मंगळवेढा, भूमी संतांची (Mangalvedha Saintly Land)

 

मंगळवेढा हे गाव संतभूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. ते आहे सोलापूर जिल्ह्यात; पंढरीच्या विठुरायापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर, दक्षिणेला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समन्वय तेथे साधला जातो. मंगळवेढा तालुक्याची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे. बोराळे सिद्धापुर अरळी, नंदुर, हुलजंती, सलगर इत्यादी भागांत कन्नड भाषिक नागरिक राहत आहेत. मंगळवेढा शहराचा कारभार वर्ग नगरपालिका पाहते.

मंगळवेढ्याचे नाव चालुक्य सम्राट मंगलेशाच्या नावावरून पडले असावे. मंगलेशाचा तेथे तळ होता. भिवघाटच्या एका कन्नड शिलालेखात मंगळवाड असा उल्लेख सापडतो. मंगलेशबीडू म्हणजे मंगलेशाचा तळ, तेच आजचे मंगळवेढे. कन्नडमध्ये बीडू या शब्दाचा अर्थ तळ, मुक्काम असा होतो. राजांच्या आश्रयामुळे कला आणि शिल्प यांचा तेथे विकास झाला. शिल्पशास्त्र, मंदिरांची उभारणी, पाण्याच्या बारवा, रम्य प्रासाद ,किल्ला आणि त्यासभोवतालचा खंदक, किल्ल्याचा तट या सगळ्या गोष्टींनी नटलेले असे हे वैभवशाली ठिकाण होते. काळाच्या ओघात त्यांतील बहुतांश खुणा नष्ट झाल्या आहेत.
मंगळवेढा प्राचीन काळी महामंडलेश्वर, मंगलवेष्टक अशा नावांनी प्रसिद्ध होते. मंगळवेढ्याचा इतिहास इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत पोचतो. दक्षिण भारतातील चालुक्य/राष्ट्रकुट यांच्या काळात भरभराटीला आलेले ते शहर. ते नंतर देवगिरीच्या यादवांकडे आले. तेथे बहामनी राजवट इसवी सनाच्या चौदाव्या शतकात सुरू झाली. नंतर, 1489 साली ते गेले विजापूरच्या आदिलशहाकडे. मोगलांनी विजापूरची आदिलशाही 1686 साली नष्ट केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले. औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. त्यानंतर शाहूंच्या पश्चात, संस्थाने खालसा होईपर्यंत मंगळवेढा सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात होते.
राष्ट्रकुटांचे उत्तराधिकारी कलचुरी; त्यांच्या राज्यात मंगळवेढे हे राजधानीचे शहर होते. वीरशैव पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर हे कलचुरी राज्याचे मुख्य प्रधान होते. म्हसवड, तेर, अक्कलकोट येथील शिलालेखांतून कलचुरी राजसत्तेत महामंडलेश्वर राजधानी असल्याचे उल्लेख आलेले आहेत. राजवाडे, धर्मस्थळे, तीर्थस्थळे यांचे तसे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले पाहण्यास मिळतात. त्यात कोरीव स्तंभ, भग्न मूर्ती, शिलालेखआहेत. शिवरायांचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यात झाल्याची दाखवणारी एकमेव नोंद मंगळवेढे येथेच आहे. शिवरायांचा मुक्काम तेथील भुईकोट किल्ल्यात 18 नोव्हेंबर 1665 या दिवशी होता.
मंगळवेढा हे आदिलशाही राजवटीचे जणू प्रवेशद्वार होते. आदिलशहावर कोणालाही आक्रमण करण्याचे झाले तर त्याला मंगळवेढ्याचा किल्ला प्रथमतः ताब्यात घ्यावा लागत असे. त्यामुळे त्या भुईकोट किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. संभाजी राजांनी मंगळवेढा किल्ला ताब्यात घेऊन बादशहाची दक्षिण मोहीम धोक्यात आणली. मराठ्यांच्या इतिहासाचा मानबिंदू ठरावा असा राजकीय पेच त्यांनी बादशहापुढे उभा केला, तोही तेथूनच!
संतभूमी असल्यामुळे गावासंबंधांतील दंतकथांचे भांडार आहे. मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांची कथा प्रसिद्ध आहे. ते बिदरच्या महंमद शहाच्या दरबारात सेनापती होते (1300 ते 1382). त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. त्यांच्या कारकिर्दीत 1378 साली भीषण दुष्काळ पडला. लोक अन्नधान्यासाठी तडफडू लागले. पण दामाजी यांनी महंमद शहाच्या कोठारातील अन्नधान्य गोरगरिबांना वाटून टाकले. दामाजी यांना अटक करण्यात आली. दामाजी यांच्या सुटकेसाठी पांडुरंगाने दामाजीपंतांच्या विठुमहार या नोकराचे नाव धारण करून दामाजीपंतांची सुटका केली! ‘पाहा मंगळवेढा हा दामाजीचाआणि झाला महार पंढरीनाथ अशी कवने प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात प्रसिद्ध आहेत.
मंगळवेढ्याचे अनेक संत प्रसिद्ध आहेत. गावकुसाबाहेर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले असतानादेखील अंतिम क्षणापर्यंत विठ्ठलाचे नामस्मरण करणारे चोखामेळा, लोकरंजन करणारी पण स्वत:चे पावित्र्य सांभाळणारी कान्होपात्रा, सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत हजरत गैबीपीर अशा थोर व्यक्ती मंगळवेढ्यात होऊन गेल्या आणि त्यातून निर्माण झाली सिद्धेश्वराचे मंदिर, एकविरादेवीचे मंदिर, महादेवाचे मंदिर, हजरत गैबी पीर यांचा दर्गा अशी मंगळवेढ्यातील श्रद्धास्थाने. संत चोखामेळा, त्याची पत्नी सोयरा, पुत्र कर्ममेळा, मेहुणा बंका, संत कान्होपात्रा, सीताराम महाराज अशी संतांची मांदियाळी मंगळवेढ्याचीच. मधवाचार्य द्वाइत संप्रदायाचे अध्वर्यु श्री जयतीर्थ टिकाचार्य हे बसवेश्वरांची गादी चालवणारे थोर व्यक्तिमत्त्व! जयतीर्थांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. मंगळवेढ्याला तीर्थक्षेत्राचा सरकारी दर्जा आहे.
चंद्रभागेच्या वाळवंटातील मुख्य प्रवर्तक संत नामदेव. त्यांचे सांगाती म्हणजे संत चोखामेळा व त्यांचे कुटुंबीय. काळाच्या आणि समाजव्यवस्थेच्या दारात उभे राहून समतेचा आर्त आणि करुणामय आक्रोश करणारे चोखामेळा. ते मंगळवेढ्याचे. चोखामेळा यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेली अभंगरचना हा त्या भक्ती चळवळीचा आत्मा आहे. सरकारी सकल संतगाथेत संत चोखामेळा यांचे तीनशेएकोणपन्नास अभंग आहेत. त्यांच्या पत्नी संत सोयराबाई यांचे बासष्ट अभंग, संत कर्ममेळा यांचे सत्तावीस अभंग, संत बंका यांचे एकोणचाळीस अभंग आणि संत निर्मळा यांचे चोवीस अभंग आहेत. मोकलोनी आस | जाहले उदास | घेई कान्होपात्रेस | हृदयात || असा धावा करणाऱ्या संत कान्होपात्रा यांची मंगळवेढा हीच भूमी. नायकीणीच्या घरात जन्माला आलेल्या कान्होपात्रा स्वत:च्या चारित्र्यसंपन्न अस्मितेसाठी लढा देतात आणि स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतात! त्यांच्या अभंगरचनांनी संतवाङ्मयाची समृद्धी वाढवली आहे.
अनुभव मंटपाच्या माध्यमाने लोकशाहीची मूळे रुजवणारे संत बसवेश्वर यांची कर्मभूमी म्हणूनही मंगळवेढ्याचा लौकिक आहे. समतेचा ध्वज घेऊन लोककल्याणाची बीजे पेरणारे बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात परिवर्तनाची क्रांती उभी केली, ती त्याच भूमीत. सन 1468 ते 1475 या कालखंडातील दुर्गादेवीच्या दुष्काळात संत दामाजीपंतांनी गोरगरिबांसाठी धान्याची कोठारे लुटली आणि उपाशी जनतेची भूक भागवली.
त्या संतांबरोबरच मंगळवेढ्यात टिकाचार्य, लतिफबुवा, सीताराम महाराज खर्डीकर, मौनीबुवा, गोपाबाई, संत गोविंदबुवा, संत वडरी महाराज, संत बागडे महाराज, संत बाबा महाराज आर्वीकर. स्वामी समर्थ यांच्या पवित्र कर्माने, वाणीने संस्कारित झालेली ती भूमी आहे.
मंगळवेढा हे पेशवाईच्या काळात सांगलीचे पटवर्धन संस्थानिक यांच्या अधिपत्याखाली होते. तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्यासाठी व वाढवण्यासाठी श्रीसंत दामाजी महाविद्यालय व श्रीसंत दामाजी हायस्कूल, दलितमित्र कदम गुरुजी यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था या माध्यमातून तालुक्यातील विविध माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा ज्ञानदान करत आहेत. गावात गल्ल्याच गल्ल्या आहेत – काझी गल्ली, मारवाडी गल्ली, खंडोबा गल्ली, मुढेमुरडे गल्ली, मुजावर गल्ली, किल्ला भाग, बोराळवेस, शनिवार पेठ अशा विविध नावांनी त्या ओळखल्या जातात. त्यात ना जातपात आड येत, ना प्रादेशिक भिन्नता जाणवत. माझी कुंभार गल्ली फार नशीबवान. शहराच्या व तालुक्याच्या राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू कुंभार गल्ली ही होती. मंगळवेढ्याच्या राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात, सहकारात प्रदीर्घ काळ सक्रिय असणारे, तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी आमदार कि.रा. मर्दा ऊर्फ मारवाडी वकील व शहराच्या नगराध्यक्षपदावर नाममुद्रा प्रदीर्घ काळ उमटवणारे रतनचंद्र शहा (सेठजी) या दोन मातब्बर नेत्यांचे राजकीय यशापयश, डावपेच माझ्या गल्लीने जवळून अनुभवले आहेत.
अभियंता हजरत काझी यांना संपूर्ण मंगळवेढा तालुका काझी महाराज या नावाने ओळखतो. हजरत काझी हिंदू धर्मीयांच्या लग्नसमारंभात पहाडी आवाजात मंगलाष्टके म्हणतात. अहमद मुलाणी हे तर तालुक्याच्या ऐक्याचे समर्थक होत. ते नवरात्र उत्सवाच्या काळात नऊ दिवस पादत्राणे न घालता शारदादेवीची पूजा करत. ते दिवंगत झाले. हजला जाणारे मुस्लिम समाजातील पहिले बादशहा अमीर शेख, कादर मुल्ला यांनी मुस्लिम समाजाची अध्यात्माची परपंरा समृद्ध केली. मुस्लिम समाजातील पहिलेच भारतीय हवाई दलात भरती झालेले रसुल शेख यांनी देशभरातील विविध ठिकाणी सेवा करून त्यांच्या राष्ट्रप्रेमाची ओळख करून दिली आहे.
मंगळवेढा तालुक्याने काळाच्या ओघात परिवर्तनाचीप्रगतीची दखल घेतली आहे. त्यामुळे मंगळवेढ्याचे गावपण आणि मोठेपण समृद्ध झाले आहे. सहकाराच्या माध्यमातून अर्थकारणाला चालना मिळाली आहे. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे नाव त्या दृष्टीने घ्यावे लागेल. भाऊसाहेब रुपनर यांचा फॅबटेक शुगरभैरवनाथ शुगरआणि उमेश परिचारक यांचा उटोपियनहे खाजगी तत्त्वावर चालणारे साखर कारखाने; त्यांनीही तालुक्यातील उद्योगाला जनाधार मिळवून दिला आहे. रतनचंद शहा यांनी मंगळवेढा अर्बन बँकेची स्थापना केली. त्यामुळे तालुक्याची आर्थिक पत व कुवत वाढली. मंगळवेढा अर्बन ही आता रतनचंद सहकारी बँक या नावाने विविध शाखांच्या द्वारे कार्यरत आहे. राहुल शहा यांच्याकडे तिचे नेतृत्व आहे. रामकृष्ण नागणे यांच्या नेतृत्वाखाली जिजामाता महिला सहकारी पतसंस्था, शिवाजीराव काळुंगे यांनी स्थापना केलेली धनश्री महिला पतसंस्था, अशोक सुरवसे यांची राजमाता महिला सहकारी बँक; तसेच, विविध पतसंस्था स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेच्या बरोबरीने सहकाराची पत सिद्ध करत आहेत.
मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ला, काशी विश्वेश्वर मंदिर, महादेवाची विहीर, ज्योतिबा माळावरील मंदिरे, गैबीसाहेब दर्गा या इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या वास्तू. पुष्कर येथील ब्रह्मदेवाच्या मूर्ती नंतर किल्ल्यापाठीमागील महादेव विहिरीत आहेत. भारतातील एकमेवाद्वितीय ती ब्रह्मदेवाची मूर्ती सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद काळ्या पाषाणात कोरलेली आहे. त्याशिवाय महिषासूर मर्दिनी, तीर्थकर यांच्या मूर्ती तेथे आढळतात. मंगळवेढ्यातील हेमाडपंथी काशीविश्वेश्वराच्या देवळाची निर्मिती शके १४९४ च्या पूर्वी काही दशके झाली असावी असे अनुमान राजवाडे यांनी काढले आहे. ते मंदिर कलाकुसरीने नटलेले आहे, शिलालेखांनी भरलेले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार मंगळवेढ्याच्या मुजुमदाराने केला. औरंगजेब दर शुक्रवारी मंगळवेढ्यास जुम्मा मशिदीमध्ये नमाज पडण्यासाठी येत असे. औरंगजेबाने त्याच्या बेगम नावाच्या मुलीचे नाव कायम स्मरणात राहवे म्हणून तिच्या मृत्यूनंतर बेगमपूर गावाची निर्मिती केली.
मंगळवेढ्याची जमीन काळी कसदार आहे. मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे – मंगुड्याचे कसदार दाणे आजही गातात गावमहतीचे गाणे हे कवन सर्वत्र प्रचलित आहे. मंगळवेढ्याच्या ज्वारीला गेल्या काही वर्षांत जागतिक स्थान लाभले आहे.
मंगळवेढ्याचे नागरिक गणपती उत्सव, शिवजयंती उत्सव, आंबेडकर जयंती, दिवाळी, शारदा उत्सव, रमजान ईद, बकरीईद, मोहरम अशा सणसमारंभांत व गैबीपीर यांच्या उरुसात उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे तेथे अद्यापपर्यंत कधीही जातीय दंगलच काय जातीय तणावदेखील निर्माण झालेला नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून प्रशासनाच्या विविध उच्च पदावर कार्यरत असलेले  अभयसिंह मोहिते, अजित शिंदे, जितेंद्र शिकतोडे यांच्यासह अनेक जण स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत. विश्वनाथ शिंदे यांनी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी अॅकॅडमी मंगळवेढ्यात स्थापन केली आहे.
गायक प्रल्हाद शिंदे आणि त्यांची मुले आनंदमिलिंद शिंदे हे त्याच गावचे. मॅरेथॉन स्पर्धा आतंरराष्ट्रीय स्तरावर जिंकणारी खेळाडू भाग्यश्री बिले, पैलवान हिदायत काझी, पैलवान मारुती वाकडे आणि राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रा. येताळ भगत या मंडळींनी मंगळवेढ्याचे नाव राज्यापासून जागतिक स्तरापर्यंत विविध पातळींवर पोचवले आहे. कवी सुरेश शिंदे, शिवाजी सातपुते, इंद्रजित घुले, रानकवी लक्ष्मण दुधाळ आणि प्रकाश झडे हे मंगळवेढ्याची साहित्यपरंपरा जोपासून आहेत.मंगळवेढ्यात दैनिक दामाजी एक्सप्रेस, साप्ताहिक सूर्यनारायण ही वृत्तपत्रे आहेत. दिगंबर भगर, औदुंबर ढावरे यांचा दबदबा मंगळवेढ्यात जाणवतो. प्रभाकर पंडित, महादेव वेदपाठक, नेहरवेसर, बघरेगुरुजी ही पत्रकार मंडळी साऱ्या गावावर नजर ठेवून असतात. त्याशिवाय गुणवान अशी अनेक मंडळी मंगळवेढ्यात आहेत. उदाहरणार्थ – अमिताभ बच्चन यांचे कट्टर फॅन नामदेव कटारे, जन्मजात आंधळे पण विहिरीत पडलेली घागर-बादली-भांडी वर काढणारे पैगबंर शेख, खमंग चिवड्याचे बादशहा चिवडेवाले, हजरत गैबी पीरच्या कळसाला कलई करणारे भगवान तांबट, येळकोट येळकोट जय मल्हारम्हणत दिमडीच्या तालावर वाघ्या मुरळीला नाचवणारे सदानंद अवघडे, सामाजिक कार्यात अग्रेसर श्रीरंग काटे, ग्रंथपाल अशोक राजगुरु.
इंद्रजित घुले 9423060112
– सिद्धेश्वर घुले 9423332502
– महंमद शेख 9881026798

———————————————————————————————-————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here