अहिराणी लोकपरंपरा

‘अहिराणी लोकपरंपरा’ पुस्तकाचे मुखपृष्ठ
‘अहिराणी लोकपरंपरा’ पुस्तकाचे मुखपृष्ठ

‘अहिराणी लोकपरंपरा’ पुस्तकाचे मुखपृष्ठसुधीर देवरे यांनी ‘अहिराणी लोकपरंपरा’ या पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्यांचे जन्मगाव विरगावातील अनुभवसमृद्धीचे शब्दचित्र रेखाटले आहे. त्यावरून त्यांनी पुस्तकाची निर्मिती त्यांची अनुभूती, लोकसाहित्याबद्दल आस्था, ती जपण्याची तळमळ आम वाचकांपर्यंत पोचवण्याचा मानस ठेवून केली आहे. सुधीर देवरे हे भाषा, कला , लोकजीवन आणि लोकसाहित्य यांचे अभ्यासक आहेत. त्यांचे अहिराणी आणि मराठी भाषांत कवितासंग्रह, समीक्षा ग्रंथ व आत्मकथन असे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्या संपदेत नाटके आणि कादंबरी यांचाही समावेश आहे. लेखकाने प्रस्तुत पुस्तकात अहिराणी लोकपरंपरेचा उगम, तिचे भौगोलिक आणि साहित्यिक दृष्टीने प्रगत स्वरूप मांडले आहे. लेखकाने विषयानुसार वर्गीकरण केल्यामुळे वाचकांच्यासमोर अहिराणी संस्कृती चलचित्राप्रमाणे उलगडत जाते.

सुधीर देवरेपहिला विभाग ‘लोकपरंपरा’ त्यात वैशाखातील अक्षय तृतीयेच्या सुमारास तीन रात्री रंगणारा भोवडा, त्याचे महत्व, त्याच्याशी निगडित लोककथा, लोकगीते याबद्दल माहिती सांगितली आहे. ज्यात देव-दैत्यांचे सोंग घेतले जाते,  ‘रात्र थोडी आणि सोंगं फार’ या म्हणीचा उगम त्या लोकपरंपरेतून झाला असावा. अहिराणी परंपरेत नवजात अर्भकाचे नाव ठेवण्याच्या काही श्रद्धा आणि पारंपरिक समजुती आहेत. त्यांचे विश्लेषण लेखकाने अनेक उदाहरणांसह केले आहे. ‘बार- एक सांस्कृतिक लढाई’ हा अक्षय तृतीयेला दोन गावांमधे खेळला जाणारा खेळ आहे. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या त्या खेळाचे महत्त्व आणि विशेषता या भागात सांगितली आहे. तशाच प्रकारचा खेळ विदर्भात पांढुरणागावी ‘गोटमार’ म्हणून खेळला जातो. तो बैलपोळ्याला खेळला जातो. लेखकाने अहिराणी ताटलीत अनेक दुर्मीळ पदार्थांची जसे कोंडाळ, घाटा, वड्याचे बट्ट, ढासलं, सुघरं भुगरं, फुणगं अशा पदार्थांची मेजवानी दिली आहे. मेघराज प्रसन्न व्हावे म्हणून परंपरेनुसार विधी केला जातो, तो म्हणजे ‘धोंड्या धोंड्या पाणी दे’. त्या लोकश्रध्देबद्दल लेखक सांगतो ‘ही अंधश्रद्धा खरी, पण या परंपरेमुळे भावनिकदृष्ट्या विस्कटलेले गाव एक होते, ही जमेची बाजू.’ लोकदैवत जेजुरीच्या खंडोबाचे भक्त मोठ्या प्रमाणात आढीजागरणाचा कार्यक्रम करतात आणि काठीकवाडीचे डफ विरगावात गुंजतात. अहिराणी रडणे ही राजस्थानातील ‘रुदाली’ शी मिळतीजुळती आहे.

‘अहिराणी लोकपरंपरा’ पुस्तकातील एक छायाचित्रदुसरा विभाग लोकदेव-दैवत , त्यांचे पूजन आणि तत्संबंधीत लोककथा यांवर आधारित आहे. खानदेशातील लोकदैवत कानबाई, तिची स्थापना, त्या संबधित प्रचलित कथा, रुढी, तिची गाणी याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. त्याच परंपरेतील चक्रपूजा, व्रत घेणे, आदिवासी दैवते-वाघदेव, खांबदेव, म्हसोबा, मुंजोबा आणि प्रमुखदेव डोंगरदेव, ही – लोकसमूहाचे दैनंदिन जीवन आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. अहिराणी भागात आदिवासींचे प्रमाण भरपूर आहे. त्यांतील प्रत्येक लोकसमूहासाठी सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा असतो. सुरक्षिततेसाठी संघटित होऊन देव-दैवतांचे पूजन होता होता ते एक सांस्कृतिक प्रतीक होऊन गेले. अहिराणी परंपरेतील कन्सरा माउली, सुखगाडी ही दैवते त्याची उत्तम उदाहरणे आहेत. लेखकाने या दैवतांच्या उपासनेसंबधी छान वाक्य लिहिले आहे. ‘खरे तर, ही परंपरा नष्ट व्हायला नको. कारण ते एक सांस्कृतिक प्रतिबिंब आहे आणि त्या उपासना परंपरेतील हीनही आपल्या भविष्याच्या डोक्यावर बसायला नको, असा मधला मार्ग काढून परंपरा सुरू राहायला पाहिजे’( पान-९३ ). हे वक्तव्य पटून जाते.

12.JPGप्रस्तुत पुस्‍तकाच्या तिसर्‍या विभागात लेखकाने लोकभाषेचे विवरण केले आहे.  संत एकनाथांच्या भारुडावरून तयार झालेले ‘लळित’ हा नाट्यप्रकार. सप्तशृंगी गडाच्या पायर्‍या चारशेचौर्‍याहत्तर पण देवीच्या गाण्यात त्यांचा उल्लेख तीनशेसाठ असा येतो. त्या संकेताचे स्पष्टीकरण या लेखात दिले आहे. लोककथा, लोकगीते, लोकपरंपरा, लोकव्यवहार यांचा अभ्यास करतांना लेखकाच्या नजरेतून नऊ लाख, सव्वा लाख, छपन्न, सव्वा मण, सतराशेसाठ ही संकेताक्षरे सुटली नाहीत. सामान्य जनतेला लक्षात राहण्यासाठी संख्यासंकेत आपल्या अवतीभवती प्रचलित आहेत. आण्हे अर्थात कूट किंवा काव्यात गुंफलेली कोडी. रोजचे जगणे सहजसुलभ करणारे, मनोरंजन करणारे, बौद्धिक आणि चातुर्याचे प्रतीक म्हणजे अहिराणी आण्हे! लेखकाने जवळपास चौपन्न आण्हे दिली आहेत. अहिराणी ही जळगाव –नाशिक जवळील अनेक गावांत ती बोलीभाषा म्हणून प्रसिध्द आहे. निसर्गकन्या बहिणाबाईंच्या रचना या भाषेत गुंफल्या गेलेल्या आहेत.

लेखक- डॉ. सुधीर देवरे
प्रकाशक-ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

विनीता श्रीकांत देशपांडे
फ्लॅट नं. १२, इडन गार्डन
सेक्टर-२६, प्राधिकरण
निगडी, पुणे ४११ ०४४
मो.नं ९८९०६४६५७७
vsdeshpande14@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.