आठवणीतला खानदेशी पोळा

2
580
पोळ्यासाठी सजवण्यात आलेला बैल

पोळ्यासाठी सजवण्यात आलेला बैल     श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच गावच्या दरवाज्यात एक लाकूड आणून टाकलं जायचं. त्यापूर्वी गावात दवंडी फिरवण्यात येऊन गावातील सर्व बैलगाड्या गावाबाहेर काढायला सांगण्यात येई. एकदा दरवाज्यात लाकूड पडलं की गावातलं कुठलंही बैलगाडं गावाबाहेर जात नसे आणि गावाबाहेरचं गावात येत नसे. एकदा एकाचं गाडं दरवाज्यात लाकूड टाकल्यानंतरही गावात राहिलं तेव्हा त्यानं ते बैलगाडं गावाबाहेर नेण्यासाठी घरापासून दरवाज्यापर्यंत जुंपूनं आणलं. दरवाज्याजवळ आल्यावर गाड्याचे सगळे अवयव वेगवेगळे केले. ते एकेक करून अलगद लाकडावरून बाहेर नेले, पण त्यानं लाकूड बाजूला सारण्याचं धाडस केलं नाही.

बैलगाडं गावाबाहेर गेल्यामुळे जवळ जवळ महिनाभर, म्हणजे पोळा होईपर्यंत गावातील लोक बैलगाडं गावाबाहेरच सोडत. त्यामुळे गावाबाहेरच्या मैदानाला यात्रेचं स्वरूप होई. बैलगाडं गावाबाहेर सोडावं लागत असल्यामुळे गावातल्या शेतकर्‍यांना रोज सकाळी शेतात काही सामानसुमान घेऊन जाताना, ते  घरापासून दरवाज्याबाहेरच्या आपल्या बैलगाड्यापर्यंत आणावं लागे आणि संध्याकाळी ते परत तसंच घरापर्यंत न्यावं लागे. हे असं करणं शेतकर्‍यांना बरंच त्रासदायक होत असे. परंतु त्या बाबतीत कोणी सहसा तक्रार करत नसे. कधी कधी, रात्री जर खूप पाऊस झाला की गावाला लागून असलेल्या नदीला पूर येई आणि आपलं बैलगाडं पुराच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून तेवढ्या रात्री उठून गावाबाहेर यावं लागे आणि गाडं एकतर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवावं लागे किंवा झाडाला बांधून ठेवावं लागे.

जळगावातल्‍या भडगाव तालुक्‍यातलं कोळगाव हे माझं गाव. लहानपणी गावात पाळली जाणारी ही प्रथा मी पाहिली. या प्रथेमागे असलेलं नेमकं कारण ठाऊक नाही. ती सुरू होण्‍यासाठी एखादी दंतकथा कारणीभूत ठरली का, हेही ऐकिवात नाही. त्‍या काळात अंगणातच बैलगाड्या सोडल्‍या जायच्‍या. बैलजोडी तिथंच बांधली जायची. पावसाळ्यात बैलांमुळे घाण साचे. त्यामुळे गावात रोगराईही पसरत असावी. पावसाळ्याच्‍या काळात बैलगाड्या गावाबाहेर राहिल्‍यानं या गोष्‍टी टाळता येत असाव्‍यात आणि त्‍यासाठीच ही पद्धत सुरू झाली असावी.

कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही प्रथा गावातल्या एका वजनदार माणसाच्या सोयीसाठी अचानक मोडली गेली. त्याचं असं झालं, की शेतकी संघाच्या रासायनिक खतांचं गोडाऊन गावात होतं. त्यामुळे रासायनिक खतांचा भरून आणलेला ट्रक हा दरवाज्यात लाकूड आडवं असल्यामुळे गावाबाहेरच उभा करावा लागला आणि हमालांनी तेथून गोडाऊनपर्यंत थैल्या पाठीवरून वाहून टाकल्या. त्यामुळे हमालांना जास्त हमाली द्यावी लागली आणि ही जास्त हमाली निव्वळ ट्रक गोडाऊनपर्यंत येऊ न शकल्यामुळे द्यावी लागली. त्यामुळे शेतकी संघाच्या चेअरमनला दरवाज्यात टाकलेलं लाकूड गैरसोयीचं वाटू लागलं. त्यामुळे दुसर्‍यांदा ज्या वेळेस रासायनिक खतांचा ट्रक आला तो रात्री; आणि चेअरमनंनी त्यावेळी चक्क दरवाज्यातलं लाकूड सारून ट्रक गोडाऊनपर्यंत नेऊन खाली केला. खाली झालेला ट्रक परत गावाबाहेर गेल्यावर दरवाज्यातलं लाकूड पुन्हा जसंच्या तसं आडवं टाकण्यात आलं.

दुसर्‍या दिवशी, ही घटना गावातल्या लोकांना समजल्यावर गावातले लोक त्या बाबतीत आपापसात कुजबुजू लागले, की ‘दरवाज्यात जर मोठं लाकूड आडवं राहिलं असतं तर ते बाजूला करणं चेअरमनला शक्य झालं नसतं.’ परंतु चेअरमन हा गावातील प्रतिष्ठित आणि वजनदार माणूस असल्यामुळे त्याच्या विरूद्ध कोणी काही करू शकलं नाही. पण त्यानंतर गावातील लोकही आपापल्या गाड्या दरवाज्यातलं लाकूड बाजूला सारून घरापर्यंत आणू लागले. नंतर गावातल्या कोणी धटिंगणानं दरवाज्यातलं ते लाकूडचं फेकून दिलं आणि तेव्हापासून दरवाज्यात लाकूड टाकण्याची प्रथा बंद झाली! वास्तविक या प्रथेचा त्रास अर्ध्या गावातील लोकांनाच अधिक व्हायचा. आमचं घर गावाच्या दरवाज्याजवळ असल्यामुळे आम्हालाही या प्रथेचा फारसा त्रास व्हायचा नाही.

दरवाज्यात लाकूड टाकल्यापासूनच पोळा जवळ आल्याची चाहूल लागे. पोळ्याला आम्हा भावंडांबरोबर सालदारांनापण नवे कपडे हमखास मिळत. ते कपडे दोन महिने आधीपासून शिवायला टाकावे लागत, तेव्हा ते पोळ्याला वेळेवर मिळत. पोळ्याला कोणी कोणता बैल धरायचा यावरून आम्हा भावंडांमध्ये भांडणं होत. सर्वांना आधी पळणार्‍या बैलाला धरायला आवडे. कोणी म्हातार्‍या बैलाला धरायला तयार नसे. कोण कोणता बैल धरणार हे ठरल्यावर जो तो आपापल्या बैलाकडे अधिक लक्ष देई. जो तो सालदारांनी कापून आणलेलं हिरवंगार लुसलुशीत गवत आपल्याच बैलांना अधिक टाके. बैल कुरणात असतील तर त्या बैलांची सालदारांकडे अधिक चौकशी करत. कुरणातले बैल पोळ्याच्या एक दिवस आधी गावात आणले जायचे. दुसर्‍या दिवशी सकाळी आमची एकच धांदल उडे. सकाळीच. सालदारांबरोबर बैल धुवायला नदीवर जात असू, बैलाला चांगलं दगडानं खरडून खरडून त्याच्या अंगावरचे शेणाचे डाग काढत असू. त्यानंतर बैलांना साबण लावून स्वच्छ करत असू. सालदार लोक बैलांना खोल पाण्यात डुबकी देत. थोडा वेळ, बैलही पाण्यात पोहतात असा भास होई, त्याची गंमत वाटे. बैल धुऊन झाल्यावर बैलांच्या गेजा, साखळ्या, घोगर, घंट्या हा सर्व साज आम्ही नदीवर नेऊन, माती लावून-घासून स्वच्छ करत असू. चामडी पट्ट्यांना तेल लावून ते स्वच्छ करत असू. सकाळी गावात न्हावी फिरून बैलांच्या शेपट्यांचे गोंडे पाडत असे आणि घरी आणून ठेवलेल्या बेगड कापून देई. कुंभारानं आणून दिलेले बैल गेरू लावून सुशोभित करत असू. त्या दिवशी घरातील कोणीतरी किंवा सालदारांपैकी एकजण बैलाचा उपवास धरी.

बैलाचे औक्षण करत असताना शेतकरी     त्‍या वेळी गावची लोकसंख्‍या बाराशेच्‍या आसपास असावी. पोळ्याच्या दिवशी सकाळी आमच्या घराजवळील चावडीवर गावातील काही वतनदार मंडळी जमत. चावडीच्या बाहेर बलुतेदार गावकरी मंडळी हातात आंब्याच्या पानांची तोरणं घेऊन तयार असत. आत बर्‍याच वेळपर्यंत वतनदार मंडळींचं काही खलबत चाले. त्यानंतर त्यांच्याकडून बलुतेदार मंडळींना काहीतरी संदेश मिळे. ती मंडळी मग घरोघर जाऊन ‘चांगभलं चांगभलं’ करत अंब्याची तोरणं बांधत. जो तो मग त्यांना ‘यंदा कोना मान शे’ असं विचारी. त्यावेळेस मग ते ‘मान धोंडा पाटीलना शे’ असं उत्तर देत. मान दरवर्षी फिरता राहायचा. गावातील पोलिस पाटील, मुलकी पाटील यांचा तो मान असायचा. गावातील ठरावीक घराण्यांकडे पोळ्याचा मान पिढ्यान पिढ्यांपर्यंत चालत आलेला होता. ज्याचा मान असायचा तो स्वत: तो घेत असे किंवा भाऊबंदकीत दुसर्‍याला देत असे. तसेच तो तोरणही स्वत: घ्यायचा किंवा दुसर्‍याला द्यायचा. पोळ्याच्या बैलाचा मान गावातील वतनदार मंडळींशिवाय इतर कोणाला मिळत नसे. आमचे आजोबा ही गावातील तगडी असामी. शिवाय त्यांची बहीण या वतनदार मंडळींत दिलेली होती. त्यांनी पोळ्याच्या बैलाचा मान आपल्याला मिळावा म्हणून अनेक वर्षं प्रयत्न करून पहिला. परंतु वतनदार नातेवाईक मंडळींनी त्यांना जास्तीत जास्त म्हणजे तोरणाचा मान दिला, पण बैलाचा मान दिला नाही. त्यांच्या दृष्टीनं आमचे आजोबा हे त्या गावात परके होते, उपरे होते.

मी एका वर्षी दिवसभर बसून रामभाऊ चांभाराकडून बैल पळवण्यासाठी चामडी चाबूक बनवून घेतला होता. त्याच्याकडे पोळ्याच्या सिझनमुळे कामाची खूप गर्दी होती. दुपारी दोन-तीन वाजेच्या सुमाराला बैल शेतातून घरी येत. बैल घरी आल्यावर मग त्यांना सजवायची तयारी सुरू होई. गावात शिंगं तासणारे कारागीर नसल्यामुळे बरेच शेतकरी स्वत:च बैलांची शिंगं तासून काढत. शिंगं तासून गुळगुळीत झाली म्हणजे त्यावर हिंगूळ चांगलं लावता येई. आमच्या शेजारच्या सुपडूकडे बैलजोडी होती. त्याच्याकडे टोकदार शिंगांचा गोर्‍हा होता. त्यानं गोर्‍ह्याची शिंगं धारदार विळ्यानं तासून अणुकुचीदार बनवली. शिंगं तासून झाल्यावर त्यानं बैलाच्या नाकातील जुनी नाथ काढून टाकली आणि तो नवी नाथ बैलाच्या नाकात अडकावू लागला. पण बैल काही त्याला नाकात नाथ अडकावू देईना. तो जागेवर थयथयाट करू लागला. हा प्रकार रस्त्यावरून जाणार्‍या एका माणसानं पाहिला. तो सुपडूला उद्देशून म्हणाला, ‘अरे, ओ येडी खोपडीना तुले का बैल ले नाथ कशी घालतस ते बी तुना बापनी शिकाडं नई.’ असं म्हणून त्यानं त्याला कशा पद्धतीनं बैलाला नाथ घातली पाहिजे हे समजावून दिलं. ते तंत्र सुपडूला अवगत नसल्यामुळे त्यानं बैलाची जुनी नाथ पूर्णपणे काढून टाकली आणि नवीन नाथ ज्या पद्धतीनं तो अडकावू पाहत होता त्यामुळे गोर्‍ह्याची अणुकुचीदार शिंगं लागून त्याला अपघात होण्याची शक्यता होती. त्या माणसानं आपलं सारं कौशल्य पणाला लावून बैलाच्या नाकात नाथ अडकावली!

आमच्याकडेही सालदार लोक बैलांना नाथ, शिलदे बांधत, नवे दोर लावत, मोरखी बांधत, कोणी हिंगूळ घोटत. आम्ही रंग तयार करण्यात गुंतलेले असू. अंगणातच बैलांना साज चढवला जाई. संध्याकाळी दरवाज्याबाहेर गावातल्या सार्‍या लोकांचे बैल हळुहळू जमा होऊ लागले. वडील सालदारांना सूचना देत होते, ‘बैल सर्वासना मांग हायजोडे उभा करा. खालीपीली नको उपाद’. त्याप्रमाणे सालदार लोक दरवाज्याबाहेर सर्वात शेवटी हाळजवळ आणून आम्हाला उभे करत. तिथं सालदार लोक आपल्या हाताच्या बोटांनी बैलांच्या शिंगांना हिंगूळ लावत. असं करताना कित्येक वेळा त्यांच्या नव्या कपड्यांवर हिंगुळाचे डागही पडत. त्यानंतर सालदार लोक वडिलांबरोबर परत घरी येत. बैलांना सजवायचं राहिलेलं काम मोठा भाऊ मग त्याच्या मित्रांच्या सहकार्यानं करायला लागे. भावाचा मित्र रमेशबुवा याला चित्रकलेची आवड असल्यामुळे तो पांढर्‍या बैलांवर ‘जय भारत, जय जवान’ अशा प्रकारे लिहून त्यांना सजवी. भाऊ बैलांच्या शिंगांना बेगडी लावत. बाकी सारे आम्ही बैलांचे दोर धरून हाळवर उभे राहत असू.

बर्‍याच वेळेस, आमच्याकडे आम्हा भावंडांचे वर्गमित्रही बैल धरायला येत. जो आमच्याकडे बैल धरे त्याला त्या दिवशी आमच्याकडेच जेवण असे. बैल सजवून झाल्यानंतर आम्ही आपापला बैल पळवत नेऊन महादेवाच्या मंदिराला आणि मरीआईच्या मंदिराला फेरी मारत असू. बैल अधिक पळावा म्हणून त्याला मारतही असू. यात आम्हाला काही वावगं वाटत नसे पण काही म्हातारे मात्र कळवळून ‘बैलेसले मारू नका रे’ असं म्हणायचे. इतरांपेक्षा आपला बैल कसा पुढे पळेल यावरच आमचं लक्ष असायचं. बैल पळवताना बर्‍याच वेळा आमचे नवे कपडे बैलाच्या शेणानं, चिखलानं भरत. परंतु आम्ही त्याची पर्वा करत नसू. बैल पळवण्याचा नाद कॉलेजमध्ये जाणार्‍या गावातील तरुणांबरोबरच वयस्कर प्रौढांनाही होता.

एव्हाना गाईंचं गव्हार यायची वेळ झालेली असायची. त्यामुळे बैलं पळवणं थांबवून आम्ही हाळवरच थांबत असू. यावेळी वडील जातीनं हाळजवळ येऊन आमच्यापाशी थांबत. ‘यांना इथून हलू देऊ नका’ म्हणून सालदारांना सूचना देत. यावेळी वडिलांचं अधिक लक्ष आमच्यापेक्षा आमच्या मामाकडे अधिक असे. कारण मामाकडे गोर्‍ह्यांची चांगली जोडी होती आणि ते पळण्यात विशेष पटाईत होते. आमचं घर वरच्या गल्लीला असल्यामुळे बैलांचा ओढा साहजिकच घराकडे असायचा. मानाचा बैल याच मार्गानं जायचा. मामाला मानाच्या बैलापुढे आपला बैल पळवायची ईर्षा होती. मामानं आपला बैल मानाच्या बैलापुढे काढू नये किंवा मामाचा दुसरा बैल कोणा मित्राला देऊन त्यानंही बैल मानाच्या बैलापुढे काढू नये म्हणून वडील मामावर लक्ष ठेवून असत. मानाच्या बैलाच्या पुढे मामाचा बैल निघणं याचा अर्थ वडिलांचीच मामाला फूस असणं असा काढला जाऊन गावात बखेडा उभा राहू नये म्हणून वडील जपत.

पोळा म्हटला की दारुड्यांना ती पर्वणीच असे. कधी कधी पिणारेही त्या दिवशी पीत. वडिलही सालदारांना त्या दिवशी थोडी थोडी पाजत. सण आहे थोडीशी घेतलीच पाहिजे असं म्हणणार्‍यांची संख्या जास्त होती. गावातले काहीजण आपल्या स्वत:च्या हातानं पोरांना एक-एक दोन-दोन कप पाजत. पाजायचा उद्देश हा, की सणाच्या दिवशी पोरांनी दोन घास जास्त खावेत. दारू पाडणार्‍यांचा त्या दिवशी चांगला धंदा होई. काही लोकांच्या दारू अंगात येई. ते दारूच्या नशेत वाट्टेल ते बरळत. नाव न घेता कुणाला तरी शिव्या देत. अशा वेळी कित्येक दिवसांपासून दबून असलेल्या दुश्मनीनं भांडणांचा भडका उडे. कधी मार्‍यामार्‍याही होत. त्यामुळे एक प्रकारची भीतीही वाटायची.

गाईंचं गव्हार आल्याशिवाय पोळा फुटत नसे. आपण गाई गावात आणल्याशिवाय पोळा फुटत नाही असं पाहिल्यावर गाई चारणार्‍या गुराख्यानं एकदा खूप उशिरा म्हणजे अंधार पडण्याच्या सुमारास गाई गावात आणल्या होत्या. त्यामुळे चिडून जाऊन गावातील लोकांनी त्याला बदडून काढलं होतं. तेव्हापासून मग गुराखी गव्हारं गावात वेळेवर आणू लागला होता.

पोळ्याला सजवलेल्या बैलासोबत अनेक शेतकरी हौसेने छायाचित्र काढून घेतात     कित्येक वेळा पोळा फुटायच्या वेळेस आभाळ भरून येई आणि अचानक पाऊस कोसळून पोळ्याचा सगळा विचका होई. परंतु तरीही मान असणारी मंडळी आणि त्यांच्याशी स्पर्धा करणारी मंडळी यांच्या ईर्षेची धार त्यामुळे जराही कमी होत नसायची. ते लोक आपले बैल घेऊन भर पावसातही दरवाज्यात गर्दी करून असायचे.

गाईचं गव्हार नदीच्या पुलाजवळ आलं म्हणजे मग दरवाज्यातली वाजंत्री सुरू होई. ते पाहण्यासाठी लोक मग मारुतीच्या पारावार दरवाजाच्या भिंतीवर, चावडीच्या ओट्यावर, गल्लीतले लोक धाब्यांवर उभे राहून पोळा फुटायची गंमत पाहत. दरवाज्याच्या लाकडापुढे मानाचा बैल उभा राही. मानाचा बैल हा आकर्षक रीतीनं सजवलेला असायचा. बैल तरुण आणि चपळ असायचा. तो तरुण नवे कपडे घालून, पानानं तोंड रंगवून आणि थोडीशी झोकलेलाही असायचा. त्याच्या भाऊबंदातले दहा, वीस लोक दरवाज्यात गर्दी करून उभ्या असलेल्या चार-पाचशे बैलांच्या लोढ्यांला मागे रेटत असायचे- जेणेकरून मानाच्या बैलाच्यापुढे कोणी बैल काढणार नाही याची ते काळजी घ्यायचे. होळी चौकाच्या डाव्या हाताच्या गल्लीत हातात मोठमोठ्या काठ्या घेऊन गावकरी मंडळी रांगेनं उभी राही. मानाचा बैल डाव्या गल्लीत वळू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येई. मानाचा बैल पिखाड्यापर्यंत सुरक्षित निघून गेला आणि त्यानंतर पोळा फुटला म्हणजे मग मानवाल्याचा मान राखला जाई आणि त्याची सगळी भाऊबंदकी त्यासाठी धडपडे. तर गावातल्या तरुणांची धडपड मानाच्या बैलाच्या पुढे आपला बैल नेण्यासाठी असे. सगळे बघे लोक जीव मुठीत घेऊन ही स्पर्धा पाहत उभे राहत. वाजंत्रीवाले, भेरवाले, डफवाले, शिंगवाले मोठमोठ्यानं आपापली वाद्यं वाजवत असत. गाईचं गव्हार गावात घुसण्यासाठी त्यांना वाट करून दिली जाई. शेकडो बैलांच्या आणि माणसांच्या गराड्यातून एकेक गाय दबकत, बिचकत गावात घुसे. दशरथबाबाच्या गोठ्याच्या ओट्यावर गावातील प्रतिष्ठित मंडळी पांढर्‍या स्वच्छ कपड्यांमध्ये उभी असत. त्यांच्या बाजूला दोन पोलिस गणवेषात हजर असत. गाईंचं गव्हार निघून गेल्याबरोबर पुन्हा दरवाज्यात एकच रेटारेटी होई. मानवाल्याचे भाऊबंद हातात काठ्या घेऊन दरवाज्यातल्या बैलवाल्यांना मागे रेटत. अशा गर्दीत एखाद्या बैलाला तडाखा बसून तो बिथरे, तर कधी कधी बैल धरणार्‍यालाच तडाखा लागून तिथंच भानगड उभी राही. त्याबरोबर मागच्या बैलवाल्यांचा रेटा दरवाज्यात आडव्या असणार्‍या लोकांना धडक देऊन सुसाट पळे. यात बैल अडवणारे बैलांच्या तडाख्यात सापडून त्यांना बैलांच्या पायांचा प्रसाद मिळे. दरवाज्यातली सर्व गर्दी हटल्यावर मग रिकाम्या झालेल्या मैदानातून बैल पळवायला आम्हाला स्फुरण चढे. चांगला पळणारा बैल आपण यावर्षी धरू असं मनाशी कित्येक दिवस आधी ठरवूनसुद्धा ऐनवेळी मात्र एखादा न पळणारा म्हातारा बैलच धरावा लागे, मी कितीही धुसफूस केली तरी वडिलांनी दटावल्यावर मला नाइलाजानं म्हातारा बैल पळवण्यावरच समाधान मानावं लागे. मी सर्वात लहान म्हणून माझ्यावर सालदाराचा सक्त पहारा राही. हा म्हातारा बैल चाबकाचे अनेक फटकारे खाऊन आणि शेपटी पिरगाळूनही माझ्याकडून पळेना. शेवटी चिडून त्या बैलाच्या शेपटीचा मी कडकडून चावा घेई. तेव्हा कुठे तो एवढातेवढा पळायला लागे. दरवाज्यात आल्यावर डफ वाजवणारा मला पाहून जोरजोरानं डफ वाजवून प्रोत्साहन देई. तेवढ्यात बैल आमच्या अंगणात येऊन उभा राही. ओट्यावर बहिणींनी मांडून ठेवलेलं बैलाच्या पूजेचं साहित्य असे. घरची पूजा आटोपली की सालदार मला कडेवर घेई आणि सर्व गावात बैलाची पूजा करत फिरवून आणी. गावात सर्वत्र बैलांचं शेण, चिखल आणि बैलांच्या खुरांनी तुडवलेली जमीन दिसे. एव्हाना अंधार पडत येई. सर्वजण गावातून बैल फिरवून आल्यावर जेवणाची तयारी होई. एका बैलाची विधिवत पूजा होऊन त्याला पुरणाची पोळी खायला घालत. ती इतर बैलांनाही ती थोडी थोडी देत. आम्ही सर्व भावंडं, बैल धरणारे आमचे मित्र, सालदार अशी मोठी पंगत बाजूच्या घरात बसत असे.

पोळ्याला सजवलेल्या बैलासोबत अनेक शेतकरी हौसेने छायाचित्र काढून घेतातदरवर्षी मानाचा बैल निघायच्या वेळेस थोड्याफार भानगडी होत. पण काही समंजस लोक त्या मिटवून टाकत. म्हणून दरवाज्यात इतर बैलांना मागे हटवण्यासाठी पैलवान उभा असे. तो हातातील चाबकानं बैलांना मारत मागे रेटायला लागला. त्याच्या चाबकाचे फटकारे बैलांना अंदाधुंद बसायला लागले. त्यामध्ये बैलांबरोबरच बैलांच्या मालकालाही ते तडाखे बसायला लागले. त्याचा बैल हटवण्याचा आवेश एवढा प्रचंड होता की त्यामुळे बैल एकदम मागे सरकले. त्या रेटारेटीत कोणी बैलांमध्ये दाबला गेला तर कोणाच्या पायावर बैलांनी पाय दिले. तो निर्दयपणे बैलांना मार देत मागे हटवत होता. बर्‍याच जणांना त्याच्या चाबकाचा प्रसाद मिळाला. तडाखे बसलेल्या लोकांची पैलवानाशी बाचाबाची सुरू झाली. पैलवानाला समंजस मंडळी समजावू लागली. पण त्याचं म्हणणं असं की मी लोकांना मागे हटवण्यासाठी पहिल्यांदा विनंती केली, पण ते मागे हटले नाहीत, म्हणून मी बैलांना मार दिला. पण ज्या लोकांना पैलवानाच्या चाबकाचा प्रसाद मिळाला होता त्यांचं म्हणणं असं की पैलवानानं बैलांना मागे हटवायचं निमित्त साधून आम्हाला मार दिला.

खरं म्हणजे पैलवानाचं त्या लोकांशी असलेलं जुनं वैमनस्य उफाळून बाहेर आलं. पैलवानानं तावातावानं गावातल्या रेटारेटी करणार्‍या पुढार्‍यांना शिवीगाळ केली. पोळा फुटून गेल्यावर आपल्या भाऊबंदकीतल्या पुढार्‍याकडे म्हणजे नानासाहेबांकडे सगळे गेले. नानासाहेब हे गावातील प्रतिष्ठित व्‍यक्‍ती होते. तर पैलवान हा तसा गावगुंड होता. नानासाहेब आणि पैलवान एकाच गल्‍लीत राहत असत. दोघांमध्‍ये आधीपासूनच वाद असल्‍यामुळे नानासाहेबांनाही त्या पैलवानाची जिरवायचीच होती. नानासाहेबांचे भाऊबंद स्वत:हूनच त्याला अद्दल घडवा म्हणून विनवायला आले होते. नानासाहेबांना चेव आला आणि ते पैलवानाच्या मागे लागले. काही लोकांनी पैलवानाची समजूत काढून त्याला पुढे नेलं. पैलवान शिव्या देत पुढे चालत होता आणि नानासाहेबांना त्यांचे भाऊबंदकीतले लोक ‘देख तो कसा गायादी र्‍हाईना’ म्हणून नानासाहेबांना चेव आणत होते. ही वरात आमच्या घरासमोरून जाताना वडिलांनी पाहिली. त्यांनी नानासाहेबांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेळपर्यंत नानासाहेबांचा पारा अतिशय चढलेला होता. त्यांना अडवणार्‍या वडिलांना ते म्हणाले, ‘तू बाजूले व्हय मामा, आज मी येनी देखीज लेस’. वडिलांनीही नानासाहेबांचा रौद्रावतार पाहून त्यांना समजावण्याचा नाद सोडून दिला. नानासाहेबांचा आवाज ऐकून त्यांच्या भाऊबंदकीतले लोक गावात बैल फिरवणं सोडून आणि जेवण करणंही सोडून नानासाहेबांच्या मदतीला धावून येत होते. येताना प्रत्येकाजवळ मारामारीसाठी लागणारी आयुधं- काठी, रुमणं, शिंगाडे असं काहीना काही होतं. दोन्ही पार्ट्या हमरीतुमरीवर आल्याची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली. पैलवानाचे भाऊही त्याच्या मदतीला धावून आले.

गावातली तटस्थ मंडळी मारामारी होऊ नये म्हणून निकराचा प्रयत्न करत होती. पैलवानाला पुढे पुढे घेऊन जात होती. पण नाना काही त्याचा पाठलाग सोडत नव्हते. रस्त्यात मध्येच नानांचा मित्र-मारवाडी नानांना समजावण्यासाठी पुढे आला. पण नानांनी त्याच्या एक थोबाडीत ठेवून त्याला हाकलून दिलं. मारवाडी गाल चोळत ओट्यावर चढला. ओट्यावरून त्याचा भाऊ मारवाडीला ‘ले थारी भारी दोस्ती थी ना’ असं म्हणाला. त्यानंतर उशिरानं नानांचा लहान भाऊ आला. नानांनी त्याच्या कमरेत लाथ घालून ‘भडवा, मना मुडदा पडता. मंग तू येता का?’ असं म्हणून त्याला खणकावलं. नानांच्या बरोबरची एवढी गर्दी पाहून पैलवानही मागं फिरत होता. पण मध्यस्थी करणारे त्याला त्याच्या घराकडे ढकलत होतं. गल्लीत माणसं मावत नव्हती. गावाला जत्रेचं स्वरूप आलं होतं. मध्यस्थी करणार्‍यांनी कसंतरी त्याला त्याच्या घरापर्यंत पोचवलं. पैलवान मागे हटत आहे हे पाहिल्यावर नानांकडंच्यांना चेव चढला, ते गर्दी करू लागले. नानांकडचे, मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलंच, वाट्टेल तशा शिव्या देत पैलवानाला आव्हान देऊ लागले. कुठलीच पार्टी मागे हटायला तयार होईना. दोन्ही पार्ट्यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहिला. पैलवानाच्या घरासमोरची ही गर्दी तो घरात गेल्यावरही हटेना.

नाना बरेचसे शांत झाले होते. पण नानांचे पुतणे काही हटत नव्हते त्यांनी पैलवानाच्या घरासमोर गर्दी केली. काही वेळ आम्हाला असं वाटलं, की हे भांडण शांत होणार. नाना शांत झाले होते पण पैलवानानं त्याचं राखीव हत्यार, भाला बाहेर काढला. त्याच्याजवळ लाकडी काठीला लावलेला लोखंडी भाला होता. भाला काढण्याचा पैलवानाचा उद्देश कदाचित त्याच्या घरासमोरची गर्दी हटवण्याचा आणि मी तुम्हाला अजून घाबरत नाही असं दाखवण्याचा असावा. पैलवानानं भाला काढल्याबरोबर बरेचसे शांत झालेले नाना आणखी उठले. सेनापती उठल्यावर त्याची सेनाही उठली आणि मग मध्यस्थी करणार्‍यांना न जुमानता दोन्ही पार्ट्या एकमेकांवर तुटून पडल्या. बर्‍याच वेळपर्यंत एकच हाणामारी चालली. पैलवानाचा भाला एकाच्या हाताला लागला आणि तो रक्तबंबाळ झाला. पैलवानाच्या भावाच्या हातातील लाकडाचा तडाखा नानांच्या लहान पुतण्याला बसल्यामुळे तो मूर्छित पडला. मध्यस्थी करणार्‍यांनी त्याला कसंतरी बाजूला नेलं. त्या पोराला धरून त्याची आई, बहीण, काकू रडायला लागल्या. यामुळे नानांच्या भाऊबंदांना अधिक जोर चढला आणि ते पैलवानावर तुटून पडले. पैलवान चांगलाच ठोकला गेला. त्याचे दोन भाऊही ठोकले गेले. नानांकडचेही दोन-तीन लोक चांगले जायबंदी झाले. शेवटी, दोन्ही पार्ट्यांचा बराच आवेश ओसरल्यावर, पोलिस आले. तोपर्यंत वातावरण बरंच निवळलं होतं. मध्यस्थी करणार्‍यांनी गावाची बेइज्जत होऊ नये म्हणून पोलिसांना वाटेला लावलं. नाना मग ओट्यावर बसून आपल्या कोणत्या भाऊबंदांनी मारामारीत भाग घेतला नाही त्यांना शिव्या देऊ लागले. नानांचे एक भाऊबंद मारामारीतून माघार घेत तटस्थ राहिले, तर पैलवानाच्याही काही लोकांनी अंग काढून घेतलं. त्यामुळे मारामारी सौम्य झाली. नाहीतर दोन-चार लोकाचे मुडदे नक्कीच पडले असते. मारामारी थांबली तरी दोन्ही बाजूंच्या लोकांच्या तोंडचा पट्टा चालू होता. बघ्यांची गर्दी कमी झाली नव्हती. आणि ज्या बैलाच्या मानावरून ही मारामारी झाली होती त्यामुळे राग येऊन यापुढे मान ही प्रथा बंद करायची आणि ज्याला पाहिजे त्यानं बैल सजवून मिरवायचे अशी घोषणा पोलिस पाटलानं केली. तेव्हापासून ती प्रथा बंद झाली. इतका वेळपर्यंत, आम्ही घरी नाही असं पाहून वडिलांनी भावाला आमच्या शोधासाठी पाठवलं. आम्ही घरी आल्यावर वडिलांच्या जीवात जीव आला.

त्यानंतर पोळ्याचा मान गाईला तरी असू द्यावा म्हणून काही लोकांनी प्रयत्न केले. परंतु एक गाय दरवाजातून गावात घुसत नाही तोपर्यत लोक पोळा फोडायला लागले. आता गावात गाईंचं गव्हारच राहिलेलं नाही. आमच्याकडे एकही बैल नाही. दरवाज्यात पोळ्याच्या बैलांची पूर्वीसारखी गर्दी होत नाही. कोणी-केव्हाही बैल पळवला तरी त्याला कोणी अडवत नाही. पूर्वीच्या मानानं बैलांची संख्याही खूप कमी झाली आहे. पण पूर्वीची आठवण झाली म्हणजे मनातल्या मनात हसायला येतं!

– साहेबराव अर्जुन महाजन, मु. पो. कोळगाव, तालुका भडगाव,
जिल्‍हा जळगाव, पिन कोड – 425105
मोबाइल – 9763779709,

टीपः

बेगड – बैलांच्‍या शिंगांना लावला जाणारा चमकणारा कागद. या बेगड शब्‍दावरूनच बेगडी हा शब्‍द तयार झाला.

हिंगुळ – बैलांच्‍या शिंगांना लावला जाणारा रंग

गव्‍हार – गाईगुरांचा कळप.

घोगर – ही घंटीप्रमाणे असते. मात्र खालील बाजूने लहानसे छिद्र असते. त्‍यात मध्‍यभागी एक छोटा खंडी गोळा असतो. पितळापासून तयार केलेला हा घोगर बैलाच्‍या गळ्यात बांधला जातो. बैलाच्या हालचालीसोबत हा घोगर खुळखुळ्याप्रमाणे वाजतो.

गेजा – चामडी पट्ट्यात अडकावलेले मोठे पितळेचे घुंगरू. हा पट्टा बैलाच्‍या गळ्यात शोभेसाठी घातला जातो. बैल धावत असताना त्‍याचा मंजुळ आवाज येतो. हा बैलाचा साज समजला जातो.

सालदार – सगळ्या प्रकारच्‍या कामांसाठी वर्षभराकरता नियुक्‍त करण्‍यात आलेला माणूस. एक प्रकारे व्‍यवस्‍थापकच. सालदार हा कुटुंबाचा घटकच समजला जात असे. अजूनही काही ठिकाणी ही पद्धत आढळते.

गोर्‍हा – तरूण बैल.

नाथ – वेसण.

शिलदा – बैलाच्‍या डोक्‍याला गुंडाळलेला गोंडेवाला दोर.

मोरखी – बैल आकर्षक दिसण्‍यासाठी त्‍याच्‍या तोंडावर बांधण्‍यात येणारा, बारीक दोरीपासून बनवलेला साज.

हाळ – चुन्‍याने तयार केलेला आयताकृती हौद. उन्‍हाळ्यात बैलांना पाणी पाजण्‍यासाठी वापर.

भेरवाले – पितळ्याचे फुंकून वाजवण्‍याचे वाद्य. हे वाद्य न्‍हावी समाजाकडून वाजवले जाई.

शिंगवाले – तुतारी वाजवणारे. तुतारीचा आकार बैलाच्‍या शिंगाप्रमाणे असल्‍याने यास शिंग असे म्‍हटले जाई.

रूमणं – वखराला लावलेल्‍या हातात धरण्‍याच्‍या लाकडी दांड्याला रूमणं असे म्‍हणतात.

शिंगाडे – बैलगाडीचालक आणि बैल यांच्‍या दरम्‍यान असलेल्‍या लाकडी फळीवर बेचके असलेले दोन दांडे बसवले जातात. या दांड्यांनाच शिंगाडे म्‍हणतात.

महाजालावरील इतर दुवे –

सर्जा – राजाचा सण; पोळा

पोळा

About Post Author

2 COMMENTS

  1. खांदेशातील बैलपोळा सणाला काय महत्त्व होते यासंदर्भात साहेबराव महाजन सरांनी यथार्थ वर्णन केले आहे… त्यांनी या लेखाद्वारे अगदी ग्रामीण भागातील पोळ्याचे सुंदर व वास्तव चित्र रेखाटले आहे…
    त्यांच्या या लेखनशैलीस दाद दिली पाहिजे….
    धन्यवाद सर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here