चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी (Ramdegi)

_Ramdegi_1.jpg

रामदेगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य पण फार परिचित नसलेले ठिकाण. रामदेगी वरोरा तालुक्यात आहे. आनंदवनापासून शेगाव बुद्रुक हे आठवडी बाजाराचे गाव ओलांडले, की पुढे चारगाव धरण लागते. चारगाव धरण पाहण्यासारखे आहे. त्या तलावातून इरई नदीचा उगम झालेला आहे. इरई नदीच्या प्रवाहाचे पाणी पुढे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. तलावात मगरी व मोठे मासे आहेत. तेथे मासेमारीचा उद्योग चांगला तेजीत असतो. गुजगव्हाणहून रामदेगीला जात असताना ‘चंदई नाला’ पडतो त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधलेला आहे. पावसाळ्यात पाणी असताना त्या परिसरात गहू, हरभरा, झेंडूची फुले यांची पिके घेतात. तेव्हा तो परिसर अमिताभच्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘ये कहा आ गये हम…’ ची वा ‘देखा एक ख्वाब तो…’ या गाण्यांची आठवण करून देतो.

रामदेगीला रानातून कच्च्या रस्त्याने तीन-चार किलोमीटर अंतर कापून पोचता येते. रामदेगी स्थानाविषयी निरनिराळ्या प्रकारच्या आख्यायिका आहेत. रामदेगी हे ऋषिमुनींच्या तपश्चर्येचे ठिकाण होते. त्या ठिकाणी ताडोबा नावाच्या राक्षसाची गुंफा होती असे म्हणतात. प्रभू रामचंद्राने ताडोबा या दैत्याचा पराभव करून ऋषिमुनींना संरक्षण दिले. त्या ठिकाणी रामाने शिवलिंगाची स्थापना केली म्हणून त्या ठिकाणाला ‘रामदेगी’ असे नाव पडले, म्हणे !

रामदेगीचा परिसर हा ताडोबा अभयारण्याचा भाग आहे. ते 1955 साली निर्माण करण्यात आले. ताडोबा अभयारण्यात साग, बांबू, घावडा, बिबळा, मोह, तेंदू, खैर या प्रकारच्या वृक्षांची दाटी आढळते. अभयारण्याचे ‘ताडोबा’ हे नाव वाघाबरोबरच्या झुंजीत मरण पावलेल्या ‘तारू’ या स्थानिक आदिवासी टोळीप्रमुखाच्या नावावरून पडलेले आहे.

रामदेगीमध्ये जूने देवस्थान आहे. देवस्थानामध्ये चार फूट उंचीची पितळेची शंकराची मूर्ती आहे. त्या ठिकाणी राम, लक्ष्मण, सीता, बजरंगबली, शिव यांचीही मंदिरे आहेत. ‘रामदेगी जमनागड’ नावाची टेकडी आहे. टेकडीवर जमनामातेचे मंदिर आहे. जमनागडापासून उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर रामचंद्राच्या विश्रांतीचे ठिकाण आहे. ते ‘भिमणचाप्रा’ या नावाने ओळखले जाते. तेथे एका उंचवट्यावर रथाची रेघ चापट दगडावर उमटली आहे. वनवासाच्या काळात राम सीता तेथे वास्तव्यास होते. टेकडीवर वाघाच्या दर्‍या, गुहा आहेत. उंचवट्यावर तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे. शिवमंदिराजवळ सीतेच्या न्हाणीचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी गाईच्या तोंडाची स्थापना केली आहे. त्यामुळे त्या ठिकाणाला ‘गायमुख’ असेही संबोधतात. त्या ठिकाणी जमिनीतून पाण्याच्या झर्‍याचा उगम झालेला दिसतो. निसर्गाच्या कलात्मकतेमुळे निरनिराळ्या बाबी त्या ठिकाणी आढळतात. त्यांचाच आधार (वा फायदा) घेऊन आख्यायिका निर्माण केल्या जातात.

भीमणचोप्रा नावाचा सपाट दगड असून, तो पहाडाचाच भाग आहे. नैसर्गिक रीत्या, त्याचा आकार हा बिछान्यासारखा दिसतो. त्यामुळे त्याला प्रभू रामचंद्राचे विश्रांतीचे ठिकाण म्हणून नाव पडले असावे.

जमनाबाईचा किल्ला व देऊळ हे मानवनिर्मित आहेत. एका शतकापूर्वी रामदेगीच्या आजुबाजूच्या परिसरातील सर्व शेतकर्‍यांच्या गाई, गुरे त्याच जंगलात पावसाळ्यात चराईसाठी, कायमच्या वास्तव्याने राहत होते. गुरांसोबत गुराखीदेखील जंगलात राहत असत. गुरांच्या संरक्षणार्थ गुराख्यांनी व शेतकर्‍यांनी परकोट तयार केला. त्यात गुरे, गुराखी रात्री मुक्कामाला असत. वाघ, लांडगे, चित्ते यांसारख्या जंगली श्वापदांपासून गुरांचे रक्षण व्हावे म्हणून परकोट बांधत. गुराख्याचे काम बहुधा आदिवासी गोवारी यांच्याकडे असे. त्यांनी जमनाबाई देवीच्या मूर्तीची स्थापना केली.

निसर्गाची सौंदर्यांची उधळण त्या ठिकाणी मुक्त हस्ताने घडून आलेली आहे. वर्षभर वाहणारा ओढा हे तेथील खास आकर्षण आहे. परिसर शांत आहे. फक्त पक्ष्यांचा किलकिलाट आहे.

_Ramdegi_2.jpgओढ्याच्या प्रवाहात सहा कुंडे आहेत. पावसाळ्यात सहाही कुंडांचे पाणी धबधब्यासारखे सातव्या कुंडात सांडत असते. ते मनोहर दृश्य अनुभवणे हा आनंद वेगळाच असतो. सीताकुंडामध्ये तर तीन खाटांची दोरीसुद्धा पुरत नाही इतके ते खोल आहे असे म्हणतात. त्या ठिकाणी औदुंबराचे झाड आहे. त्याचा परीघ बारा व्यक्तींनी एकमेकांच्या हाताला हात धरल्यानंतर होणार्‍या घेराइतका आहे.

उंचच उंच हिरवे वृक्ष सर्वत्र स्वागत करत असतात.

तेथे पक्का रस्ता नाही, वीज नाही, शहरीकरण नाही म्हणून प्रदूषणही नाही. नैसर्गिक सौंदर्य त्यामुळे जपून ठेवले गेलेले दिसते. तेथे जाताना वाघाच्या गोष्टी ऐकल्यामुळे सतत भीतीच्या गूढ दडपणाखाली वावरत त्या परिसरात फिरणे हे एक वेगळेच ‘थ्रील’ असते.

या जागेला एक वेगळाच राजकीय सांस्कृतिक संदर्भ आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ नावाचे पाक्षिक चालवले होते. बाबासाहेबांनी शतकानुशतके अन्याय होत असल्यामुळे मुक्या राहिलेल्या लोकांची त्या पाक्षिकाद्वारे वाचा जागी केली. त्याचे प्रतीक म्हणून दरवर्षी 30 व 31 जानेवारीला विदर्भातून हजारो बौद्ध बांधव त्या ठिकाणी येतात. त्यावेळी बौद्ध बांधव धम्माच्या प्रसारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात. पाक्षिक 31 जानेवारी 1920 रोजी सुरू केले. त्याची अशी स्मृती.

रामदेगीला बौद्ध बंधुभगिनी ‘संघरामगिरी’ असे संबोधतात. त्यांनी तेथे दूर उंच टेकडीवर सुंदर विहार बांधला आहे. तेथे बौद्ध भिक्खू नेहमीकरता वास्तव्याला असतात. आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळात ‘वर्षावास’ चालतो. सध्या तर इतर देशांतील भिक्खूसुद्धा वर्षावासासाठी तेथे येत असतात.

बौद्ध भिक्खूंनी जंगलातील वृक्ष-वेलींचा वापर करून एक काढा तयार केला. त्या काढ्यामुळे वात, कमजोरपणा इत्यादी आजारांना आळा बसतो.

भगवान बुद्धाच्या काळात भिक्खू कसे जीवन जगत असतील ते रामदेगी वा संघरामगिरीला आल्यावर कळते.

– श्रीकांत पेटकर

About Post Author

Previous articleको-हाळे (Korhale)
Next articleतुर्भे बुद्रुक (Turbhe Budruk)
श्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (MSEB) कंपनीत पडघे (तालुका भिवंडी) येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. पेटकर यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या वीज केंद्रास सलग तीन वर्षे उत्कृष्ट वीज केंद्राचा पुरस्कार मिळाला. त्यांना लेखनाची आवड असून त्यांची ‘आणि मी बौद्ध झालो‘ या अनुवादित पुस्तकासोबत कल्याण, शांबरीक खरोलिका, चांगुलपणा अवतीभोवती, बेहोशीतच जगणं असतं, गजल अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्यांच्या चित्रांची दोन प्रदर्शने भरली होती. त्यांना ‘कल्याण रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

6 COMMENTS

  1. इथे नागपुर/ चंद्रपुर हुन कसे…
    इथे नागपुर/ चंद्रपुर हुन कसे जाता येईल ? पर्यटकां करिता खान्या पिण्याची व राहण्याची सोय आहे काय ? तसेच स्थळा पर्यन्त वाहन जातात काय…

  2. चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी…
    चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी या गावाचे निसर्गरम्य वर्णन वाचताना मी जणू रामदेगी वा संघरामगिरीला प्रतेक्षात गेल्यासारखे वाटले. महराष्ट्रात आशी लपलेली ठिकाणे श्रीकांत पेटकर सर याच्यामुळे वाचायाला मिळत आहेत.
    VERY NICE.

  3. रामदेगी हे ठिकाण चिमूर या…
    रामदेगी हे ठिकाण चिमूर या तालुक्यात आहे . एवढीच सुधारणा हवी ..वरील लेखात .
    thanks.

  4. रामदेगी चे अप्रतिम वर्णन…
    रामदेगी चे अप्रतिम वर्णन केले आहे, वाचताना असे वाटते आपण त्याच परिसरात वावरतोय

  5. रामदेगी मुळे शेगाव चे नाव…
    रामदेगी मुळे शेगाव चे नाव प्रचलित झाले. सरकार ने या पर्यटन स्थळाचा अजुन विकास करायला पाहिजे.

Comments are closed.