आजचे नाटक – माणसाच्या आतड्याच्या आत शिरून लिहिलेले…

_aajache_natak_1.jpg

तरुण पिढी ही नेहमीच पाथब्रेकर असते; नवीन गोष्टी निर्माण करणारी असते. पण सध्या, या पिढीतील लोकांना उसंत नाही; बंडखोरी करण्यासाठी उसंत मिळू नये याची संपूर्ण तरतूद केली गेली आहे. कॉलसेंटर्स, मॉल्स आणि चटकन मिळणारा पैसा – तो टिकवण्यासाठी करावी लागणारी मेहनत. कॉण्ट्रॅक्ट बेसिसवरील नोकऱ्या, पेन्शन नाही – रिटायरमेंटची त्यांची सोय त्यांनीच करून ठेवायची! आता, काही तुम्हाला मिळणार नाही हे सांगणाऱ्या जाहिराती… यामुळे आजच्या पिढीतील राग त्यांना थकवून टाकून संपवला जात आहे.

आमची आजची पिढी, त्यामुळे, बंडखोर असण्याच्या नुसत्या कल्पनेवर भाळते. आमची बंडखोरीचे गवेराचे प्रिंट्स असलेले टीशर्ट्स घालून किंवा कबीर आणि मीराचे दोहे ‘कोट’ करून कधीकधी संपते. ज्या गोष्टीला विरोध करायचा आहे ते नेमके काय आहे हेच कळेनासे झाले आहे. ती कदाचित आणि सर्रास ‘रूट्स’कडे जाणे म्हणजे ‘ट्रॅडिशनल’ किंवा ‘कन्वेन्शनल’ होणे असेही मानते. अभिजाततावाद वेगळा आणि अंधपणे ‘ट्रॅडिशन्स’ना पुनरुज्जीवित करणे वेगळे; आणि आम्ही नेमके तेच करतो! लग्नात खर्च करून सप्तपदी, कन्यादान, मंगळसूत्र, सोने करणे, घरात गणपती बसवणे, जेथे मागील पिढी चुकली आहे तेथे तिला न टोकणे, मागील पिढीवर टीका न करणे इत्यादी.

आणि मग हेच कलेतही खूप वेळा उतरते. कशालाच विरोध न करता सगळ्यांना भावेल, आवडेल, रुचेल असे लोकाभिमुख काम करत राहायचे! काहीतरी नवीन विषय आणि फॉर्म घेतल्याचा दावा करून अत्यंत ‘कन्वेन्शनल’, मागील पिढीचे कौतुक करणे किंवा चुका पदरात घालणे, री पुढे ओढणे. तसे आजच्या बऱ्याच प्रायोगिक नाटकांतही दिसते, जाणवते.

आमच्या पिढीवर सरसकट हा आरोप केला जातो, की इतिहासाला समजून न घेता केले जाणारे नाटक. वैयक्तिक आणि व्यक्तिगत आयुष्याचा मांडलेला पट आणि त्यामुळे या पिढीची नाटके राजकीय किंवा सामाजिक होत नाहीत, पण ते आरोप एका असमंजस दृढ कल्पनेतून निर्माण झालेले आहेत. तरुण पिढी आज प्रत्येक गोष्टीत मेहनत व अभ्यास करूनच काम करते. अगदी तद्दन व्यावसायिक टेलिव्हिजनमधील डान्स ‘शोज’मध्ये येणारी लहान लहान मुले बघितली तरी ते कळेल. ते नाचाच्या ‘कॉम्पिटिशन’मध्ये येतात तेव्हा त्यांना चित्रपट संगीतावर थिरकणे माहीत असते, पण कालांतराने ते ‘सालसा’, ‘बोल डान्स’, ‘बेली डान्स’, शास्त्रीय नृत्य असे अनेक प्रकार शिकतात, जाणून घेतात आणि ते अप्रतिम रीत्या ‘परफॉर्म’ करतात. ‘रिअॅलिटी शोज’ हे बरोबर की चूक ही गोष्ट आपण बाजूला ठेवू, पण मेहनतीला पर्याय या पिढीकडे तरी नाही. स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे सतत नवनवीन गोष्टींबद्दल अपडेट राहवे लागते. ‘नवीन’ येणाऱ्या मोबाइलच्या ‘हँडसेट’पासून, ‘डाएट फूड’पर्यंत किंवा लादेनपासून ते मार्क्स आणि लेनिन यांच्यापर्यंत. ‘इन्फर्मेशन’च्या अतिभरण्यामुळे की काय, आजच्या पिढीला स्वतःची ‘आयडियॉलॉजी’ ठरवणे अशक्य झाले आहे. ‘इन्फर्मेशन’ अतिभरण्याचाच दुष्परिणाम म्हणता येईल. त्यात अजून एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. तरुण पिढीसमोर काय आणि कोणता इतिहास मांडला जातो? त्याच्यापर्यंत मुळात गाळीव इतिहास पोचत असतो. तो खूपदा अत्यंत ‘बायस्ड’ पद्धतीने लिहिलेला असू शकतो. त्या इतिहासाला पाया धरून तयार झालेल्या कलाकृतीही – नाटक, सिनेमे, कविता इत्यादी खूपदा ‘बायस्ड’च होऊ शकतात. मला वाटते, येथे चूक तरुण पिढीची नसून मागील पिढीची आहे, की मागील पिढीला असेच छुपे जातीयवादी नाटककार आणि कलाकार निर्माण करायचे आहेत?

आजचा काळ हा गोंधळाचा आहे, निराशेचा आहे, मानसिक अस्थैर्याचा आहे. पण जसा ‘अॅबसर्ड’ नाटकांचा काळ दुसऱ्या महायुद्धानंतर आला, अस्तित्ववादी साहित्याचा उगम झाला. कोणी ‘अॅबसर्ड’ नाटक लिहिणार असे ठरवून ते साहित्य लिहिले गेले नाही. ते परिस्थितीजन्य होते. अनेक जण काहीच बदल होत नाही, काही घडत नाही, कोठलीच आशा नाही या सरसकट भावनेतून लिहू लागले, कलेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले आणि मग त्या ‘अॅबसर्ड’ किंवा ‘एक्झिस्टेंशिअॅल’च्या व्याख्येत बसवले गेले. आजचा काळ हा घडण्याचा आहे. रोज नवीन काहीतरी सातत्याने, घडत आहे. अशा वेळेस लेखक-कलावंताचा ‘फॉर्म’ काय असेल? आहे?

_aajache_natak_2.jpgएक गोष्ट अनेक चित्रपटांमधून, कवितांमधून आणि अगदी ‘फिल्म’च्या ‘लिरिक्स’ व ‘म्युझिक’मधून प्रकर्षाने जाणवते, की त्यांनी कात टाकली आहे आणि जे घडत आहे ते नवीन आहे!  पण ते काय आहे? आतापर्यंत, भावनांना सोपे करून गोड गुलाबी वेष्टनातील चित्रपट बनत. पण आज, अनेक नवीन चित्रपटांमधून, कविता-संगीत यांमधून वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न होतो. माणसाच्या आतड्यांच्या आत शिरून त्यांची चिरफाड केली जात आहे आणि ते कलाकृतींमधून मांडले जात आहे. गोष्टी कदाचित जुन्याच आहेत, पण त्यातील ‘रोमॅण्टिसिझम’ची व्याख्या बदलली आहे. नवीन चित्रपटांमुळे (उदाहरणार्थ, ‘देव. डी’, ‘लव्ह, सेक्स और धोखा’, ‘सोचा ना था’, ‘ओय लकी लकी ओय’ या मेनस्ट्रीम बॉलिवूड चित्रपटांनीदेखील) भारतीय चित्रपटात स्त्रीची शूचिर्भूत, सोज्वळ आणि ‘व्हर्जीन’ ही प्रतिमादेखील बदलली आहे, पुसली गेली आहे. शिवाय, त्या चित्रपटांची गंमत म्हणजे जवळपास त्या सर्व चित्रपटांनी बॉलिवूडच्या तद्दन सिनेमातील अविभाज्य घटकांना तसेच ठेवले आहे. उदाहरणार्थ, गाणी. पण त्यांचा वापर अत्यंत वेगळ्या पद्धतीने केला गेला. त्यामुळे त्या चित्रपटांच्या संगीतात आणि गाण्यांच्या शब्दांतही नावीन्य आले. उदाहरणार्थ, ‘तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार, तेरा इमोशनल अत्याचार’. समाजव्यवस्थेच्या भोंदुगिरीवर त्यातून ताशेरे ओढले गेले. दांभिक सोफेस्टिकेशनच्या आत जमलेल्या जुनाट संकल्पनांच्या चरबीचे विच्छेदन केले गेले. अनेकदा, जुन्या संकल्पनांची मोडतोड केली गेली. ‘रेट्रो’ आणि ‘व्हिण्टेज इमेजेस’ वापरून त्यांची आजच्या काळाशी सुसंगत अशी पुनर्रचना केली गेली आणि सगळ्यात गंमत म्हणजे त्या चित्रपटांनी या सगळ्याकडे एका सटायरिकल पद्धतीने बघण्याचा नवीन चष्मा दिला. त्यातील विनोद हा आजचा आजच्या जगण्यातून आलेला आहे. बॉलिवूडचा चित्रपट याबद्दल इतके लिहिण्याचे कारण म्हणजे मला वाटते, की तो आजचा फॉर्म आहे. तोच फॉर्म आजच्या नवीन नाटकांचाही कदाचित असू शकतो. ज्याला आपण कातड्याच्या आतील आतड्याचे नाटक म्हणू शकू.

दोन परदेशी अनुवादित नाटके मराठी रंगभूमीवर नुकतीच झाली –

खिडक्याः ओरिजिनल जर्मन नाटक, Clemens Madge नावाच्या नाटककाराचे गिरीश जोशी यांनी अनुवादित आणि दिग्दर्शित केलेले. त्यात अल्झायमर झालेल्या म्हाताऱ्या स्त्रीला तिचा नातू कॉम्प्युटर शिकवतो आणि ती तरुण मुलगी म्हणून ब्लॉग लिहू लागते! तिची स्वतःची आणि त्या काल्पनिक पात्राची सरमिसळ तिच्या आयुष्यात होऊ लागते.

तिची सतरा प्रकरणेः मूळ Martin Crimp या ब्रिटिश लेखकाचे नाटक ‘अटेंप्ट्स ऑन हर लाईफ’. त्यात एका मेलेल्या स्त्रीबद्दल उठणाऱ्या वावटळी, अफवा, चर्चा-गॉसिप याबद्दल बोलले गेले. ती कोण होती? वेश्या, कलाकार, दहशतवादी की एक सामान्य जीवन जगणारी स्त्री? मूळ नाटक जे सांगू पाहते ते खूप महत्त्वाचे वाटते.

या दोन नाटकांचा उल्लेख मी येथे करते, कारण ही आणि यासारखी नाटके आजचा काळ खऱ्या अर्थाने रिप्रेझेंट करतात. ‘मिडिया’चे प्रत्यक्ष आयुष्यात शिरणे-घुमणे, आणि त्यामुळे बोथट झालेल्या मानवी संवेदनांचा अप्रतिम नाट्याविष्कार दोन्ही नाटकांत दिसतो. आजचे नाटक असे आहे. किंबहुना असे इतके ‘ब्लण्ट’, उघडे-नागडे, गुंतागुंतीचे असावे.

सारा केन या ब्रिटिश नाटककाराचा, तिच्या ‘४.४८ सायकोसिस’ या नाटकातील एक संवाद मला नमूद करावासा वाटतो.

“Have you made any plans?” Take an overdose, slash my wrists then hang myself. “All those things together?” It couldn’t possibly be misconstrued as a cry for help.”

मला असे वाटते, की लिहित्या असलेल्या आजच्या अनेक नाटककारांचा प्रवास त्या दिशेने चालला आहे. अजून थोडी वाट बघितली आणि नवीन नाटके व नाटकातील ऊर्जा टीका करून मारून टाकली गेली नाही तर असाच नवीन फॉर्म आणि आशय घेऊन नवीन नाटके रंगमंचावर येतील.

– मनस्विनी लता रवींद्र, manaswini.lr@gmail.com
(प्रिय रसिक, जून २०१८ वरून उद्धृत)

About Post Author