. पण त्यातील एक अविस्मरणीय आहे. तो प्रसंग म्हणजे त्यांचे प्रथम मातृत्व साजरे करण्यासाठी पती राजीव आठ तासांचा प्रवास करून आले आणि नवजात बाळाकडे फक्त एक कटाक्ष टाकून त्यांच्या लष्करी कर्तव्यस्थानाकडे रवाना झाले ! तेव्हा त्या जयपूरमध्ये होत्या तर राजीव यांच्या रेजिमेंटचा हिवाळी सराव जैसलमेरजवळ सुरू होता. माधुरी रुग्णालयात काम करत असताना प्रसूती कळा येऊ लागल्या. माधुरी यांनी एका प्रसूती तज्ज्ञास बोलावून घेतले. त्यांचा संदेश मिळाल्यानंतर राजीव आठ तासांचा प्रवास करून रुग्णालयात आले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना कर्तव्यकर्मस्थानी हजर होण्याचा आदेश होता. त्यांनी माधुरी यांना सांगितले, “मी जास्तीत जास्त चार वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत थांबू शकतो”. त्यांची प्रसूती चार वाजून तीस मिनिटांनी झाली. राजीव फक्त खिडकीतून माधुरी यांच्याकडे आणि बाळाकडे एक कटाक्ष टाकून रवाना झाले त्या बाळाचे नाव रेजिमेंटच्या रणगर्जनेवरून रणविजय असे ठेवण्यात आले. ती घटना 1992 सालची आहे. त्या म्हणतात, “आता सर्व स्तरांतील महिलांना बाल संगोपन रजा आणि सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळू शकते. त्यामुळे त्यांची मोठी सोय झाली आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे युद्धकाल वैद्यकीय उपचार विभागाच्या प्रमुख म्हणून काम करत असताना आलेले अनुभव त्या कधीच विसरू शकणार नाहीत. भारत सरकारने जम्मू- काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 रद्द केल्यानंतर त्यांची उत्तर विभागात नियुक्ती झाली. त्यांनी त्या विभागातील प्रत्येक महत्त्वाच्या स्थानास भेट दिली. स्वतःचे प्राण पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांच्या जीवघेण्या जखमा पाहून त्या हेलावून गेल्या. भारतीय जवान देशाच्या रक्षणासाठी जिवाची पर्वा न करता लढत असल्याचे पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. त्यांची नियुक्ती कारगील युद्धाच्या वेळी 1999 साली पठाणकोट येथे झाली होती. त्या वेळी त्यांची दोन मुले त्यांच्या आजोळी पुण्यात होती तर पती लेफ्टनंट जनरल राजीव यांची नेमणूक हिस्सार येथे झाली होती. म्हणजे हे चौकोनी कुटुंब तीन ठिकाणी विभागले गेले होते. त्या वेळी त्यांचा मुलगा नववीत असताना आणि त्याची दहावीची परीक्षा होण्यापूर्वी कोठेतरी भ्रमंती करावी म्हणून परदेशात फिरण्यास जाण्याचा बेत ठरला. आरक्षणही झाले. पण निघण्याला दोन दिवस बाकी असताना युद्ध सुरू झालेपती-पत्नी यांना कर्तव्यकामी बोलावण्यात आले. त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. माधुरी म्हणतात, “आम्ही लष्करी गणवेश परिधान केला आहे तो अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठीच.

माधुरी यांचे पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर हेही निवृत्त झाले आहेत. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक (PVSM)अति विशिष्ट सेवा पदक(AVSM), विशिष्ट सेवा पदक (VSM) आणि सेवा पदक (SM) यांनी गौरवण्यात आले आहे. माधुरी आणि त्यांचे पती राजीव असे दोघेही लेफ्टनंट जनरल असल्याचे ते भारतीय लष्करातील एकमेव उदाहरण आहे. माधुरी म्हणतात, “माझे पती राजीव यांचा पूर्ण पाठिंबा मला मिळत आला आहे. मी एकटीनेच संसार आणि लष्करी कर्तव्य पार पाडण्याची कसरत केलेली नाही. राजीव अनेक वर्षे एकटेच राहत असले तरी त्यांनी त्याबद्दल कधी तक्रार केली नाही. ते म्हणताततुझ्यासमोरचे आव्हान अधिक खडतर आहे.’ म्हणूनच माझ्यासाठी अनेक समस्या निर्माण झाल्याच नाहीत.

माधुरी त्यांच्या बढतीचा किस्सा सांगतात, “ही पदोन्नती मला मिळण्यापूर्वीच राजीव त्या पदावर पोचले होते. मी पदोन्नती मिळण्यासाठी वाट पाहत होते. परंतु ती घडत नव्हती. एकदा मी दिल्लीला अन्य एका बैठकीसाठी गेलेली असताना माझी पदोन्नती मंजूर झाली असल्याची बातमी मिळाली. त्या वेळी माझ्याकडे माझा गणवेशही नव्हता. म्हणून मी राजीव यांना दूरध्वनी करून ती माहिती दिली. ते म्हणाले, “तू यासाठी सोळा महिने वाट पाहत आहेस. आता एक क्षणही दवडू नको. राजीव माझा गणवेश आणि अन्य सामुग्री घेऊन रात्रभर ट्रेनचा प्रवास करून दुसर्‍या दिवशी सकाळी पोचले. औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्या पदावर परिधान करण्यात येणारी त्यांची टोपी त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवलीतेव्हा माझ्या भावना अनावर झाल्या.

माधुरी आणि त्यांच्या दोन बहिणी यांना नेहमीच त्यांच्या पणजीकडून स्फूर्ती मिळत आलेली आहे. त्यांच्या वडिलांच्या आजी म्हणजे डॉक्टर सरलादेवी खोत या होत. त्या गेल्या शतकात डॉक्टर झाल्या होत्या. त्यांचा बालविवाह झाला होता. त्यांनी त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षीच पतींना गमावले. तथापी त्यांच्या आजोबांनी त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सरलादेवी 1928 साली बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झाल्या आणि त्यानंतर विवाहबद्ध झाल्या. सरलादेवी आणि त्यांचे पती यांनी पूर्व आफ्रिकेत ब्रिटिश वसाहतीत अकरा वर्षे वैद्यकीय सेवा केली. माधुरी यांचे वडील भारतीय रेल्वेत अभियंता होते. त्यांच्या सतत बदल्या होत असत. त्यामुळे पुणे येथे त्यांच्या आजोळी त्यांचे आणि त्यांच्या दोन बहिणी यांचे संगोपन झाले. माधुरी एक निष्णात खेळाडू आहेत. माधुरी एका दमात दहा किलोमीटर पळत जाऊ शकतात. त्यांना अश्वारोहण आणि गोल्फ हे खेळ विशेष आवडतात. त्यांनी पॅराग्लायडिंगही केले आहे. माधुरी या एकूणच महिला वर्गासाठी पण संघर्ष आणि कष्ट करण्यास तयार असलेल्या प्रत्येकासाठी आदर्श ठरू शकतात.

– दिलीप चावरे, मुंबई 9867557327patrakar@hotmail.com

 ——————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

  1. खुप छान आणि माहितीपूर्ण लेख.लेखक श्री दिलीप चावरे यांचे अभिनंदन.माधुरी मॅडम सैन्य दलातून निवृत्त झाल्या तेंव्हा मी वृत्तपत्रात त्यांच्यावर एक लेख लिहिला होता.एका संमेलनात त्यांची भेट झाली तेंव्हा त्यांना लेख दाखवल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता.त्या संमेलनात त्यांनी अतिशय प्रेरणादायी भाषण केले होते.खूप छान बोलतात त्या. या रणरागिणीला सलाम.

  2. खुप छान आणि माहितीपूर्ण लेख.लेखक श्री दिलीप चावरे यांचे अभिनंदन.माधुरी मॅडम सैन्य दलातून निवृत्त झाल्या तेंव्हा मी वृत्तपत्रात त्यांच्यावर एक लेख लिहिला होता.एका संमेलनात त्यांची भेट झाली तेंव्हा त्यांना लेख दाखवल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता.त्या संमेलनात त्यांनी अतिशय प्रेरणादायी भाषण केले होते.खूप छान बोलतात त्या. या रणरागिणीला सलाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here