संघर्षाशिवाय तरणोपाय नाही हे अनुराधा भोसले यांच्या लक्षात लहानपणीच आले ! कष्ट हे जणू त्यांच्या पाचवीला पुजले होते. त्यांनी अकरावी-बारावीचे शिक्षण घेत असताना शौचालयाच्या साफसफाईचे कामदेखील केले आहे ! पण त्यांची पुढील आयुष्यातील कामगिरी फार मोठी आहे. अनुराधा भोसले यांनी ‘अवनि’ संस्थेमार्फत कोल्हापूर वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सत्तावन ‘वीटभट्टी’ शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वंचित, निराधार मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. तो तर आरंभ होता. त्यांनी त्यापुढे जाऊन वेगवेगळ्या सत्तावन्न शाळा निर्माण केल्या आहेत, तर एकूण शहाऐंशी हजार मुलांची नोंद वेगवेगळ्या शाळांत केली आहे. शिक्षणप्रसाराचे हे मोठे काम एकसूत्र प्रयत्नांतून उभे राहिले आहे. अनुराधा यांनी एकल स्त्रियांसाठी ‘एकटी’ ही संस्था सुरू करून त्या स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे. अनुराधा भोसले यांच्या नावावर कोल्हापूरात अनेक कामांच्या नोंदी आहेत.
अनुराधा यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-भोकर गावचा. त्यांचे लग्नाआधीचे नाव अॅगाथा अमोलिक. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. आई घरीच असे, ती अशिक्षित होती. त्यांना बारा भावंडे. घरची परिस्थिती जेमतेम. त्या पाचवीपासून एका शिक्षकाच्या घरी राहून शिकू लागल्या.
त्यांनी जिद्दीने शिकून समाजकार्याची पदवी मुंबईतील ‘निर्मला निकेतन’मधून मिळवली आहे. त्यांनी नोकऱ्या पुणे, जळगाव, औरंगाबाद येथे केल्या. मात्र त्यांचे मन नोकऱ्यांत रमले नाही. अनुराधा यांनी वर्गसंघर्ष व विशेषत: बालकांचा उत्कर्ष हे जीवितकार्य ठरवले. त्यांना त्यासाठी प्रेरणा विवेक पंडित यांच्या ‘श्रमजीवी संस्थे’ने ठाणे जिल्ह्यात केलेल्या कामापासून मिळाली. त्यातच त्यांनी आंतरजातीय विवाह केला. त्यांनी दहा वर्षांचा सुखाचा संसार केला; नंतर पतीची वेगळी लक्षणे दिसू लागताच त्याच्याशी संबंध तोडले आणि स्वत:च्या करारी बाण्याचे दर्शन घडवले. असा त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाशिवाय तरणोपाय नव्हता.
अरुण चव्हाण आणि सहकाऱ्यांनी ‘अवनि’ (अन्न, वस्त्र, निवारा) संस्थेची स्थापना 1994 मध्ये केली. अनुराधा यांनी नोकरी त्या संस्थेत करण्याचे ठरवले. अरुण चव्हाण आणि सहकारी यांचे सांगली जिल्ह्यातील ‘वेरळा विकास प्रकल्पा’चे काम चांगले आकाराला आले होते. चव्हाण यांनी स्वत:च, अनुराधा यांची नम्रता, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती हे गुण पाहून; तसेच काम स्वबळावर कोल्हापूरात करण्यास सुचवले. अनुराधा भोसले यांची कोल्हापूर ही कर्मभूमी अशी होत गेली.
कोल्हापूर शहरपरिसराला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. त्या शहरात अनुराधा यांच्या विचारांना वेगळी दिशा मिळाली. त्यांनी वर्गसंघर्ष, शोषितांचे प्रश्न तेथे मुळापासून जाणून घेतले. त्यांना प्रश्नांची व्याप्ती खूप मोठी आहे हे लक्षात आले. त्या कोल्हापूरात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, ‘रंकाळा बचाओ’, ‘महिला संघर्ष’ अशा वेगवेगळ्या चळवळींतही काम करू लागल्या.
अनुराधा यांनी पुढे जाऊन कामासाठी वेगळे क्षेत्र निवडले. त्यांनी भंगार गोळा करणाऱ्या मुलांशी मैत्री सुरू केली. त्यातून त्यांच्या कामाला मोठे वलय लाभले. त्यांनी ‘तुम्ही शिकलं पाहिजे, नाहीतर आयुष्य भंगार गोळा करण्यातच जाईले’ हे त्या मुलांच्या मनावर ठसवण्यास सुरुवात केली. त्याच बरोबरीने त्या कोल्हापूर जिल्ह्यातील डवरी, लमाण, फासेपारधी, गोसावी समाजांच्या वस्त्यांवरही जाऊ लागल्या. तेथील शाळांत न जाणाऱ्या मुलांना एकत्र करून त्या त्या वस्त्यांमध्ये त्यांनी शाळा सुरू केल्या. त्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले. तशा वस्त्यांवरील शाळांची संख्या छत्तीस आहे. त्या निमित्ताने त्या त्या समाजातील लहान मुलांचे थांबलेले शिक्षण सुरू झाले आहे ! पुढे, अनुराधा त्यांना जवळच्या शाळांत दाखल करून घेतात आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतात. अनुराधा यांनी गेल्या तीस वर्षांत या प्रकारे शहाऐंशी हजार मुलांसाठी शिक्षणाची पायवाट तयार केली आहे.
वस्त्यांवरील मुलांना शिक्षणसोय करून देत असतानाच त्यांच्यासमोर प्रश्न आला, तो वीटभट्टी कामगारांच्या मुलांचा. त्यांचे आयुष्य कायम फिरते असते. पावसाळा संपला, की कोल्हापूरच्या आसपास वीटभट्ट्या उभ्या राहतात. अनुराधा यांनी वीटभट्टीवरील पहिली शाळा 2002 मध्ये सुरू केली. तशा सत्तावन ‘वीटभट्टी शाळा’ कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत सुरू आहेत. ‘अवनि’ संस्थेचे कार्य कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांतील स्थलांतरित ऊसतोड व वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विस्तारले आहे.
अनुराधा यांचा आणखी जिव्हाळ्याचा विषय आहे तो स्त्रियांच्या हक्कांचा. त्यांनी त्यासाठी आंदोलने केली आहेत. त्यांनी विधवा-परित्यक्तांना निवृत्तिवेतन मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रंदिवस धरणे धरले होते (2009). त्यामुळे साडेतीन हजार स्त्रियांचे निवृत्तिवेतन सुरू झाले. मात्र निवृत्तिवेतन मिळणे पुरेसे ठरणार नाही हे लक्षात आल्यावर अनुराधा यांनी त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवली. त्यांनी विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता व एकल स्त्रिया यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘एकटी’ ही संस्था 2012 मध्ये सुरू केली.
त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो कचरावेचक स्त्रियांचे संघटन करण्याकडे. त्या स्त्रियांना कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. नैसर्गिक खताची मागणी वाढत असल्याने त्या स्त्रियांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने बेघरांसाठी निवारागृहे सुरू केली. स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र निवारागृहे प्रत्येकी दोन आहेत.
अनुराधा यांच्या ‘अवनि’त राहून पन्नास मुली शिक्षण घेत आहेत. ‘अवनि’चे बालगृह 2001 मध्ये बांधण्यात आले. बालगृह हे किमान एकशेवीस मुलींना ग्राह्य धरून बांधण्यात आले आहे. बालगृह अनाथ, निराधार, एकल पालक, तसेच मुक्त बालकामगार, अत्यंत गरीब, शिक्षणापासून वंचित ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशा मुलींकरता सुरू केले आहे. तेथे मुलींना शालेय शिक्षणाबरोबर इतर जीवनकौशल्ये शिकवली जातात. संस्था लोकांकडून मिळणाऱ्या मदतीने मुलींना सांभाळत आहे. मुलींना शाळेत सोडण्यासाठी दोन बसेस आहेत.
बालगृहाला लागूनच कामकाजाकरता ऑफिस, रिसेप्शन एरिया, छोटा दवाखाना, बालगृह स्टाफची राहण्यासाठीची जागा हे बांधकाम होणे बाकी आहे. त्याकरता किमान एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संस्थेने नवी इमारत आणि अन्य उपक्रम सुरू करण्यासाठी तसा एक कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा बनवला आहे. ‘अवनि’ संस्था शासनमान्य आहे तरीही हरतऱ्हेने प्रयत्न करूनसुद्धा शासकीय अनुदान संस्थेला मिळत नाही असे अनुराधा भोसले सांगतात.
संस्थेचे वेगवेगळे प्रकल्प आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मुलींचे बालगृह हाच आहे. बालगृहाचा महिन्याचा खर्च साडेतीन लाख रुपये आहे. ‘अवनि’मध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांवर पूर्णवेळ अठ्ठेचाळीस कार्यकर्ते आहेत. दहा प्रकल्प समन्वयक त्यांना मार्गदर्शन करतात. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, विश्वस्त अर्चना जगतकर ही दोघे अनुराधा भोसले यांना पूर्णवेळ मदत करतात.
अनुराधा यांचे वय छप्पन वर्षे आहे. अनुराधा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाचा ‘अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी अनुराधा यांना सहभागी करून ‘अवनि’चे कार्य सर्वदूर पोचवले आहे. अनुराधा भोसले वंचित, उपेक्षित आणि असहाय मुलांच्या आणि स्त्रियांच्या अधिकारासाठी निडरपणे उभ्या आहेत !
संस्थेचे नाव – अवनि संस्था कोल्हापूर https://www.avani.org.in/
पत्ता – कोल्हापूर गारगोटी रोड, जैताळ फाट्याजवळ, हनबरवाडी, कोल्हापूर
संपर्क – 9881320946, 9637317437 avanikolhapur@gmail.Com
– दयानंद लिपारे 9922416056 dayanandlipare@gmail.com