आगरी बोलीभाषा

0
45
_Aagari_Boli_Carasole

पेण, अलिबाग या नगरांतील आणि वडखळ, पंजर, माणकुले या गावांतील वाणीला सर्वसामान्य लोक आगरी बोली असे म्हणतात. निसर्ग या एकाच अर्थक्षेत्राचा विचार केला तर डोंगर, ढग, दरड, नदी, पाऊस, वारा यांसारखे, प्रमाण मराठीतील शब्द आगरीत आहेत. नल (नदी), दर्या (समुद्र) यांसारखे पर्यायही आहेत. आगोट (पावसाची सुरुवात) आयटा (भात आपटण्याचा बाक), आराड (जलप्रवास), आरव (कापलेल्या भाताची पेंडी), उसळी (पावसाची सर), ऊल (कांद्याची रोपे), करटी (एक प्रकारची कोळंबी), कवजा (सदरा), किटालो (कुंपण), केगयी (समुद्रपक्षी), कोझेरी (भोवळ), खरगळ (ओसाड जमीन), खला (अंगण), खुलगा (रेडा), गवना (शेतातील पाणी वाहून जाण्याची वाट), व्हाल (ओहोळ) असे खास आगरी शब्दही कितीतरी आहेत.

उच्चारणात आगरीमध्ये मराठीतील ‘ण’, ‘ळ’ आणि ‘ड’ हे ध्वनी ‘न’, ‘ल’ आणि ‘र’ असे होतात. नासिक्यरंजनाचा अभाव हे आगरीचे आणखी एक वैशिष्ट्य. आगरीमध्ये पुल्लिंगी व नपुसकलिंगी एकवचनी नामांमध्ये क्रियापदरूपात किंवा सर्वनामात फरक होत नाही. ‘तो वाघ परला’ आणि तो झार ‘परला’ अशी समान रूपे होतात. वर्तमानकाळात तर ‘परतं’ असे एकच रूप तिन्ही लिंगांत येते. आगरीचे विभक्ती प्रत्यय मात्र प्रमाण मराठीसारखे आहेत. मराठीतील ‘- णार’ प्रत्ययान्त क्रियापद आगरीत नाही. मराठीत ‘आहे’ हे साहाय्यकारी क्रियापद वाक्यात गाळता येते. साहाय्यकारी क्रियापदाचा हा लोप कोकणी, आगरी, मालवणी या अन्य बोलींतही दिसतो. म्हणजे या भाषाबाबींनुसार त्या सर्व ‘वाणी’ मालवणीबोली समान आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मराठी’ वाणी कशी आहे? आमडोसा, शेरले, कुबल, कोचरे, बावशी, उमर माळ, काळकाई, दहीबाव, रेडी (= शिरोडा) यांसारख्या गावांत आणि वेंगुर्ला यासारख्या नगरांत बोलल्या जाणाऱ्या मराठी ‘वाणी’ला मालवणी बोली असे सर्वसाधारण नाव दिले जाते. त्या ‘वाणी’ची प्रमुख लक्षणे कोणती? ‘निसर्ग’ या अर्थक्षेत्रातील डोंगर, रान, सूर्य, चंद्र, वारा, पाऊस यांसारखे प्रमाण मराठीतील शब्द मालवणीत आहेत. तर न्हय (नदी), दर्या (समुद्र), पावळी (पागोळी), तारू (जहाज), घळण (दरी) यांसारखे प्रतिशब्दही मालवणीत येतात. व्हाळ (ओढा), सुरमई वारे (मतलई वारे), पाणंद-गवण-गोपा (पायवाट), सायबाय (शेवटचा पाऊस), भिनभिना (कातर वेळ), दडाक (पावसाची सर) हे शब्द खास या वाणीचे. शब्दारंभी महाप्राणस्फुटता (उदाहरणार्थ, पुढला > फुडला, कोपरा > खोपरा, जाळी > झाळी, उंदीर > हुनीर, गडगड > घडघड, बाशिंग > भाशिंग) तर अन्त्यस्थानी व मध्यस्थानी त्याचा लोप (उदाहरणार्थ, गोठा > गोटो, वल्हे > वली, पेंढी > पेंडी, काठ > काट, कोथिंबीर > कोतिंबीर) हे या वाणीचे उच्चारातील एक वैशिष्ट्य. संयुक्त व्यंजनांचे एकव्यंजनी सुलभीकरण (उदाहरणार्थ, डुक्कर > डुकर, गल्ली > गली, अक्का > आका, वैद्य > वेद, भिंत > भीत, पोस्टमन > पोसमन, सर्प > सोरप, ग्रीष्म > गीम) हे मालवणीचे आणखी एक वैशिष्ट्य. प्रमाण मराठीतील प्रारंभीच्या ‘ओ’ या स्वराजागी ‘व’ या अर्धस्वराचा वापर (उदाहरणार्थ, ज्योत > ज्वात, सोंड > स्वांड, ओवाळणी > ववाळणी) अशी अनेक उच्चार-वैशिष्ट्ये सांगता येतील. मालवणीत व्यंजनान्त नामे सर्व लिंगांत आढळतात; पण पुल्लिंगात ‘ओ’कारान्त, स्त्रीलिंगात ‘ई’कारान्त व नपुसकलिंगात ‘आ’कारान्त नामांचे प्राबल्य आहे.

– रमेश धोंगडे 9561640857, (020) 25230759

(‘भाषा आणि जीवन, दिवाळी 2016, ‘भाषिक नकाशा’’ या लेखातून उद्धृत)

About Post Author