अलिबाग माझे गाव

1
417

अलिबाग हे पुण्या-मुंबईजवळचे समुद्र किनाऱ्यावरील गाव. अलीकडच्या काळात ‘टुरिस्ट प्लेस’ म्हणून गाजलेले. ते दोन दिवसांच्या ट्रिपसाठी उत्तम मानले जाते. मुंबईहून तेथे ‘रोरो बोट सर्व्हिस’ने जाता येत असल्याने अलिबागचे पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व अधिकच वाढले आहे. पण अलिबागला मोठा इतिहास आहे.

शिवाजीराजे व आंग्रे सरदार यांच्या कथाकहाण्या प्रसिद्ध आहेतच, पण ज्यू लोक दोन हजार वर्षांपूर्वीपासून येथे राहत आले आहेत. त्यांची जुनी घराणी आहेत आणि आता संबंध इस्त्रायलशी जोडलेले आहेत. बरेच लोक तिकडे स्थलांतरित झाले आहेत.

अलिबागचा पांढरा कांदा हे तेथील वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे. अलिबागला ब्रिटिशकाळात हवामान केंद्र होते. ते तत्कालीन कुलाबा (आता रायगड) जिल्ह्याचे मुख्य शहर होय. तेथून जिल्ह्याचे सर्व व्यवहार होतात.

खरे तर अलिबाग अष्टागरातील मुख्य स्थळ, पण त्यासोबत नागाव-रेवदंडा-किहीम अशी सागरकाठची आठ गावे येतात- जेथे नारळपोफळींचे वैभव होते. अशाच सासवणे नावाच्या गावी करमरकर यांचा जागतिक ख्याती लाभलेला शिल्पाकृती संग्रह आहे.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर ‘गावगाथा’ नावाचे सदर आहे. त्यात अलिबाग गावाच्या माहितीचा लेख वर्षा चांदणे यांच्याकडून मिळाला. अलिबागच्या अधिक माहितीचा शोध घेत असताना अलिबाग शहराचा उल्लेख ओघाने आलाच. आम्ही तो लेख अनेक अलिबागकरांस ‘शेअर’ केल्यावर अनंत देशमुख यांनी त्यांच्या लहानपणी अलिबागला मिळणाऱ्या गोटीच्या सोड्याची आठवण लेखाद्वारे लिहून दिली आहे. वडखळ-अलिबाग रस्त्यावर एका ठिकाणी तो सोडा अजून मिळतो. वर्षा कुवळेकर यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले अलिबाग, त्यात होणारा बदल, शिक्षण, विकास या गोष्टी त्यांच्या ‘माझे अलिबाग’ या लेखातून मांडल्या आहेत. अलिबाग नावाच्या व्युत्पत्तीचा लेख रिचर्ड नुनीस यांच्याकडून प्राप्त झाला आहे. हे चारही लेख लिंक स्वरूपात सोबत जोडले आहेत. वाचकांना याबाबत काही सांगायचे असल्यास किंवा अधिक माहिती द्यायची झाल्यास कृपया कळवावे.

-संपादकीय, थिंक महाराष्ट्र

अलिबाग माझे गाव

अलिबाग हे जिल्हा व तालुका यांचे मुख्यालय आहे. ते कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचे शहर आहे. अलिबाग उत्तरेकडे समुद्राने वेढलेले असून शहराच्या दक्षिणेला कुंडलिका नदी आणि रोहा गाव येते. पूर्वेकडे अंबा नदी व नागोठाणा गाव आहे. मुंबईच्या जवळील स्थळ म्हणून अलिबाग हे पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. ते मुंबईपासून अठ्ठ्याहत्तर किलोमीटर आणि मुंबई-गोवा रस्त्यावरील पेण गावापासून तीस किलोमीटर अंतरावर येते. तेथे बायपास झाला आहे. अलिबागला ‘मिनी गोवा’ असेही म्हणतात. शिवाय, अलिबाग किनारी गर्भश्रीमंतांचे बंगले वसलेले आहेत. त्यात अनेक ‘सेलिब्रिटीज’चाही समावेश आहे.

अलिबागची लोकसंख्या सुमारे पंचवीस हजार आहे. तेथे रायगड जिल्ह्याचे शासकीय मुख्यालय व जिल्हा न्यायालय आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई-गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. अलिबागला मुंबईहून समुद्रमार्गेही भाऊच्या धक्क्यावरून जाता येते. लाँच सेवा आहे. तेथे रो-रो बोटीची सुविधासुद्धा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वत:च्या वाहनासह फक्त पंचेचाळीस मिनिटांत अलिबागला पोचता येते. त्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्या मार्गे या ‘फेरी’ ‘गेट वे ऑफ इंडिया’पासून मांडवा गावापर्यंत उपलब्ध आहेत. समुद्रातून अलिबागकडे जाताना नयनरम्य देखावा दिसतो. प्रारंभी कुलाबा हा जलदूर्ग, त्यातील झाडी, मंदिरे आणि नंतर, त्या पाठीमागील नारळी-पोफळीच्या लांबवर पसरलेल्या राई व वनश्रीमध्ये लपलेले अलिबाग शहर दृष्टीस पडते. दूरवर नजर टाकल्यास रामधरण टेकडी व सागरगड दिसतो. रामधरण टेकडीच्या उजव्या बाजूस प्रसिद्ध कनकेश्वराची टेकडी तर सागरगडाच्या उजव्या बाजूस वनाच्छादित बेलोशी आणि मोठे डोंगर नजरेस येतात. शहराच्या आग्नेयेस नागाव आणि रेवदंडा या गावांच्या पलीकडे बौद्ध लेणी व दत्तात्रयाचे मंदिर असलेली चौल या प्राचीन प्रसिद्ध गावाची टेकडी दिसते. कुलाबा किल्ल्यापासून समुद्रात साडेतीन किलोमीटर नैऋत्येकडे साठ फूट गोलाकार उंचीचा दगडी मनोरा आहे. तो दीपस्तंभ. मनोऱ्याच्या उभारणीपूर्वी तेथील खडकांवर तांदूळ घेऊन जाणारी जहाजे आपटून बुडत, म्हणून त्या जागेस ‘चाऊल-खाद्या’ असे (चावल = तांदूळ) म्हणतात.

अलिबाग परिसरामध्ये रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम आणि आवास या गावांचा समावेश होतो. त्यांना एकत्रितपणे ‘अष्टागर’ (अष्ट आगर= आठ गावे) म्हणून ओळखले जाई. अलिबागमध्ये हिंदू, मुस्लिम, पोर्तुगीज-ख्रिश्चन, बेने इस्रायल ज्यू आणि पारशी असे वेगवेगळे धर्मसमुदाय एकत्रितपणे वास्तव्यास पूर्वीपासून आहेत. तरी ते खेडेच होते. अलिबाग गावाचे गेल्या पाचसात दशकांत शहर कधी व कसे झाले, ते स्थानिकांना उमगलेच नाही ! अलिबाग आतूनबाहेरून बदलले आहे. तेथे मॉलपासून आधुनिक सर्व गोष्टी आहेत. अलिबागच्या दोन गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत. एक म्हणजे अलिबागचा ‘कुलाबा किल्ला’ आणि दुसरी गोष्ट म्हणजे अलिबागचा ‘पांढरा कांदा’. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची चव कोणालाच ऐकणार नाही. ते खास तेथलेच पीक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दसरा झाला, नवान्न पौर्णिमा झाली, की दिवाळीचे वेध लागतात. त्याच सुमारास कांद्याचे वाफे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागतात. अलिबागचे कांदे जानेवारीपासून मुंबई-गोवा हायवेवर वडखळजवळ ‘कांद्याच्या माळा’ म्हणून विकण्यास येतात.

पर्यटन व शेती हे अलिबागचे मुख्य व्यवसाय आहेत. अलिबाग शहराच्या जवळच राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा कारखाना आहे. गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम हे कारखानेसुद्धा जवळ परिसरात आहेत.

कुलाबा किल्ला, खांदेरी, गणेश मंदिर, बालाजी मंदिर, मुरुड-जंजिरा, कोर्लई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय स्थळे अलिबाग आणि आजुबाजूच्या परिसरात आहेत. मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख अक्षी या गावात आहे. भारतीय ख्यातीचे शिल्पकार विनायक पांडुरंग ऊर्फ नानासाहेब करमरकर सासवण्याचे. त्यांचे तेथील घर शिल्पालयात रूपांतरित करण्यात आले आहे. तेथे त्यांच्या बहरकाळातील सुबक मूर्तिशिल्पे संग्रहित आहेत.

अलिबागचा समुद्रकिनारा हा विश्रांतीसाठी आणि पाण्यातील खेळ यांसाठी लोकप्रिय आहे. अलिबाग हे गाव समुद्रकिनाऱ्यावर वसलेले असल्याने वर्षभर तेथील हवा सुखकारक असते.

अलिबागमध्ये जिल्हा परिषदेच्या तसेच शासनमान्य खासगी शाळा आहेत. ‘सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूल’, ‘डी.के.टी. स्कूल’, ‘एजी कॉन्व्हेंट हायस्कूल’ व ‘आर.सी.एफ. स्कूल आणि ज्युनियर कॉलेज’ यांसारख्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा आहेत. जे.एस.एम. महाविद्यालयाची स्थापना 1961 मध्ये झाली. त्यामुळे तेथील शैक्षणिक विकासास चालना मिळाली. ‘सी.एच. केळुसकर होमिओपॅथी कॉलेज आणि हॉस्पिटल’, ‘दत्ता पाटील लॉ कॉलेज’, पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजमेंट कॉलेज यांमुळे वेगवेगळ्या विद्याशाखांतील शिक्षण घेण्यासाठी पुण्या-मुंबईकडे जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अलिबाग मुंबई व पुणे या मोठ्या शहरांपासून जवळ असल्यामुळे तेथे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. तेथील विविध प्रकारचे मासे खाणे हे आकर्षण असतेच.

अलिबाग परिसर विविध प्रकारच्या दुर्मीळ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. अलिबाग ते मुरुड असा पसरलेला समुद्रकिनारा विविध पक्षांना आकर्षित करून घेतो. तेथे काही विशिष्ट प्रजातींचे पक्षी विशिष्ट कालावधींमध्ये पाहण्यास मिळतात. भारतातील प्रसिद्ध पक्षीनिरीक्षक व ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ या नावाने ओळखले जाणारे सलीम अली हे अलिबागजवळील किहीम या गावी मुक्कामास असत. तेथे त्यांना मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा अभ्यास करण्यास मिळाला. त्यांची पक्षीनिरीक्षणावरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामुळे किहीम येथे मोठे पक्षी संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

अलिबाग परिसरातून अनेक मंडळी मोठी होऊन गेली. त्यांनी साहित्य-संस्कृती क्षेत्रात नाव कमावले. त्यांची यादी मोठी आहे – जुन्या काळातील डॉ. आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी, लेखक बाळुताई खरे व मधुकरबुवा पेडणेकर (सासवणे), गंगाधर गाडगीळ (धोकवडे), मा.ना. आचार्य (चौल), मधु पाटील, म.सु. पाटील, शंकर सखाराम (तिघे पेजारी-पोयनाड), मीना देवल (किहीम), सिद्धपुरुष शंकरगिरी महाराज (मांडवे), कलावंत दुर्गा खोटे (झिराड), संगीतकार शंकर (अलिबाग), नेपथ्यकार जोगळेकर (चोंढी) हे होऊन गेले.

अलिबाग हे गाव कान्होजी आंग्रे यांनी ते मराठी आरमाराचे प्रमुख इसवी सन 1698 मध्ये झाल्यावर नव्याने उभारले. तत्पूर्वी जुने गाव हिराकोटच्या उत्तरेस रामनाथ येथे होते. त्या भागातच आंग्रे यांचा राजवाडा होता. तेथे आंग्रे यांची कुलदेवता कळंबिका देवीचे मंदिर आहे. राघोजी आंग्रे कुलाबा किल्ल्यात इसवी सन 1771 मध्ये राहत होते. परंतु त्यांचा राजवाडा, खजिना, पागा अशा वास्तू अलिबागेत होत्या. कुलाबा संस्थान ब्रिटिशांनी खालसा केल्यावर (1839) तेथे ब्रिटिश एजंटाचा कारभार सुरू झाला. अलिबागला कुलाबा एजन्सीचे मुख्यालय 1840 मध्ये झाल्यानंतर 1850 पर्यंत गावाचा विकास होऊन त्याचा चेहरामोहरा बदलला. अलिबाग हे तालुक्याचे मुख्य ठिकाण 1852 मध्ये बनले. वेगळा कुलाबा जिल्हा 1869 साली निर्माण झाला व अलिबाग हे जिल्हा मुख्यालय झाले.

सूरपारंब्यांचा खेळ, चुलीवरची भाकर-भाजी हे जुन्या अलिबागचे आकर्षण असे. भाजी हरभरा, वांगे आणि बटाटे यांची बनवतात. ती भाजी आणि बुंदी खाणे हा आनंद वेगळाच असतो. अलिबाग परिसरातील जेवणाला वेगळीच अशी चव, खुमारी त्यामुळे येते !

अलिबागमध्ये बरीच जुनी मंदिरे आहेत. त्यांपैकी काही पेशवाईत अथवा तत्पूर्वी बांधलेली आहेत. त्यात बालाजी, उमामहेश्वर, समुद्राकडे व शासकीय कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नाक्यावरील मारुती, काशीविश्वेश्वर, गणपती, कळंबिकादेवी, आंग्रेवाड्यातील विष्णू, रामनाथ येथील राम, वरसोलीचे विठोबा अशा देवीदेवतांच्या मंदिरांचा समावेश होतो. त्याशिवाय अलिकडच्या काळात बांधलेले लक्ष्मीनारायण, विठ्ठलरुक्मिणी, कामत आळीतील गणपती, कोळीवाड्यातील दत्त, घरत आळीतील गणपती, राम, इंग्रजी शाळेजवळील मारुती व मरीआई अशीही मंदिरे आहेत. घरी शुभकार्य किंवा काही कार्यक्रम असेल तर त्या देवीदेवतांना नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये वर्षातून एकदा, डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीला यात्रा असते. अलिबागकर त्या प्रसंगाची आठवण वर्षभर ठेवतात आणि त्यावेळी एकत्र जमतात. मुस्लिम धर्मीय दोन मशिदी आहेत. त्यांपैकी एक अदमासे दोनशेपंचवीस वर्षांपूर्वी तर दुसरी एकशेदहा वर्षांपूर्वी बांधलेली आहे. ज्यू (बेनेइस्त्राईल) लोकांचे एक सायनॅगॉगही गावात असून ते दीडशे वर्षांपूर्वी बांधलेले आहे.

अलिबागला जुनी वेधशाळा होती. पावसाळ्यात अलिबाग परिसरात वेगळेच हवामान असते. खूप पाऊस असतो. घरातून बाहेर पडता येत नाही आणि त्यात हिरवीगार शेते व डोंगर दूरवर खुणावत राहतात. गावात दरवर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम होतो. गावात तऱ्हतऱ्हेची झाडे लावली आहेत. त्यामुळे गाव हिरवेगार दिसते. गावातील लोक मिळून मिसळून वागतात. गावात जातिभेद नाही.

– वर्षा चांदणे 9082512797 chandanevarsha6@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. मुंबई पासून अगदी जवळ असणारे अलिबाग दोन दिवसाच्या भ्रमंती साठी योग्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here