अनुपमा बोरकर यांची अनागारिका जीवनपद्धत

अनुपमा बोरकर सर्वसाधारण वृद्धांपेक्षा अगदी वेगळे जीवन जगतात. त्यांनी बौद्ध धर्मातील अनागारिका जीवनपद्धत स्वीकारली आहे. वास्तविक ते बौद्ध भिक्षूपदाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. म्हणजे श्रमनेर व उपसंपदा ही पुढील दोन पावले उचलली की साधक भिक्षु पदास पोचतो. अर्थात ती दोन पावले अनेक वर्षांच्या साधनेची असतात. श्रमनेर अवस्था दहा वर्षांची असते आणि त्या काळात साधक पुन्हा सांसारिक जीवनात येऊ शकतो. मात्र त्याने उपसंपदा अवस्थेत प्रवेश केला, की त्याला मागे फिरणे शक्य नसते.

अनुपमा म्हणाल्या, की माझे पाय अधू आहेत, मला चालता येत नाही. मला दिसते फार कमी. त्यामुळे मी अनागारिका अवस्थेतील आठ शिलांचे पालन मनोभावे करते, तसे आचरण मला महत्त्वाचे वाटते व मी ते शेवटपर्यंत करत राहील. त्या म्हणाल्या, की मी महानुभाव पंथ सोडल्यानंतर बौद्ध धर्माकडे आकृष्ट झाले. त्या बाबतीत मला औरंगाबाद लेण्याजवळील विहारातील भंते विशुद्धानंद यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले.

अनुपमा यांचा मोठा मुलगा पंकज, त्याची पत्नी नीता आणि त्या दोघांची तीन मुले असे एकत्र कुटुंब आहे. त्यांच्या बरोबर अनुपमा यांच्या एकशेपाच वर्षांच्या सासुबाईही राहतात. अनुपमा यांचा दुसरा मुलगा राहुल, त्याची पत्नी सुजाता व त्यांची दोन मुले स्कॉटलंडमध्ये ग्लासगोला असतात.

अनुपमा म्हणाल्या, की माझ्या दोन्ही सुनांनी लग्नवेळी बौद्ध धर्म स्वीकारला. परंतु नीता स्वतः व तिचे माहेर घर त्यांच्या पसंतीने काही हिंदू देव देवतांचे पूजन करतात. पण नीताचे ते देव आमच्या घराच्या पहिल्या मजल्यावर आहेत आणि मी तर लंगड्या पायांनी वर जाऊ शकत नाही. तेथेच आमच्यातील संघर्ष संपतो आणि नीता एरवी माझी काळजी खूप घेते. तिचा ब्युटी पार्लरचा मोठा व्यवसाय आहे. माझे नातू आणि नात मला माझ्या सर्व कामांत मदत करतात. सासूबाईंची काळजी घेण्यास व त्यांना सर्व तऱ्हेची मदत करण्यास आम्ही एक बाई नेमल्या आहेत.

अनुपमा यांनी नंदनवन कॉलनीतील विहार स्वच्छतेसाठी व्यवस्था लावून दिली आहे. त्यामुळे तेथे साफसफाई नित्य केली जाते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी निधीची व्यवस्था केली आहे. त्या म्हणाल्या, की त्यामुळे मी वृद्धकाळी फार समाधानात असते.

थिंक महाराष्ट्र

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here