अरुण दाते व त्यांचे गायन

2
133
carasole

काही कलाकार सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला येतात, त्यांना अनेक संधी सहज उपलब्ध होतात. ज्येष्ठ भावगीत आणि गझल गायक अरुण दाते हे त्याचे उत्तम उदाहरण. त्यांचे वडील म्हणजे इंदूरचे प्रसिद्ध रामुभैया दाते. ते स्वत: गायक व दर्दी रसिक, ते संस्थानामध्ये सेक्रेटरी दर्ज्याचे अधिकारी होते, त्यामुळे घर प्रशस्त, स्वभाव दिलदार, खानदानी रईस!

अरुण यांचे मूळ नाव अरविंद. अरुण वडिलांमुळे गाण्याच्या मैफिली लहानपणापासून ऐकत आले. त्यामध्ये बालगंधर्व, पु.लं., वसंतराव देशपांडे; शिवाय, इतर घराण्याचे गायक असत. कुमार गंधर्व तर इंदुरजवळ देवास येथे स्थायिक असलेले. इंदूरमधील रामुभैयांच्या वाड्यांमध्ये वहिवाट अशी, की संस्थानामध्ये गाणे झाले, की त्या गायकाची मैफिल दुसऱ्या दिवशी रामुभैया दाते यांच्याकडे होणारच! कलाकारांचे समाधान रामुभैयांची दाद मिळाल्याशिवाय होत नसे. मग तो सतारवादक असो की तबलानवाझ. रामुभैयांची दाद व (बरोबर खाण्यापिण्याचे औदार्य) लाभल्याखेरीज अनेक कलाकार व कानसेनही इंदूरमधून जाताना तृप्त होतच नसत.

तशा घरात जन्मलेला मुलगा गायक किंवा कलावंत न होता तरच नवल! त्यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘शुक्रतारा’ हे चरित्र त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांची यथार्थ नोंद करते. अरुण दाते यांचे वय ऐंशी आहे. पण मुलगा अतुल दाते याने पुढाकार घेऊन वडिलांचे चरित्र प्रकाशित केले. त्यामुळे एका रसिक व यशस्वी माणसाची कहाणी जगासमोर आली. ते गायक म्हणून सर्वांना प्रिय होतेच.

पुस्तकामुळे १९७० नंतरच्या दोन दशकांच्या आठवणी जागृत होतात. तो सध्या वयाच्या साठीच्या आसपास असलेल्या पिढीच्या तरुणपणाचा व कार्यकर्तृत्वाचा काळ. त्यावेळी दूरदर्शन नव्याने सुरू झाले असल्यामुळे रेडिओवरील चित्रपटांची गाणी हॉटेलामध्ये बसून ऐकणे ही तरुणांची क्रेझ होती. लोक गजानन वाटवे, बबनराव नावडीकर यांची भावगीते बरीच वर्षे ऐकत होते. त्यांची जागा भरून काढेल अशा भावगीत व चित्रपट गीते गाणाऱ्या गायकाची आवश्यकता होती.

त्याच सुमारास कवी मंगेश पाडगावकर भावगीत लेखनाच्या अंगाने बहरास येत होते. गदिमांचा बाज थोड्या जुन्या वळणाचा, भारतीय संस्कृतीतील संदर्भांचा होता. पाडगावकरांनी बदलणाऱ्या मध्यमवर्गाची नस पकडली. त्याच्या मानसिक आनंदाला, सुखाला हळुवार फुंकर घातली. त्यामध्ये सामाजिक जाणिवेची इष्ट फोडणी मिसळली. दाते यांच्या आवाजात तो हळुवारपणा होता. तशा परिस्थितीत ‘शुक्रतारा मंद वारा’ हे गीत पाडगावकरांनी लिहिले. श्रीनिवास खळे हा त्यांतील तिसरा घटक; किंबहुना संगीत दिग्दर्शक, नियोजक म्हणून गीताची, गाण्याची, गायकाच्या आवाजाची जाण असलेला, सर्व सूत्रे एकत्र बांधू शकणारा. खळे यांनी गीताला सुरेख चाल लावली. त्यांनी अरुण दाते यांची हिंदी गाणी ऐकली होती. खळे यांना हा मुलगा ‘शुक्रतारा’ गाण्याला न्याय देऊ शकेल असे वाटले. खळे अरुण यांच्या दादरच्या घरी गेले. अरुण दाते यांनी तोपर्यंत एकही मराठी गाणे गायले नव्हते. त्यामुळे ते मराठी गाणे म्हणण्यास चाचरत होते. पण वडिलांच्या (रामुभैय्या) व खळे यांच्या आग्रहामुळे त्यांनी आकाशवाणीवर शनिवारी सकाळी ७.४५ वाजता ते गाणे प्रथम सादर केले. शनिवार सकाळचा मुंबई केंद्रावरील भावसरगम हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय होता. तेच गाणे लागोपाठ चार शनिवार लागत असे. त्या गाण्याने इतिहासच घडवला. त्या महिन्यात ते गाणे महाराष्ट्रभर पोचले व गाजले. अरुण दाते पहिल्या गाण्यालाच रेडीओ स्टार झाले. ग.दि.मा., राजा परांजपे, सुधीर फडके ही त्रयी चित्रपट व संगीत यांमध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. पाडगावकर, खळे, दाते ही नवी त्रयी भावगीत संगीतात जन्मास आली. अरुण दाते यांचे ते गाणे होते: शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे  धुंद या गाण्यातुनी. 

त्यानंतर यशवंत देव, श्रीनिवास खळे व हृदयनाथ मंगेशकर हे संगीत दिग्दर्शक पाडगावकर व इतर कवी (शंकर वैद्य वगैरे) यांच्या काव्यरचना दाते यांजकडून गाऊन रेडिओवर सादर करू लागले. त्यातूनच ‘शुक्रतारा’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळमधली’ अशा काही गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. तरुण पिढी त्या गायकाची ‘फॅन’ बनली. त्या सुमाराचे हृदयनाथ मंगेशकर यांनी चाल दिलेले ‘स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ हे शंकर वैद्यांचे गाणेही अजरामर झाले. अरुण दाते एक यशस्वी मराठी भावगीत गायक बनले. ‘गीत रामायणा’नंतर ‘शुक्रतारा’, ‘भाव सरगम’ असे अनेक मराठी कार्यक्रम त्यावेळी हाऊस फुल्ल गर्दीत सुरू असत, माझ्यासारख्या तरुणांना ते त्यांच्या जीवनाशी निगडित वाटले. दादरच्या त्यावेळच्या सुशिक्षित, सुखवस्तू लेखक व कवी मराठी लोकांनी अरुण दाते यांना उचलून धरले, मग ते शशी मेहता असोत वा व.पु. काळे असोत. किंवा पाडगावकर, देव, खळे असोत. अरुण दाते यांनी मराठी मनावर गारुड जवळ जवळ वीस वर्षें केले.

‘शुक्रतारा’ या पुस्तकाची भट्टी इतकी चांगली जमली आहे, की त्यांतील कलाकार व प्रतिभावंत यांचे अनुभव वाचताना पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही. घरात रोज स्वयंपाक होतो पण एखाद्या दिवशी स्वयंपाक चवदार व सुंदर होतो तसे त्या पुस्तकाचे झाले आहे.

खरे म्हणजे १९७० ते १९९० म्हणजे तमाम मराठी समाजातील अनेक संघटनाचा जागृतीचा व संघर्षाचा काळ. मग ती ‘दलित पँथर’ असो, ‘प्रायोगिक नाट्य चळवळ’ असो किंवा ‘चतुरंग’ व ‘ग्रंथाली वाचक चळवळी’ यांच्यासारखे सांस्कृतिक उपक्रम असोत, त्या सुमारास संगीत क्षेत्रात काही नवीन गायक व संगीतकार उदयास आले. त्यांनी त्यांच्या नवीन कल्पनांनी गाणे एका वेगळ्या उंचीवर नेले. भारतीय समाज हा १९७० पर्यंत पारंपरिक जीवन वर्षानुवर्षें जगत होता. त्या सुमारास अनेक जणांनी परदेश गमन करून तेथे नोकरी-व्यवसाय सुरू केले. साहजिकच भारतीय/मराठी नाळ जागतिक चळवळीशी जुळू लागली. जगातील घटनांचा प्रतिसाद भारतीय समाजावर उमटू लागला. स्वातंत्र्यानंतर झालेल्या शिक्षणप्रसारामुळे सर्व जाती-जमातींचे लोक जागृत झाले. त्याचवेळी आमच्यासारखा सुशिक्षित मध्यमवर्गीय समाज जो पूर्वी कष्ट, नोकरी किंवा वडिलोपार्जित व्यवसाय करत होता तोही अशा छोट्यामोठ्या सामाजिक चळवळीशी जोडला गेला. साहित्यिकांना, कलावंताना ती त्यांचीच कामगिरी वाटू लागली. तशा जाणीवजागृत तरुणांना नवीन गायन /वादन/ मनोरंजनाची आवश्यकता होती. त्याच वेळी अरुण दाते यांचा मराठी सांस्कृतिक विश्वात प्रवेश झाला.

त्यापूर्वी प्रसिद्ध शास्त्रीय गायक (निर्गुणी भजन म्हणणारे ) कुमार गंधर्व प्रकृतीच्या कारणाने देवास (मध्य प्रदेश) येथे राहण्यास गेले. त्यांना सर्वतोपरी मदत रामूभैया दाते करत होते. साहजिकच, कुमार गंधर्व व अरुण दाते यांना एकमेकांचा सहवास व मैत्री अनेक वर्षें मिळाली. जसे चंदनाच्या सहवासाने इतर गोष्टी सुगंधित होतात तसे अरुण दाते यांचा मुळचा गोड गळा तशा सहवासाने अधिक गोड व मुलायम झाला. कुमारांच्या अनेक मैफिली रामुभैया यांच्याकडे झाल्या. साहजिकच, अरुण दाते यांच्याशी त्यांचे मैत्रीचे नाते निर्माण झाले.

अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या पुस्तकात वडिलांचे (रामुभैयाचे) जवळ जवळ संपूर्ण जीवन सांगितले असून, अशा वडिलांच्या साहचर्यामुळे त्यांचे जीवन फुलण्यासाठी कशी मदत झाली ते वर्णले आहे. एक प्रकारे, ते वडील व मुलगा यांचे चरित्र असून ते नातवाने सांगितले आहे. (सुलभा तेरणीकर यांनी शब्दांकन केले आहे.) पुस्तकात संगीताखेरीज इतरही अनेक गोष्टी आल्या आहेत. अरुण दाते हे टेक्सटाईल इंजिनीयर. त्यांनी काही काळ विविध ठिकाणी नोकऱ्या केल्या. त्यामध्ये अनेक मिलमालक व त्या क्षेत्रातील उच्च अधिकारी यांचे अनुभव दिले आहेत. काही वेळा अतिशय कठीण प्रसंग व अडचणी आल्या. त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला तेही सांगितले आहे. अरुण दाते यांना अनेक मोठ्या लोकांचा व कलांवताचा सहवास लाभला अशा गोष्टी, किस्से वाचण्यामध्ये वाचकांना रस असतो. तशा अनुभवामुळे पुस्तकाची वाचनीयता वाढली आहे. के.महावीर यांच्यासारखे प्रतिभावान कलाकार अरुण दाते यांचे गुरू होते. ते त्यांच्या विचित्र स्वभावामुळे व त्यांच्याकडे व्यावसायिकता नसल्यामुळे कसे मागे पडले त्याचे दर्शन पुस्तकात घडते.

‘शुक्रतारा’ पुस्तकामुळे त्यावेळचा काळ थोड्या फार प्रमाणात जगल्याचा अनुभव वाचकांना (ज्येष्ठ नागरिकाना) मिळतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्या त्या वयातील आदर्श (आयडॉल) असतात. गंमत म्हणजे परप्रांतात राहणारा अमराठी मुलगा इंदूरहून येऊन मराठी जीवनाचा फारसा अनुभव नसताना वाटवे, नावडीकर यांसारख्या गायकांची जागा भरून काढतो व त्याला मराठी समाज उचलून डोक्यावर घेतो याला काळाची गरज म्हणावे की नियतीचा संकेत म्हणावे?

या पुस्तकाला ‘पुलंनी लिहिलेली प्रस्तावना जोडली आहे. ‘पुलंनी ज्यांचे कौतुक केले त्याला महाराष्ट्राने उचलून धरले. मग ते राम नगरकर असोत, की मालवणी नाटककार ‘वस्त्रहरण’वाले गंगाराम गव्हाणकर असोत. येथे तर साक्षात ‘पुलं यांचा वरदहस्त लाभलेले अरुण दाते आहेत. त्यांची यशाची कमान उंचच राहणार!

अतुल दाते यांनी त्यांच्या वडिलांचे (व आजोबांचे) चरित्र प्रकाशित करून पंचावन्न वर्षांचा सांगितिक वाटचालीचा आढावा घेतला आहे. यावेळी गीत रामायणातील ओळींची आठवण करून दिली आहे. “पुत्र सांगती चरित पित्याचे लव कुश रामायण गाती.”

प्रकाशक : मोरया प्रकाशन पुणे
पृष्ठ संख्या – ३२८
किंमत : ३०० रुपये

– प्रभाकर भिडे

About Post Author

2 COMMENTS

  1. अतिशय दर्जेदार लिखाण मनाचे
    अतिशय दर्जेदार लिखाण. मनाचे स्पंदन जागवणारा!

Comments are closed.