अचलपूरच्या हौजकटोराचे दुर्दैव

0
206

अचलपूरच्या ‘अष्टकोनी हौज कटोरा’ची खास निर्मिती जलविहाराकरता केली गेली होती. बहामनी काळातील राजाराणींच्या जीवनातील आनंद उपभोगण्याचे ते रमणीय ठिकाण. ती तीन (की पाच) मजली इमारत होती. तिचा तळमजल्यापर्यंतचा भाग पाण्याखाली राहत असे. त्यामुळे जलमहालाच्या पहिल्या मजल्यावर नौकेद्वारे जावे लागे…

अचलपूरचा अष्टकोनी ‘हौजकटोरा’ काळाशी झुंज देत उभा आहे ! अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. हौजकटोराची वास्तू ‘जलमंदिर’ या नावानेही ओळखली जाते. त्या ऐतिहासिक वास्तूला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हौज कटोरा अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. बहामनी काळातील राजाराणीच्या जीवनातील सौख्य उपभोगण्याचे ते रमणीय ठिकाण. त्याची खास निर्मिती जलविहाराकरता केली गेली. इमारत तीन मजली आहे. ती एका वक्राकार तलावाच्या मध्यभागी उभी आहे. ती इमारत दगडावर दगड ठेवून 24.68 मीटर उंच अशी बांधली गेली. तिच्या सभोवतालच्या तलावाचा व्यास एक्याण्णव मीटर व खोली 4.572 मीटर (पंधरा फूट) आहे. तलावाची खोली व रुंदी मातीच्या गाळामुळे बदललेली आहे. त्या तलावात पाणी धामणगाव गढीवरून अंडरग्राऊंड पाइपने गुरूत्वाकर्षण शक्तीच्या साहाय्याने आणले जात होते. ते पाईप आणि तो मार्गही बंद झाला आहे. पाण्याचा तो मार्ग गाळामुळे भरून गेला असावा. ते पाणी धामणगाव गढीवरून येत असे हा निष्कर्ष सिद्ध करता येत नाही, मात्र तशी नोंद इंग्रजांनी गॅझेटमध्ये केलेली आहे.

हौजकटोरा राजेशाहीच्या काळातील गत ऐश्वर्याची आठवण करून देतो. त्या वास्तूची शिल्पकला पठाणकालीन आहे. मूळ अष्टकोनी इमारतीचे तीन मजले दिसतात. तिसरा मजला विटांनी परत बांधून काढण्यात आला आहे. मात्र ती इमारत सुरुवातीला पाच मजली होती अशी नोंद आहे. चौथा व पाचवा हे दोन मजले तोडून एका नबाबाने ते साहित्य त्याच्या राजवाड्याकरता वापरले, म्हणे ! इमारतीला आकर्षक तळघर असल्याचेही बोलले जाते. ते तळघर दिसून मात्र येत नाही. तळघर गाळाखाली दबून गेले असण्याची शक्यता वर्तवली जाते.

अहमदशहा वली बहामनी यांनी ‘हौजकटोरा’ ही वास्तू 1416 मध्ये बांधली. बहामनी राजांपैकी इमादशहाच्या वंशाने वऱ्हाडवर दीडशे वर्षे राज्य केले. त्यामुळे त्या इमारतीकडे इमादशाहीचा अवशेष म्हणून बघितले जाते. तिचा आकार कटोऱ्याप्रमाणे आहे. अष्टकोनी वास्तू (महाल) तलावाच्या मध्यभागी उभी आहे. जलमहालाच्या तळमजल्यापर्यंतचा भाग नेहमी पाण्याखाली राहत असे. त्यामुळे महालापर्यंत जाण्याचे झाल्यास नौकेद्वारे जलमहालाच्या पहिल्या मजल्यावर जावे लागत असे.

दगडांत बांधलेल्या त्या इमारतीच्या आठही बाजूंना कमानीदार खुले दरवाजे आहेत. इमारतीवर चढण्याकरता कसल्याही प्रकारची शिडी अथवा पायऱ्या नाहीत. पर्यटकाला तासन् तास त्या इमारतीकडे बघावेसे वाटत असले तरी संबंधित विभागाचे त्याकडे दुर्लक्ष आहे ! अनेक परदेशी पर्यटकांनी कॅमेराबंद केलेली ती इमारत स्वतःच काळाशी झुंज देत अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे.

हौजकटोरा परिसर कमळाच्या फुलांकरता प्रसिद्ध आहे. परंतु कालक्रमात कमळाची मुळे खणून काढली गेली आहेत. त्यामुळे तेथील कमळांची फुले जवळजवळ नष्ट झाली आहेत. कमळाच्या मुळांचा वापर खाण्याकरता होत असे.

‘हौजकटोरा’ नामक वास्तूला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे त्या वास्तूची शास्त्रोक्त पद्धतीने देखभाल व दुरुस्ती अपेक्षित होती. तसे अद्याप काहीच घडलेले नाही !

– अनिल कडू 8275417941 anilkadu28@gmail.com

—————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here